You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शराबी सिनेमाची 40 वर्षे : अमिताभ बच्चन यांच्या हाताची जखम जेव्हा तरुणांमध्ये 'स्टाईल' म्हणून झाली प्रसिद्ध
- Author, वंदना
- Role, सिनियर न्यूज एडिटर
भारतीयांवर अनेक दशकांपासून बॉलीवूड चित्रपटांचं गारुड आहे. अमिताभ बच्चन यांना तर महानायक म्हटलं जातं. त्यांचा शराबी हा चित्रपट प्रचंड मोठा हिट झाला होता. या चित्रपटातील गाणी, संवाद, अभिनय सर्वकाही लोकांच्या पसंतीस उतरलं. या चित्रपटाला 40 वर्षे पूर्ण होत असताना, त्याच्या अनेक आठवणींवर चर्चा केली जाते.
"माझ्या लग्नाच्या दिवशी मी पांढरा सूट घातला होता आणि माझा उजवा हात सतत माझ्या पॅन्टच्या खिशात असायचा. कारण 'शराबी' चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या स्टाईलची मी नक्कल करत होतो."
कानिश साहीम शराबी चित्रपटाशी संबंधित आठवण फेसबूकवर अशा पद्धतीनं मांडतात.
18 मे 1984 ला प्रदर्शित झालेल्या 'शराबी' चित्रपटाला 40 वर्ष पूर्ण झाली आहेत. चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी विकी नावाच्या दारुड्या व्यक्तीची भूमिका केली होती.
"राय साहब अमरनाथ कपूर...विकी आज यतीम हो गया. उसके सर से उसके बाप का साया उठ गया. आज मेरा बाप मर गया."
शराबी या चित्रपटात विकी म्हणजे अमिताभ बच्चन ज्या आवेशानं आणि आक्रमकतेनं, अमरनाथ कपूर या स्वतःच्या जिवंत पित्याबरोबर म्हणजे प्राण यांच्याबरोबर हा संवाद बोलतात, तेव्हा लक्षात येतं की चित्रपटाचं नाव भलेही शराबी असेल, मात्र प्रत्यक्षात ही पिता-पुत्राच्या नात्यातील गुंतागुंत असलेली कथा आहे.
अमिताभ बच्चन-प्रकाश मेहरा यांची जोडी
80च्या दशकात अमिताभ बच्चन आणि प्रकाश मेहरा, दोघेही यशाच्या शिखरावर होते. त्यावेळी अमिताभ बच्चन वर्ल्ड टूरवर गेलेले होते.
दोघेही विमानानं न्यूयॉर्कहून त्रिनिदादला जात होते. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर असं सांगितलं होतं की, प्रकाश मेहरा यांनी मला आपण पिता-पुत्राच्या नात्यावर एक चित्रपट बनवायचा आहे, असं सांगितलं होतं. यात मुलगा दारुचं व्यसन असलेला असेल, असं त्यांनी सांगितलं होतं. अटलांटिक महासागरावरून जवळपास 35,000 फूट उंचीवरून विमान जात असताना अशाप्रकारे त्यांनी कथा ऐकवली होती.
या जोडीनं यापूर्वी जंजीर, हेरा-फेरी, खून पसिना, मुकद्दर का सिकंदर, लावारीस, नमक हलाल हे चित्रपट केले होते.
हाताची जखम बनली स्टाईल
शराबी चित्रपटात अमिताभ बच्चन नेहमी एक हात पॅन्टच्या खिशात ठेवत असत आणि दुसऱ्या हातानं हातवारे करत असत. त्यांची ही स्टाईल अत्यंत प्रसिद्ध झाली होती.
प्रत्यक्षात ही स्टाईल नव्हती तर त्या दिवसांमध्ये अमिताभ बच्चन यांच्या हाताला जखम झाली होती. दिवाळीला बॉम्ब फोडताना त्यांचा हात गंभीररित्या भाजला होता.
शराबी चित्रपटातील 'दे दे प्यार दे' या गाण्याच्या शूटिंगबद्दल जया प्रदा यांनी इंडियन आयडल या टीव्ही कार्यक्रमात सांगितलं होतं की, "अमिताभ बच्चन खरंच महान आहेत. शराबी चित्रपटाच्या वेळेस त्यांचा हात भाजला होता. मात्र अमिताभ बच्चन यांनी भाजलेला हात, स्टाईल म्हणून खिशात ठेवून, एक रुमाल बांधून, गाण्याचे शूटिंग केले होते."
ट्वीटमध्ये अमिताभ यांनी लिहिलं होतं की "माणसाच्या शरिरातील विविध अवयवांपैकी बोटांना पूर्ववत करणं खूप कठीण काम आहे. दिवाळीत बॉम्ब फुुटल्यामुळं माझा हात गंभीररित्या भाजला होता. त्यामुळं अंगठा बोटांच्या दिशेनं हलवण्यासाठी मला दोन महिने लागले."
शराबी चित्रपटाच्या यशाबद्दल चित्रपट समीक्षक अर्णब बॅनर्जी म्हणाले की, "काही अपवाद वगळता त्यावेळी सर्वसाधारणपणे चित्रपटाचा नायक प्रचंड दारुडा दाखवलं जात नव्हतं. खलनायकानं त्याला नकळत दारू पाजल्याचं दाखवलं जायचं."
"नायक नैतिकता पाळणारा आणि अतिशय साधा-सरळ असायचा. तो गाणी गायचा, समाज आणि कुटुंबाबद्दलच्या जबाबदाऱ्या पार पाडायचा. शराबी चित्रपटात मात्र नायक दारुडा होता. अशा व्यक्तीला चांगलं मानलं जात नसे, तरीही लोकांची सहानुभूती नायकासोबत होती. कारण तो नेहमीच नशेत बुडालेला असला तरी, तो प्रत्येक टप्प्यावर त्याची माणुसकी दिसायची."
अमिताभ बच्चन यांचे स्टारडम
शराबी ही एका श्रीमंत, बिघडलेल्या पण चांगलं मन असलेल्या तरुणाची कथा होती. या माणसाकडं वडिलांची प्रचंड संपत्ती आहे, मात्र बापाचं प्रेम नाही. तरीही तो आयुष्यावर आणि स्वत:वर हसणं विसरलेला नाही.
भूमिकेत खूप ट्रॅजेडी, भावनिकता, नाट्य, विनोद आहे. टाळ्या मिळवणारे प्रचंड दमदार संवाद आहेत. मनाला स्पर्श करून जाणारे भावनाशील क्षण या चित्रपटात आहेत. अभिनयाचे इतके विविध पैलू एकाच वेळी अत्यंत उत्कट अभिनयाद्वारे सादर करून अमिताभ यांनी या भूमिकेत कमाल केली होती.
चित्रपट समीक्षक अर्णब बॅनर्जी म्हणतात की, शराबी चित्रपटात अमिताभ यांच्या भूमिकेत नकारात्मक आणि सकारात्मक असे दोन्ही पैलू होते.
तुम्ही अमिताभ बच्चन यांचे फॅन असाल तर तुम्हाला कल्पना असेल की त्यांनी इतर अनेक उत्तम चित्रपटांमधून अधिक उत्तम भूमिका केल्या आहेत. शराबी चित्रपटातील छायाचित्रण काही खूपच अफलातून नाही. इथं कोणतंही उपकथानक नाही. जुन्या धाटणीची मेलोड्रामा असलेली पटकथा आहे. मात्र 'वन मॅन शो' असल्याप्रमाणं अमिताभ बच्चन यांनी अभिनयाच्या जोरावर हा चित्रपट यशस्वी केला आहे.
शराबी चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे अमिताभ बच्चन राजकारणात जाण्याआधीच्या काळातील तो अमिताभच्या शेवटच्या हिट चित्रपटांपैकी एक आहे.
किशोर कुमार यांनी टेबलावर लोळून गायलं - 'इंतेहा हो गई..'
80 चं दशक जसं अमिताभ बच्चन यांचं होतं, तसंच ते किशोर कुमार यांचंदेखील होतं. याचा अंदाज तुम्हाला यावरून येऊ शकतो की, 1985 च्या फिल्मफेअरमध्ये सर्वोत्तम पार्श्वगायनासाठीची चारही नामांकन किशोर कुमार यांनाच होती.
त्याहून मजेशीर गोष्ट म्हणजे, सर्व नामांकनं शराबी चित्रपटातील गाण्यांसाठी होती. ही गाणी दे दे प्यार दे, मंजिले अपनी जगह है, लोग कहते हैं आणि इंतेहा हो गई.. ही होती. किशोर कुमार यांना मंजिले अपनी जगह है या गाण्यासाठी पुरस्कार मिळाला होता. मात्र आज आपण इंतेहा हो गई.. या गाण्याबद्दल बोलूया.
आशा भोसले यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर सांगितलं होतं की, "प्रकाश मेहरा, बप्पी लाहिरी...आम्ही सर्व स्टुडिओमध्ये बसून गाण्यावर चर्चा करत होतो. प्रकाश मेहरा यांनी म्हटलं की, गाण्यात नायक दारू प्यायलेला आहे. तेव्हा किशोर दा म्हणाले-माणूस दारू पितो तेव्हा नीट उभा राहू शकत नाही, तो खाली पडतो किंवा लोळतो. मीही लोळून गाणं गाईन. एक लांब टेबल घेऊन या."
"नंतर किशोर कुमार खरोखरंच टेबलवर झोपले. हातावर डोकं टेकवून ते गाणं रेकॉर्ड करू लागले. हे गाणं होतं, 'इंतेहा हो गई, इंतजार की...हाय...' या 'हाय' मुळं सर्व गाण्याचा नूरच पालटला. त्या 'हाय' मध्ये किशोर कुमारांनी ज्या पद्धतीनं भावना प्रकट केल्या त्यावरून खरोखरंच वाटतं की त्यांनी दारू प्यायली होती."
बप्पी लाहिरी आणि अमेरिकन बॅंड
चित्रपटाच्या गाण्यांची चर्चा होl आहे तर, संगीत दिग्दर्शक बप्पी लाहिरी यांच्याबद्दल बोलणंदेखील महत्त्वाचं आहे. शराबी चित्रपटासाठी बप्पी लाहिरी यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तर गीतकार अंजान यांना देखील चित्रपटातील गाण्यांसाठी नामांकन होतं.
'इंतेहा हो गई..' या गाण्यामध्ये नायिका जया प्रदा पायऱ्यांवरून पळत येते. गाण्यातील त्या प्रसंगाची धून तुम्ही ऐकली तर त्यात अमेरिकन बॅंडच्या 'रनर' या एका गाण्याशी साम्य असलेलं जाणवेल. 'द थ्री डिग्रीज' नावाचा हा बॅंड काही अमेरिकन महिलांनी एकत्र येऊन बनवला होता. 'द रनर' नावाचं गाणं 1978 मध्ये आलं होतं.
1984 मध्ये आलेल्या शराबी चित्रपटात आणखी एक प्रसिद्ध गाणं आहे. ते म्हणजे, 'जहॉं चार यार'. 1980 मध्ये आलेल्या कोशाई या बांग्लादेशी चित्रपटातील 'बॉन्धू तीन दिन' हे रुना लैला यांनी गायलेलं गाणं जर तुम्ही ऐकलं असेल तर 'जहॉं चार यार' या गाण्याची चाल एकदम मिळती जुळती आहे.
बांग्लादेशी गाण्याची ही चाल तेथील ज्येष्ठ संगीतकार अलाउद्दीन यांनी संगीतबद्ध केली होती. अलाउद्दीन यांच्या मुलीनं बीबीसीला सांगितलं की त्यांच्या वडिलांची ही चाल मोलाची आहे.
कादर खान यांचे संवाद
प्रेक्षकांची नस ओळखणाऱ्या कादर खान यांनी शराबी चित्रपटासाठी असे संवाद लिहिले की त्यावर टाळ्या मिळणं आणि ते लोकांना आवडणं निश्चित होतं.
उदाहरणार्थ दारूच्या नशेत अमिताभ बच्चन आपले वडील प्राण यांना म्हणतात, ''आपने मुझे वो सब कुछ दिया जिसे बाज़ार से खरीद कर घर में सजाया जा सकता है. मगर वो सुख नहीं दिया जिसे दिल में सजाया जा सके"...यावरून तुम्ही चित्रपटगृहात वाजणाऱ्या टाळ्यांचा अंदाज लावू शकता.
"आज इतनी भी मयस्सर नहीं मयख़ाने में, जितनी हम छोड़ देते थे पैमाने में", "जिनका अपना दिल टूटा होता है, वो औरों के दिल नहीं तोड़ा करते." अशा अफलातून संवादांची शराबीमध्ये रेलचेल आहे.
कादर खान यांनी अमिताभ बच्चन यांच्या अनेक हिट चित्रपटांचे संवाद लिहिले आहेत आणि ते आजदेखील लोकप्रिय आहेत.
'मूँछें हों तो नत्थूलाल जैसी हों'
संवादां बरोबरच शराबी चित्रपटात इतर मजेशीर पात्रांनी देखील रंगत आणली होती. या चित्रपटातील एक लोकप्रिय पात्र होतं नत्थूलाल. ही भूमिका मुकरी यांनी केली होती.
'मूँछें हों तो नत्थूलाल जैसी हों'- हा संवाद आजदेखील अनेक मीम्समध्ये तुम्हाला दिसून येईल. बेताची उंची आणि विनोदाचं उत्तम टायमिंग असणारे मुकरी मुरलेले कलाकार होते. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ते जवळपास 10 चित्रपटांमध्ये दिसले होते.
या चित्रपटात पित्याची भूमिका प्रसिद्ध अभिनेते प्राण यांनी केली होती. तर वडिलांचं प्रेम विकीला देणाऱ्या आणि त्याचं संगोपन करणाऱ्या व्यक्तीची म्हणजे 'मुंशी' जी ची भूमिका प्रसिद्ध अभिनेते ओमप्रकाश यांनी केली होती. त्यांनी या चित्रपटात अमिताभला उत्तम साथ दिली होती. तर अहंकारी पित्याची भूमिका निभावणाऱ्या प्राण यांचा अभिनय देखील लोकांच्या पसंतीस उतरला होता.
'सरगम', 'कामचोर' आणि 'तोहफा' या चित्रपटांमधून अभिनेत्री जया प्रदा तेव्हा प्रसिद्ध झाली होती. चित्रपटात एका स्वाभिमानी कलाकाराची जया प्रदा यांनी केलेली भूमिकादेखील लोकांना आवडली होती. जेव्हा अमिताभ बच्चन जया प्रदा यांच्या शो ची सर्व तिकिटे विकत घेऊन एकटेच तो पाहायला येतात, तेव्हा जया प्रदा त्यांना बाणेदारपणे म्हणते की- 'कलाकार सिर्फ़ तारीफ़ का भूखा होता है पैसों का नहीं.'
या चित्रपटातील एक भाग मला खूप आवडतो त्याबद्दल सांगते. शराबी चित्रपटात विकी म्हणजे अमिताभ बच्चन आपलं दु:खं शायरीच्या रुपात व्यक्त करतो. मात्र विकीचे गुरू मुंशीजी म्हणजे ओमप्रकाश यांना नेहमीच वाटतं की, अमिताभ यांच्या शायरीमध्ये फार दम नाही.
अनेकदा यावर बोलल्यावर विकी तक्रार करतो की "शायरी में रदीफ़ पकड़ते हैं तो काफ़िया तंग पड़ जाता है. काफ़िये को ढील देते हैं तो वज़न कम पड़ जाता है. ये वज़न मिलता कहाँ है."
त्यावेळी उर्दू शायरी आणि गजल यांच्यातील बारकाव्यांचं मला फारसं ज्ञान नव्हतं. शराबी चित्रपटातील या संवादामुळं शेरो-शायरी, रदीफ आणि काफिए सारख्या शब्दांशी माझी ओळख झाली.
शराबी चित्रपटामुळंच मला लहान वयात कळालं की रदीफ काय असतं. गजल च्या प्रत्येक शेर संपतो तेव्हा त्याच्या अखेरीस येणाऱ्या एकसारख्या शब्दांना रदीफ म्हणतात.