बॉलिवूडमधला पहिला किसिंग सीन, चार मिनिटांचं चुंबनदृश्य म्हणून चर्चा झाली, पण...

    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

एक सुंदर राणी...जमिनीवर बेशुद्ध पडलेला तिचा प्रियकर...त्याला शुद्धीवर आणण्यासाठी ती झुकून ‘किस’ करते. बॉलिवूडमधला हा ‘किस’ भारतीय सिनेमा विश्वातली एक दंतकथाच बनून राहिला.

1933 साली रिलीज झालेल्या 'कर्मा' चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री देविका राणी आणि हिमांशु राय यांनी एका दांपत्याची भूमिका केली होती. याच चित्रपटातला हा किसिंग सीन होता.

बॉलिवुडमधलं पहिलं चुंबनदृश्य, बॉलिवूडमधला सर्वांत मोठ्ठा किसिंग सीन आणि बरंच काही....या दृश्याबद्दल भरपूर लिहिलं गेलं आहे.

पण या सगळ्यांत किती तथ्य होतं?

त्यावेळेच्या वर्तमानपत्रांमध्ये लिहिलं गेलं होतं की, हे चुंबनदृश्य चार मिनिटांहून जास्त लांबीचं होतं आणि तेव्हापासूनच हा सीन एक मिथक बनला.

हिमांशु राय आणि देविका राणी यांनी 1934 साली बॉम्बे टॉकिजची स्थापना केली. हा भारतातील पहिला व्यावसायिक स्टुडिओ होता. या स्टुडिओने भारतीय सिनेमाच्या सुरवातीच्या दशकांवर मोठा प्रभाव टाकला होता आणि अनेक असे ट्रेंड सुरू केले ज्यांची आजही चर्चा होते.

2020 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात हा ‘किस’ आणि या दांपत्याच्या आयुष्यातील उलथापालथ यावर लिहिलं गेलं आहे.

द लाँगेस्ट किस : द लाइफ अँड टाइम्स ऑफ देविका रानी या पुस्तकाला भारतीय सिनेमावरील सर्वोत्कृष्ट पुस्तकासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे.

या पुस्तकाच्या लेखिका किश्वर देसाई सांगतात की, “हा सिनेमा हिमांशू राय आणि देविका राणी यांच्या लग्नानंतर तातडीने बनला होता. ते अगदीच एकमेकांच्या प्रेमात होते. त्यामुळे जेव्हा असा हा भावनात्मक ‘किस’ चित्रित केला गेला, तेव्हा कोणाला फार वावगं वाटलं नाही.”

त्या सांगतात, “त्यावेळी भारतीय सिनेमासाठी किसिंग सीन ही काही नवीन गोष्ट नव्हती. कारण तेव्हा भारतावर ब्रिटीशांचाच अंमल होता आणि बहुतांश चित्रपट परदेशी प्रेश्रकांसाठी बनवले जायचे. 1920 आणि 1930 च्या दशकात तयार झालेल्या काही चित्रपटांमध्ये किसिंग सीन असायचे.

त्यांच्या मते, त्याकाळच्या बहुतांश चित्रपटांप्रमाणे 'कर्मा'मध्येही आशियाई संस्कृती उत्तमरीतीने सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

63 मिनिटांचा हा सिनेमा ब्रिटीश फिल्ममेकर जेएल फ्रियर हंट यांनी दिग्दर्शित केला होता आणि या सिनेमात राजेशाही महाल तसंच आशियन वैभव दाखवल्याचा दावा करण्यात आला होता.

पाश्चिमात्य प्रेक्षकांना हव्या असलेल्या गोष्टी या सिनेमात मोठ्या प्रमाणावर दाखवल्या गेल्या होत्या. उदाहरणार्थ- भारतीय राजघराण्यातील रीतीरिवाज, चित्यांची शिकार, सापांचा जुगवा आणि गारूडी...

'किस सीन' बद्दलचं मिथक

हे चुंबनदृश्य सिनेमाच्या शेवटच्या भागात आहे. कोब्राने दंश केल्यामुळे बेशुद्ध झालेल्या राजकुमाराचं राणी चुंबन घेत आहे.

देसाई सांगतात, “हा ‘किसिंग सीन’ चार मिनिटांचा असल्याचं सांगितलं जातं. पण खरंच तसं नाहीये. हे बॉलिवूडमधलं आतापर्यंतचं सर्वांत दीर्घ चुंबनदृश्यही नाहीये. खरंतर हे एक सलग चुंबनदृश्यच नाहीये, तर वारंवार आवेगाने घेतलेले मुके आहेत.

ही चुंबनांची मालिका सलग जोडली तरी दोन मिनिटांहून अधिक मोठं हे दृश्य होणार नाही.”

त्याकाळचा विचार करता हा सिनेमासाठी 'सेलिंग पॉइंट'ही नव्हता.

“या दृश्याबद्दलचं मिथक नंतर तयार झालं असावं आणि त्यामध्ये वर्तमानपत्रांचं योगदान तर नक्कीच असणार.”

असा उघड प्रणय भारतात अनेक दशकांपासून एक टॅबू होता, मात्र सध्याच्या काही वर्षांत भारतीय सिनेमा याबाबतीत सातत्याने 'बोल्ड' होत आहे.

हॉलिवूडसोबत स्पर्धा करण्याची इच्छा

सेन्सॉर बोर्ड चित्रपटातल्या प्रणयदृश्यांबाबत अधिक सर्तक असायचं आणि त्यामुळेच जुन्या चित्रपटांमध्ये अनेकदा चुंबन दृश्य दाखवताना फुलं किंवा प्रतीकात्मक दृश्य दाखवली जायची.

त्यामुळेच 'कर्मा'चा वारंवार उल्लेख होतो. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या या सिनेमात चुंबन दृश्य चित्रीत केलं गेलं होतं. पण एवढं बोल्ड दृश्य असूनही हा सिनेमा फ्लॉप झाला होता.

किश्वर देसाई सांगतात, “या सिनेमात अभिनेत्री ऑपेरा स्टाइलमध्ये गाताना दाखवली आहे. भारतीय प्रेक्षकांसाठी हे नवीन होतं.”

त्या पुढे सांगतात, “हा सिनेमा बनवताना किंवा त्यातल्या या दृश्यामागे सवंग लोकप्रियतेची अपेक्षा नव्हती, तर मुंबईतून जागतिक दर्जाचा सिनेमा बनवला जाऊ शकतो हे जगाला दाखविण्याची ईर्षा होती.”

देसाई यांच्या मते, “त्यावेळी हिमांशु राय यांची युरोपमध्ये खूप क्रेझ होती आणि उदयोन्मुख कलाकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण ते आधी एक व्यावसायिक होते.

मुंबईत एक स्टुडिओ सुरू करण्याचा ते पहिल्यापासूनच विचार करत होते. ‘कर्मा’सारखा चित्रपट बनवून ते जगावा संदेश देऊ पाहत होते की, भारतातही हॉलिवूडच्या दर्जाचा सिनेमा बनू शकतो.”

हे स्वप्न साकार करण्यासाठी ब्रिटीश किंवा पारशी समुदायासारख्या सधन लोकांनी यात पैसा गुंतवणं गरजेचं होतं. पारशी लोकांचं राहणीमानही पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणेच होतं.

इथेच देविका राणींची मदत झाली. त्या रवींद्रनाथ टागोरांच्या नातेवाईक होत्या. वयाच्या नवव्या वर्षापासून त्या इंग्लंडमध्ये राहिल्या होत्या आणि शिक्षण पूर्ण केलं होतं. त्या खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटन होत्या.

परदेशात प्रसिद्धी आणि नात्यामध्ये दुरावा

आपल्या पुस्तकात देसाई सांगतात की, 'कर्मा'ची स्क्रिनिंग लंडनमधल्या मार्बल आर्च थिएटरमध्ये खूप धुमधडाक्यात झाली.

या शो साठी ब्रिटनमधल्या अनेक श्रीमंत घराण्यातील लोकांनी उपस्थिती लावली. हा चित्रपट पाहायला किंग पंचम जॉर्ज आणि महाराणी मेरीसुद्धा उपस्थित होत्या, अशी अफवा पसरली होती.

देसाई सांगतात की, सिनेमाचं खूप कौतुक झालं, विशेषतः देविका राणी यांना. त्या सांगतात, “त्यांचं सौंदर्य आणि अभिनय शैलीचं चित्रपट समीक्षकांनी खूप कौतुक केलं.”

एका वर्तमानपत्रानं लिहिलं, “त्यांच्यासारखी प्रेम करणारी व्यक्ती मिळणं कठीण आहे.” दुसऱ्या एका वर्तमानपत्राने त्यांचे डोळे, आकर्षक चेहरा आणि सौंदर्याबद्दल लिहिलं.

त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि भारतातली ‘एकमेव आंतरराष्ट्रीय कीर्तीची स्टार’ असं बिरूदही त्यांना मिळालं. हॉलिवूड आणि युरोपियन सिनेमातून त्यांना ऑफर आल्या.

पण त्या हिमांशु रायसोबत मुंबईला परत आल्या आणि भारतातील पहिला व्यावसायिक स्टुडिओ स्थापन केला. त्या स्वतः तिथे मेहनत करत होत्या.

त्यांनी एक डझनहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. मोठ्या पडद्यावर अशोक कुमारसोबत त्यांची जोडी खूप गाजली. 'अछूत कन्या'सह त्यावेळच्या अनेक हिट सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं.

एकीकडे ‘भारतीय सिनेमाची फर्स्ट लेडी’ अशी ओळख त्यांना मिळत होती, तर दुसरीकडे हिमांशु रायसोबतच्या नात्यात दुरावा येत होता.

देसाई सांगतात, “त्या खूप मेहनत करत होत्या, पण त्यांना त्याचं श्रेय दिलं जात नव्हतं. हिमांशु यांच्यासोबतच्या नात्यात कडवटपणा आला होता. कारण त्यांचं आधीच एक लग्न झाल्याचं तसंच त्यांना एक मुलगीही असल्याचं देविकाराणींना कळलं होतं.”

हिमांशु राय यांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी त्यांची भेट एक रशियन कलाकार स्वेतोस्लाव रोइरिख यांच्याशी झाली. त्यांनी नंतर विवाहही केला.

देविका राणी यांनी आपल्या नवऱ्याला लिहिलेल्या पत्रांमध्ये हिमांशु राय त्यांच्यासोबत कसं वाईट वागायचे हे लिहिलं होतं. तापाने फणफणत असतानाही त्यांना काम करायला लावायचे.

एका घटनेबद्दल देविका राणींनी लिहिलं आहे, "एकदा हिमांशु राय यांनी त्यांना मारलं आणि त्या फरशीवर कोसळल्या. रक्त यायला लागलं.”

मधुबाला आणि दिलीप कुमार यांना ब्रेक दिला...

त्यांच्या नात्यातला दुरावा तेव्हा वाढला जेव्हा 1936 साली देविकाराणी आपल्या एका सह अभिनेत्यासोबत राहायला गेल्या. मात्र देसाई सांगतात, “जेव्हा त्या परत आल्या, तेव्हा राय यांनी त्यांना मोकळ्या मनाने स्वीकारलं. कारण त्यांची जागा आयुष्यात दुसरं कोणीच घेऊ शकत नव्हता.”

दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर ‘बॉम्बे टॉकीज’वर परिणाम झाला, कारण त्यांच्या जर्मन स्टाफला अटक केली गेली आणि इंग्रजांन त्यांना एका कँपमध्ये ठेवलं.

1940 साली हिमांशु राय यांना नर्व्हस ब्रेकडाऊन झाला आणि त्यांचं निधन झालं. त्यानंतर देविका राणी यांनी प्रोड्युसर म्हणूनच स्टुडिओची सूत्रं हातात घेतली. त्यांनी मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्यासारख्या कलाकारांना ब्रेक दिला आणि अनेक हिट चित्रपट दिले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)