'ज्या व्यक्तीवर मी 9 वर्षांपासून प्रेम करत होते ती माझी चुलत बहीणच निघाली'

    • Author, अंबर संधू आणि मनीष पांडे
    • Role, बीबीसी एशियन नेटवर्क न्यूज

ही सगळी गोष्ट एका फ्रेंड रिक्वेस्टने सुरू झाली होती. ही गोष्ट 2009 ची आहे. तेव्हा किरत यांना बॉबीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. बॉबी हे दिसायला देखणे होते आणि व्यवसायाने हृदयरोगतज्ज्ञ होते.

त्यावेळी किरत अस्सी यांना वाटायचं की त्यांच्या हाती जॅकपॉट लागला आहे. किरत आणि बॉबी एकमेकांसाठी अगदीच अनोळखी नव्हते. दोघंही शीख होते आणि त्यांचे कॉमन मित्र मैत्रिणीही होते.

म्हणून किरत यांनी बॉबी यांची रिक्वेस्ट स्वीकारली होती. दोघांमध्ये ऑनलाइन बोलणं सुरू झालं. ते एकमेकांच्या आयुष्याचा भाग झाले.

लवकरच या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. मात्र वास्तविक परिस्थिती अतिशय भीषण होती. किरत कॅटफिशिंग म्हणजे एका विचित्र फसवणुकीच्या जाळ्यात अडकल्या होत्या.

खरंतर बॉबी आणि किरत एकमेकांना कधीच भेटलेले नव्हते. दोघं एकमेकांशी फक्त इमेलच्या माध्यमातून बोलत होते.

जेव्हाही भेटण्याबद्दल चर्चा व्हायची तेव्हा बॉबी काहीतरी कारणं देत असत. त्यांना चक्करच आली आहे, गोळी मारली आहे किंवा कोर्टात कोणासाठी साक्ष द्यायला जात आहे अशी कारणं द्यायचे.

बॉबी यांचा एखादा निकटवर्तीय या कारणांची पुष्टी करायचा.

सत्य परिस्थिती अतिशय वेगळी होती

कॅटफिशिंगमध्ये एखादी व्यक्ती दुसऱ्या एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचा फोटो, ओळखपत्र किंवा कागदपत्रांचा वापर करतो. त्यानंतर मग एखादं सावज शोधून त्याला मानसिक किंवा आर्थिक नुकसान पोहोचवलं जातं.

जेव्हा नऊ वर्षानंतर बॉबीची कारणं अगदीच थिटी पडू लागली.

त्यानंतर किरत आणि बॉबी प्रत्यक्ष एकमेकांना भेटले. मात्र किरत यांच्यासमोर जी व्यक्ती होती तिला किरत ओळखू शकली नाही.

नऊ वर्षांपासून किरत यांच्या संपर्कात जी व्यक्ती होती ती बॉबी नाही तर त्यांची चुलत बहीण सिमरन होती. या कॅटफिशिंग मागे सिमरनचं डोकं होतं.

‘आपण इतका मूर्खपणा कसा केला?’ असा विचार किरत आता करतात.

पॉडकास्ट सादर करणाऱ्या टॉरटॉइज या कंपनीसाठी ही कहाणी एकदम हिट झाली.

आता या गोष्टीला तीन वर्षं होऊन गेली आहेत. नेटफ्लिक्सने नुकतीच एक डॉक्युमेंट्री प्रसारित केली आहे. त्यात किरत यांनी त्यांचा अनुभव कथन केला आहे.

‘लोकांनी कोणतेही ग्रह करून घेऊ नये’

त्यांची गोष्ट ऐकून असं कसं कोणी फसू शकतं असा प्रश्न स्वाभाविकपणे लोकांना पडू शकतो असं किरत म्हणतात.

बीबीसी एशियन नेटवर्कशी बोलताना किरत म्हणाल्या, “ज्या लोकांना वाटतं की मी मूर्ख आहे त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा हक्क आहे.”

मात्र किरत यांना वाटतं की लोकांनी असे ग्रह करून घ्यायला नको. किंबहुना म्हणूनच त्यांनी आपली गोष्ट सांगण्याचा निर्णय घेतला आहे.

त्या म्हणतात, “मी मूर्ख नाही. अन चूप देखील बसणार नाही. मी अशी व्यक्ती आहे की माझ्यासोबत जे घडलं ते सांगण्याचा मी निर्णय घेतला आहे. मी संघर्षाचा पर्याय निवडला आहे आणि माझ्यासारखे अनेक लोक समोर येतील अशी मला अपेक्षा आहे.”

‘समुदायाप्रति आमच्या काही जबाबदाऱ्या आहेत’

किरत पंजाबी आहेत. त्या म्हणतात की, त्यांच्या अनुभवांबद्दल बोलणं गरजेचं आहे. कारण दक्षिण आशियाई समाजात अशा घटनांबद्दल कोणी बोलत नाही.

त्या म्हणतात, “आपण अशा प्रकारच्या घटनांना खूप घाबरतो कारण आपल्याला वाटतं की आमच्या समुदायाला व्यापक स्तरावर लोक कसे बघतील? त्यामुळे जितके लोक पीडित आहेत, ते शांतच राहतात.”

त्यांना जे सांगायचं आहे ते त्यांच्या वडिलांना योग्य पद्धतीने कळलं आहे असं त्या म्हणतात.

त्या म्हणतात, “काय झालं, कसं झालं हे त्यांना जाणून घ्यायची इच्छा नव्हती. कारण जे झालं तर फार वाईट होतं आणि भयानक पद्धतीने झालं होतं."

"हे फारच दु:खद होतं. माझं माझ्या वडिलांवर प्रेम आहे त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला माहिती आहे. माझे वडील ज्या वातावरणात मोठे झाले ते अतिशय वेगळं होतं," किरत सांगतात.

या बातम्याही वाचा :

किरत या खऱ्या बॉबीशी कधीच बोलल्या नाहीत. अवघड वाटणारा संवाद न करता येण्याची समाजातील मानसिकता त्या पाठीमागे असल्याचं किरत यांना वाटतं.

किरत विचार करतात की त्या जर पंजाबी नसत्या तर त्यांचा अनुभव वेगळा असता का?

किरत म्हणतात, “मी काही वेगळे निर्णय घेतले. कारण आमच्या समाजाप्रति आमच्या काही वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. तसंच आमच्या कुटुंबावरही दबाव आहे.”

‘मी पीडितेची मानसिकता ठेवत नाही’

‘स्वीट बॉबी’शी निगडीत गोष्ट पुन्हा सांगितल्याबद्दल तिला नकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. तरीही त्या म्हणतात की त्या समोर येऊन प्रश्नांचा सामना करतील.

त्या म्हणतात, “तुम्ही मला बघाल तर माझ्याजवळ यायला तुम्हाला भीती वाटणार नाही. जर तुम्हाला माझ्याशी काही वादग्रस्त बोलायचं असेल तर तसंही सांगा. आपण नक्कीच चर्चा करू.”

जेव्हा किरत यांना विचारलं की पॉडकास्ट किंवा डॉक्युमेंट्री निर्मात्यांशी बोलल्यावर त्यांना ही घटना विसरायला मदत झाली का, तर त्यावर त्या म्हणाल्या की निश्चित असं सांगू शकत नाही.

खरंतर सिमरन यांनी डॉक्युमेंट्रीमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव नाकारला होता. त्यांची भूमिका एका अभिनेत्रीने केली होती.

दरम्यान किरत यांनी त्यांच्या चुलत बहिणींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला. तसंच केस संपल्यावर त्यांना नुकसानभरपाई मिळाली आणि सिमरन यांनी माफी मागितली.

शो मध्ये सिमरन यांना समावेश केला आहे.

त्यात ते म्हणाले की, “या प्रकरणात ज्या घटना शाळेत असताना सुरू झाल्या होत्या, त्या घटनांचाही समावेश आहे. पण ते एक खासगी प्रकरण असल्याचं सांगतात. तसंच त्यांच्यावर लावलेल्या आरोपांवर त्या प्रचंड आक्षेप घेतात. कारण त्यांच्या मते ते आरोप निराधार आणि हानिकारक आहेत.”

किरत म्हणतात की त्यांनी सिमरन यांच्यावर गुन्हेगारी कलम लावलेले नव्हते. मात्र जे झालं त्याबद्दल मी सिमरनला जबाबदार ठरवते असं त्या म्हणतात..

किरत म्हणतात, “सिमरन तुरुंगाच्या बाहेर आहे याबद्दल मी अजिबात खूश नाही.”

त्यांच्याविरुद्ध असं का करण्यात आलं याबद्दल त्यांना खरी माहिती कधीच कळणार नाही असं त्यांना वाटतं.

किरत म्हणाल्या, “मला वाटतं की मी खूप आधीच पराभव पत्करला आहे. ती व्यक्ती इतक्या मर्यादेपर्यंत गेली, जे कधीच योग्य नव्हतं. तिने असं करणं का थांबवलं नाही हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. एखाद्या व्यक्तीला दु:खी काय आनंद मिळत होता काय माहिती?”

या प्रश्नांची उत्तरं न मिळाल्याने त्यांना पुढे जाण्यापासून रोखलं नाही. किरत आता आयुष्यात पुढे गेली आहे. त्या पुन्हा डेटिंग करत आहेत.

त्या म्हणतात, “मी खूप कष्ट घेत आहे. आपलं आयुष्य आणि करिअर करण्यासाठी जितके कष्ट घेतले, त्यापेक्षा जास्त कष्ट घेतली आहे. मी पीडितेची मानसिकता घेऊन जात नाही. मी अशी व्यक्ती होणार नाही. मी आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी काम करते आहे.”

'स्वीट बॉबी: माय कॅटफिश नाइटमेअर' ही डॉक्युमेंट्री सध्या नेटफ्लिक्सवर आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.