You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अपहरण, तस्करी, बलात्कार; म्यानमारच्या जंगलातल्या गुप्त सायबर छळछावण्यांची कहाणी
- Author, सुनेथ परेरा आणि इस्सरिया प्रथोंग्याम
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
सूचना : या लेखात लैंगिक हिंसेसह हिंसाचाराच्या घटनांचं वर्णन आहे. काही वाचकांसाठी हे वर्णन त्रासदायक असू शकतं.
"त्यांनी माझे कपडे काढले, मला एका खुर्चीवर बसवलं आणि माझ्या पायांना विजेचे झटके दिले. तो माझ्या आयुष्याचा शेवट असल्याचं त्या क्षणी मला वाटत होतं."
आयटी क्षेत्रात नोकरी करण्यासाठी रवी थायलंडला गेला होता, पण बँकॉकच्या गगनचुंबी इमारतींमधल्या आलिशान कार्यालयात न पोहोचता तो म्यानमारच्या एका निर्जन कंपाउंडमध्ये पोहोचला होता. श्रीलंकेहून थायलंडला आलेल्या 24 वर्षीय रवीची फसवणूक झाली होती.
थायलंडमध्ये त्याचं अपहरण करून त्याला थायलंडच्या माई सॉट या शहरात नेण्यात आलं. त्याची तस्करी करून थायलंड म्यानमार सीमेवरच्या एका नदीपलीकडे त्याला नेण्यात आलं होतं. अपहरणकर्त्यांनी त्याला थायलंड आणि म्यानमारच्या सीमावर्ती भागातल्या या शहरात डांबून ठेवलं होतं.
तिथे ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपैकी एका चिनीभाषिक टोळीला त्याला विकण्यात आल्याचं रवी सांगतो. तस्करी करून तिथे आणण्यात आलेल्या रवीसारख्या तरुणांना या टोळ्यांचे म्होरके त्यांच्यासाठी काम करण्यास भाग पाडतात.
महिलांच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून अमेरिका आणि युरोपात राहणाऱ्या एकल पुरुषांना जाळ्यात ओढण्यासाठी या टोळ्या काम करतात.
यापैकी काही सावजांना हेरून बनावट ट्रेडिंग कंपन्यांमध्ये एक मोठी रक्कम गुंतवायला सांगितलं जातं. आकर्षक आणि तात्काळ परताव्याचं आमिष दाखवून या लोकांची फसवणूक केली जाते.
म्यानमारमधल्या लष्करी सरकारच्या थेट नियंत्रणाखाली नसलेल्या म्यावाड्डी परिसरातील एका जंगलात हे 'सायबर-गुलामगिरी'चं शिबीर चालवलं जात होतं. रवीला तिथेच ठेवलं होतं.
इंटरपोलने दिलेल्या माहितीनुसार आशिया, पूर्व आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि पश्चिम युरोपमधील हजारो तरुण-तरुणींना या आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांचं आमिष दाखवून इथे आणलं जातं.
जे लोक या टोळ्यांचा हुकूम मानत नाहीत, त्यांना मारहाण केली जाते, त्यांच्यावर बलात्कार केले जातात आणि त्यांचा प्रचंड छळ केला जातो.
रवीने बीबीसीला सांगितलं की, "मी त्यांचं ऐकत नव्हतो म्हणून मला 16 दिवस एका कोठडीत डांबण्यात आलं होतं. त्याकाळात त्यांनी फक्त सिगारेटचे तुकडे आणि राख मिसळलेलं पाणी मला प्यायला दिलं."
रवी पुढे म्हणाला की, "मी त्या कोठडीत बंद होतो त्याच्या पाचव्या किंवा सहाव्या दिवशी माझ्या शेजारच्या खोलीत दोन मुलींवर 17 जणांनी बलात्कार केला. हे सगळं माझ्या डोळ्यासमोर घडत होतं."
"त्या दोघींपैकी एक फिलिपीन्सची नागरिक होती. दुसऱ्या पीडित मुलीला कोणत्या देशातून आणलं होतं याची मला खात्री नाही."
तस्करीला बळी पडलेले हे लोक कोण आहेत?
संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, ऑगस्ट 2023 मध्ये बेकायदेशीर जुगार आणि क्रिप्टोकरन्सीशी संबंधित ऑनलाईन गुन्हे करणाऱ्या टोळ्यांमध्ये काम करण्यासाठी 120,000पेक्षा जास्त लोकांना म्यानमारमध्ये तस्करी करून आणलं गेलं. तर कंबोडियामध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकांना हे काम करण्यास भाग पाडलं गेलं.
गेल्या वर्षी इंटरपोलच्या अहवालात लाओस, फिलीपिन्स, मलेशिया, थायलंड आणि काही प्रमाणात व्हिएतनाममध्ये ऑनलाइन गुन्ह्यांसाठीचे अड्डे चालवले जात असल्याचं उघड झालं आहे.
इंटरपोलच्या एका प्रवक्त्याने बीबीसीला सांगितलं की, "आता ही समस्या केवळ प्रादेशिक न राहता ती जागतिक सुरक्षेला धोका बनली आहे. या देशांसोबतच इतरही काही देश यात गुंतलेले आहेत. यापैकी काही देशांमध्ये ऑनलाईन गुन्हेगारीच्या या टोळ्या सक्रिय आहेत, काही देशांमधल्या रस्त्यांचा वापर करून ही तस्करी केली जाते आणि काही देशांमधील नागरिकांना फसवून इथे आणलं जातं. त्यामुळे हा एकट्यादुकट्या देशाचा प्रश्न राहिलेला नाही."
या महिन्याच्या सुरुवातीला, भारत सरकारने जाहीर केले की त्यांनी आतापर्यंत कंबोडियाला तस्करी केलेल्या एकूण 250 नागरिकांची सुटका केली आहे, तर मार्चमध्ये चीनने आपल्या शेकडो नागरिकांना म्यानमारमधील या छावण्यांमधून परत आणलं आहे.
चीन सध्या म्यानमारचे लष्करी सरकार आणि सशस्त्र गट या दोघांवरही अशा छावण्या बंद करण्यासाठी दबाव टाकत आहे.
श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांना म्यानमारमधील चार वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या 56 श्रीलंकेच्या नागरिकांची माहिती आहे. म्यानमारमधील श्रीलंकेचे राजदूत जानका बंडारा यांनी बीबीसीला सांगितलं की त्यांनी म्यानमारच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने आठ जणांची सुटका केल्याचं सांगितलं आहे.
असं असलं तरी या छळ छावण्या चालवणाऱ्यांकडे येणाऱ्या माणसांची कमतरता नाही. अनेक स्थलांतरित कामगारांना जास्त पगाराच्या आरामदायक नोकऱ्यांचं आकर्षण असतं त्यामुळे अशा छावण्यात येणाऱ्यांचा ओघ सुरूच असतो.
दरवर्षी, दक्षिण आशियातले लाखो इंजिनियर, डॉक्टर, परिचारिका आणि आयटी तज्ञ परदेशात काम शोधण्यासाठी स्थलांतर करत असतात.
कॉम्प्युटर तज्ज्ञ असणाऱ्या रवीलाही त्याचा देश सोडून परदेशात जायचं होतं, श्रीलंकेची अर्थव्यवस्था संकटात सापडली होती, त्यातच रवीला कळलं की एक स्थानिक संस्था बँकॉकमध्ये डेटा एन्ट्रीची नोकरी देत आहे.
नोकरी देणाऱ्या संस्थेने रवीला असं आश्वासन दिलं होतं की, या कामासाठी त्याला 1200 डॉलर्स म्हणजेच 3 लाख 70 हजार रुपये मिळतील. नुकतंच लग्न झालेल्या रवी आणि त्याच्या पत्नीने या नोकरीमुळे त्यांना घर बांधता येईल असं स्वप्न बघितलं होतं. त्यामुळे त्यांनी वेगवेगळी कर्जं काढून स्थानिक एजंटला पैसे दिले.
थायलंड ते म्यानमार
2023 च्या सुरुवातीला रवी आणि इतर काही श्रीलंकेच्या नागरिकांना आधी थायलंडला नेण्यात आलं. तिथून त्याला पश्चिम थायलंडमधल्या 'माई सोट' या सीमावर्ती शहरात नेलं गेलं.
रवी म्हणाला की, "आधी आम्हाला एका हॉटेलमध्ये घेऊन जाण्यात आलं आणि त्यानंतर लगेच आम्हाला दोन बंदूकधारी व्यक्तींच्या ताब्यात देण्यात आलं. ते आम्हाला नदीच्या पलीकडे म्यानमारमध्ये घेऊन गेले."
त्यानंतर त्यांना चिनी भाषा बोलणाऱ्या गुंडांच्या शिबिरात हलवण्यात आलं. त्या लोकांनी रवी आणि त्यांच्यासोबतच्या लोकांना एकही फोटो न काढण्याची तंबी दिली होती.
रवी म्हणाला की, "आम्ही भेदरून गेलो होतो. श्रीलंका, पाकिस्तान, भारत, बांगलादेश आणि आफ्रिकन देशांमधून आलेल्या चाळीस पेक्षा जास्त लोकांना बळजबरीने या शिबिरात डांबलं गेलं होतं."
रवी म्हणाला की उंच भिंती आणि काटेरी कुंपणांमुळे तिथून पळून जाणं अशक्य होतं. त्या शिबिराच्या फाटकांवर चोवीस तास सशस्त्र गुंडांचा पहारा होता.
रवीच्या म्हणण्यानुसार, त्याला आणि इतरांना दिवसातून 22 तास काम करावं लागायचं. महिन्यातून एकच सुट्टी दिली जायची. त्यांना एका दिवसात तीन जणांना फसवण्याचं उद्दिष्ट दिलं जायचं.
जे लोक हे काम करायचे नाहीत त्यांना मारहाण केली जायची, त्यांचा छळ केला जायचा. तिथून बाहेर पडण्यासाठी या लोकांकडून मोठी रक्कम उकळली जायची.
ऑगस्ट 2022 मध्ये तिथे महाराष्ट्रातील 21 वर्षांच्या नील विजयला इतर पाच भारतीय लोकांसोबत तिथे आणलं गेलं होतं. नीलने पैसे देऊन तिथून स्वतःची सुटका करून घेतल्याचं रवी सांगतो.
नीलने बीबीसीला सांगितलं की त्याच्या आईच्या बालपणीच्या मैत्रिणीने नीलला बँकॉकमधल्या एका कॉल सेंटरमध्ये नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या बाईने त्यांच्याकडून 1 लाख 50 हजार रुपये उकळले होते.
नील म्हणाला की, "तिथे चिनी भाषा बोलणारे लोक बऱ्याच कंपन्या चालवत होते. आम्हाला त्याच कंपन्यांना विकण्यात आलं होतं."
"तिथे गेल्यावर माझ्या सगळ्या आशा मावळल्या होत्या. माझ्या आईने त्यांना आणखीन पैसे दिले नसते तर इतरांसारखा माझाही छळ करण्यात आला असता."
नीलने हे काम करण्यास नकार दिल्यानंतर त्याच्या कुटुंबाने त्याला सोडवण्यासाठी या टोळीला सहा लाख रुपये दिले. पण तिथे असताना ज्यांनी काम करण्यास नकार दिला किंवा ज्यांना ठरवलेलं उद्दिष्ट गाठता आलं नाही अशा लोकांचा अमानुष छळ झालेला त्याने पहिला.
या टोळ्यांनी नीलची सुटका केल्यानंतर थायलंडच्या अधिकाऱ्यांनी त्याला भारतात पोहोचण्यास मदत केली. नीलच्या कुटुंबीयांनी स्थानिक एजंटच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.
अशा पद्धतीने फसवणूक झालेल्यांची सुटका करण्यासाठी थायलंडचे अधिकारी इतर देशांसोबत मिळून काम करत आहेत. पण थायलंडच्या न्याय मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलं की शेजारील देशांमध्ये सुरु असलेल्या छावण्यांमध्ये जबरदस्तीने ताब्यात घेतलेल्या लोकांच्या संख्येच्या तुलनेत सुटका करण्यात आलेली संख्या खूपच कमी आहे.
थायलंडमधील विशेष तपास विभागाचे (DSI) उपमहासंचालक पिया रक्सकुल म्हणाले, "आम्हाला या गुन्हेगारी टोळ्यांबद्दल जगभरातील लोकांशी संवाद साधण्याची गरज आहे. जेणेकरून ते अशा फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करू शकतील.
मानवी तस्करी करणारे अनेकदा बँकॉकचा वापर तस्करीचे मध्यवर्ती केंद्र म्हणून करतात. कारण भारत आणि श्रीलंकेसह अनेक देशांतील लोक 'व्हिसा ऑन अरायव्हल'चा वापर करून अगदी सहज इथे येऊ शकतात. म्हणून, गुन्हेगार याचा फायदा घेतात आणि नोकरी शोधायला आलेल्यांची तस्करी करतात."
ऑनलाईन फसवणुकीचे घोटाळे कसे केले जातात?
रवीने सांगितलं की, चोरीचे फोन नंबर, सोशल मीडिया आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून पाश्चात्य देशांतील श्रीमंत पुरुषांना लक्ष्य करण्यास त्याला सांगितलं गेलं. या लोकांना फसवण्यासाठी त्यांच्यासोबत आधी रोमँटिक संबंध तयार करण्याच्या सूचना दिल्या गेल्या.
रवी आणि त्याच्यासारखे अनेक लोक ज्यांची फसवणूक करायची आहे अशा पुरुषांना आधी मेसेज करत. अनेकदा हा मेसेज चुकून पाठ्वल्याच सांगून संवाद सुरु केला जायचा. काही लोक या मेसेजकडे दुर्लक्ष करत पण आयुष्यात एकटेपणा अनुभवणारे किंवा लैंगिक साथीदाराच्या शोधात असणारे अनेक लोक या आमिषाला बळी पडत असल्याचं रवीने सांगितलं.
त्यानंतर या छावण्यांमधल्या काही मुलींना आक्षेपार्ह फोटो काढून पाठवण्यास सांगितलं जायचं.
फक्त काही दिवसात शेकडो मेसेजेस पाठवून त्या व्यक्तीसोबत संवाद साधला जायचा. त्यांचा विश्वास मिळवल्यानंतर त्यांना बनावट ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये मोठ्या रकमेची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केलं जायचं.
या बनावट ॲप्सवर नंतर खोटी गुंतवणूक आणि त्यांना मिळालेल्या नफ्याचे आकडे दाखवत असत.
रवीने सांगितलं की, "जर एखाद्या व्यक्तीने 100,000 डॉलर हस्तांतरित केले, तर आम्ही त्यांना 50,000 डॉलर परत करायचो. हा त्यांचा नफा असल्याचं आम्ही त्यांना सांगायचो. यावरून त्यांना असं वाटायचं की आता त्यांच्याकडे एकूण दीड लाख डॉलर आहेत. पण त्यांनी केलेल्या गुंतवणुकीपैकी अर्धेच पैसे त्यांना परत द्यावे लागायचे आणि बाकीचे पैसे आमच्याकडे असत."
फसवणूक झालेल्या लोकांकडून जास्तीत जास्त उकळल्यानंतर त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी वापरण्यात आलेले नंबर आणि सोशल मीडिया प्रोफाईल्स अचानक गायब केले जातात.
या ऑनलाईन फसवणुकीच्या माध्यमातून नेमकी किती रुपयांची उलाढाल केली जाते. हा उद्योग नेमका किती मोठा आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे, पण एफबीआय( FBI)च्या 2023 च्या इंटरनेट क्राईम अहवालात असं आढळून आलं की अमेरिकेत अशा फसवणुकीबाबत 17,000 पेक्षा जास्त तक्रारी दाखल करण्यात आल्या आणि यामुळे एकूण 652 दशलक्ष डॉलर्सचं नुकसान झालं.
पीडित व्यक्तींवर झालेले मानसिक आणि शारीरिक परिणाम
एक महिना बंदी म्हणून राहिल्यानंतर रवीला दुसऱ्या टोळीला विकण्यात आल्याचं त्याने सांगितलं. कारण त्याने सुरुवातीला ज्या कंपनीसाठी काम केले ती कंपनी दिवाळखोरीत निघाली. म्यानमारमध्ये अडकलेल्या सहा महिन्यांत तो एकूण तीन वेगवेगळ्या टोळ्यांकडे गेला.
रवीने सांगितलं की त्याने एका नवीन टोळीच्या मालकाला सांगितलं की तो आता लोकांना फसवू इच्छित नाही. त्याला श्रीलंकेला परत जाऊ देण्याची त्याने अक्षरशः भीक मागितली.
एके दिवशी, टीम लीडरशी भांडण झाल्यामुळे त्याला एका कोठडीत डांबण्यात आलं आणि 16 दिवस छळ करण्यात आला. शेवटी, "चायनीज बॉस" रवीला भेटायला आला आणि त्याला पुन्हा काम करण्याची "एक शेवटची संधी" त्या मालकाने रवीला दिली. रवीला सॉफ्टवेअरचं चांगलं ज्ञान होतं म्हणूनच या मालकाने त्याच्यावर ही दया दाखवली होती.
"माझ्याकडे पर्याय नव्हता; तोपर्यंत माझे अर्धे शरीर निकामी झाले होते," असे रवी पुढे म्हणाला.
त्यानंतरचे चार महिने व्हीपीएनचा वापर करून रवीने फेसबुक खाती चालवली. कृत्रिम बुद्धिमत्ता(AI) ॲप्स आणि 3D व्हिडिओ कॅमेरे वापरून हे खाते चालवले जात होते.
दरम्यान, रवीने आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी श्रीलंकेला जाण्याची परवानगी देण्याची विनंती केली. रवीने नदी ओलांडून थायलंडमध्ये प्रवेश करण्यासाठी 6 लाख रुपये आणि अतिरिक्त 2 लाख रुपये खंडणी म्हणून दिले तर त्याला सोडून देण्याचं त्या टोळीच्या म्होरक्यांनी मान्य केलं.
रवीच्या त्याच्या पालकांनी पैसे उधार घेतले, त्यांचं घर त्यांनी गहाण ठेवलं. आणि ते पैसे त्याला पाठवून दिले.
व्हिसा नसल्याबद्दल त्याला विमानतळावर 20,000 थाई बात म्हणजेच 550 डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला तेव्हा रवीच्या पालकांना आणखी कर्ज काढावे लागले.
"जेव्हा मी श्रीलंकेत आलो तेव्हा माझ्यावर 18 लाख 50 हजार रुपयांचं कर्ज होतं." असं रवी म्हणाला.
तो आता त्याच्या घरी परत आला आहे पण त्याची आणि त्याच्या बायकोची क्वचितच भेट होते.
रवी अत्यंत कडवट स्वरात म्हणाला की, "हे कर्ज फेडण्यासाठी मी एका गॅरेजमध्ये रात्रंदिवस काम करतो. व्याज फेडण्यासाठी आम्ही आमच्या लग्नाच्या दोन्ही अंगठ्या गहाण ठेवल्या आहेत."
(या वृत्तातीलरवी नावाच्या पात्राचं नाव बदलण्यात आलेलं आहे.)