You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ए. आर. रहमान यांच्यावर टीका म्हणजे त्यांच्या तक्रारीला दुजोरा देणं नाही का? - दृष्टिकोन
- Author, प्रियदर्शन
- Role, वरिष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
संगीतकार ए. आर. रहमान यांनी बीबीसीला एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीवरून देशभर जणू वादंगच उठलं. खरंतर रहमान यांनी अतिशय संयत शब्दात म्हटलं होतं की, बॉलिवूडमधील सत्तासंतुलन बदलल्यामुळे कदाचित मला कमी काम मिळत असावं.
यामागे धार्मिक कारणही असू शकतं, असं रहमान म्हणाले. मात्र, त्याचवेळी ते असंही म्हणाले की, ऐकीव गोष्टींच्या पलीकडे माझ्याकडे याबाबत ठोस अशी माहिती नाहीय.
बस्स, ए. रहमान एवढंच म्हणाले आणि त्यानंतर वादाचं अगदी मोहोळच उठलं. सहा राष्ट्रीय पुरस्कार, दोन अकॅडमी अवॉर्ड, दोन ग्रॅमी, एक बाफ्टा, 15 फिल्मफेअर आणि 18 फिल्मफेअर साऊथ पुरस्कार मिळवणाऱ्या, भारताचं तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार अर्थात पद्मभूषण पुरस्कार प्राप्त या संगीतकारावर चहूबाजूंनी ट्रोलिंगचा मारा झाला.
रहमान यांच्यावर आरोप करण्यात आले की, ते देशाची बदनामी करत आहेत, बॉलिवूडची बदनामी करत आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागावी.
आरोप करणाऱ्यांमध्ये कट्टर उजव्या संघटनांपासून ते स्वतःला पुरोगामी समजणारे लोकही होते. या सगळ्यांना असं वाटत होतं की, बॉलिवूडवर टीका योग्य नाही.
याशिवाय अनेक लोक गप्प राहिले. अर्थात, काही लोकांनी ए. आर. रहमान यांचं समर्थनही केलं.
ज्येष्ठ अभिनेते परेश रावल म्हणाले की, रहमान यांचा मला अभिमान आहे.
पुढे ट्रोलिंगचा दबाव इतका वाढला की, ए. आर. रहमान यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. स्पष्टीकरण देताना रहमान म्हणाले की, "भारतच माझं घर आहे, माझी प्रेरणा आहे. माझ्या संगीताचं उगमस्थान भारताच्या बहुसांस्कृतिक परंपरेत आहे आणि मला देशाचा अभिमान आहे."
असहमतीचा अधिकार
खरंतर बारकाईनं पाहिल्यास लक्षात येईल की, ए. आर. रहमान यांचं संगीत अशाच काळात बहरत होतं, जेव्हा भारतात हिंदुत्ववादी राजकारण शिखरावर जात होतं. एका बाजूला राम रथयात्रा सुरू होती आणि बाबरी मशिदीचा विध्वंस होत होता, तर दुसऱ्या बाजूला 'रोजा', 'बॉम्बे', 'लगान' आणि 'दिल से' यांसारख्या चित्रपटांची गाणी घुमत होती.
याच उत्कर्षबिंदूवर 'स्लमडॉग मिलियनेअर'मधील 'जय हो' गाणं आलं, ज्यानं 'ऑस्कर' जिंकून खऱ्या अर्थाने जगभरात भारताचा जयघोष केला आणि पुढील अनेक वर्षे हे गाणं भारतात राष्ट्रीय अभिमानाच्या प्रसंगी देशाचे 'थीम साँग' बनून गेलं.
याही आधी, भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 'माँ तुझे सलाम' संगीत-रचनेनं रहमान यांनी राष्ट्रभावनेला एका वेगळ्या संगीतमय अभिव्यक्तीत मांडलं.
काही क्षण असं मानूया की, ए. आर. रहमान यांनी केलेली तक्रार पूर्णपणे योग्य नसेल. कारण खरंतर ते स्वतःही साशंक दिसत होते. पण जर त्यांना काही वेदना होत असतील, तर त्या मांडण्याचा त्यांना अधिकार आहे.
अर्थात, इतरांना त्या अधिकाराशी असहमती दर्शवण्याचाही अधिकार आहे.
लोकांनी ती वेदना समजून घेतली असती आणि रहमान यांना हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता की, परिस्थिती तितकीशी वाईट नाही, की या देशाच्या अंगणात धर्माच्या नावानं जरी काहीएक भिंती उभ्या असल्या तरी शतकानुशतके चालत आलेल्या आणि स्वातंत्र्यलढ्याच्या काळात अधिक जोमानं वाढलेल्या सांस्कृतिक विविधतेची परंपरा अजूनही मजबूत आहे.
हे असं संयत शब्दांमध्ये ए. आर. रहमान यांना सांगितलं गेलं असतं, तर किती बरे झाले असतं!
मात्र, प्रत्यक्षात तसं झालं नाही. रहमान यांच्यावर शाब्दिक हल्ले सुरू झाले. यावरून असं वाटू लागलं की, त्यांच्या तक्रारीला जणू दुजोराच दिला जातोय.
त्यामुळे काही प्रश्न आपसूक समोर येतात. ते म्हणजे, त्यांची झालेली ट्रोलिंग म्हणजे ए. आर. रहमान यांच्या तक्रारीवरचा राग होता? की त्यांच्या धार्मिक ओळखीमुळे त्यांना निशाणा बनवलं जात होतं? गेल्या काही काळात धार्मिक ओळखीला सतत निशाणा बनवलं जात नाही का?
या देशात अचानक 'चांगला मुसलमान' आणि 'वाईट मुसलमान' शोधण्याची आणि ठरवण्याची जी मोहीम सुरू झाली आहे, तिच्यामागे कोण आहे? कोण आहेत ते लोक, जे ठरवतात की कोण बाबरसारखा मुसलमान आहे आणि कोण ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासारखा?
लोकशाहीला संकुचित करण्याचा प्रयत्न
जर कुणाला असे वाटत असेल की, ही मोहीम फक्त बहुसंख्याकवादाचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा, हिंदुत्ववादी राजकारण मजबूत करण्याचा परिणाम आहे, ज्यात अल्पसंख्याकांना ना बोलण्याचा अधिकार आहे, ना तक्रार करण्याचा; तर हे लोक भाबडे आहेत आणि त्यांना संभाव्य धोक्यांना समजून घेता येत नाहीय.
हा या देशाची प्रकृती बदलण्याचा प्रयत्न आहे. या देशाच्या लोकशाहीला संकुचित करण्याचा प्रयत्न आहे.
हे तर स्पष्ट आहे की, या प्रयत्नात सर्वाधिक लक्ष्य अल्पसंख्याकच ठरत आहेत; पण इतर पुरोगामी लोक आणि उदारमतवादी हिंदूही या कक्षेबाहेर नाहीत. हे लक्षात ठेवलं पाहिजे की, ए. आर. रहमान यांच्या आधी शाहरुख खान यांच्यावरही असेच टीका आणि ट्रोलिंगचे हल्ले झाले होते.
आयपीएलच्या लिलावात शाहरुख खान यांनी बांगलादेशी खेळाडू मुस्ताफिजूर रहमान याला आपल्या संघात घेतले, त्यावेळी बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असल्याचे कारण देत त्यांच्याकडूनही माफीची मागणी करण्यात आली.
शाहरुखविरोधातील या मोहिमेमागे भाजप नेते संगीत सोम यांच्यासह स्वतःला देशाचे बौद्धिक नेतृत्व देणारे समजणारे काही लोक होते. मात्र, बांगलादेशी खेळाडूंना लिलावात सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या बीसीसीआयला त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही.
स्पष्टच आहे की, इथेही शाहरुख यांच्या निर्णयाकडे त्यांच्या धार्मिक ओळखीच्या चष्म्यातून पाहिले गेले.
बोलणंच धोकादायक होतंय?
हे पुन्हा सांगणं गरजेचं आहे की, अल्पसंख्याक ओळखीवर होणारे हे हल्ले प्रत्यक्षात आपल्या लोकशाहीतील अभिव्यक्तीच्या संपूर्ण स्वातंत्र्यावरच हल्ले आहेत. विद्यमान सत्तेविरुद्ध कोणतीही असहमती जणू मान्यच नाही.
कोव्हिड काळ आठवा. जेव्हा आजारी नातेवाइकांसाठी ऑक्सिजन सिलेंडर किंवा रुग्णालयात बेड मिळावा म्हणून सोशल मीडियावर मदत मागणाऱ्या लोकांनाही ट्रोल करण्यात आलं आणि देशाची बदनामी करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला.
एक काळ असा होता की, रुपयाच्या घसरणीवर किंवा पेट्रोलच्या वाढत्या किमतींवर या देशातील खेळाडू आणि अभिनेते उघडपणे मत व्यक्त करत होते. पण आज रुपया डॉलरच्या तुलनेत 90 पार गेला आहे आणि पेट्रोलचा 'न्यू नॉर्मल' 100 रुपयांपर्यंत पोहोचला असतानाही सगळ्यांचे ओठ शिवलेले आहेत.
यावरून हे स्पष्ट होतं की, त्यांची आर्थिक समज बदललेली नाही; मात्र या नव्या व्यवस्थेत बोलणं धोकादायक ठरत आहे, ही राजकीय समज त्यांना आलेली आहे.
ए. आर. रहमान यांना बचावाची गरज नाही. सर्व टीका आणि ट्रोलिंगनंतरही या देशाची बहुसांस्कृतिक मुळं इतकी मजबूत आहेत, तसंच बॉलिवडूमध्ये क्रिएटिव्ह कामाची गरज आणि कदर अजूनही इतकी आहे की, त्यांना काम मिळत राहील.
मात्र, या देशाची लोकशाही संकुचित होण्यापासून वाचवण्याची नितांत गरज आहे. आपल्या विविधतेची जी एक सुसंवादी सिंफनी आहे, त्यातील बेसूर स्वर ओळखून तो दुरुस्त करण्याची गरज आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)