रशियन तेलावर भारताचा ब्रेक? ट्रम्प म्हणतात, ' नरेंद्र मोदींनी मला शब्द दिला'

रशियन तेलावर भारताचा ब्रेक? ट्रम्प म्हणतात, 'मोदींनी मला शब्द दिला'

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, डॅनियल के
    • Role, बिझनेस रिपोर्टर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावलं होतं. त्याचबरोबर व्हिसा शुल्क वाढवण्याबरोबरच इतर काही निर्बंधही भारतावर लादण्यात आले आहेत.

भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचे कारण सांगत हे टॅरिफ लावण्यात आल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आलं. अमेरिकेच्या या निर्णयामुळे जगभरातून प्रतिक्रिया आल्या. परंतु, भारताने रशियाकडून तेल खरेदी करणं सुरूच ठेवलं आहे.

दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवण्यास सहमती दर्शवल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

दरम्यान, ट्रम्प यांच्या या नव्या दाव्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

त्यांनी 'एक्स'वरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की,"पंतप्रधान मोदी हे ट्रम्प यांना घाबरले आहेत. ते ट्रम्प यांना निर्णय घेण्याची परवानगी देतात आणि भारत रशियाचं तेल खरेदी करणार नाही, अशी घोषणा करतात. दुर्लक्ष करूनही सातत्याने ते ट्रम्प यांना अभिनंदनाचा संदेश पाठवत आहेत."

दुसरीकडे, युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी रशियावर आर्थिक दबाव टाकणं गरजेचं आहे, असं ट्रम्प यांनी अनेकदा म्हटलं आहे. रशियाकडून तेल घेणारे देश अप्रत्यक्षपणे रशियाला युद्धात मदत करत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफचा एक शस्त्र म्हणून वापर करत असल्याचा आरोप टीकाकारांकडून सातत्याने होताना दिसतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफचा एक शस्त्र म्हणून वापर करत असल्याचा आरोप टीकाकारांकडून सातत्याने होताना दिसतो.

ट्रम्प म्हणाले, "युक्रेनचं युद्ध हे एक असं युद्ध होतं की, रशियाने ते एका आठवड्यात जिंकायला हवं होतं. पण आता चार वर्षे झाली आहेत. मला हे युद्ध संपलेलं पाहायचं आहे.

भारत रशियाकडून तेल घेतो, याबद्दल मी आनंदी नव्हतो. पण आज त्यांनी मला आश्वासन दिलं आहे की, ते आता रशियाकडून तेल घेणार नाहीत. हे एक मोठं पाऊल आहे."

बुधवारी (15 ऑक्टोबर) व्हाइट हाऊसमधील एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं.

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासाच्या प्रवक्त्यांनी या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे टॅरिफचा दबावासाठी वापर करत आहेत. परंतु, भारताने याचा विरोध केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी तणाव गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे.

अमेरिकेचा दबाव

रशिया मोठ्या प्रमाणात कच्चं तेल आणि गॅसची निर्यात करतो, आणि त्याचे मुख्य ग्राहक चीन, भारत आणि तुर्किये आहेत.

"आता मला चीनलाही असं करण्यासाठी पटवावं लागेल," असं ट्रम्प यांनी बुधवारी ओव्हल ऑफिसमध्ये म्हटलं.

एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी भारताबद्दल म्हटलं, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे मित्र आहेत. आमचे खूप चांगले संबंध आहेत. भारत तेल खरेदी करत आहे, हे मला आवडलं नाही. आज त्यांनी मला आश्वासन दिलं आहे की, रशियाकडून ते तेल घेणार नाहीत."

रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेच्या व्यापारी संबंधात तणाव निर्माण झाला आहे. (फाइल फोटो)

फोटो स्रोत, JIM WATSON/AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेच्या व्यापारी संबंधात तणाव निर्माण झाला आहे. (फाइल फोटो)

ट्रम्प प्रशासन चीनसह इतर व्यापार भागीदारांवरही रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यासाठी दबाव आणत आहे. यामुळे रशियाच्या कमाईवर अंकुश ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

ट्रम्प म्हणाले की, भारत 'लगेच' तेलाची खरेदी थांबवू शकत नाही, पण हा बदल एका 'प्रक्रियेचा भाग' आहे आणि 'लवकरच पूर्ण होईल'.

ट्रम्प प्रशासनाने भारतातून येणाऱ्या वस्तूंवर 50 टक्के पर्यंत टॅरिफ लावला आहे.

ट्रम्प यांनी या टॅरिफचे भारताने रशियाकडून तेल आणि शस्त्रं खरेदी केल्याबद्दल दिलेली 'शिक्षा' असं वर्णन केलं आहे.

हे टॅरिफ ऑगस्टपासून लागू झाले आहेत आणि भारतासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यात रशियासोबतच्या व्यवहारांवर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफचा देखील समावेश आहे.

रशिया जे तेल विकतो, ते युक्रेन युद्धासाठी त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे, असा ट्रम्प यांचा दावा आहे.

भारताची भूमिका

भारत रशिया-युक्रेन युद्धात निष्पक्ष आहे, अशी भूमिका पंतप्रधान मोदी हे गेल्या काही महिन्यांपासून स्पष्ट करत आहेत.

परंतु, भारत आणि रशियाचे संबंध जुने आणि घनिष्ठ राहिले आहेत.

रशियाच्या युद्धातून भारताचा फायदा होत असल्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या आरोपाला भारतीय अधिकाऱ्यांनी हा 'दुहेरी मापदंड' असल्याचा आरोप केला आहे.

अमेरिका आणि युरोपनेही रशियासोबत व्यापार सुरू ठेवल्याचे भारताने म्हटले आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात चांगले संबंध असल्याचे मानले जाते.

फोटो स्रोत, Press Information Bureau (PIB)/Anadolu via Getty Images

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात चांगले संबंध असल्याचे मानले जाते.

भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारत आपल्या आर्थिक हितासाठी रशियाकडून कच्चं तेल सवलतीच्या दरात खरेदी करत आहे.

रशियन तेल खरेदीच्या आधारावर भारतावर टॅरिफ लावल्याबाबत अमेरिकेच्या निर्णयावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली की, "ही कृती अन्यायकारक, अवास्तव आणि तर्कहीन आहे."

भारतानं म्हटलं होतं की,"अलीकडच्या काळात अमेरिकेने रशियाकडून भारतातील तेल आयातीवर निशाणा साधला आहे. आम्ही या मुद्द्यांवर आधीच आमचं मत स्पष्ट केलं आहे. आमची आयात बाजाराच्या परिस्थितीनुसार होते आणि याचा उद्देश भारतातील 1 अब्ज 40 कोटी लोकांची ऊर्जा सुरक्षितता सुनिश्चित करणं आहे."

रशियन तेलावरील हा वाद ट्रम्प आणि मोदी यांच्या संबंधात तणावाचं कारण बनला आहे. तरी बुधवारी ट्रम्प यांनी मोदींचं कौतुक करत त्यांना 'महान व्यक्ती' म्हटलं.

मोदींनी मागील आठवड्यात म्हटलं होतं की, त्यांची ट्रम्प यांच्याशी चर्चा झाली आहे. ज्यामध्ये दोन्ही नेत्यांनी "व्यापार वाटाघाटीमध्ये झालेल्या चांगल्या प्रगतीचा आढावा घेतला."

भारत-रशियाचा तेल व्यापार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफनंतरही भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे.

युरोपियन थिंक टँक सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लिन एअरच्या (सीआरइए) अहवालानुसार, गेल्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये भारताने रशियाकडून 2.5 अब्ज युरो (सुमारे 2.91 अब्ज डॉलर) किंमतीचं कच्चं तेल खरेदी केलं.

भारत तेल वापरात जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. सप्टेंबरमध्ये चीननंतर भारत रशियन तेलाचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार राहिला.

रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेने भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावले होते.

तेल वापराच्या बाबतीत भारत हा जगात तिसरा सर्वात मोठा देश आहे. (सांकेतिक फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तेल वापराच्या बाबतीत भारत हा जगात तिसरा सर्वात मोठा देश आहे. (सांकेतिक फोटो)

सीआरइएनुसार, सप्टेंबरमध्ये भारताने रशियन जीवाश्म इंधनाची एकूण 3.6 अब्ज युरोची खरेदी केली.

यामध्ये कच्च्या तेलाचा वाटा 77 टक्के (2.5 अब्ज युरो), कोळशाचा 13 टक्के (452 दशलक्ष युरो) आणि तेल उत्पादनांचा 10 टक्के (344 दशलक्ष युरो) होता.

रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात सुमारे 1.6 दशलक्ष बॅरल प्रति दिवस राहिली. जी मागील महिन्यांपेक्षा 9 टक्क्यांनी कमी आणि फेब्रुवारीपासूनची सर्वात कमी आहे. तरीही एकूण आयात किंचितशी वाढलेली आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.