ट्रम्प-मोदी इतके जवळचे मानले जात असताना, भारत-अमेरिकेचे संबंध इतके तणावाचे का बनले?

मोदी, ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रजनीश कुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना वाटतं की, त्यांनी भारत आणि रशियाला चीनच्या हातात देऊन गमावलं आहे. परंतु, रशिया कधी अमेरिकेसोबत होता?

मग ट्रम्प यांना असं का वाटतं की त्यांनी रशियाला गमावलं आहे? भारत खरंच चीनसोबत आहे का?

शुक्रवारीच (5 सप्टेंबर) भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी चीनसोबतचा सीमावाद हे सर्वात मोठं आव्हान आणि अडचण असल्याचं म्हटलं आहे.

अशा परिस्थितीत अनेक लोक ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावर आणि भारताविषयीच्या त्यांच्या आकलनावर प्रश्न उपस्थित करत आहेत. अमेरिकन प्रशासनाकडून भारताबद्दल सातत्यानं अपमानास्पद गोष्टी बोलल्या जात आहेत.

अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक ब्लूमबर्गशी बोलताना म्हणाले, ''एक-दोन महिन्यांत भारत बोलणी करण्यासाठी येईल आणि माफी मागेल. त्यानंतर भारत ट्रम्प यांच्यासोबत करार किंवा तडजोड करण्याचा प्रयत्न करेल आणि मग ट्रम्प ठरवतील की मोदींसोबत कसं वागायचं.''

हॉवर्ड लुटनिक यांच्या या भाषेवर थिंक टँक ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूशनच्या वरिष्ठ फेलो तन्वी मदान यांनी 'एक्स'वर लिहिलं, ''भारताशी अपमानास्पद भाषेत बोलणं आणि सार्वजनिक दबावाची रणनीती अमेरिकेला कधीच उपयोगाची ठरलेली नाही. खरं तर अनेकदा याचे उलट परिणामच झाले आहेत.''

पंतप्रधान मोदींच्या एससीओ शिखर परिषदेतील सहभागावर आणि शी जिनपिंग यांची भेट घेतल्याबद्दल ट्रम्प नाराज झाल्याचे दिसत आहेत.

फोटो स्रोत, @narendramodi

फोटो कॅप्शन, पंतप्रधान मोदींच्या एससीओ शिखर परिषदेतील सहभागावर आणि शी जिनपिंग यांची भेट घेतल्याबद्दल ट्रम्प नाराज झाल्याचे दिसत आहेत.

यावेळी अमेरिकन माध्यमांपासून ते जगभरातील अनेक तज्ज्ञ सांगत आहेत की, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मोदी आणि ट्रम्प यांच्यातील संबंधांमध्ये अधिक तणाव निर्माण झाला आहे.

न्यूयॉर्क टाइम्सच्या 30 ऑगस्टच्या वृत्तात म्हटलं आहे की, ट्रम्प हे जी-7 शिखर परिषदेत सहभागी झाले होते. त्यानंतर कॅनडाहून परतल्यावर त्यांनी मोदींशी 35 मिनिटं फोनवर चर्चा केली होती. त्यावेळी मोदी हे कॅनडामध्ये होते. ट्रम्प यांनी मोदींना वॉशिंग्टनला येण्याचं आमंत्रण दिलं होतं, परंतु मोदी गेले नाहीत.

ट्रम्प हे मोदी आणि पाकिस्तानी लष्करप्रमुखांना 'शेकहँड' करण्यास भाग पाडतील, अशी भारतीय अधिकाऱ्यांना भीती होती.

त्याच वेळी व्हाइट हाऊसमध्ये पाकिस्तानी फील्ड मार्शल असीम मुनीर यांना लंचसाठी बोलावलं गेलं होतं. एका भारतीय अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, यावरून भारत-पाकिस्तानचा वाद आणि त्यांच्या इतिहासाबद्दलच्या संवेदनशीलतेबद्दल ट्रम्प किती बेजबाबदार आहेत, हे दिसून येतं.

मोदी आणि ट्रम्प यांच्यातील हे संभाषण दोघांच्या नात्यासाठी एक महत्वाची घटना ठरली, असं म्हटलं जातं.

भारतीय लोक ट्रम्प यांच्याबद्दल एवढे उत्साहित का होते?

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत विजयी झाले तेव्हा बहुसंख्य भारतीय आनंदी होते. काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी तर ट्रम्प यांच्यासाठी पूजा आणि हवनही केलं होतं. परंतु, काही महिन्यांनंतर ट्रम्प भारताशी ज्या पद्धतीने वागले, त्यामुळं त्यांच्या भारतीय चाहत्यांमध्ये निराशा दिसून येते.

हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर खूप आनंदात होते, पण आता ते निराश झाले आहेत.

विष्णु गुप्ता म्हणतात, "ट्रम्प हे इस्लामिक विचारधारेबाबत कठोर होते, म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा देत होतो. मात्र, आता ते पाकिस्तानशी जवळीक दाखवत आहेत. त्यांचा अध्यक्षपदाचा पहिला कार्यकाळ आम्हाला आवडला होता."

ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यामुळे केवळ विष्णु गुप्ता नाही, तर अनेक भारतीयही सकारात्मक आणि आनंदी होते.

ट्रम्प परत आल्यास भारताच्या हितासाठी चांगलं असेल, असं या वर्षी जानेवारीत युरोपियन कौन्सिल फॉर फॉरेन रिलेशन्सने केलेल्या सर्वेक्षणात 84 टक्के भारतीयांनी म्हटलं होतं.

याच वर्षी फेब्रुवारीत महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांची व्हाइट हाऊसमध्ये भेट घेतली होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, याच वर्षी फेब्रुवारीत महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांची व्हाइट हाऊसमध्ये भेट घेतली होती.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इंडोनेशियामध्ये फक्त 30 टक्के, युरोपियन युनियनमध्ये 22 टक्के आणि यूकेमध्ये 15 टक्के लोक म्हणाले की, ट्रम्प परत आल्यास त्यांच्या देशासाठी हिताचं असेल. पण भारतावरील 50 टक्के टॅरिफ लादल्यावर लोकांची ट्रम्प यांच्याबद्दलची मतं बदलत आहेत. भारतातील अनेक भागांत ट्रम्प यांचा पुतळा जाळण्यात आला आहे.

पण फक्त सामान्य लोकांचंच नाही तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे अनुभवी मुत्सद्दी आहेत आणि त्यांनी जगातील शक्तिशाली देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी ट्रम्प यांच्या निवडीवर म्हटलं होतं, "काही देश अमेरिकेबद्दल काळजी करत आहेत, पण भारत त्या देशांपैकी नाही."

भारतात सामान्यांपासून ते विशेष लोकांपर्यंत ट्रम्प यांच्याबद्दल इतका सकारात्मकपणा का होता? असं नाही की, ट्रम्प यांचा पहिला कार्यकाळ भारतासाठी खूप चांगला होता. पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी भारताला जीएसपीमधून बाहेर काढलं होतं.

जीएसपी (जनरलाइज्ड सिस्टिम ऑफ प्रेफरन्स) अंतर्गत भारताच्या काही वस्तूंना अमेरिकेत ड्युटी-फ्री मार्केट मिळत असत.

ट्रम्प यांनी भारताला इराणमधून तेल आयात करण्यापासूनही रोखलं होतं. पहिल्या कार्यकाळातही त्यांनी काश्मीरबाबत मध्यस्थी करण्यात रस दाखवला होता. तरीही बहुतेक भारतीय आणि सत्ताधारी पक्षाचे नेते ट्रम्प यांना भारताच्या बाजूने का मानत होते?

भारताचा ट्रम्प यांच्याबद्दलचा अंदाज चुकला का?

नेपाळ आणि व्हिएतनाममध्ये राजदूत म्हणून काम पाहिलेले रणजित राय म्हणतात की, एखाद्या देशाशी किती जवळीक किंवा जिव्हाळ्याचे संबंध आहे, ते फक्त सरकारच्या पातळीवरील संपर्कातून किंवा चर्चेतूनच कळू शकतं.

रणजित राय म्हणाले, "अमेरिकेत 'हाउडी मोदी' होत होतं आणि गुजरातमध्ये 'नमस्ते ट्रम्प.' असं म्हटलं जात होतं की, मोदी आणि ट्रम्प यांचे वैयक्तिक संबंध खूप चांगले आहेत."

"जेव्हा भारत सरकारला ट्रम्प यांच्यामुळे फार त्रास होत नव्हता, तेव्हा जनता नकारात्मक का राहिल? ट्रम्प यांच्या या कार्यकाळातील परिस्थिती पाहता भारताचा अंदाज पूर्णपणे चुकीचा होता, परंतु कोणालाही याची कल्पना नव्हती की, अमेरिका भारतावर 50 टक्के टॅरिफ लावेल.''

ट्रम्प आणि मोदी यांच्यातील वैयक्तिक संबंध चांगले असल्याचे बोलले जाते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ट्रम्प आणि मोदी यांच्यातील वैयक्तिक संबंध चांगले असल्याचे बोलले जाते.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील पश्चिम एशिया अभ्यास केंद्राचे माजी प्राध्यापक ए.के. पाशा म्हणतात की, ट्रम्प हे अनेकदा मुस्लीमविरोधी बोलत असत. त्यामुळे भारतातील काही लोकांना ते आवडत होते.

प्रा. पाशा म्हणतात, ''ज्या लोकांनी ट्रम्प यांच्यासाठी हवन आणि पूजा केली, ते केवळ मुस्लीमविरोधाच्या नावाखाली समर्थन करत होते. मात्र, त्यांना लक्षात यायला हवं होतं की, ट्रम्प हे फक्त देशांतर्गत राजकारणासाठी अशा गोष्टी बोलत होते.''

रणजित राय यांच्या मते, ही फक्त टॅरिफ आणि रशियापासून तेल घेण्याची गोष्ट नाही. आता हे प्रकरण वैयक्तिक झालं आहे. ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार हवा होता आणि ते भारताकडून युद्धविरामाचं श्रेय मिळवू इच्छित होते. परंतु, मोदी भारतातील लोकप्रिय नेते आहेत आणि ते हे श्रेय देण्याची जोखीम घेऊ शकत नाहीत.

"पंतप्रधानांनी जे केलं ते भारताच्या परराष्ट्र धोरणाला अनुसरून आहे, परंतु, ट्रम्प यांनी तो वैयक्तिक अहंकाराचा प्रश्न बनवून टाकला आहे.''

चूक कुठे झाली?

जेम्स क्रॅबट्री हे अमेरिकन मॅगझीन फॉरेन पॉलिसीचे स्तंभलेखक आहेत. त्यांनी 27 ऑगस्टला फॉरेन पॉलिसीमध्ये लिहिलं, ''ट्रम्प यांना हाताळू शकतो, असं भारताला वाटलं होतं. परंतु, मोदींच्या टीमला उशिराने का होईना ट्रम्प यांच्याबाबतची ही चूक लक्षात आली.''

''भारताला अमेरिकाच्या जवळ ठेवणं मोदींसाठी देशांतर्गत राजकीयदृष्ट्या धोकादायक ठरू शकतं. भारताचं परराष्ट्र धोरण पारंपरिकपणे तटस्थ राहिलेलं आहे. ट्रम्प यांनी भारताशी संबंध तडकाफडकी संपवले. त्यामुळे भारतात राजकीय खळबळ उडाली आहे.''

ट्रम्प यांनी भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेची तुलना रशियाच्या अर्थव्यवस्थेशी करत तिला 'मृत' ठरवलं. अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी भारताला नफेखोर म्हटलं, तर ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी युक्रेन युद्धाला 'मोदी युद्ध' अशी उपमा दिली.

ट्रम्प यांनी सर्जिओ गोर यांना भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्त केले आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ट्रम्प यांनी सर्जिओ गोर यांना भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्त केले आहे.

शुक्रवारी (5 सप्टेंबर) ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर शी जिनपिंग, व्लादिमीर पुतिन आणि नरेंद्र मोदी यांचे फोटो पोस्ट करत लिहिलं, "असं वाटतं की, आम्ही भारत आणि रशियाला चीनच्या हातून गमावलं आहे. आशा आहे की, त्यांचं भविष्य चांगलं आणि दीर्घकाळ टिकणारं असेल."

खरं तर, पंतप्रधान मोदी 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत एससीओ (शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन) शिखर परिषदेसाठी चीनला गेले होते. या परिषदेमध्ये रशियाचे अध्यक्ष पुतिन हे देखील सहभागी झाले होते.

या परिषदेत राष्ट्राध्यक्ष पुतिन, शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी एकत्र बोलताना दिसले. मोदी यांनी या चर्चेचे फोटो 'एक्स'वर पोस्ट केले होते. ट्रम्प यांनी या दौऱ्याचा हवाला देत 'ट्रुथ'वरून टीका केली होती.

राजदूताच्या माध्यमातून भारताला धक्का?

ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर भारतातील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्र द हिंदूचे आंतरराष्ट्रीय संपादक स्टॅनली जॉनी म्हणतात, "ट्रम्प हे एससीओ समिटबाबत खूप चिंतेत दिसत आहेत. परंतु अमेरिकेच्या प्रशासनात ट्रम्प यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत किंवा ट्रम्प यांच्या काउंटरप्रॉडक्टिव्ह टॅरिफ युद्धाबाबत जे ते अमेरिकेच्या मित्र देशांवर लादत आहेत त्या रणनीतीबाबत सल्ला देत नाही का?"

ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसचे पर्सनल डायरेक्टर सर्जिओ गोर यांना भारतातील राजदूत म्हणून नियुक्त केलं आहे. प्रथमदर्शनी असं वाटतं की, सर्जिओ ट्रम्प यांचे विश्वासू असल्यामुळे भारतासोबत संबंध सुधारण्याची संधी मिळू शकते. परंतु, अनेक तज्ज्ञांच्या मते, गोर यांची ही नियुक्तीही भारतासाठी त्रासदायक ठरू शकते.

गोर यांच्याकडे भारताबरोबरच दक्षिण आणि मध्य आशियाची जबाबदारीही देण्यात आली आहे. जेव्हा भारताला अमेरिकेच्या नजरेत स्वतःला पाकिस्तानपासून वेगळं दाखवायचं आहे, त्यावेळी गोर यांच्याकडे भारतासह संपूर्ण दक्षिण आशियाची जबाबदारी देण्यात आली आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, @narendramodi

फोटो कॅप्शन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

जेव्हा जयशंकर यांना गोर यांच्या नियुक्तीबाबत विचारलं, तेव्हा त्यांनीही, ''होय, मीही याबद्दल वाचलं आहे,'' अशी प्रतिक्रिया दिली.

यावरून असं दिसतं की, अमेरिकच्या अधिकाऱ्यांनी गोर यांचं नाव जाहीर करण्यापूर्वी भारताला याची माहिती दिली नव्हती. आतापर्यंत अशी परंपरा होती की, एखादं नाव अंतिम करण्याआधी दोन्ही देश एकमेकांना याची माहिती देत असत.

भारताचे माजी परराष्ट्र सचिव आणि प्रसिद्ध मुत्सद्दी श्याम सरन यांनीही सर्जिओ यांच्या नियुक्तीची पद्धत आणि त्यांना दिलेल्या अतिरिक्त जबाबदारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

श्याम सरन यांनी 'मनीकंट्रोल'शी बोलताना सांगितलं, ''डिप्लोमॅटिक पद्धत अशी असते की, राजदूताची नियुक्ती करताना आधी त्याचं नाव गुप्तपणे पाठवलं जाते. नंतर तो देश त्यावर आपलं मत नोंदवतो आणि मग मंजुरी दिली जाते. मात्र, इथं तर ट्रम्प यांनी एकतर्फी नियुक्ती जाहीर केली.''

गोर यांना दक्षिण आणि मध्य आशियाची अतिरिक्त जबाबदारी देण्याबाबत श्याम सरन म्हणतात, ''आपण भारतासारख्या महत्त्वाच्या देशात असा राजदूत पाठवत आहात, ज्याच्याकडे इतरही जास्तीच्या जबाबदाऱ्या आहेत."

"असं वाटतं की, भारताला पार्ट-टाइम राजदूत देण्यात आला आहे. दिल्लीत बसून भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेशसारख्या गोष्टी हाताळणं ही विखुरलेली डिप्लोमसी किंवा मुत्सद्देगिरी ठरेल. असं पूर्वी कधीच घडलेलं नव्हतं. आपण त्याचं स्वागत करू शकत नाही.''

मोदी ट्रम्प यांना प्रभावित करू शकले नाहीत का?

पेन इंटरनॅशनल बोर्डचे सदस्य आणि लेखक सलील त्रिपाठी यांनी अमेरिकेचं मॅगझीन टाइमच्या वेबसाइटवर लिहिलं, ''भारतासाठी धडा हा आहे की, परराष्ट्र धोरण मिठी मारण्यामुळे किंवा अलिंगन देण्यावर नव्हे, तर ठोस हितांवर चालतं."

"ट्रम्प यांच्यासाठी कोणतंही नातं पवित्र नाही, त्यांना फक्त सौदेबाजी किंवा करार महत्त्वाचे आहेत. मोदींना वाटलं की, ते ट्रम्प यांना प्रभावित करू शकतील. ट्रम्प यांना प्रशंसा आवडते, परंतु शेवटी तितकं पुरेसं ठरत नाही.''

त्रिपाठी यांनी लिहिलं, ''दीर्घ काळ भारताचं परराष्ट्र धोरण धोरणात्मक किंवा रणनीतिक स्वायत्ततेवर आधारित राहिलेलं आहे. मात्र, अशी स्वायत्तता मिळवण्याची किंमत मोजावीच लागते आणि आता आपण ते पाहत आहोत."

"हे टॅरिफ दाखवत आहे की, भारताचा प्रभाव आणि अर्थव्यवस्थेत ताकद आहे, पण धोरणात्मक दृष्टिकोनातून त्याची इतकी वाढ झालेली नाही की प्रत्येक निर्णय त्यांना आपल्या मर्जीने घेता येईल.''

''भारताचं परराष्ट्र धोरण इतकं स्वतंत्र आहे की, पाश्चिमात्य देशांना ते आवडत नाही. अनेक पाश्चिमात्य उत्पादनांसाठी भारताची बाजारपेठ अजूनही बंद आहे. भारतातील कठोर लालफितीमुळे परदेशी व्यवसाय फारसा वाढत नाही. भारताचे उद्योग अजूनही बाहेरील दबाव सहन करण्यास तयार नाहीत.''

पण ही फक्त ट्रम्प यांना समजून घेण्यातील भारताची चूक नाही. अनेक लोक मानतात की, ट्रम्प देखील भारताला समजून घेण्यात चूक करत आहेत. थिंक टँक ब्रुकिंग्सच्या तन्वी मदान यांनादेखील असंच वाटतं.

मदान यांनी 'एक्स'वर लिहिलं, ''चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी 2020 मध्ये जी चूक केली होती, तीच चूक ट्रम्प करताना दिसत आहेत. ट्रम्प हे भारताला एक लहान देश किंवा कमी शक्ती असलेला देश म्हणून पाहत आहेत आणि त्या पद्धतीने वागत आहेत."

"त्यांना वाटतं की, भारतही लहान देशांप्रमाणेच प्रतिक्रिया देईल. मात्र भारत ना लहान देश आहे, ना स्वतःला तसं पाहतो आणि ना तशी प्रतिक्रिया देईल.''

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (डावीकडे) आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (उजवीकडे)

फोटो स्रोत, @CMShehbaz

फोटो कॅप्शन, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (डावीकडे) आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (उजवीकडे)

जेम्स क्रॅबट्री म्हणतात, ''भारत मल्टी-अलाइनमेंट धोरण पाळतो. याचा अर्थ पाश्चिमात्य देशांशी चांगले संबंध ठेवणं आणि पुतिन यांच्या संबंधांवरही विश्वास ठेवणं आवश्यक आहे. भारताला इराणपासूनही दूर राहायचं नाही.''

''बायडन प्रशासनाच्या काळात अमेरिका भारताच्या या धोरणाला मान देत होती आणि त्यांचे रणनीतिक महत्त्व किंवा मुत्सद्देगिरी त्यांनी मान्य केली होती. परंतु, ट्रम्प यांनी हे धोरण सोडून दिलं आणि भारतावर रशियाकडून तेल खरेदीच्या बदल्यात 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादले.''

अमेरिका आणि भारताच्या संबंधांबाबत बोलताना पाश्चिमात्य विश्लेषक सांगतात की, भारताला फक्त चीनचा सामना करण्याची गरज आहे. पण पाश्चिमात्य देशांसाठी भारताचा अर्थ फक्त इतकाच आहे का?

भारताचे माजी मुत्सद्दी राजीव डोगरा म्हणतात, ''पाश्चिमात्य देश, खासकरून अमेरिका, भारताला चीनविरोधी साधन बनवू इच्छित आहे. भारत त्यांची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आहे की, स्वतःच्या हिताचा विचार करण्यासाठी? ट्रम्प भारताला अजिबात समजून घेत नाहीत आणि पाश्चिमात्य देशही भारताला फक्त त्यांच्या दृष्टिकोनातून हाताळण्याचा विचार करतात.''

अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या 'वैयक्तिक अहंकाराचा' प्रश्न बनला आहे का?

राजीव डोगरा म्हणाले, ''ट्रम्प यांनी हा फक्त अहंकाराचा प्रश्न बनवला आहे. परंतु, पंतप्रधान मोदी यांनी फक्त भारताचा दृष्टिकोन सांगितला आहे. भारत कोणाच्या अधीन राहून किंवा हाताखाली काम करत नाही. भारत कोणाच्या सांगण्यावर युद्ध सुरू करत नाही आणि थांबवतही नाही.''

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)