You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘घरात पैसा नव्हता, पण जिद्द होती’, वाशिममधल्या शेतकऱ्याचा मुलगा JEE परीक्षेत देशात पहिला
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
"मला शिकायचं होतं. पण, घरची परिस्थिती वाईट असल्यानं फक्त बारावीपर्यंत शिक्षण घेऊ शकलो. परिस्थितीमुळे लहान वयातच शेतात काम करायला लागलो. घरात पैसा नव्हता, पण, माझ्या मुलानं शिकावं ही माझी जिद्द होती. आज मुलगा माझं स्वप्न पूर्ण करतोय."
जेईई मेन्स या परीक्षेत देशात अव्वल आलेल्या नीलकृष्ण गजरेचे वडील नीलकुमार गजरे अभिमानाने सांगत होते. नीलकुमार वाशिम जिल्ह्यातील बेलखेडा या छोट्याशा गावातले शेतकरी आहेत.
त्यांचा मुलगा नीलकृष्णने जेईई मेन्स या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवत देशातून पहिला क्रमांक पटकावला.
त्याचे आई-वडील दोघांचंही फक्त बारावीपर्यंत शिक्षण झालं. नीलकृष्णच्या आजोबांची 15 एकर शेती आहे. पण, त्याच्या वडिलांच्या हिस्स्याला साडेतीन एकर शेती येते. यात निसर्गाच्या लहरीपणामुळे पीकांना फटका बसतो. कधी पीकांना भावही मिळत नाही. वर्षाला दोन लाख रुपये नफा मिळतो.
त्यातून कुटुंबाचं पालनपोषण करून दोन मुलाचं शिक्षण कसं करायचं असा प्रश्न नीलकृष्णच्या वडिलांसमोर होता. पण, आपल्यासारखं आपल्या मुलाचं भवितव्य धोक्यात येऊ नये याची त्यांनी काळजी घेतली. घरच्या, वडिलांच्या आर्थिक परिस्थितीची नीलकृष्णलाही जाणीव होती.
त्यामुळे आपल्याला शिक्षणात आर्थिक अडचण येऊ नये यासाठी त्याने कुठून शिष्यवृत्ती मिळते का यासाठी प्रयत्न केले. त्याने शिकवणी वर्गाची परीक्षा देऊन त्यांच्याकडून 75 टक्के शिष्यवृत्ती मिळवली. त्यामुळे पैशांचं टेंशन कमी होऊन जेईईमध्ये देशात पहिला क्रमांक पटकवण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याचं नीलकृष्ण सांगतो.
पाचवीपासून शिक्षणासाठी बाहेर
नीलकृष्ण लहानपणापासूनच हुशार आहे. त्यामुळे त्याला चांगलं शिक्षण मिळावं याची काळजी त्याच्या आई-वडिलांनी घेतली. त्याला पाचवीपासूनच कारंजा लाड इथं शिक्षणासाठी ठेवलं. इथंही भाड्याच्या खोलीत राहून त्याने अभ्यास केला.
पाचवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण कारंजा इथल्या जे. सी. हायस्कूलमधून पूर्ण केलं. दहावीत त्याला 98.60 टक्के गुण मिळाले होते. आयआयटी मुंबईमधून शिक्षण घेण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या निलकृष्णनं दहावीनंतर त्या दृष्टीनं वाटचाल केली.
त्यानं शेगावच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. तसेच अभियांत्रिकीसाठीची प्रवेश परीक्षा जेईई च्या तयारीसाठी तो नागपुरात पोहोचला. नागपुरातही भाड्याच्या खोलीत राहून शिक्षण पूर्ण केलं. नागपुरातून ट्रेनने कधी शेगावला महाविद्यालयात जायचा. पण, त्याने जेईईच्या अभ्यासावरच पूर्ण लक्ष केंद्रीत केलं होतं.
नीलकृष्णने यश कसं मिळवलं?
नीलकृष्णने अकरावीपासून जेईई परीक्षेची तयारी सुरू केली. पहाटे पाच वाजता उठून अभ्यास करायचा, त्यानंतर पाच ते सहा तास शिकवणी वर्ग आणि त्यानंतर पुन्हा अभ्यास अशी त्याची दिनचर्या ठरलेली आहे. अभ्यासात सातत्य ठेवल्यामुळे हे यश मिळाल्याचं निलकृष्ण सांगतो.
तो बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाला, ‘’जेईई मेन्स या परीक्षेचा आणि बारावी असा दोन्ही अभ्यास जास्त असल्यानं सुरुवातीला त्रास झाला. पण, मी माझे प्रयत्न सुरूच ठेवले. देशात पहिला क्रमांक मिळवायचा हे ध्येय्य ठरवलं होतं. यश मिळवायचं असेल तर सततचे प्रयत्न महत्वाचे असतात. परीक्षेची तयारी करताना ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्नीशील राहणं महत्वाचं आहे. त्यामुळेच हे यश मिळवता आलं.’’
परीक्षेच्या काळात तणाव आला तर काय करायचं?
नीलकृष्ण जेईईचा अभ्यास करताना सोशल मीडियापासून दूर राहिला. पण, सततच्या अभ्यासातूनही कधी कधी कंटाळा येतो.
त्यामध्ये काहीतरी मनोरंजन हवं म्हणून 15 दिवसांमधून एकवेळा चित्रपट पाहायचा आणि त्यानंतर मोबाईलला हातही लावायचा नाही, असे नियम त्याने स्वतःला घालून घेतले होते.
आता जेईई अॅडव्हान्स या परीक्षेची तयारी करतानाही तो याच नियमांचं पालन करतो. पण, अभ्यास करताना ताण-तणाव येतो.
या तणावातून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्याही येतात. राजस्थानमधील कोटा शहरात काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. मग अभ्यास करताना तणाव आला तर काय करावं? नीलकृष्णने काय सांगितलं?
अभ्यास सुरुवातीला कठीण वाटतो यात शंका नाही. पण, आपल्याला हे जमणार नाही हे ज्या क्षणी वाटतं त्या क्षणापासून अभ्यासातलं सातत्य टिकवून ठेवायला पाहिजे, तर पुढच्या गोष्टी सोप्प्या जातात, असा सल्लाही प्रवेश परीक्षांची तयारी कणाऱ्या विद्यार्थ्यांना देतो.
सोबतच तो पालकांनाही सल्ला द्यायचं विसरला नाही.
पालकांनी मुलांवर करिअर करण्याबद्दल दबाव टाकू नये. मुलांना आवड आहे त्याच क्षेत्रात करीअर करू द्यावं, असा सल्ला देतानाच त्याच्या आई-वडिलांनी त्याला अभ्यास, करिअरबद्दल कधी दबाव टाकला नाही म्हणूनच हे शक्य झाल्याचं तो सांगतो.
देशात मुलगा पहिला येताच हे समजताच आई-वडिलांना इतका आनंद झाला की ते रात्री अकरा वाजता वाशिमहून नागपूरला यायला निघाले.
गावची पोलीस पाटील असलेली निलकृष्णची आई सांगतेय, ‘’मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे खरं आहे. माझा मुलगा लहानपणापासून हुशार होता.
आम्ही तिघी बहिणी असल्यामुळे माझं लवकर लग्न झालं. त्यामुळे मला बारावीनंतर पुढे शिकता आलं नाही. पण, माझ्या मुलाला चांगलं शिक्षण देईन हे ठरवलं होतं. मुलाचं यश पाहून अभिमान वाटतो.’’