You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
UPSC Civil Service Result: देशात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या श्रुती शर्माने दिल्या या टिप्स
नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षांचे निकाल जाहीर झाले. या परीक्षेत दिल्लीच्या श्रुती शर्माने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. पहिल्या तीनही महिलाच आहेत. पहिल्या क्रमांकावर श्रुती शर्मा, दुसऱ्या क्रमांकावर अंकिता अग्रवाल आणि तिसऱ्या क्रमांकावर गामिनी सिंगला या आल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले "नागरी सेवेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांचे अभिनंदन. महत्त्वपूर्ण वेळी ते प्रशासकीय कारकीर्दीला सुरुवात करत आहेत. देश सध्या प्रगतीपथावर आहे आणि आपण सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत."
जे उमेदवार अयशस्वी झाले आहेत त्यांना उद्देशून पंतप्रधान म्हणाले, "की जे उमेदवार या परीक्षेत यशस्वी झाले नाहीत त्यांची निराशा मी समजू शकतो. पण मला हे देखील माहित आहे की ते प्रतिभावान आहेत, ते ज्या पण क्षेत्रात जातील तिथे देशाची मान उंचावतील."
या परीक्षेत एकूण 685 उमेदवारांना यश मिळाले आहे. या परीक्षेत खुल्या वर्गातून 244, आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातून 73, इतर मागासवर्गीय वर्गातून 203 जण, अनुसूचित जातीतून 105 आणि अनुसूचित जमातीतून 60 जणांचे नाव अंतिम यादीत आले आहे.
श्रुती शर्माने काय म्हटले?
या परीक्षेत तुम्ही प्रथम क्रमांक मिळवाल अशी अपेक्षा होती का असं बीबीसीचे प्रतिनिधी विकास त्रिवेदी यांनी विचारल्यावर श्रुतीने सांगितले की "मला बिल्कुल अपेक्षा नव्हती. मी कालपासून निकालाबाबत अस्वस्थच होते. थोडी भीती देखील वाटत होती. सतत फोन चेक करत होते पण अचानक गोष्टी बदलल्या."
हा श्रुतीचा दुसरा प्रयत्न होता आणि तिचा ऑप्शनल विषय इतिहास हा होता. श्रुतीला इंटरव्यूबाबत देखील प्रश्न विचारण्यात आले. असा एखादा प्रश्न की ज्यामुळे तुमचा पहिला क्रमांक येण्यास मदत झाली असं वाटतं का असं प्रतिनिधीने विचारल्यानंतर श्रुतीने सांगितलं, "नाही याच्या एकदमच विपरित झालं. इंटरव्यूआधी माझ्यात आत्मविश्वास होता. माझे मॉक इंटरव्यू देखील चांगले जात होते. मला वाटत होतं की मुलाखत ही माझी जमेची बाजू आहे. पण माझ्या इंटरव्यू नंतर मात्र मी खूश नव्हते. मी माझ्या आई-वडिलांसमोर अक्षरशः रडले."
"काही वस्तूनिष्ठ प्रश्नांची उत्तरं मी दिली नव्हती. कारण ती मला माहितच नव्हती. त्यामुळे मी नो-नो म्हणत गेले. पण शेवटी सर्वकाही चांगलं झालं," श्रुतीने सांगितलं.
तिन्ही टॉपर या मुलीच आहेत, ज्या मुली परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यासाठी काय टिप्स द्याल तेव्हा श्रुती म्हणाली, "मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगळ्या टिप्स नाहीत. मला आनंद आहे की मुली केवळ युपीएससीमध्येच नाही तर इतर क्षेत्रातही यशस्वी होताना दिसत आहेत."
"ही गोष्ट यामुळेच शक्य होत आहे की त्यांच्या कुटुंबातील आणि आजूबाजूचे लोक त्यांना सहकार्य करत आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षण घेता येत आहे आणि पुढे जाता येत आहे. हे शहरी तसेच ग्रामीण भागात ही होताना दिसत आहे. येणाऱ्या काळात हे प्रमाण आणखी वाढू शकते.
"यशस्वी होण्यासाठी किती तास अभ्यास करणे आवश्यक आहे असे विचारलं असता श्रुतीने सांगितले की मी हे कधी मोजलं नाही की मी किती अभ्यास केला आहे. आणि ही काही लपवून ठेवण्यासारखी देखील गोष्ट नाही, तरीदेखील हे सांगते की मध्ये मध्ये ब्रेक घेणे आणि आपला रुटीन बॅलन्स करणे देखील महत्त्वाचे आहे," असं श्रुतीने सांगितले.
श्रुतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टिप्स दिल्या.
1. युपीएससीची तयारी करण्याबाबत प्रत्येकाची वेगळी पद्धत असू शकते पण मला वाटतं की आपली उद्दिष्टे ठराविक असावीत. 2. ठराविक पण नेमका अभ्यास करावा. स्वतः नोट्स काढून त्यातून अभ्यास करण्याचा फायदा मला झाला. 3. वेळेचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तुमच्याजवळील संसाधनांचा नीट वापर करावा. त्यासाठी वेळेचं व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. 4. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जे ही कराल त्यात सातत्य हवे. चिकाटी हवी ती गोष्ट महत्त्वाची आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)