मृतदेह दरीत टाकायला गेला आणि स्वतःच प्राण गमावून बसला #5 मोठ्या बातम्या

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. मृतदेह दरीत टाकायला गेला आणि स्वतःच प्राण गमावून बसला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे एक विचित्र घटना घडली आहे. कराड येथून दोन व्यक्ती मृतदेह फेकण्यासाठी इथं आल्या, परंतु मृतदेह दरीत फेकताना त्यातील एक माणूस पाय घसरून दरीत पडला आणि त्याचाही मृत्यू झाला.

वीट व्यावसायिक भाऊसाहेब माने याने एका व्यक्तीला कर्जाने पैसे दिले होते. ते त्याने परत न केल्यामुळे भाऊसाहेबने त्याला मारहाण केली.

या मारहाणीत त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला. यामुळे घाबरलेल्या भाऊसाहेबाने एका साथीदाराबरोबर आंबोली गाठले.

देणेकऱ्याचा मृतदेह फेकताना भाऊसाहेबही दरीत कोसळला आणि त्याचाही मृत्यू झाला. ही घटना त्याच्या साथीदाराने पोलिसांना सांगितली आहे. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केली आहे.

2. झारखंडमधील आगीत 14 मृत्युमुखी

झारखंडमधील धनबाद शहरातील आशीर्वाद नावाच्या इमारतीला लागलेल्या आगीमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 12 जण गंभीर जखमी झाले आहेत.

धनबाद
X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

धनबाद शहरात शक्ती मंदिराजवळ ही इमारत आहे. काल 31 जानेवारी रोजी या इमारतीला संध्याकाळी आग लागली. आगीची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दल तसेच प्रशासकीय अधिकारी तेथे दाखल झाले. ही बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली आहे.

“धनबाद येथील आशीर्वाद इमारतीत लागलेल्या आगीत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत दु:खद आहे. जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत”, अशी माहिती झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिली आहे.

3. पुण्यात कोयत्याचा वापर सुरूच, तरुणांचा कोयत्याने हल्ला

पुण्यामध्ये कोयता गँगच्या दहशतीनंतर आता कोयत्याचा वापर हत्यार म्हणून सर्रास होताना दिसत आहे. एका विद्यार्थ्याला 2 तरुणांनी कोयत्याने जखमी केले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

त्या विद्यार्थ्याबरोबर आणखी एका विद्यार्थ्याला मार बसल्याचे झी 24 तासने बातमीत म्हटले आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

विजय आरडे नावाचा मुलगा आपल्या मैत्रिणीशी बोलत आहे याचा राग मनात धरुन समीर पठाण नावाच्या मुलाने विजयवर कोयत्याने हल्ला केला.

दरम्यान, पुण्याच्या येरवड्याच्या बालसुधारगृहातून कोयता गँग फरार झालीय.मध्यरात्री कोयता टोळीतील 7 सदस्य सुधारगृहातून पळून गेले. या सातही जणांना वेगवेगळ्या प्रकरणांत बालसुधारगृहात ठेवण्यात आलं होतं.

4. अजित पवारांचे समर्थक आमदाराचा मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मंत्रालय ते ठाणे असा प्रवास केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अण्णा बनसोडे हे पिंपरी मतदारसंघाचे आमदार आहेत.

एकीकडे चिंचवड पोटनिवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष असताना या नव्या घडामोडीमुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

अणा बनसोडे हे अजित पवार यांचे समर्थक मानले जातात. तसेच पुढील तिकीट दुसऱ्या व्यक्तीला दिले जाणार असल्याच्या चर्चेमुळे ते नाराज असल्याचं बोललं जात आहे असं सकाळने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. त्यामुळे बनसोडे आणि शिंदे यांच्या एकत्रित प्रवासाची सर्वत्र चर्चा होत आहे.

5. 32 वर्षीय महिलेनं केलं 15 वर्षांच्या मुलाचं लैंगिक शोषण

कल्याणमधील एका 32 वर्षीय महिलेने नववीत शिकणाऱ्या एका मुलाचं लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे.

हा अल्पवयीन मुलगा नाशिकला आपल्या आत्याकडे गेला असता त्याची सदर महिलेशी ओळख झाली. तिने या मुलाला दारू आणि अश्लील चित्रपट पाहाण्याचं व्यसन लावून त्याला शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लावले. तसेच त्याच्याबरोबर नग्नावस्थेतले व्हीडिओही तिने तयार केले होते.

यासंदर्भातील तक्रार मुलाच्या आईने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. ही बातमी टाइम्स नाऊ मराठीने दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)