जन्मतारखेतल्या चुकीमुळे फाशीची शिक्षा सुनावली गेली; 28 वर्षं तुरुंगात काढली आणि...

फोटो स्रोत, Antariksh Jain
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
25 वर्षांपूर्वी एका पौगंडावस्थेतील म्हणजेच टीनएजर मुलाला खुनाच्या आरोपाखाली प्रौढ व्यक्ती म्हणून फाशीची शिक्षा देण्यात आली. गुन्ह्याच्या वेळी ती व्यक्ती अल्पवयीन होती असा निर्वाळा देत सुप्रीम कोर्टाने या व्यक्तीची मार्चमध्ये सुटका केली.
बीबीसी प्रतिनिधी सौतिक बिस्वास या व्यक्तीच्या गावात गेले. राजस्थानातील जलबसर हे त्याचं गाव. ती व्यक्ती आता 41 वर्षांची आहे.
नागपूरच्या केंद्रीय कारागृहात बंदिस्त असलेल्या निराणाराम चेतनाराम चौधरीची सुटका झाली.
त्यांनी 28 वर्षं, सहा महिने, 23 दिवस कारागृहात घालवला. 10431 दिवस त्यांच्यावर खटला चालला. हे सगळे दिवस बंदिस्त 10 बाय 12 खोलीत गेले. त्यांचा सेल अतिसुरक्षित होता. या काळात त्यांनी पुस्तकं वाचली, परीक्षा दिली आणि 18 वर्षाचा होण्याआधीच शिक्षा झाली हे सिद्ध करण्यात त्यांचा वेळ गेला.
निराणाराम यांना 1994 मध्ये पुण्यात सात लोकांचा खून केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यात पाच स्त्रिया आणि दोन लहान मुलांचा समावेश होता. त्यांच्याबरोबर आणखी दोघांना राजस्थानमधील त्यांच्या गावातून अटक करण्यात आली होती. 1998 मध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तेव्हा त्यांचं वय 20 वर्षं होतं असं गृहित धरण्यात आलं होतं.
मार्च 2023 मध्ये त्यांच्यामागचं हे शुक्लकाष्ठ संपलं. तीन कोर्ट, अगणित सुनावण्या, बदलते कायदे, याचिका, दयेचा अर्ज, वय ओळखण्याच्या चाचण्या, आणि जन्माचा दाखला शोधण्याचा हा प्रवास होता.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ते घटनेच्या वेळी 12 वर्षं, सहा महिने, इतकं त्यांचं वय होते. याचाच अर्थ ते अल्पवयीन होते. भारतीय कायद्यात अल्पवयीन गुन्हेगाराला तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होत नाही.

फोटो स्रोत, Antariksh Jain
एका अल्पवयीन मुलाला फाशीची शिक्षा होते इतकी न्यायाची थट्टा कशी काय होऊ शकते?
जेव्हा त्यांना अटक झाली तेव्हा त्यांचं नाव नारायण असं नोंदवलं गेलं होतं आणि त्यांचं वयही चुकीचं नोंदवलं गेलं.
हे असं का झालं, पोलिसांनी त्याचं वय चुकीचं का नोंदवलं याची कारणं समोर आली नाही. जेव्हा पहिल्यांदा चुकीचं वय नोंदवलं तेव्हाची परिस्थिती आता लोकांना फारसं आठवत नाही.
“त्याच्या अटकेच्या नोंदी खूप जुन्या असतात. तपासाचे मूळ पेपर्स सुप्रीम कोर्टात पोहोचले सुद्धा नाहीत,” असं श्रेया रस्तोगी म्हणाल्या.
श्रेया प्रोजेक्ट 39A शी निगडीत आहेत. दिल्लीच्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचा हा एक उपक्रम आहे. या उपक्रमा अंतर्गत निराणाराम यांना न्याय मिळायला तब्बल नऊ वर्षं लागली.
आश्चर्यकारकरित्या 2018 पर्यंत निराणाराम अल्पवयीन असल्याचा मुद्दा कोणत्याही कोर्टात आला नाही, तो कोणत्याही वकिलांनी उपस्थित केला नाही. जन्माचा दाखला नसल्याने अनेक भारतीयांना त्यांची जन्मतारीखच माहिती नाही. निराणाराम त्यांच्यापैकी एक आहेत.
त्याच्या शाळेतले एक जुनं रजिस्टर समोर आल्यामुळे त्यांची जन्मतारीख 1 फेब्रुवारी 1982 असल्याचं लक्षात आलं. तसंच त्यासोबत शाळा सोडल्याचा दाखला होता. त्यात शाळेत कधी प्रवेश घेतला आणि कधी सोडली याची नोंद होती त्यामुळे नारायण आणि निराणाराम एकच व्यक्ती असल्यावर शाळेनं शिक्कामोर्तब केलं.
“हे संपूर्ण व्यवस्थेचं अपयश आहे. मग वकील असो, बचाव पक्षाचे वकील, कोर्ट, तपास अधिकारी असो. या घटनेच्या वेळी ते किती वर्षांचे होते हे आम्हाला कळलं नाही.” असं रस्तोगी यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Antariksh Jain
गेल्या आठवड्यात त्यांच्या गावात जाण्यासाठी आम्हाला रखरखत्या वाळवंटातून जावं लागलं. राजस्थानातील बिकानेर जिल्ह्यातील या गावात 600 घरं होते आणि 3000 लोक होती. या गावात निराणाराम यांचं घर आहे. शेतकरी बापाच्या पोटी जन्माला आलेल्या निराणाराम यांची आई गृहिणी होती. निराणाराम आता त्यांचे चार भाऊ, त्यांच्या बायका, पुतणे यांच्याबरोबर रहायला आले आहेत.
अनेक शेतं आणि वाळवंटाच्या मध्यावर वसलेलं हे गाव बऱ्यापैकी श्रीमंत वाटलं. या गावातील रस्ते निर्मनुष्य होते. घरांच्या वेळी सॅटलाईट डिश आणि पाण्याच्या टाक्या होत्या. स्थानिक शाळांच्या भिंतीवर अनेतक दात्यांची नावं कोरलेली होती.
“माझ्याबरोबर असं का झालं? एका क्षुल्लक चुकीमुळे मी माझ्या आयुष्यातील उमेदीची वर्षं घालवली” उंचपुरे आणि खोल गेलेले डोळे असलेले निराणाराम माझ्याशी बोलत होते.
“याची नुकसानभरपाई कोण करेल?”
प्रशासननाने केलेल्या या चुकीची भरपाई कशानेच होऊ शकत नाही.

फोटो स्रोत, Antariksh Jain
निराणाराम यांचे सहआरोपी अजूनही तुरुंगात आहेत. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. जेव्हा पुण्यातल्या कोर्टात ही केस उभी राहिली तेव्हा ही दुर्मिळातली दुर्मिळ केस असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं.
पुण्यात 26 ऑगस्ट 1994 ला एका घरात दरोडा घालण्याचा प्रयत्न झाला. एकाच कुटुंबातल्या सात लोकांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.
हे सगळं प्रकरण काय होतं? इथे वाचा.
पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार एक आरोपी त्यांच्या दुकानात काम करत होता आणि घटनेच्या काही दिवस आधी त्याने नोकरी सोडली होती. ( नंतर हा आरोपी माफीचा साक्षीदार झाला.)
अल्पवयीन निराणाराम यांच्यासह इतर दोन आरोपी या कुटुंबाला माहिती नव्हते. “दरोडा घालणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं तरीही त्यांना प्रत्येकाला मारण्याची काय गरज होती?” असं संजय राठी यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं होतं. ते या कुटुंबातील एक सदस्य आहेत.
निराणाराम तिसऱ्या वर्गापर्यंत शिकले आणि आणि घरातून पळून गेले.
“तुम्ही का पळून गेला होतात? मी विचारलं.
“मला आता लक्षात नाही, मी ज्यांच्याबरोबर पळून गेलो ते लोकही मला लक्षात नाही. मी पुण्यात आलो. तिथे मी एका टेलरकडे काम करत होतो.” ते म्हणाले.
निराणाराम का पळून गेले हे त्यांच्या भावांनाही आठवत नाही.
त्यांनी केलेल्या खुनाचं काय?

फोटो स्रोत, Antariksh Jain
“मी असं काही केल्याचं मला आठवत नाही. पोलिसांनी मला का पकडलं याची मला अजिबात कल्पना नाही. मला अटक केल्यानंतर पोलिसांनी मारल्याचं आठवतं. जेव्हा मी त्याचं कारण विचारलं तेव्हा ते मराठीत काहीतरी म्हणाले. तेव्हा मला मराठी भाषा यायची नाही.”
तुम्ही गुन्हा कबूल केला का?
“मला आठवत नाही. पण पोलिसांनी मला अनेक कागदांवर सही करायला लावली. मी लहान होती. मला वाटतं मला या प्रकरणात गोवण्यात आलं.”
"तुम्ही गुन्हा केला नाही असं तुम्ही म्हणताय का?" मी त्यांना विचारलं.
“मी गुन्हा कबूलही करत नाही आणि केल्याचं नाकारतही नाही. मला सगळं आठवलं तर मी अधिक माहिती देऊ शकेन, मला काहीही आठवत नाही. माझ्या त्याबाबत काहीही आठवणी नाही,” निराणाराम म्हणाले.
12 वर्षाचा मुलगा इतका गंभीर गुन्हा करू शकतो का असा प्रश्न कोर्टाने निराणाराम यांना सोडताना विचारला.
“हे सगळं अतिशय धक्कादायक आहे तरी आपण कोणत्याही शंकेला वाव ठेवू शकत नाही. आम्हाला बाल मानसशास्त्राचं आणि गुन्हेगारीशास्त्राचं फारसं ज्ञान नाही.” असंही निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवलं.
पांढरा शर्ट आणि पँट घालून निराणाराम बसले होते. तुरुंगातल्या सह आरोपींनी त्यांचा सुरुवातीला खूप छळ केला. याशिवाय त्यांना तुरुंगाचे सुरुवातीचे दिवस आठवत नाही.
मात्र नागपूरच्या तुरुंगात त्यांचा कैदी कम्रांक 7432 असल्याचं त्यांना आठवतं. काही काळ त्यांनी पुण्याच्या तुरुंगात घालवल्याचं त्यांना स्पष्ट आठवतं.
मी खूप घाबरलो होतो त्यामुळे इतर कैद्यांबरोबर मी मैत्री केली नाही असं ते म्हणाले. हा एकटेपणा घालवण्यासाठी शिक्षण हा चांगला उपाय आहे असं त्यांच्या लक्षात आलं. ते सतत अभ्यास करायचे. त्यांनी त्या दमट आणि दाटीवाटीच्या कारागृहात अनेक परीक्षा दिल्या आणि शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतं. सुटकेच्यावेळी राज्यशास्त्रातही अशाच प्रकारचं शिक्षण घेत होते.
जर आपली सुटका झाली तर त्यांना भारतभर फिरायचं होतं त्यामुळे त्यांनी पर्यटन क्षेत्रातला एक सहा महिन्याचा कोर्सही केला. गांधींच्या विचारांचाही त्यांनी अभ्यास केला.
“तुरुंगात असताना पुस्तकं हेच तुमचे सर्वांत चांगले मित्र असतात,” ते म्हणाले.
निराणाराम यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यांनी चेतन भगत आणि दुरजॉय दत्ता सारख्या प्रसिद्ध लेखकांची पुस्तकं वाचली आहेत. तसंच सिडने शेल्डन यांची पुस्तकंही वाचली आहे.
Fydoor Dosteovsky यांचं Crime and Punishment हे पुस्तक त्यांना खूप आवडलं. जॉन ग्रिशम यांचं The Confession हे त्यांचं आवडतं पुस्तक आहे. कारण या पुस्तकाची कथा आणि त्यांची कथा सारखीच आहे असं त्यांना वाटतं.
इंग्रजी वर्तमानपत्रं हा बाह्य जगाशी संपर्क साधण्य़ाचा एकमेव मार्ग होता असं ते सांगतात. ते पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत पेपर वाचायचे एकदा त्यांनी वेन डिझेलचा फोटो पाहिला आणि टक्कल केलं. त्यांना युक्रेनबद्दलसुद्धा माहिती आहे.
“यावरून दोन्ही देशाला एकत्र आणून चर्चा घडवून आणण्यासारखा जागतिक नेता नाही असं यातून सिद्ध होतं,” असं त्यांनी रस्तोगी यांना एका लिहिलेल्या पत्रात म्हटलं.
“तुम्ही लिहिता, बोलता, वाचता तरी तुम्हाला कंटाळा येतो,” ते म्हणाले.

फोटो स्रोत, Arindam Jain
निराणाराम यांनी भाषा शिकायला सुरुवात केली. त्याने मराठी, हिंदी, आणि पंजाबी भाषा शिकली. मल्याळम शिकायलाही सुरुवात केली होती. मात्र या सगळ्यात त्यांची मातृभाषा विसरले.
निराणाराम जेव्हा घरी आले त्याच्या आदल्या रात्री दणक्यात डीजे लावून जोरदार जल्लोष करण्यात आला. त्यांची आई सुद्धा या जल्लोषात सहभागी झाली. जेव्हा अण्णी देवी त्यांच्या मुलाला भेटल्या तेव्हा त्यांच्या गालावरून अश्रू वाहू लागले.तरी एकमेकांशी काय बोलताहेत हे त्यांना कळलं नाही. निराणाराम यांच्या वडिलांचं 2019 मध्ये निधन झालं.
जेव्हा निराणाराम तुरुंगाच्या बाहेर आले तेव्हा भारत कितीतरी बदलल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
“रस्त्यावर नवीन कार होत्या, लोकांनी स्टाईलिश कपडे घातले. रस्तेही छान आहेत. अगदी तरुण लोकांकडेही हायाबुझा बाईक आहे. मला आधी वाटायचं की या बाईक फक्त चित्रपट अभिनेत्यांकडेच असतील.” ते म्हणाले.
घरी आल्यावर निराणाराम यांच्यासाठी भाषा हा खूप मोठा अडसर आहे. त्यांना मराठी, हिंदी, इंग्लिश या भाषा येतात. पण त्यांच्या कुटुंबियांना यापैकी एकही भाषा बोलता येत नाही. त्यामुळे मायलेक रोज एकमेकांकडे पाहत बसलेले असतात. त्यांचा पुतण्या या दोघांमधला दुभाषा असतो कारण त्याला हिंदी बोलता येतं.
“माझ्याच घरी कधीकधी मला परकं वाटतं.” निराणाराम म्हणतात.
लोकांशी व्यवहार करणं आणि जागेशी जुळवून घेणं ही सुद्धा त्यांच्यासाठी एक कठीण प्रक्रिया आहे. “सार्वजनिक ठिकाणी लोकांना धडकण्याची मला कायम भीती वाटते. कारण मला तुरुंगाची आणि छोट्या जागेची सवय झाली आहे. फाशीची शिक्षा झाल्यामुळे एक प्रकारचं सामाजिक एकटेपण येतं. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून कसं जगतात हे आता मला शिकावं लागणार आहे.” ते म्हणाले.
निराणाराम म्हणाले की त्यांना लोकांशी विशेषत: बायकांशी कसं बोलायचं हे कळत नाही. “मला बायकांशी कसं बोलायचं आणि वागायचं ते कळत नाही. मला बायकांशी बोलायला शिकवा हे मी कोणाला कसं सांगू? मला त्यांच्याशी बोलताना दोनदा विचार करावा लागतो.”
पण त्यांना आता एक नवीन आयुष्य सुरू करायचं आहे. त्याच्या कुटुंबियांनी त्याला मोबाईल दिला आहे. तो कसा वापरायाचा हे आता ते शिकत आहेत. त्यांच्या पुतण्यांनी फेसबुक आणि व्हॉट्स अप अकाऊंट उघडलं आहे. त्याचे वडील 100 एकरावर शेती करतात. मात्र निराणाराम यांना आता कायद्याचं शिक्षण घ्यायचं आहे, समाजसेवा करायची आहे. त्यांच्यासारखीच स्थिती असलेल्या इतर कैद्यांची मदत करायची आहे.
सध्या ते त्यांच्या गावात चर्चेचा विषय झाले आहेत असं त्यांचा पुतण्या राजू चौधरीने सांगितलं. “फाशीची शिक्षा झालेल्या व्यक्तीला पाहण्यासाठी अनेक लोक, त्यांचे नातेवाईक रोज येत आहेत.”
निराणाराम त्यांच्या भावांपैकी एकाच्या घरात राहतात. ते त्यांच्या पुतण्यांना इंग्रजी शिकवतात. मुक्त जगात वावरणं शिकण्यासाठी त्यांना वेळ लागेल असं ते म्हणतात कारण त्यांना तुरुंगाच्या संथ आयुष्याची सवय होती.
“मी भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यात हिंदोळे घेत आहे. मी सुटलो याचा मला आनंद आहे. पुढे काय होईल याची मला काळजी वाटते. सध्या मी एका विचित्र स्थितीतून जात आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








