देवांशी : 8 वर्षांची मुलगी हिऱ्यांच्या व्यापाराची वारसदार ठरली असती, पण आता संन्यासी आयुष्य जगणार...

फोटो स्रोत, Rupesh Sonawane
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, दिल्ली
आठ वर्षांची देवांशी संघवी मोठी होऊन हिरे व्यापारी झाली असती. मात्र आता ती एका संन्याशाचं आयुष्य जगतेय. पांढरी साडी घालून, अनवाणी पायाने जाऊन दारोदारी भिक्षा मागत आहे.
कारण मागच्या आठवड्यात धनेश आणि अमी संघवी यांच्या मोठ्या मुलीने संन्यास घेण्याची घोषणा केली आहे.
भारतात असलेल्या 45 लाख जैनांपैकी संघवी एक आहेत. जैन धर्माचा उदय भारतात 2500 वर्षांपूर्वी झाला आणि तो भारतातल्या सगळ्यात जुन्या धर्मांपैकी एक आहे.
भौतिक गोष्टींचा त्याग करणाऱ्या जैनांची संख्या वाढत असल्याचं जैन धर्माच्या अभ्यासकांचं म्हणणं आहे. मात्र अगदी देवांशीच्या वयाच्या लोकांचं प्रमाण अगदी नगण्य आहे.
गेल्या बुधवारी (18 जानेवारी) सुरत मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात देवांशीने संन्यासाची दीक्षा घेतली. यावेळी ज्येष्ठ जैन मुनी आणि हजारो लोक उपस्थित होते.
शहरातील वेसू भागात ती तिच्या पालकांबरोबर आली. सिल्कचा ड्रेस घातलेली देवांशी दागिन्यांनी मढलेली होती. तिच्या डोक्यावर एक हिऱ्याचा मुकूट ठेवण्यात आला.
कार्यक्रम पार पाडल्यानंतर तीसुद्धा इतर संन्याशिणींच्या पंक्तीत जाऊन बसली होती. तिने पांढरी साडी नेसली होती आणि मुंडन केलं होतं.

फोटो स्रोत, Rupesh Sonawane
देवांशी आता जैन साधू संत जिथे राहतात त्या उपाश्रयात राहणार आहे.
“ती आता घरात राहू शकणार नाही. तिचे पालक आता तिचे राहिलेले नाहीत. ती आता संन्याशीण आहे.” असं किर्ती शाह म्हणाल्या.
त्यासुद्धा हिरे व्यापारी आहेत, या कुटुंबाच्या स्नेही आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत.
“जैन संन्याशिणीचं आयुष्य कठीण असतं. तिला आता सगळीकडे चालत जावं लागेल. ती आता कोणतंच वाहतुकीचं माध्यम वापरू शकत नाही. ती आता एका पांढऱ्या चादरीवर झोपेल आणि सूर्यास्तानंतर ती खाऊ शकणार नाही.
भारतात फक्त जैन धर्मात लहान मुलं संन्यासी म्हणून स्वीकारले जातात.
देवांशीचे पालक अतिशय धार्मिक म्हणून ओळखले जातात. ती लहानपणापासूनच अतिशय धार्मिक असल्याचं या कुटुंबाच्या मित्रमैत्रिणींनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.
'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या बातमीनुसार तिने कधीही टीव्ही पाहिला नाही, कधी चित्रपट बघायला गेली नाही की कधी मॉलमध्ये गेली नाही. अगदी हॉटेलमध्ये खायला गेली नाही.
अगदी कमी वयापासून देवांशी तीन वेळा प्रार्थना करते, अगदी दोन वर्षांच्या वयापासून ती उपवास करते, असंही या बातमीत पुढे म्हटलं आहे.
हा कार्यक्रम होण्याच्या आदल्या दिवशी या कुटुंबाने सुरतमध्ये एक मोठी मिरवणूक काढली आहे. या मिरवणुकीत उंट, घोडे, बैलगाड्या होत्या. तसंच मेघडंबरी सुद्धा या मिरवणुकीत होत्या.
देवांशी आणि तिचं कुटुंब एका रथात बसले होते. तो रथ हत्ती ओढत होते. तर लोक त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करत होते.

फोटो स्रोत, Rupesh Sonawane
अशीच एक मिरवणूक मुंबई आणि बेल्जिअम मधील अँटव्रेप शहरातसुद्धा अशीच मिरवणूक काढण्यात आली. तिथे संघवी कुटुंबाचा व्यापार चालतो.
जैन समुदायाने देवांशीच्या संन्यास घेण्याच्या संकल्पनेला पाठिंबा दिली पण यामुळे इतक्या लहान वयात संन्यास घेण्याच्या संकल्पनेला विरोधही होत आहे. तिने योग्य वयात तिच्यासाठी हा निर्णय घेईपर्यंत तिचे कुटुंबीय का थांबले नाही, असाही प्रश्न आता विचारला जात आहे.
शाह यांना या कार्यक्रमाला बोलावलं होतं मात्र ते गेले नाहीत. कारण लहान मुलांनी संन्यास घेण्याची संकल्पना त्यांना पटत नाही. कोणत्याही धर्माने इतक्या लहान वयात संन्यास घ्यायला लावू नये असं त्यांचं मत आहे.
“ती लहान आहे. तिला यातलं काय कळतं?” ते विचारतात.
“16 वर्षाच्या वयात कोणतं शिक्षण घ्यायचं हे सुद्धा ते ठरवू शकत नाही. मग अशा परिस्थितीत संपूर्ण आयुष्यावर प्रभाव पाडणारा हा निर्णय ती कसा घेऊ शकते?”
एका लहान मुलीने हा निर्णय जाहीर केल्यावर जगाने तिला देवत्व दिलं आहे. त्यांच्या समुदायात उत्सव सुरू आहे. हे सगळं त्या मुलीला एक पार्टी असल्यासारखं वाटत असेल असं प्रा. निलिमा मेहता म्हणतात. त्या मुंबईत बाल हक्क रक्षण सल्लागार आहेत. या निर्णयामुळे त्या मुलीला पुढे फार त्रास होणार आहे असंही त्या पुढे म्हणाल्या.
“जैन संन्याशिणीचं आयुष्य फार कठीण होतं.” त्या म्हणाल्या.
इतक्या लहान वयातल्या मुलीला तिच्या कुटुंबापासून दूर केल्याच्या निर्णयावर इतर समुदायातील लोकांनीही टीका केली आहे.
जेव्हापासून ही बातमी समोर आली आहे तेव्हापासून सोशल मीडियावरही लोकांनी संघवी कुटुंबावर टीका केली आहे. बालहक्कांचा भंग केल्याचं लोकांचं मत आहे.
संन्यास घेण्याची प्रथा थांबवायला हवी आणि त्यासाठी सरकारने ही प्रयत्न करायला हवा, अशी मागणी आता होत आहे.
मात्र असं येत्या काळात होण्याची शक्यता फार कमी आहे. देवांशी प्रकरणात राष्ट्रीय बाल हक्क आयोग काही करणार आहे का हे विचारण्यासाठी मी त्यांचे प्रमुख प्रियांक कांगो यांना विचारलं. मात्र हा विषय नाजूक असल्याने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
काही कार्यकर्त्यांच्या मते देवांशीच्या हक्काचं उल्लंघन झालं आहे.
ती मुलगी तिच्या मर्जीने संन्याशीण झाली आहे असं म्हणणाऱ्या लोकांना प्रत्युत्तर देताना प्रा.मेहता म्हणतात की, लहान मुलांची परवानगी कायद्याने गृहितच धरल्या जात नाही.
“18 व्या वर्षी व्यक्ती स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतं. तेव्हापर्यंत त्यांच्या पालकांतर्फे निर्णय घेतले जातात. पाल्याचं हित कशात आहे याचा निर्णय पालक घेतात.”
“एखाद्या निर्णयामुळे त्या पाल्याच्या शिक्षणावर आणि इतर गोष्टींवर बाधा येत असेल तर ते तिच्या हक्कांचं उल्लंघन आहे.”
बिपीन दोशी मुंबई विद्यापीठात जैन तत्त्वज्ञान शिकवतात. त्यांच्या मते आध्यात्मिक जगाला कायद्याचे नियम लागू होत नाहीत.”
“काही लोकांचं असं मत आहे की लहान मुलं असे निर्णय घेण्यास परिपक्व नाहीत. मात्र अशी काही मुलं असतात जे लहान वयात प्रौढ व्यक्तींपेक्षाही चांगले निर्णय घेऊ शकतात. काही लहान मुलं अध्यात्माकडे झुकलेले असतात. मग ते संन्यासी झाले तर त्यांचं काय चुकलं?”ते विचारतात.
तसंच देवांशी ला कोणत्याही प्रकारे कोणीही इजा केलेली नाही याकडेही ते लक्ष वेधतात.
“तिला पारंपरिक करमणुकीच्या साधनांपासून दूर ठेवण्यात आलं पण ते प्रत्येकासाठी गरजेचं असतं का? ती प्रेम आणि शिक्षणापासून वंचित राहील यावर माझा विश्वास नाही. तिला तिच्या गुरुंकडून प्रेम मिळेल. तसंच ती प्रामाणिकपणा आणि अलिप्त राहण्याचा प्रयत्न करेल. हे चांगलं नाही?”
डॉ. दोशी म्हणतात की जर देवांशीला कोणत्याही टप्प्यावर असं वाटलं की तिने चुकीचा निर्णय घेतला तर ती भौतिक जगात कधीही परत येऊ शकते.

फोटो स्रोत, Rupesh Sonawane
मग ती वयात आल्यावर तिला हा निर्णय का घेऊ दिला नाही असा प्रश्न प्रा.मेहता विचारतात.
“लहान मुलांवर लगेच आजूबाजूंच्या वातावरणाचा प्रभाव पडतो. हे असं आयुष्य आपल्याला नकोय असंही तिला वाटू शकतं.” त्या म्हणाल्या. अनेकदा मुली मोठ्या झाल्यावर त्यांचं मत बदलल्याच्या घटनाही झाल्या आहेत असंही त्या पुढे म्हणाल्या.
मेहता सांगतात की गेल्या काही वर्षापूर्वी अशाच एका मुलीची केस त्यांनी हाताळली होती. तिला खूप त्रास झाल्याने ती तिच्या आश्रमातून पळाली होती.
असंच एक प्रकरण 2009 मध्ये झालं होतं. एक मुलगी नवव्या वर्षीच संन्याशीण झाली. ती 21 वर्षांची झाली आणि तिच्या बॉयफ्रेंडबरोबर पळाली आणि त्याच्याशी लग्न केलं.
यासंबंधी अनेक याचिका कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत. प्रा. मेहता म्हणतात की समाजसुधारणा हे एक खूप मोठं आव्हान आहे कारण तो एक नाजूक विषय आहे.
“फक्त जैन धर्मातच नाही, हिंदू मुलींचंही देवाबरोबर लग्न लावून देण्यात येतं. त्याला देवदासी प्रथा म्हणतात. लहान मुलं आखाड्यात जातात. बुद्ध धर्मात सुद्धा मुलं संन्यासी होतात.
“सगळ्याच धर्मात लहान मुलांचं शोषण होतं. मात्र तुमचं मूल ही तुमची मालमत्ता आहे हे त्यांच्या पालकांनी लक्षात ठेवायला हवं.” त्या पुढे म्हणतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








