प्रेमभंगाच्या दुःखातून सावरण्याचे धडे मुलींना देणारी 'ब्रेकअप प्रशिक्षक'

फोटो स्रोत, SOMSARA RIELLY
- Author, मेघा मोहन,
- Role, जेंडर अँड आयडेंटीटी प्रतिनिधी, बीबीसी न्यूज.
टिकटॉकवर आतापर्यंत ब्रेकअप हा हॅशटॅग 21 अब्जांहून अधिकवेळा वापरण्यात आला आहे. म्हणजे जगभरात किती जण ब्रेकअपमधून गेले असतील याचा अंदाज आपल्याला येऊ शकते.
आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये निदान एकतरी व्यक्ती असते की ती ब्रेकअपच्या फेजमधून जात असते.
कित्येक वेळा तुम्ही त्यांना सावरण्याचा काम केलं असू शकतं किंवा त्यांनी देखील तुमच्या कठीण काळात तुम्हाला साथ दिली असू शकते. पण तुम्हाला माहीत आहे का, आता या जगात ब्रेकअप कोच नावाचे प्रोफेशन देखील अस्तित्वात आहे.
अनेकांना आपल्या प्रेमभंगातून सावरायचं असतं पण ज्या व्यक्तीकडे आपण विश्वासाने बोलू अशी व्यक्तीच नसते तेव्हा अनेक जण आरोंक ओमेम यांचा सल्ला घेतात. त्या एक व्यावसायिक ब्रेकअप कोच आहेत.
त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात होण्याआधी त्या देखील काही कटू अनुभवांतून त्या गेल्या आहेत. त्यांचा हा अनुभव आता त्यांच्या क्लायंटसला उपयुक्त ठरतोय.
नायजेरियाच्या लागोस शहरातील एका कोर्टात आरोंक गेल्या होत्या. तेव्हा त्या आपल्या एका मैत्रिणीला धीर देण्यासाठी गेल्या होत्या.
आरोंक यांची मैत्रीण मेरी ( बदलेलं नाव) यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट होणार होता आणि मेरी ही प्रचंड तणावाखाली होती.
आरोंक यांना अजून तो दिवस आठवतो त्या सांगतात. मेरी यांची आई मेरीच्या बाबांकडे टक लावून पाहत होत्या. आपली असहायता त्यांना दिसेल आणि ते त्यांचा निर्णय बदलतील अशी गोष्ट कदाचित त्यांच्या मनात असावी.

फोटो स्रोत, SOMSARA RIELLY
मग सुनावणी झाली आणि न्यायाधीशांनी त्यांना काही वेळासाठी ब्रेक दिला. तेव्हा मेरीची आई मेरीला सोबत घेऊन मेरीच्या वडिलांसमोर गेली. त्यांनी विनवणी केली की असा संसार मोडू नका. पण मेरीचे वडील भूमिकेवर ठाम होते. त्यांनी त्या दोघींना शिवीगाळ केली.
मेरी यांना धीर देण्यासाठी गेलेल्या आरोंक यांनी देखील लहानपणीच आई-वडील वेगळे होतानाचं दुःख अनुभवलं होतं. 1993 ची ती घटना होती. या घटनेनी त्यांना बरंच काही शिकवलं.
नायजेरियाच्या लागोस शहरातील एका कोर्टात आरोंक गेल्या होत्या. तेव्हा त्या आपल्या एका मैत्रिणीला धीर देण्यासाठी गेल्या होत्या.
आरोंक यांची मैत्रीण मेरी ( बदलेलं नाव) यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट होणार होता आणि मेरी ही प्रचंड तणावाखाली होती.
आरोंक यांना अजून तो दिवस आठवतो त्या सांगतात. मेरी यांची आई मेरीच्या बाबांकडे टक लावून पाहत होत्या. आपली असहायता त्यांंना दिसेल आणि ते त्यांचा निर्णय बदलतील अशी गोष्ट कदाचित त्यांच्या मनात असावी.
मग सुनावणी झाली आणि न्यायाधीशांनी त्यांना काही वेळासाठी ब्रेक दिला. तेव्हा मेरीची आई मेरीला सोबत घेऊन मेरीच्या वडिलांसमोर गेली. त्यांनी विनवणी केली की असा संसार मोडू नका. पण मेरीचे वडील भूमिकेवर ठाम होते. त्यांनी त्या दोघींना शिवीगाळ केली.
मेरी यांना धीर देण्यासाठी गेलेल्या आरोंक यांनी देखील लहानपणीच आई-वडील वेगळे होतानाचं दुःख अनुभवलं होतं.
'आई-वडील वेगळे का झाले याचं उत्तर कधीच मिळालं नाही'
1967 साली आरोंक केवळ 9 वर्षांच्या होत्या. शाळेत खेळायच्या तासात त्या मित्र-मैत्रिणीसोबत खेळत होत्या. त्या ठिकाणी अचानकपणे मुख्यध्यापिका आल्या आणि त्यांनी आरोंकला सांगितलं की तुझे वडील तुला भेटायला आले आहेत.
छोट्या आरोंकच्या मनात आलं की काहीतरी वेगळं घडलं असणार नाहीतर वडील असं येतच नाहीत.

फोटो स्रोत, SOMSARA RIELLY
वडिलांनी तिला बाहेर गेल्यावर सांगतलं, "आपण आता घरी जाणार नाही. तू आता काही दिवस आजीकडे राहणार आहेस."
आजीचं घर त्यांच्या शहरापासून काही किलोमीटर दूर असलेल्या एका गावात होतं. शाळेत सोडणारं-आणणारं कुणी नाही. त्यामुळे आता शाळाही काही दिवस बुडणार होती.
आरोंकच्या आई-वडिलांना एकमेकांना खासगीत बोलण्यासाठी वेळ हवा होता. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीला आजीकडे सोडलं होतं.
नेमकं काय चाललंय, हे आरोंकच्या लक्षात आलं नाही. एकूणच ती याबाबत संभ्रमावस्थेत होती.
कधी कधी आरोंकचे आई-वडील आजीच्या घरी येत. त्यावेळी आई-वडिलांच्या खोलीतून कुजबुजण्याचे आवाज येत असत.
हळुहळू आरोंक या वातावरणात रुळली. ती दिवसभर खेळत असे आणि आजीला स्वयंपाकात मदत करत असे.
याविषयी आरोंक सांगतात, "आमचं कुटुंब मोठं होतं. शिवाय, मला आजी-आजोबा, काका-काकू, मामा-मामी या सगळ्यांनी सांभाळलं. याची माझ्या आई-वडिलांना खूप मदत झाली."
पुढे काही दिवसांनी आरोंक तिच्या घरी परतली. पण वडील घरातून निघून गेले होते.
आई-वडिलांनी वेगळे झाल्यावर एकमेकांशी सौहार्दपूर्ण संबंध कायम ठेवले. ते आपले मुलाबाळांसमोर कधीच भांडले नाही.
"प्रत्येकाचा हेतू चांगला असला तरी नाती नेहमीच टिकतात असं नाही. त्यामुळे आयुष्यभर एकमेकांना टोमणेबाजी करत राहण्यापेक्षा चांगुलपणाने एकमेकांचा आदर राखून नातं संपवलेलं कधीही चांगलं."
आपल्या आईवडिलांचं वैवाहिक नातं का संपुष्टात आलं, याचं उत्तर आरोंकला कधीच मिळालं नाही.
तिचं उर्वरित बालपण तसं आनंदातच गेलं. पण पुढे तिला प्रेमामध्ये मिळालेला धडा चांगलीच शिकवण देऊन गेला.
प्रेमभंग आणि त्यातून मिळालेला धडा
आरोंक 18 वर्षांची होती. तिने कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथं तिचे अनेक मित्रमैत्रिणी झाले. मित्रांपैकी एकजण तिच्याशी थट्टामस्करी करायचा. चेष्टा कधी कधी फ्लर्टिंगपर्यंत पोहोचत आहे हे आरोंकच्या लक्षात येत होतं.
इथेच रिलेशनशिपची सुरूवात झाल्याचं तिला जाणवलं. आरोंक आयुष्यात पहिल्यांदाच कुणाच्या तरी प्रेमात पडली होती.
पण यादरम्यान एक समस्या आली. तिच्या प्रियकराला आरोंकसोबत सेक्स करायचा होता. पण ती त्यासाठी तयार नव्हती.

फोटो स्रोत, SOMSARA RIELLY
आरोंक सांगते, "लग्नापूर्वी सेक्स करणं माझ्या तत्त्वात बसत नव्हतं, मी खूपच कौटुंबिक विचार करणारी होते."
पण प्रियकराला वाईट वाटू नये, यासाठी त्याला इतर पद्धतींनी त्याला भुरळ घालण्याचा प्रयत्न
आरोंक नेहमी करायची. ती प्रत्येक वेळी त्याला भेटण्यास जायची. त्याला वेगवेगळे सरप्राईजही द्यायची.
एके दिवशी प्रियकराला असंच एक सरप्राईज देण्यासाठी आरोंक थेट त्याच्या घरी गेली. तिथं तो दुसऱ्याच एका मुलीचं चुंबन घेत असल्याचं तिला दिसलं.
"मला खूप मोठा धक्का बसला. मी तिथून बाहेर पडले. तो मला विनवण्यासाठी माझ्या मागे येतो का, तेही मला पाहायचं होतं. पण तो आला नाही," आरोंक सांगते.
काही दिवसांच्या अबोल्यानंतर तिला एक पत्र मिळालं.
ते पत्र प्रियकरानेच पाठवलं होतं. "मला हवा असलेलं रत्न मला भेटलं आहे, त्यामुळे तुझं आता माझ्या आयुष्यात काही काम नाही," असं त्यामध्ये लिहिलं होतं.
आता प्रियकराच्या आयुष्यात आपल्याला काहीच जागा नाही, हे आरोंकच्या लक्षात आलं.
प्रियकराच्या असा विश्वासघात केल्याने ती निराश झाली.
"मला खूप दुःख झालं, लज्जास्पदही वाटत होतं. मी जगाच्या मागे पडले आहे, असं मला वाटू लागलं होतं," ती सांगते.
या प्रकारानंतर आरोंक दोन आठवडे कॉलेजला गेली नाही. बेडवर पडून ती रडत राहायची. प्रियकरासमोर जाण्याचीही तिला भीती वाटू लागली होती. त्यामुळे दिवसभर ती घरातच बसून राहायची.
आरोंकचे काही मित्र तुटले. काहींनी तिला भविष्याकडे पाहण्याचा सल्ला दिला.
बाहेरच्या जगात इतरही अनेक पर्याय उपलब्ध आहेत, असं त्यांनी सांगितलं.
काही दिवसांनी आरोंकचा मूड बदलला. तिला बाहेर जावंसं वाटलं. तिला कायद्याचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. तसंच मित्रमैत्रिणींसोबत पार्टीही करायची होती. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी आरोंकने घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
"मी स्वतःला रडू दिलं, याचा मला आनंद वाटतो. मला चांगला धडा मिळाला. मी रडून ते सगळं मोकळं केलं," असं ती म्हणते.
'अपमानामुळे होतो त्रास'
या घटनेनंतरची घटना आपण पाहू मेरीच्या आयुष्यातील. मेरीच्या वडिलांनी तिच्या आईचा आणि मेरीचा चारचौघात अपमान केला ते पाहून आरोंक यांना दुःख झाल्याचं त्या सांगतात.
त्या काळातील महिला असा अपमान का सहन करायच्या हा देखील विचार त्यांच्या मनात येऊन जातो.
त्यादरम्यान मेरीच्या वडिलांनी इतकी शिवीगाळ केली की ते काय म्हणाले, हे जसंच्या तसं लक्षातही राहू शकणार नाही. खरंतर ते विसरून जाण्याचाच आरोंकचा प्रयत्न आहे. ते अतिशय दयनीय होतं, असं आरोंक त्याविषयी सांगते.
दुर्दैवाने, त्याच्या काही वर्षांनंतर आरोंकलाही घटस्फोटाला सामोरं जावं लागलं. पण तिला मेरीच्या आईप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी अपमानाला तोंड द्यावं लागलं नाही.
मेरीच्या आईविषयी आरोंकला अजूनही वाईट वाटतं. वयाच्या साठीतील एखादी महिला अशा प्रकारे कशी एखाद्या पुरुषासमोर गुडघे टेकवून उभी राहते. तो तिला वाईट वागणूक देत असतानाही ती त्याला न सोडण्याची भीक मागत आहे, हा तिला किळसवाणा प्रकार वाटतो.
ती याविषयी आरोंक, "तेव्हाच मला लक्षात आलं की आपला समाजच या सगळ्या गोष्टींना पाठिंबा देतो. नवऱ्याकडून अपमानित होणं, अत्याचार सहन करणं ही समाजासाठी सामान्य गोष्ट बनली आहे."
करिअरकडे लक्ष आणि महिलांना मदत करण्याचा निर्धार
यादरम्यान आरोंकने आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रीत केलं होतं. पण याचा परिणती तिच्या घटस्फोटात झाली. या कालावधीत होत असलेल्या उलटसुलट चर्चांकडे दुर्लक्ष करण्याचं तिने ठरवलं होतं.
आरोंकच्या आई-वडिलांच्या घटस्फोटावेळीही सगळ्यांच्या नजरा तिच्या आईवरच होत्या. तिने असं काय केलं किंवा नाही केलं की ज्यामुळे नवऱ्याचा इंटरेस्ट तिच्यामधून निघून गेला, असा सगळ्यांचा सूर होता.
"अशा स्थितीत महिलेने दुःखीच राहायला हवं, इतर कोणताही विचार करू नये, असं समाजाला पाहिजे असतं. पण झालं-गेलं मागे टाकून नवं आयुष्य जगण्याचा सल्ला कुणीच देत नाही," आरोंक सांगत होती.
मेरीच्या आई-वडिलांचं ते कोर्टरूममधलं नाट्य पाहून आरोंक बाहेर पडली ते मनाशी एक पक्का निर्धार करूनच.

फोटो स्रोत, Getty Images
अशा स्थितीतून जाणाऱ्यांना कशा प्रकारे मदत करता येईल, याचा विचार तिने सुरू केला. नातं संपवत असताना एकमेकांच्या सन्मानाना अशा प्रकारे धक्का लागू नये यासाठी लोकांची मदत करता येईल, असं तिला वाटलं.
पुढची काही वर्षे आरोंकने कौटुंबिक कायदे तसंच नातेसंबंधांविषयक बारकावे शिकून घेण्यात घालवली. तिच्या मित्रमंडळींनी तिचं नाव ठेवलं 'सिसी लॉयर'. पुढे याच सिसी लॉयरचं नामकरण ब्रेक अप कोच असं करण्यात आलं.
2022 वर्षात आता आरोंकचं आयुष्य काहीसं असं आहे. तिला 40 वर्षांपेक्षा जास्त वकिलीचा अनुभव आहे. त्यापैकी दहापेक्षा जास्त वर्षे तिने मान्यताप्राप्त प्रशिक्षक म्हणून काम केलं.
रोज सकाळी ती उठते तेव्हा इनबॉक्समध्ये मेसेजेसचा ढीग पडलेला असतो. त्यातही बहुतांश मेसेज प्रेमभंगातून सावरण्याचा प्रयत्न करत असलेल्या महिलांचेच असतात.
ब्रेक-अप प्रशिक्षक म्हणून काय काम करावं लागतं?
आपल्या ब्रेक-अप प्रशिक्षक म्हणून कामाबाबत ती सांगते, "ब्रेक-अप प्रशिक्षक नावाचं वेगळं क्षेत्र उदयाला आलं आहे. याचा मी एक भाग बनले आहे. महिलांना नातं तुटल्याच्या दुःखातून बाहेर पडायचं असतं. त्यासाठी मेंटॉर म्हणून तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता."
"ब्रेक-अप प्रशिक्षक तुम्हाला विसरू न शकणाऱ्या त्या दुःखदायक काळातून धडा घेण्याचं कौशल्य शिकवतो. गोष्टी मागे टाकून नवं आयुष्य सुरू करण्यासाठी तो तुमची मदत करतो. स्वतःवर प्रेम पुन्हा करण्याचंही तो तुम्हाला शिकवतो," आरोंक सांगते.

फोटो स्रोत, Getty Images
आरोंकचं काम अतिशय गोपनीयरित्या चालतं. त्याविषयी ती सांगते, "मला अनेकांचे मेसेज येतात. ते मला सोशल मीडियावर सर्वांदेखत फॉलो करत नाहीत. पण इनबॉक्समध्ये त्यांचे मेसेज पाठवतात. त्यांना त्यांची ओळख जाहीर करायची नसते."
नातेसंबंधांविषयी सल्ला देण्यासाठी आरोंक दीड लाख नायजेरियन नायरा म्हणजेच 300 युरो इतकी फी आकारते. या फीमध्ये एकूण तीन सेशन्सचा कोर्स क्लाएंटसाठी असतो.
ती सांगते, "माझ्या क्लाएंटसाठी टप्प्याटप्प्याने काही गोष्टींची चर्चा केली जाते. यादरम्यान पहिले दोन आठवडे महत्त्वाचे असतात. क्लाएंटने मनमोकळेपणाने रडावं, असा सल्ला ती सर्वप्रथम देते. यानंतर आपल्या एक्सला सोशल मीडियावर ब्लॉक करणं किंवा त्याच्याबाबत येणारे नोटिफिकेशन बंद करणं, हा पुढचा टप्पा असतो. यानंतर त्याला कॉल करण्यापासून स्वतःला रोखण्यासाठी दुसऱ्या एका मित्राची मदत घेणं हासुद्धा याचा एक भाग असतो."
"तुम्हाला वारंवार तुमच्या एक्सला कॉल करण्याची इच्छा होते. तुमचं मन त्यासाठी काही ना काही कारण शोधत असतं. पण त्याकडे दुर्लक्ष करण्याची गरज असते. हाच टप्पा त्याला दूर करण्यासाठी महत्त्वाचा असतो," ती सांगते.
कठीण काळ निघून जातो
आरोंक सांगते, "नातं तुटणं हे खरंच धक्कादायक असतं. यातून बाहेर पडताना बराच त्रास होतो. कारण असा अनुभव तुम्ही यापूर्वी कधीच घेतलेला नसतो."
"या काळात तुम्हाला तुमच्या मित्रांची किंवा कुटुंबीयांची नक्कीच मदत होऊ शकते. या संपूर्ण कालावधीत तुम्ही एकटे नाहीत, हे सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्या. कठिण काळ निघून जातो. हळुहळू का होईना तुमचं आयुष्य पुन्हा रुळावर येऊ लागतं. प्रेमभंगातून असंच बाहेर पडता येतं."
तुमच्या एक्सचे नाव बदला
तिच्या मते, "प्रेमभंगातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही तुमच्या एक्सबद्दल बोलत असताना त्याचं नाव बदलून बोला. म्हणजे त्याचं नाव रोहित असेल तर तुम्ही त्याला राहुल असं म्हणा. असं करताना कदाचित तुम्हाला कमी राग येईल. अशा पद्धतीने तुम्ही त्याच्याबाबत जास्त वस्तुनिष्ठ राहू शकाल."

फोटो स्रोत, RYANKING999
आरोंक तिच्या क्लाएंट्सना दूरगामी विचार करण्याचाही सल्ला देते. ती सांगते, "नातेसंबंधांमध्ये पैसा आणि संपत्ती यांचीही गुंतवणूक होते. पण ते वेगवेगळं असण्याची गरज आहे. त्यामुळे महिलांनी आर्थिकरित्या सक्षम राहिलं पाहिजे."
पण आरोंकच्या कामामुळे तिला ऑनलाईन ट्रोलही केलं जातं. ती घटस्फोटित असल्यामुळेच ती इतरांना असे सल्ले देते, म्हणत तिच्यावर टीका करण्यात येते.
"पण अशा टीकेचा माझ्या कामावर मी कधीच परिणाम होऊ दिला नाही. खरं तर माझा सध्या एक पार्टनर आहे. पण सिंगल घटस्फोटित असले असते तरी या टीकेने मी विचलित झाले नसते," असं ती म्हणते.
आरोंक पुढे म्हणते, "माझं काम मला आवडतं. नातेसंबंध तुटल्यामुळे अंधकारात चाचपडणाऱ्यांना प्रकाशाची वाट दाखवण्याचं काम मी करत आहे. खरंतर नातं तुटणं हा आपल्यासाठी एक धडा असतो. नवं नातं चांगल्या पद्धतीने कसं निर्माण करावं, याची शिकवण आपल्याला त्याच तुटलेल्या नात्यातून मिळत असते."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








