महिला IAS अधिकाऱ्याने मुलाला कडेवर घेऊन केलं भाषण, त्यावरून वाद का?

फोटो स्रोत, COURTESY: DIVYA S IYER
- Author, गीता पांडे,
- Role, बीबीसी प्रतिनिधी
केरळमधील एका महिला प्रशासकीय अधिकाऱ्याने आपल्या तीन वर्षीय मुलाला कडेवर घेऊन एका सार्वजनिक कार्यक्रमात भाषण केलं.
या भाषणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर गेल्या आठवड्यात प्रचंड व्हायरल झाला.
दिव्या एस. अय्यर असं या महिला अधिकाऱ्यांचं नाव. दिव्या यांची ही कृती योग्य की अयोग्य या मुद्द्यावरून आता सोशल मीडियावर दोन गट पडल्याचं दिसून येत आहे.
काही वर्षांपूर्वी माझा मुलगा लहान असताना कधी-कधी मी त्याला कामावर घेऊन जायचे. विशेषतः आठवड्याच्या शेवटी किंवा सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी.
एकदा मी एका मंत्र्याच्या मुलाखतीवेळीही माझ्या मुलाला सोबत नेलं होतं. मी त्या मंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न अनेक दिवसांपासून करत होते. त्यांच्या कार्यालयाने नेमकी माझ्या सुट्टीच्या दिवशीची वेळ दिली. मीसुद्धा त्या भेटीची वेळ मान्य करून दिलेल्या वेळी मुलाखत घेण्यासाठी गेले.
मुलाखतीला माझ्यासोबत एक लहान मूल आल्याचं पाहून मंत्री आनंदित झाले. मी त्यांच्यासोबत चर्चा केली.
त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना खाण्या-पिण्यासाठी काहीतरी आणायला सांगितलं. माझ्या मुलाला कामावर घेऊन गेल्याचं हे एकमेव उदाहरण नव्हतं.
गेल्या काही वर्षांत बीबीसीमधील माझ्या अनेक सहकाऱ्यांना त्यांच्या मुलांना कार्यालयात आणताना मी पाहिलं आहे.
पण मूल ऑफिसला आणलं म्हणून कुणी भुवया उंचावल्याचं मला कधीच दिसलं नाही.
कारण, भारतात बालसंगोपन ही प्रामुख्याने मातांचीच जबाबदारी असते. काम आणि घर हेच बहुसंख्य नोकरदार महिलांसाठीचं वास्तव आहे.
बर्याच भारतीय कंपन्या अधिकाधिक महिलांना कामावर ठेवण्यासाठी बाल-अनुकूल धोरणं आणत आहेत.
अमेरिका आणि कॅनडासारख्या काही देशांमध्ये पालकांनी मुलांना कामावर आणावं, यासाठी विशिष्ट दिवस साजरे करून त्याला प्रोत्साहित केलं जातं.
दिव्या एस. अय्यर या पथनामथिट्टाच्या जिल्हाधिकारी आहेत. 30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी त्या एका चित्रपट महोत्सव समारोप समारंभात त्यांच्या मुलाला घेऊन सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या या कृतीने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.

फोटो स्रोत, ANANTHAKRISHNAN
अय्यर यांनी माझ्याशी फोनवर केलेल्या संभाषणामध्ये मध्ये म्हटलं, “मी माझ्या मुलाला सोबत नेलं असा पहिलाच कार्यक्रम नव्हता. पण त्याचे व्हीडिओ व्हायरल झाले. या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं आणि विविध प्रकारची मते त्यावर नोंदवली जात आहेत.
"मी मल्हारला सोबत घेतलं कारण तो रविवारचा दिवस होता. त्या दिवशी मी सहसा त्याच्यासोबत घालवत असते. कार्यक्रमातही अर्ध्या तासाहून अधिक वेळ तो बाहेर खेळत होता. पण नंतर त्याने मला व्यासपीठावर पाहिलं आणि माझ्याकडे धावत आला. त्यानंतर पुढे जे घडलं, ती आई आणि मुलाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती."
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अय्यर यांनी त्यांच्या मुलाला कडेवर घेतलेलं आहे. त्या बोलत असताना मुलाने आपल्या आईच्या गळ्याभोवती आपले हात बांधलेले आहेत. मध्येच मल्हार आपल्या आईचे गाल ओढतानाही व्हीडिओमध्ये दिसतं. दिव्या अय्यर अशाच प्रकारे तब्बल 10 मिनिटे भाषण करतात.
राज्य विधानसभेचे उपसभापती आणि महोत्सवाचे मुख्य संयोजक चित्तायम गोपकुमार यांनी हा व्हीडिओ सर्वप्रथम फेसबुकवर शेअर केला.
ते म्हणाले, “मल्हारमुळे या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित झाला.”
दिव्या अय्यर यांचा मुलगा मल्हारचं व्यासपीठावर धावणं आणि त्याची आनंदी भावमुद्रा यांचं अनेकांनी सोशल मीडियावर कौतुक केलं.
परंतु काहींनी या गोष्टीवर नाराजी दर्शवली. अय्यर यांचं हे वर्तन अयोग्य होतं, त्यांनी आपल्या मुलाला सोबत नेऊन कार्यक्रमाला क्षुल्लक ठरवलं, असंही काहींचं मत होतं.
यावर बोलताना दिव्या अय्यर म्हणतात, “या प्रतिक्रिया धक्कादायक आहेत. तो अधिकृत कार्यक्रम नव्हता. याकडे पाहण्याचे दोन दृष्टीकोन असतील, असं मला कधीच वाटलं नव्हतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्या पुढे म्हणतात, “मला वाटतं की मुलांना ते सहसा जात नाहीत अशा ठिकाणी घेऊन जायला हवं. त्यामुळे त्यांचा परीघ विस्तारण्यास मदत होते. त्यांना नवा दृष्टिकोन प्राप्त होण्यासाठी त्याचा उपयोग होतो.”
"बालपण हे काय फक्त फुगे आणि टेडी बेअर्स यांच्याभोवती नाही. ते वास्तविक जीवनातील अनुभवांशीही संबंधित आहे. माझ्या मुलाने हे अधिकाधिक पाहावं, अशी माझी इच्छा आहे. मला वाटतं की मी फक्त त्याची आई नाही. तर त्यापेक्षाही खूप काही आहे. मी एक स्त्री आणि अधिकारी देखील आहे," असं त्या म्हणतात.
“या व्हीडिओवरील अनेक प्रतिक्रिया खूप उत्साहजनक होत्या. कारण प्रत्येक कुटुंब यामधून जात आहे. मी 24x7 अधिकारी आहे. तितकाच वेळ मी आईसुद्धा आहे. माझ्या अनेक भूमिका आहेत. त्यापैकी एकही भूमिका मला टाळता येणार नाही. या दोहोंचा समतोल साधून मला राहावं लागेल. मी त्यासाठी प्रयत्न करत आहे. पण लोकांना ते स्वीकारणं कठीण का वाटलं,” असा प्रश्न त्यांनी सर्वांना केला.
अय्यर यांच्या मते, ही प्रतिक्रिया गैरसमजुतीतून आली आहे. लैंगिक भेदभावामुळे सत्तापदावर असलेल्या महिलांनी एकाच पद्धतीचं आयुष्य जगावं, अशी अपेक्षा केली जाते.”
शिवाय, अय्यर यांच्यावरील टीका ही राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचंही मानलं जात आहे.
दिव्या यांचे पती के. एस. सबरीनाथन हे केरळमधील विरोधी पक्ष काँग्रेस पक्षाशी संबंधित आहेत.
सबरीनाथन यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली, ते म्हणतात, “यामधील दुर्भावना बाजूला ठेवली तर या वादामुळे आपल्या समाजातील नोकरदार मातांच्या स्थितीवर चर्चा झाली, ते बरंच झालं. यामुळे या समस्येबद्दल अधिक संवेदनशीलता निर्माण झाली आहे.”

फोटो स्रोत, Getty Images
काही महिन्यांपूर्वी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी तिच्या अर्भकाला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारपण परिषदेत आणलं होतं.
तर ऑस्ट्रेलियातील खासदार लॅरिसा वॉटर्स यांनी संसदेत त्यांच्या बाळाला दूध पाजलं होतं.
याकडे लक्ष वेधून त्यांनी म्हटलं, “कार्यक्षेत्रे बदलण्याची आणि अधिक अनुकूल बनण्याची गरज आहे.”
अय्यर यांच्या कृतीने काम करणाऱ्या महिलांच्या समस्यांना वाचा फुटली आहे.
विशेषतः गरीब वर्गातील रोजंदारी कामगारांना त्यांच्या मुलांना कामावर घेऊन जाण्यास भाग असतं.
“हे अतिशय अन्यायकारक आहे,” असं इतिहासकार आणि स्त्रीवादी संशोधक जे देविका यांना वाटतं.
“मला समजत नाही की सोशल मीडियावर त्यांच्यावर इतकी टीका का झाली? यासंदर्भात तक्रार करण्याची गरज काय, तो अधिकृत कार्यक्रम नव्हता, तर मग हा गोंधळ का?" असा सवाल त्यांनी केला.
देविका यासुद्धा आपल्या मुली लहान असताना त्यांना कार्यक्रमांना घेऊन जात असत.
कारण आया लावणं त्यांना परवडणारं नव्हतं. शिवाय आजूबाजूला कोणतंही घर नव्हतं. स्त्रियांना बालसंगोपनाच्या जबाबदारीतून कधीच सूट दिली जात नाही, असं त्या म्हणतात.
देविका यांनी पुढे म्हटलं, “एक काळ असा होता की जेव्हा माजी इंदिरा गांधींवर ‘कोल्ड मदर’ म्हणून टीका केली जात होती? आता दिव्या यांना ‘वार्म मदर’ असं म्हणून ट्रोल केलं जात आहे.
"त्यांच्यावर टीका करत असलेल्या लोकांनी महिला बांधकाम कामगारांना त्यांच्या मुलांना कामावर घेऊन जाताना पाहायला हवं. त्यांना पाहूनही ते असेच संतापतात का, हे मला पाहायचं आहे. त्यांनी त्यांचा राग या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर काढावा.”
प्रसिद्ध गीतकार राजीव आलुंकल यांच्या मते, “जिल्हाधिकाऱ्यांचं व्यासपीठावरील वर्तन अपेक्षित नव्हतं. मीसुद्धा माझ्या 4 वर्षांच्या मुलाला कार्यक्रमांना सोबत नेतो. पण त्याने न हलता जागेवर शांत बसून राहावं, असं मी त्याला सांगत असतो.”
दिव्या अय्यर पुढे म्हणतात, “या सर्वांमुळे चर्चा सुरू झाली, हा याचा एक सकारात्मक परिणाम आहे. मला विशेषतः तरुण मातांकडून बरेच मेसेज आले.”
“मी मल्हारला हाकलून लावलं नाही, हे पाहून त्यांना आवडलं. असं करण्यास त्यासुद्धा आता तयार आहेत.”
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








