शिव्यांचा इतिहास काय आहे? शिव्या महिलांवरूनच का दिल्या जातात?

महिला कर्मचारी
    • Author, सुशीला सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कोणताही वाद जेव्हा भांडणाचं स्वरूप घेतो, तेव्हा शिव्यांची लाखोली वाहिली जाते. दोन पुरुषांमधलं भांडण असलं तरी महिलांचा उल्लेख करत शिव्या दिल्या जातात. एकूणच शिव्यांच्या केंद्रस्थानी नेहमी महिलाच असतात, असं साधारणपणे दिसून येतं.

अशा शिव्या लोकांच्या शब्दकोशातून हटवण्यासाठी दोन तरुणींनी 'द गाली प्रोजेक्ट' नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे. लोकांना शिव्या देण्यासाठी इतर पर्याय दिले जावेत, असा या मागचा विचार आहे.

मुंबईची नेहा ठाकूर 'द गाली प्रोजेक्ट'मध्ये सहभागी झाली आहे. ती याबाबत अधिक माहिती देताना सांगते, "ओव्हर द टॉप (OTT) प्लटॅफॉर्मवर येत असलेल्या वेब सिरीजमध्ये वापरली जाणारी भाषा दर्जाहीन होत चालल्याचं आपण पाहत आहोत. या शिव्यांच्या वापराबाबत आम्ही काही तरूणांशी बोललो. त्यांना याचं काहीच वाटत नाही. त्यात आक्षेप घेण्याचं कारण काय, 'दॅट्स फॉर फन', असं ते म्हणतात."

नेहाच्या मते, "सध्याच्या वातावरणात राग येण्याची, शिव्या देण्याची अनेक कारणं आहेत. सरकारबाबत नाराजी, वाहतुकीच्या समस्या, नोकरी, रिलेशनशीप वगैरे. लोकांमध्ये चीड इतकी आहे की अशा परिस्थितीत तोंडातून शिव्या निघणं स्वाभाविक आहे. गाली प्रोजेक्टचा आमचा उद्देश म्हणजे शिव्यांबाबत जागरुकता निर्माण करणं हा आहे.

गाली प्रोजेक्ट

ती पुढे सांगते, "दोन पुरुषांमध्ये सुरू असलेल्या भांडणात महिलांचा उल्लेख असलेल्या शिव्या असतात. जातीवाचक किंवा एखाद्या समुदायाचा उल्लेख असलेल्या शिव्यांचा वापर केला जातो. त्याऐवजी अशा काही शिव्या आपण वापरू शकतो, ज्यामुळे समोरच्याला जास्त वाईटही वाटणार नाही, शिवाय तुमचं कामसुद्धा होईल. महिलाविरोधी, जातीवाचक, भेदभाव दर्शवणाऱ्या, अपमानजक किंवा खालच्या दर्जाच्या शिव्या नसाव्यात, असं आमचं मत आहे."

या प्रोजेक्टबाबत बोलताना कम्युनिकेशन कन्सल्टंट म्हणून काम करणारी तमन्ना मिश्रा म्हणते, "आम्ही लोकांना शिव्या देण्यापासून रोखत नाही. आम्ही त्यांना इतर शिव्यांचा पर्याय उपलब्ध करून देत आहोत. या माध्यमातून तुम्ही तुमचं म्हणणं मजेदार पद्धतीने मांडू शकता."

शिव्यांचा संग्रह

तमन्ना सांगते, "हा प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी आम्ही एक गूगल फॉर्म बनवला. आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना तसंच इतर लोकांना आम्ही हा फॉर्म पाठवला. यामध्ये महिलाविषयक, जातीवाचक आणि भेदभाव न दर्शवणाऱ्या शिव्या लिहून पाठवण्यास आम्ही सांगितलं. आम्हाला सुमारे 800 शब्द मिळाले. पण त्यापैकी 40 टक्के शब्द जातीवाचक, लिंगभेद दर्शवणारे, महिलाविरोधीच होते. पण त्यामध्ये आम्हाला 500 'निर्मळ शिव्या'ही मिळाल्या."

नेहा ठाकुर

फोटो स्रोत, NEHA THAKUR

फोटो कॅप्शन, नेहा ठाकूर

या शब्दांचा अर्थ जाणून घेण्यासाठी नेहा आणि तमन्ना यांनी संबंधित राज्यांमध्ये राहणाऱ्या मित्रमंडळींशी चर्चा केली.

शब्दांची काटेकोरपणे पडताळणी केल्यानंतरच या शिव्यांची माहिती सोशल मीडियावर देण्यास त्यांनी सुरूवात केली. याला लोकांचा प्रतिसाद चांगला होता. पण या शिव्या दिल्यानंतर शिव्या देण्याचा फिल येत नाही, अशी तक्रारही काही जणांनी केली.

तमन्ना मिश्रा पुढे सांगते, "आम्ही इंस्टाग्राम, फेसबुक यांच्यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या शब्दांचे मीम टाकतो. आम्ही शिव्यांचे शब्द बदलून लोकांची विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न करत आहोत. ही प्रक्रिया अतिशय संथ असेल, हे आम्हाला माहिती आहे. पण एखादी गोष्ट एका रात्रीत तात्काळ बदलणं शक्य नसतं. काही बदल मजेदार पद्धतीने करता येऊ शकतात."

तमन्ना आणि नेहा आपल्या पद्धतीने लोकांच्या शिव्या देण्याच्या मानसिकतेत बदल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सध्या त्यांचे प्रयत्न प्राथमिक पातळीवरच सुरू आहेत. भविष्यात पुस्तक स्वरूपात या शिव्यांचा संग्रह प्रकाशित करण्याचाही त्यांचा विचार आहे. पण शिव्या देण्याची ही कुसंस्कृती आणि त्यामध्ये महिलांचा वाईट पद्धतीने उल्लेख करण्याची ही प्रवृत्ती कधी निर्माण झाली, हासुद्धा एक प्रश्न आहे.

गाली प्रोजेक्ट

फोटो स्रोत, The Gaali project-Instagram page

तज्ज्ञांच्या मते, भाषा निर्माण झाली, तेव्हाच शिव्याही निर्माण झाल्या होत्या.

हिंदी आणि मैथिली साहित्याच्या लेखिका पद्मश्री पुरस्कारप्राप्त उषा किरण यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्यांच्या मते, "शिव्यांची सुरुवात कशी झाली, हे सांगणं कठिण आहे. पण सामाजिक विकासानंतरच चांगलं आणि वाईट यांची व्याख्या होऊ लागली. त्याचवेळी शिव्या देणंही सुरू झालं असेल. शिव्या एका प्रकारे राग किंवा संताप व्यक्त करण्याचा मार्ग आहेत."

लोकगीतांमध्येही शिव्यांचा वापर

भारतात लोकगीतांमध्येही शिव्यांचा वापर केला जातो. हिंदी लोकगीतांमध्ये व्याही किंवा नवऱ्याची आत्या यांना प्रेमळ पद्धतीने शिव्या देण्याची पद्धत आहे. एकमेकांप्रति सौहार्द वाढवण्यासाठी या शिव्या दिल्या जातात, असं मानलं जातं.

पद्मश्री डॉ. शांती जैन या संस्कृतच्या प्राध्यापक होत्या. लेखिका उषा किरण यांनी सांगितलेल्या मुद्द्यांनाच त्या पुढे नेत त्या म्हणाल्या, "लग्नानंतर गायल्या जाणाऱ्या लोकगीतांमध्ये शिव्या देण्याची परंपरा आहे. भगवान रामाच्या लग्नानंतरही अशा शिव्या दिल्याचं सांगितलं जातं. लोकगीतांमध्ये शिव्यांचा उपयोग जुना आहे. पण भांडणात दिलेल्या शिव्या वेगळ्या असतात. संतप्त होऊन शिव्या दिल्या जातात, तेव्हा त्यांचा प्रभाव वेगळाच असतो."

शिव्यांच्या वापराबाबत लेखिका उषा किरण यांनी ऐतिहासिक संदर्भही दिले. त्या सांगतात, "सुरुवातीच्या साहित्यामध्ये शिव्या नव्हत्या. संस्कृत, पाली, प्राकृत आणि संस्कृतमधून निर्माण झालेल्या दक्षिणेतील भाषांमध्येही शिव्या नव्हत्या. संस्कृतमध्ये तर शिव्याच नाहीत. या भाषेत फक्त दुष्ट आणि कृपण यांच्यासारखे शब्द वापरले जातात. त्या काळी तीच सर्वात मोठी शिवी मानली जायची. पण 1 हजार वर्षांपूर्वी लोकांचा प्रवास, एकमेकांशी संपर्क वाढल्यानंतर शिव्या विकसित झाल्या असाव्यात."

डॉ. उषा किरन खान
फोटो कॅप्शन, डॉ. उषा किरन खान

शिव्यांच्या कुसंस्कृतीत महिलांचा उल्लेख कधीपासून केला जाऊ लागला?

यांचं उत्तर देताना उषा किरण म्हणतात, "वैदीक काळात महिला आणि पुरुष समान होते. पण कालांतराने महिलांचं महत्त्व घटू लागलं. पुरुषांचं वर्चस्व वाढू लागलं. महिलांची सुरक्षा करण्याची जबाबदारी पुरुषांवर आली. हळूहळू स्त्री ही पुरुषांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनली.

युद्धात मुलींचा सौदा होऊ लागला. पराभूत झालेल्या राजांना मुली द्याव्या लागायच्या. यामुळे प्रतिष्ठा धुळीला मिळते, असा समज होता. त्यामुळे राजे आपल्या मुली इतरांच्या हाती लागू नये म्हणून त्यांना स्वतःच संपवून टाकू लागले. यामध्ये शिव्यांमध्ये महिलांच्या उल्लेखाचं मूळ आहे."

उषा किरण यांच्या मते, "स्त्री-सुरक्षा हा त्याकाळी सर्वात मोठा मुद्दा बनला होता. स्त्री पुरुषांची संपत्ती बनत गेली. त्यानंतर तिला शिव्या दिल्या जाऊ लागल्या. या शिव्यांमध्ये पुरुषी अहंकार लपलेला असतो. इतरांना खालच्या दर्जाचं दर्शवण्याचा हा प्रकार असतो. पुढे कालांतराने आधुनिक काळात याचं प्रचलन वाढत गेलं."

सामाजिक शास्त्रज्ञ प्रा. बद्री नारायण सांगतात, "आदिवासी समाजात महिलांना प्रतिष्ठा होती. पण पुढे महिलांना इज्जतीचं प्रतीक म्हणून पाहिलं जाऊ लागलं. इज्जत वाचवायची असेल तर महिलेने उंबरठ्याच्या आतच राहिलं पाहिजे, असा विचार यामुळे पुढे आला. समाजात महिला अशक्त मानल्या जाऊ लागल्या. तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा अपमान करायचा असेल, त्याला त्रास द्यायचा असेल, तर त्याच्या घरातील महिलांबाबत लैंगिक शिव्या देण्याचा प्रकार सुरू झाला."

गाली प्रोजेक्ट

फोटो स्रोत, The Gaali project-Instagram page

फोटो कॅप्शन, गाली प्रोजेक्ट

डॉ. शांती जैन याबाबत सांगतात, "सध्या महिला शक्तीची चर्चा होताना दिसते. पण अजूनही महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. सुशिक्षित महिलांवरसुद्धा अत्याचार होतात. तुम्हाला एखाद्याला अपमानित करायचं असल्यास त्याच्या घरातील महिलेला शिव्या दिल्या जातात. यामुळे त्या व्यक्तीचा अपमान होतो, असा समज निर्माण झाला आहे.

"ही गोष्ट पुरुषांच्या अहंकाराला संतुष्ट करते. एखाद्या पुरुषाचा बदला घ्यायचा असेल तर त्याच्या घरातील स्त्रीला पळवून आणलं जाईल, अशी धमकी दिली जायची. अशा प्रकारे स्त्री अपमानित करण्यासाठीचं माध्यम बनत गेली. सुरुवातीच्या काळात समाजात कनिष्ठ पातळीचे मानले जाणारे लोक अशा प्रकारे शिव्या जास्त प्रमाणात द्यायचे. पण सध्याच्या काळात सर्वसामान्य लोकही अशा प्रकारच्या शिव्या देताना दिसतात," असं किरण यांनी सांगितलं.

प्रा. बद्री नारायण हा विषय यांनी सोशल सेन्सॉरिंगशी जोडतात. त्यांच्या मते, "पू्र्वी लोक कुटुंबीयांचा आदर करायचे. घरात आजोबा, वडील किंवा ज्येष्ठ व्यक्तींसमोर अशा शब्दांचा वापर करण्यास कचरत होते. पण असे सोशल सेन्सॉरिंग आता संपत चालले आहे. सोशल मीडियावर लोक सहज एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहताना दिसतात. त्या शिव्यांना लाईक्सही मिळतात. सध्या हे समाजात सर्वमान्य बनल्याप्रमाणे झालं आहे. त्यामध्ये काहीच वाईट नाही, अशी मानसिकता बनत चालली आहे.

गाली प्रोजेक्ट

दिल्ली युनिव्हर्सिटीत हिंदी साहित्याच्या सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. नीरा याविषयी दुसरी बाजू मांडतात.

त्या सांगतात, "लक्षपूर्वक पाहिल्यास शिव्यांमध्ये ज्या प्रकारे महिलांचा उल्लेख केला जातो, तसा पुरुषांचा केला जात नाही. आताच नव्हे तर इतिहासातही असे उल्लेख आढळून येत नाहीत. लोकगीतांमध्येही अनेक म्हणींमध्ये स्त्रीयांचा उल्लेख करूनच शिव्या दिल्या जातात. महिलांसाठी वेश्या, गणिका, सती यांच्यासारखे शब्द वापरले जायचे. पण अशा अर्थाने पुरुषांसाठी समानार्थी शब्द आढळून येत नाहीत. समाजाने ग्रंथांच्या माध्यमातून महिलांना एका चौकटीत बांधलं आहे. लोकगीतांमध्ये डोकावून पाहिल्यास महिलांचं वाईट चित्रणच समोर येईल."

प्रा. बद्री नारायण यांच्या मते, 'आपल्या समाजात एक व्यापक सेन्सॉरिंग होतं. परंपरा, मूल्य आणि मानवीयता यांची सेन्सॉरिंग आता कमकुवत बनलं आहे. महिलावादी अनेक चळवळी चालवतात. सध्या जागरूकता वाढत असल्याचं दिसून येत आहे. पण शिव्यांच्या बाबतीत हे घडत नाही.'

"सध्याच्या काळात महिलेच्या उपस्थितीत अशा शिव्या दिल्या जात नाहीत. पण ती नसताना अशा प्रकारच्या शिव्या देण्यात येतात. दोघांच्या संवादातही कधीकधी शिव्या दिल्याचं दिसून येतं. यामध्ये बदल होण्याची गरज आहे. शिव्या देणं ही बीभत्स मानसिकतेचंच प्रतीक आहे. अशा शिव्या प्रात्यक्षिक स्वरूप घेतात, त्यावेळी निर्भया प्रकरणासारख्या घटना घडताना दिसतात."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)