पाकिस्तान : तृतीयपंथीयांनाही सन्मानाचं आयुष्य देणारा खास मदरसा

किन्नरांचा मदरसा
    • Author, शहजाद मलिक
    • Role, बीबीसी ऊर्दू प्रतिनिधी, इस्लामाबाद

वर्षभरापूर्वीपर्यंत राणी खान आपल्यासारख्याच इतर तृतीयपंथीयांप्रमाणेच लोकांच्या लग्नसमारंभात नाचून स्वतःचा उदरनिर्वाह चालवायच्या. इस्लामविषयी त्यांना कधीच आकर्षण नव्हतं. मात्र, त्यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली जिने त्यांचं आयुष्य जगण्याची पद्धत आणि आयुष्यंच बदलून टाकलं.

राणी सांगतात, त्यांची एक मैत्रीणही लहान-मोठ्या समारंभात नाचून पैसे कमवायची. एक दिवस अशाच एका कार्यक्रमातून परतत असताना रस्ते अपघातात तिचा मृत्यू झाला. त्या म्हणतात, "तिच्या मृत्यूच्या काही दिवसांनंतर मला एक स्वप्न पडलं. स्वप्नात मैत्रिणीचा चेहरा विद्रूप झाला होता आणि ती मला हे नाच-गाणं सोडायला सांगत होती."

त्या स्वप्नाचा आपल्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि धर्माकडे आपला कल वाढल्याचं राणी सांगतात.

'नमाजच्या वेळी लोक लांब सरकायचे'

त्यानंतर कुराणचा अभ्यास करण्याचा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. त्यामुळे त्यांनी एका मदरशात जायला सुरुवात केली.

राणी सांगतात, "तिथले इतर विद्यार्थी माझ्याकडे विचित्र नजरेने बघायचे. मला तिथे असुरक्षित वाटायचं. काही दिवस मदरशात गेले. पण तिथल्या लोकांच्या वागणुकीमुळे मी जाणं सोडलं. मग आईकडूनच कुराण शिकू लागले."

त्यावेळी राणी नमाज पठणासाठी मशिदीत जाताना पुरूषी कपडे घालून जायच्या. पण त्यांना ओळखणाऱ्या लोकांना नमाजसाठी त्यांच्यासोबत एका रांगेत बसायचा संकोच वाटायचा.

राणी सांगतात, "बरेचदा लोक माझ्यापासून दहा पावलं लांब उभे राहायचे."

लोकांच्या या वागण्यामुळे राणीच्या मनात असुरक्षेच्या भावनेने घर केलं. मात्र, त्यावर मात करत राणी यांनी स्वतःच तृतीयपंथीयांसाठी मदरसा उघडण्याचा निर्णय घेतला. राणीचं हे स्वप्न साकारही झालंय.

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आज एक असा मदरसा आहे, ज्याचा कारभार मौलाना किंवा धर्माचं ज्ञान असणारी एखादी स्त्री चालवत नसून तृतीयपंथीय असणाऱ्या राणी चालवतात.

या मदरशात धर्माचं शिक्षण घ्यायला येणारे स्त्री वा पुरूष नाहीत. ते तृतीयपंथीय आहेत. असे तृतीयपंथीय ज्यांना व्यावसायिक जीवनाबरोबरच धार्मिक ओढही आहे.

किन्नरांचा मदरसा

'तृतीयपंथीयांना मुस्लीम मानलं जात नाही'

पण मदरशासाठी जमीन मिळवणं आणि त्यावर प्रत्यक्षात मदरसा उभा करणं राणीसाठी सोपं नव्हतं. मदरशासाठी त्यांना एक घर हवं होतं. या घराचा शोध त्यांनी फार आधीच सुरू केला होता.

त्या सांगतात, "मी बऱ्याच भागांमध्ये फिरले. पण घर द्यायला कुणीही तयार होत नसे. बरीच पायपीट केल्यानंतर इस्लामाबादच्या एका उपनगरात मला भाड्याने एक घर मिळालं."

घर मिळालं. मात्र, राणीचा संघर्ष आता कुठे सुरू झाला होता. या घरात येऊन इस्लामचं शिक्षण घेण्यासाठी तृतीयपंथीय तयार नव्हते. त्यांना शोधून त्यांचं मन वळवण्यासाठीही त्यांना बरेच कष्ट उपसावे लागले. त्या अशा भागांमध्ये फिरल्या जिथे तृतीयपंथीय भीक माागायचे.

राणी सांगतात, "मी त्यांना मदरशात येऊन धार्मिक शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. पण, सुरुवातीला कुणीच यायला तयार नव्हतं."

पाकिस्तानात तृतीयपंथीयांकडे नाच-गाणं करणारे म्हणून पाहिलं जात असल्याचं रानी सांगतात. त्यांचा स्वतःचाही धर्माकडे विशेष कल नसतो.

त्या म्हणतात, "पाकिस्तानी समाजात बहुतांश लोकांचा असा समज असतो की कदाचित तृतीयपंथीय मुस्लीम नसावे आणि धर्माकडे त्यांचा ओढाही नसाावा. मात्र, असं अजिबात नाही."

किन्नरांचा मदरसा

तृतीयपंथीय मदरशात कसे आले?

राणीने तृतीयपंथीय मदरशात कसे आले, याची गोष्टही सांगितली. जो कुणी मदरशात शिकायला येईल त्याला दर महिन्याला धान्य देण्यात येईल, असा प्रस्ताव राणीने ठेवला.

यानंतर जवळपास 40 तृतीयपंथीय मदरशात आले. पण, दोन महिन्यांनंतर यातले निम्मे पळून गेले आणि पुन्हा रस्त्यावर भिक्षा मागू लागले.

आता मदरशात येणाऱ्या सर्व तृतीयपंथीयांना दर महिन्याला धान्य दिलं जातं आणि त्याचा संपूर्ण खर्च राणी स्वतः उचलतात. इतकंच नाही तर दर महिन्याला मेकअपचं सामानही दिलं जातं.

मदरसा

'मदरशासोबतच डोक्यावर छप्पर मिळालं'

मदरशात बॉबी (नाव बदललेलं आहे) यासुद्धा शिक्षण घेत आहेत. घरच्यांना तृतीयपंथीय असल्याचं कळल्यावर समाजात बदनामी होण्याच्या भीतीने त्यांनी आपल्याला घराबाहेर काढल्याचं, बीबीसी ऊर्दूशी बोलताना बॉबी यांनी सांगितलं.

बॉबी सांगतात, "घरातून काढल्यानंतर माझ्या डोक्यावर छप्पर नव्हतं. माझा रंग सावळा आहे आणि चेहऱ्यावर व्रणही आहेत. त्यामुळे मला कुणीच कार्यक्रमांमध्ये बोलवायचं नाही. शिवाय, सेक्स वर्कर म्हणूनही फारसं काम मिळत नव्हतं."

काही दिवस असेच घालवल्यानंतर एक दिवस त्या रावळपिंडीमध्ये सरकारने उभारलेल्या एका रात्र निवाऱ्यात रहायला गेल्या.

बॉबी सांगतात, "तिथले लोक माझ्याकडे अत्यंत विचित्र नजरेने बघत होते. त्यामुळे मी इतकी घाबरले की रात्रभर झोप आली नाही."

दुसऱ्या दिवशी बॉबीने एकाला हा अनुभव सांगितला तेव्हा त्यानेच बॉबीला इस्लामाबादमधल्या या मदरशाचा पत्ता सांगितला.

बॉबी सांगतात, "मी या मदरशात आले तेव्हा कुणीच माझा रंग किंवा माझ्या चेहऱ्यावरच्या डागांवरून मला चिडवलं नाही. उलट सर्वांनीच माझं छान स्वागत केलं."

या मदरशात आल्यानंतरच बॉबीला पहिल्यांदा धर्म आणि पैंगंबर-ए-इस्लामची खरी ओळख झाली.

या मदरशात सुरैया (नाव बदललेलं आहे) यासुद्धा राहतात.

सुरैया सांगतात, "भीक मागितल्यामुळे पोलिसांना मला अटक केली. तेव्हा या संपूर्ण शहरात माझा जामीन करणारं कुणीच नव्हतं. ही गोष्ट राणी यांना कळली. तेव्हा त्या स्वतः पोलीस ठाण्यात आल्या आणि मला जामिनावर बाहेर काढलं."

सुरैया पुढे सांगतात, "मी ज्या चौकात भीक मागायचे तिथे राणी येऊन गेल्या होत्या. त्यांनी मला भीक न मागता मदरशात राहायला यायला सांगितलंही होतं. पण, तेव्हा मी त्यांचं म्हणणं ऐकलं नाही."

आता या मदरशात येऊन आनंदी असल्याचं आणि इथे सुरक्षित वाटत असल्याचं सुरैया सांगतात. त्या म्हणतात, "आता मी पूर्णवेळ इथेच असते. इथली साफ-सफाई करते आणि धार्मिक शिक्षण घेणाऱ्या तृतीयपंथीयांची सेवा करते."

किन्नरांचा मदरसा

'लोक मदरशाकडे विचित्र नजरेने पाहतात'

हा मदरसा केवळ तृतीयपंथीयांसाठी नाही. कुणीही इथे येऊ शकतं, असं मदरशाच्या संस्थापक राणी सांगतात.

त्या म्हणतात, "या मदरशात मुलाला किंवा मुलीला धार्मिक शिक्षण देण्याची मनाई नाही. मात्र, ज्या भागात हा मदरसा आहे तिथले लोक आपल्या पाल्यांना इथे पाठवायचा विचारही करत नाहीत."

कुठल्याही कट्टरपंथीय गटाकडून मदरसा बंद करण्याची धमकी मिळाली नसल्याचं राणी सांगतात. पण मदरशासमोरून जाणारे लोक मदरशाकडे आणि इथल्या लोकांकडे 'अत्यंत विचित्र नजरेने पाहत' असल्याचं त्या म्हणतात.

स्वतः रानीने प्राथमिक शिक्षण घेतलं आहे. मात्र, या मदरशात धार्मिक शिक्षण घेणाऱ्यांना पुढे आधुनिक शिक्षण देण्याचीही त्यांची इच्छा आहे.

माझ्यासारखा पश्चाताप होऊ नये म्हणून तरुण तृतीयपंथीयांनी आधुनिक शिक्षण घ्यावं असं राणी यांना वाटतं.

किन्नरांचा मदरसा

वयोवृद्ध तृतीयपंथीयांसाठी मदतीचं आवाहन

पाकिस्तान सरकारच्या 'एहसास कार्यक्रमांतर्गत' गरीब आणि अल्प उत्पन्न असणाऱ्यांना मदत केली जाते. या योजनेत तृतीयपंथीयांचाही समावेश करावा, असा विनंती अर्ज राणीने सरकारकडे केला आहे.

जे तृतीयपंथीय आता वयोवृद्ध आहेत आणि नाच-गाणं करून किंवा इतर कुठलंही काम जे आता करू शकत नाही, त्यांना मदत करावी, अशी विनंतीही त्यांनी सरकारकडे केली आहे.

परिस्थिती बघता या मदरशाची सुरक्षा वाढवावी, असे आदेश पोलिसांना देण्यात आल्यचं इस्लामाबादचे उपायुक्त हमजा शफकात यांनी बीबीसी ऊर्दूशी बोलताना सांगितलं. मदरशाच्या संस्थापकांनी मदरशाच्या नोंदणीसाठी अर्ज केला तर जिल्हा प्रशासन संपूर्ण सहकार्य करेल, असं आश्वासही त्यांनी दिलं.

जिल्हा प्रशासनाच्या रेकॉर्डनुसार इस्लामाबादमध्ये 1100 हून जास्त मदरशे आहेत. यापैकी केवळ 450 मदरशे नोंदणीकृत आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)