पाकिस्तानची पहिली तृतीयपंथी टीव्ही अँकर कोण आहे?

फोटो स्रोत, KOHENOOR NEWS
- Author, रझा हमदानी
- Role, बीबीसी उर्दू प्रतिनिधी इस्लामाबाद
पाकिस्तानच्या एका न्यूज टीव्ही चॅनेलनं नुकतंच तृतीयपंथी मार्विया मलिक यांना अँकर म्हणून नोकरी दिली आहे.
नोकरी मिळाल्याची बातमी समजल्यावर अक्षरश: रडू कोसळलं, असं मार्विया मलिक यांनी बीबीसी उर्दूशी बोलताना सांगितलं. मार्विया यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. याआधी त्या मॉडेलिंग करत होत्या.
तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर गेल्या शुक्रवारी (23 मार्च) मार्विया यांनी पहिल्यांदा न्यूज शो सादर केला.
पाकिस्तानमध्ये तृतीयपंथी लोकांबरोबर भेदभाव केला जातो. त्यांना सहजासहजी नोकरी मिळत नाही. त्यामुळे त्यांना भीक मागून, नृत्य किंवा वेश्याव्यवसाय करून पोट भरावं लागतं.
"माझ्या ध्येयाची पहिली पायरी मी गाठली आहे," असं त्या सांगतात.
पाकिस्तानमधील तृतीयपंथी समुदायाचं जीवनमान उंचावण्यासाठी या कामाची मदत होईल, असं मार्विया यांना वाटतं.
त्या पुढे सांगतात, "आम्हालाही समान वागणूक द्यावी आणि भेदभाव करू नये. समान हक्क द्यावा आणि आम्हाला तृतीयपंथी म्हणून वेगळी वागणूक देण्याऐवजी इतर नागरिकांप्रमाणे वागवावं. माझ्या कुटुंबाला मी मॉडेलिंग करते हे माहीत आहे. आता न्यूज चॅनेलमध्ये नोकरी मिळाल्याचं त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून समजलं असेलच."
घरच्यांनी मार्विया यांना घराबाहेर काढल असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मार्विया यांची गुणवत्तेच्या आधारावर निवड केली आहे. त्यांच्या जेंडरचा विचार केलेला नाही, असं कोहिनूर न्यूज चॅनेलचे मालक जुनैद अन्सारी यांनी VOA News शी बोलताना सांगितलं.
या महिन्याच्या (मार्च) सुरुवातीला तृतीयपंथी समुदायाच्या हक्कांना संरक्षण देणाऱ्या विधेयकाला पाकिस्तानच्या सिनेटनं पाठिंबा दर्शवला आहे. या विधेयकात तृतीयपंथीयांना त्यांचं जेंडर ठरवण्याचा अधिकार देण्यात यावा असं म्हटलं आहे.
जून 2016 साली तृतीयपंथी हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या अलिशा यांना वेळेवर वैदकीय मदत न मिळाल्यानं जीव गमवावा लागला होता.
23 वर्षीय अलिशा यांच्यावर आठ गोळया घातल्या गेल्या होत्या. गंभीर स्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांना कोणत्या विभागात (महिला की पुरुष) ठेवायचं या गोंधळात वेळ गेल्यामुळे मृत्यू झाला, असं अलिशा यांच्या मित्रांनी सांगितलं.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








