अमेरिकेच्या एका निर्णयामुळे पाकिस्तानची NSGची वाट बिकट, भारताच्या मात्र पथ्यावर?

फोटो स्रोत, JEWEL SAMAD
अमेरिकेनं पाकिस्तानच्या सात कंपन्यांवर बंदी घातली आहे. त्यांच्यावर अण्वस्त्र व्यापार करण्याचा आरोप होता. म्हणून या कंपन्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणासाठी धोकादायक असल्याचं सांगण्यात येत आहे.
अमेरिकेच्या या निर्णयानंतर पाकिस्तानच्या 'न्युक्लिअर सप्लायर ग्रुप' (NSG) मध्ये सामील होण्याच्या मनसुब्यांना सुरूंग लागण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मागच्या काही दिवसांत अमेरिकेनं बंदी घातलेल्या 23 परदेशी कंपन्यांमध्ये या कंपन्यांचासुद्धा समावेश आहे.
अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाच्या मते या सात कंपन्या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा किंवा परराष्ट्र धोरणाला घातक असलेल्या कारवायांमध्ये सामील होत्या किंवा तसं करण्याचा त्यांचा डाव होता.
या सात कंपन्यांची नावं खालीलप्रमाणे
- अख्तर अँड मुनीर
- इंजिनिअरिंग अँड कमर्शिअल सर्व्हिसेज
- मेरीन सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड
- सोल्युशन्स इंजिनिअरिंग , पाकिस्तान
- मुश्को लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंगापूर
- मुश्को इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, पाकिस्तान
- प्रोफिशिअंट इंजिनिअर्स
अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाच्या मते कराचीमधल्या मुश्को इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडनं निर्बंध घातलेल्या काही कंपन्यांकडून उपकरणांची खरेदी केली आहे.
त्याचप्रमाणे लाहोरच्या सोल्युशन्स इंजिनिअरिंग कंपनीचा राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाला घातक असल्याच्या आरोपावरून या यादीत समावेश करण्यात आला. त्यांच्या काही हलचाली या अमेरिकी सुरक्षेला धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या आधीच निर्बंध घातलेल्या पाकिस्तानी कंपन्यांसाठी या कंपन्या उपकरणांची खरेदी करत असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Reuters
या सातही कंपन्या कराची, इस्लामाबाद आणि लाहोरमधल्या आहेत. मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत या कंपन्यांच्या पत्त्याचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत समावेश झाल्यानं आता त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापार करता येणार नाही.
'एनटायटी लिस्ट' असं या यादीचं नाव आहे. कोणत्याही कंपनीचा या यादीत समावेश करण्यासाठी किंवा हटवण्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र, संरक्षण, उर्जा आणि अर्थ मंत्रालयांमध्ये सहमती असावी लागते.
निर्बंध घातलेल्या 23 कंपन्यांमध्ये 15 कंपन्या दक्षिण सुदान आणि एक कंपनी सिंगापूरची आहे.
एनएसजीची (NSG) वाटचाल होणार कठीण
अमेरिका पाकिस्तानवर दहशतवादाविरुद्ध कडक पावलं उचलण्यासाठी दबाव टाकत आहे, अशा पार्श्वभूमीवर या घडामोडी घडत आहेत.
यामुळे पाकिस्तानच्या न्युक्लिअर सप्लायर ग्रुपमध्ये सामील होण्याच्या प्रयत्नांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाकडे अण्वस्त्र असूनसुद्धा दोन्ही देश एनएसजीचे सदस्य नाहीत.
भारत या गटात सामील होण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी ब्रिटन, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा भारताला पाठिंबासुद्धा आहे.
पाकिस्ताननं या गटात सामील होण्यासाठी 2016 साली आपलं नाव पुढे केलं होतं आणि चीननं पाकिस्तानला समर्थन दिलं होतं.
भारत ज्या आधारावर या गटात सामील होऊ इच्छितो तोच आधार पाकिस्तानकडे आहे.
या गटात सामील होण्यासाठी प्रत्येक सदस्य देशाची सहमती असणं गरजेचं आहे.
या एनटायटी लिस्टनंतर भारताची स्थिती मजबूत होईल असं भारतीय अधिकाऱ्यांना वाटत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








