#Aadhar : आधार कार्डामुळे हरवलेला सौरभ सापडला, पण कसा?

- Author, फैसल मोहम्मद अली
- Role, बीबीसी प्रतिनिधी, पानिपत
त्यांचा लाडुला खेळता खेळता हरवला. आधार कार्डामुळेच त्यांचा मुलगा त्यांना परत मिळाला. पण कसं शक्य होऊ शकलं हे?
विनोद आणि गीता यांच्यासाठी तो क्षण धक्कादायक होता. त्यांचा पाच वर्षांचा लाडका मुलगा सौरभ अचानक खेळता खेळता गायब झाला. पानिपतला राहणाऱ्या या दांपत्यासाठी सौरभला शोधणं पानिपतच्या लढाईपेक्षाही मोठं होतं.
तो रविवार होता. 2015 या वर्षातली ही घटना. चार वर्षांचा सौरभ खेळता खेळता हरवला.
"रडत रडत रेल्वे स्टेशनला गेलो. सौरभला सगळीकडे शोधलं. वर्षभराच्या दुसऱ्या मुलाला शेजाऱ्यांकडे ठेवलं आणि सौरभचा शोध घेतला. पण तो कुठेही मिळाला नाही. माझे पती संध्याकाळी 6-7 वाजता कामावरून परत आले", हे सांगताना गीता यांचे डोळे आजही पाणावतात.
फळांची गाडी चालवून तर कधी मजुरी करून कुटुंबाची गुजराण करणाऱ्या विनोद यांनी लाडक्या सौरभसाठी हरयाणा पिंजून काढलं. तो शोध अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला.
"गुरुद्वारा, मंदिर, चांदनी चौक- जिथं शक्य होईल तिथं त्याला धुंडाळलं. माझं डोकं जेवढं चालतं तिथं तिथं जाऊन विचारणा केली," असं विनोद यांनी सांगितलं. त्यांचं घर म्हणजे बंद पडलेल्या गॅरेजप्रमाणे जुनाट भासत होतं. याच घराच्या दर्शनी भागात पसरलेल्या खाटेवर बसून विनोद आपली सौरभची कहाणी सांगत होते.
"कोणत्याही मुलाला पाहिल्यावर गीताला सौरभची आठवण येत असे. ती धाय मोकलून रडत असे," असं विनोद यांनी सांगितलं.
आनंदाची बातमी देणारा फोन
आणि एकेदिवशी तो फोन आला. तो फोन होता लहान मुलांसाठी काम करणाऱ्या सलाम बालक ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेकडून.

फोटो स्रोत, Getty Images
निर्मला देवी सांगतात, शाळेत प्रवेशाच्या वेळी सौरभचं आधारकार्ड तयार करण्यात आलं. त्याचे फिंगरप्रिंट पानिपतमधल्या एका आधारकार्डाशी संलग्न माहितीशी जुळले. त्या कार्डाच्या माहितीत मोबाइल नंबर होता. आम्ही त्या क्रमांकावर कॉल केला. त्या कुटुंबातला सौरभ अनेक वर्षांपासून गायब असल्याचं कळलं.
आमच्या संस्थेत आधारच्या माध्यमातून ज्या मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवू शकलो त्यापैकी सौरभ पहिलाच होता.
सलाम बालक ट्रस्ट संस्थेनं गेल्या वर्षांत सात मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवलं आहे. आधार कार्डाच्या तपशीलामुळे हे शक्य होऊ शकलं.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या चाइल्ड होममध्ये राहणारी ही मुलं पंजाब, हरयाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, झारखंड राज्यातली होती.

"गेल्या वर्षभरात आमच्याकडे आलेल्या 927 मुलांपैकी 678 मुलांना त्यांच्या घरच्यांपर्यंत पोहोचवण्यात आम्ही यशस्वी ठरलो. कार्यकर्त्यांची फौज, त्यांचं तपशीलवार काम, स्थानिक प्रशासनाची मदत यामुळेच हे शक्य होऊ शकलं," असं या संस्थेचे दिल्ली संयोजक संजय दुबे यांनी सांगितलं.
आधार कार्ड किती उपयोगी?
आधार कार्डात असलेल्या माहितीचा उपयोग किती होतो?
"निर्मला देवींनी संदर्भ दिलेल्या सात मुलांच्या वेळी आम्हाला आधारचा उपयोग झाला. बाकी मुलांच्या बाबतीत पालकांची भेट घडवून आणण्यासाठी आमची संस्था आधार कार्ड अस्तित्वात नसल्यापासून अनेक वर्षं काम करत आहे," असं संजय दुबे यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, "आधार कार्डामुळे काम थोडं सोपं झालं आहे. मानसिकदृष्ट्या पूर्णविकसित न झालेल्या मुलांच्या बाबतीत आधार कामी येतं. ही मुलं स्वत:बद्दल किंवा घरच्यांबद्दल फार काही सांगू शकत नाहीत."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








