You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डाव्या विचारांचे अनुरा कुमारा दिसानायके विजयी, निवडणुकीत दिली होती 'ही' आश्वासनं
- Author, आयशा परेरा आणि जोएल गिंटो
- Role, बीबीसी न्यूज
नॅशनल पीपल्स पॉवर पक्षाचे नेते अनुरा कुमारा दिसनायके हे श्रीलंकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.
2024 च्या निवडणुकीत डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या अनुरा कुमारा दिसानायके यांनी विजय मिळवला आहे. त्यांना 57 लाख 40 हजार 179 मतं मिळाली.
अनुरा कुमार दिसानायके यांच्यासमोर सजीथ प्रेमदासा यांचं प्रमुख आव्हान होतं. श्रीलंकेच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच पहिल्या फेरीत कुठल्याही उमेदवाराला 50 टक्क्यांहून अधिक मतं न मिळाल्यामुळे मतमोजणी दुसऱ्या फेरीत गेली.
सामान्य परिस्थितीत अनुरा कुमारा दिसानायके यांनी मिळवलेला हा विजय अभूतपूर्व ठरला असता. मात्र, निवडणुकीआधीच डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या अनुरा कुमार दिसानायके यांच्या विजयाचं भाकीत अनेकांनी वर्तवल्यामुळे, सामान्य श्रीलंकन नागरिकांसाठी हा विजय तेवढा धक्कादायक ठरला नाही.
55 वर्षांचे दिसानायके हे श्रीलंकेतील नॅशनल पीपल्स पॉवर (एनपीपी) या आघाडीचे नेतृत्व करतात. त्यांच्या पक्षाचं नाव जनता विमुक्ती पेरामुना (जेव्हीपी) असं आहे. त्यांच्या पक्षाने आजवर डाव्या आर्थिक धोरणांचा पुरस्कार केला असून, जास्तीत जास्त सरकारी हस्तक्षेप आणि कमी करांची मागणी केली आहे.
श्रीलंकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कठोर डाव्या धोरणांचा पुरस्कार करणारा नेता हा श्रीलंकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेईल.
एनपीपीच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार हरिणी अमरसूर्या यांनी बीबीसीला सांगितलं की, "श्रीलंकेत बदल घडवून आणण्यासाठी लोकांनी मतदान केलं आहे. आम्ही संपूर्ण प्रचारात जे मुद्दे मांडले त्यावर श्रीलंकेच्या मतदारांनी शिक्कामोर्तब केलं आहे. सध्या श्रीलंकेत असलेल्या राजकीय व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी श्रीलंकेच्या मतदारांनी आम्हाला कौल दिला आहे."
अनुरा कुमारा दिसानायके यांनी मतदारांना भ्रष्टाचाराच्या विरोधात पावलं उचलण्याची आणि सुशासन देण्याचं आश्वासन दिलं आहे. श्रीलंकेतील जे नागरिक तिथल्या राजकीय संकटापासूनच योग्य बदलाची मागणी करत आहेत, अशा मतदारांमध्ये अनुरा कुमारा दिसानायके यांचं आश्वासन मनात खोलवर ठसल्याचं मानलं जातं आहे.
2022 मध्ये श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात निदर्शनं, आंदोलनं झाली होती. त्यानंतर गोटाबाया राजपक्षे यांना राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळेस देशाला मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागलं होतं. त्यानंतर शनिवारी (21 सप्टेंबर) पहिल्यांदाच तिथे राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे.
अनुरा कुमारा दिसानायके यांनी कोणती आश्वासने दिली होती?
श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतमोजणी पहिल्यांदाच दुसऱ्या फेरीत गेली.
पहिल्या फेरीत कोणत्याही उमेदवाराला एकूण मतांपैकी 50% पेक्षा जास्त मते मिळाली नाहीत, दुसऱ्या फेरीच्या शेवटी दिसानायके यांना 42.31% मते मिळाली तर त्यांचे सर्वात जवळचे प्रतिस्पर्धी, विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा यांना 32.76% मते मिळाली.
निवडणूक प्रचारात श्रीलंकेच्या मतदारांना सुशासन आणि भ्रष्टाचारविरोधी कठोर उपाययोजनांचे आश्वासन देणाऱ्या अनुरा कुमार दिसानायके यांचा दुसऱ्या फेरीनंतर विजय झाला.
या ऐतिहासिक विजयानंतर अनुरा कुमारा दिसानायके यांनी एक्स (पूर्वीच्या ट्विटर)वर पोस्ट करून मतदारांचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिलं की, "आपण सगळ्यांनी अनेक शतकांपासून पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलं आहे. हा विजय कोणत्याही एका व्यक्तीचा विजय नसून, तुमच्यासारख्या हजारो लाखो लोकांचं कष्ट त्यामागे आहे. तुमच्या वचनबद्धतेने आम्हाला इथपर्यंत पोहोचवले आहे आणि त्यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे. हा विजय आपल्या सर्वांचा आहे."
अनुरा कुमार दिसानायके यांनी श्रीलंकेची अर्थव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी उत्पादन, कृषी आणि आयटी क्षेत्र विकसित करण्याचं आश्वासन दिलं आहे. यासोबतच श्रीलंकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सोबत केलेला करार पुढे चालू ठेवण्याचं वचनही त्यांनी दिलं आहे.
1982 नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत निकाल लागत होता, पण यंदा पहिल्यांदाच मतमोजणी दुसऱ्या फेरीत गेली. श्रीलंकेच्या इतिहासातली सगळ्यात अटीतटीची निवडणूक झाल्याचं निरीक्षकांनी सांगितलं आहे.
निवडणुकीच्या आधी श्रीलंकेत कशी परिस्थिती होती?
गरीब किंवा अविकसित देशातील राजकारण अगम्य असतं. तिथली सर्वसामान्य जनता बऱ्याचवेळा राजकीय डावपेचांना बळी पडते. त्यामुळे अशा देशांमध्ये काही ठराविक कुटुंबं किवा गट बराच काळ सत्तेत राहतात आणि देशाच्या बऱ्याच साधनसंपत्तीवर कब्जा मिळवतात. जनता त्याविरुद्ध पेटून उठते, त्यांना सत्तेबाहेर हाकलते मात्र काही काळानं परिस्थिती पुन्हा जैसे थे होते. श्रीलंका हा दक्षिण आशियातील कधीकाळी सुजलाम सुफलाम असलेला सुंदर देशसुद्धा याच दुष्टचक्रातून जातो आहे, त्याविषयी...
एका बाजूला जमाव आनंद साजरा करतोय तर दुसऱ्या बाजूला काही उत्साही तरुण स्विमिंग पूलमध्ये थिरकत आहेत. प्रसिद्ध पापारे बँडवर ट्रम्पेट आणि ड्रमच्या तालावर श्रीलंकन नागरिक एका भव्य हॉलमध्ये नाचत आहेत.
13 जुलै 2022 ला श्रीलंकेतील जमावानं राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर हल्लाबोल करून तो ताब्यात घेतल्यावर श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना देश सोडून पळून जावं लागलं होतं. त्यानंतरच्या काही तासातच ही दृश्ये जगभरात पाहिली गेली.
श्रीलंकेतील लोकांसाठी हा विजयाचा क्षण होता. अनेक वर्षे राजपक्षे कुटुंबाच्या हाती श्रीलंकेची सत्ता एकवटलेली होती. त्यामुळे त्यांना सत्तेतून निघून जायला भाग पाडल्यानंतर सर्वसामान्य श्रीलंकन नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.
संपूर्ण श्रीलंकेतील हजारो लोकांनी देशभर लागू असलेल्या कर्फ्यू मोडला होता. त्यांनी राजपक्षे यांना सत्ता सोडण्याचे आवाहन केलं आणि राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाकडे शांततामय मार्गानं कूच केलं.
अश्रूधुराचे नळकांडे आणि पाण्याच्या माऱ्याचा न घाबरता सामना करत सर्वसामान्य नागरिक राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचले.
त्याआधी काही आठवड्यांपासून आंदोलक श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होती. गोटाबाया राजपक्षे यांचे मोठे भाऊ महिंदा राजपक्षे त्यावेळेस श्रीलंकेचे पंतप्रधान होते.
जनतेचा रोष कमी करण्यासाठी महिंदा राजपक्षे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. तरीदेखील आंदोलक गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्यावर ठाम होते. गोटाबाया राजपक्षे मात्र सत्ता सोडण्यास तयार नव्हते.
2022 मध्ये कित्येक महिन्यांपासून श्रीलंकेत निदर्शनं सुरू होती. श्रीलंकेतील सिंहला भाषेत त्याला 'अरगलया' (aragalaya) असं म्हटलं जात होतं. त्याचा अर्थ 'संघर्ष' असा होतो.
या निदर्शनं आणि आंदोलनाची परिणती जुलै 2022 च्या घटनाक्रमात झाली होती. यामुळे गोटाबाया राजपक्षे यांना अपमानास्पदरीत्या घाईघाईनं सत्ता सोडावी लागली होती आणि देशाबाहेर पलायन करावं लागलं होतं.
त्याच्या काही महिने अगोदर श्रीलंकेत असं काही होईल, अशा घटना घडतील याची कोणीही कल्पना देखील केली नव्हती.
श्रीलंकेत असं का घडलं? त्यामागे काय कारणं होती? हे जाणून घेणं त्यामुळेच महत्त्वाचे ठरेल.
श्रीलंकेतील राजकीय परिस्थिती
श्रीलंका म्हणजे भारताच्या दक्षिणेला असलेलं एक नितांत सुंदर, नैसर्गिक साधनसंपत्तीनं समृद्ध असलेलं बेट.
तिसऱ्या जगातील किंवा बऱ्याचशा अविकसित किंवा विकसनशील देशांमध्ये जसं सत्तेचं राजकारण आणि सत्तेचं केंद्र काही ठराविक कुटुंब किंवा घराण्यांभोवती फिरतं, तशीच श्रीलंकेची स्थिती होती.
श्रीलंकेत अनेक वर्षांपासून राजपक्षे कुटुंबाच्या हाती सत्ता होती. श्रीलंकेच्या राजकारणावर आणि सत्तेवर राजपक्षे कुटुंबाची जबरदस्त पकड होती. राजपक्षे कुटुंबाचे प्रमुख होते महिंदा राजपक्षे.
महिंदा राजपक्षे सत्तेत येण्यापूर्वीपासून श्रीलंकेचं सरकार आणि बंडखोर तामिळ वाघ यांच्यातील संघर्ष सुरू होता. प्रभाकरनच्या नेतृत्वाखालील लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल इलम (एलटीटीई) ही संघटना तुम्हाला आठवत असेल.
अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षाचा श्रीलंकेच्या सर्वच अंगावर विपरित परिणाम झाला होता. सतत हिंसाचार आणि लढाया होत होत्या. हा छोटासा देश या संघर्षाखाली दबून गेला होता.
मात्र महिंदा राजपक्षे यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्याच कार्यकाळात या रक्तरंजित यादवी युद्धाचा शेवट झाला.
श्रीलंकन सरकारच्या ठाम पाठिंब्याच्या जोरावर श्रीलंकन लष्करानं तामिळी वाघांचा पूर्ण बिमोड केला. तामिळी वाघांचा प्रमुख प्रभाकरन देखील यात मारला गेला.
साहजिकच इतक्या वर्षांपासून संपूर्ण देशाला अस्थिर करणाऱ्या या संघर्षाला संपवणाऱ्या विजयामुळे बहुसंख्य सिंहली लोकांमध्ये महिंदा राजपक्षे यांची प्रतिमा कमालीची उंचावली.
'राष्ट्राचा तारणहार' किंवा 'राष्ट्राचा नायक' अशा स्वरूपात महिंदा राजपक्षे यांना स्वत:ला स्थापित करता आलं. इतकंच काय तर श्रीलंकेतील महिंदा राजपक्षे यांच्या सर्वांत समर्थकांनी तर त्यांची तुलना एखाद्या विजयी सम्राटाशी केली.
राजपक्षे कुटुंबात सत्तेचं केंद्रीकरण
त्यानंतरच्या काळात महिंदा राजपक्षे यांची ताकद वाढत गेली, त्याचबरोबर त्यांच्या राजपक्षे कुटुंबाची ताकद देखील वाढत गेली, हे कुटुंब अधिक शक्तिशाली, प्रभावशाली होत गेलं.
महिंदा राजपक्षे यांनी त्यांचे लहान भाऊ गोटाबाया राजपक्षे यांची संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती केली. या पदाचा वापर गोटाबाया यांनी निर्दयीपणे केला असं विश्लेषक म्हणतात.
महिंदा यांनी त्यांचे आणखी दोन भाऊ, बेसिल आणि चमल राजपक्षे यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश करून घेतला. बेसिल यांना अर्थमंत्रिपद तर चमल यांना संसदेचं सभापतीपद दिलं.
राजपक्षे कुटुंबानं श्रीलंकेतील बहुसंख्य सिंहली राष्ट्रवादी लोकांवर प्रभाव टाकला होता.
त्यामुळे भ्रष्टाचार, आर्थिक अनागोंदी किंवा कुशासन, मानवी हक्कांचं मोठ्या प्रमाणात केलेलं उल्लंघन आणि राजकीय विरोधकांचं दमन यासारखे आरोप होत असतानाही राजपक्षे कुटुंब वर्षानुवर्षे सत्तेत टिकून राहिलं.
मात्र 2022 मध्ये श्रीलंकेतील परिस्थिती बदलली. राजपक्षेंच्या धोरणांमुळे श्रीलंकेसमोर आतापर्यंतचे सर्वांत वाईट आर्थिक संकट उभे ठाकले. श्रीलंकेची अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईला आली होती.
त्यातून जनतेमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. लोकांनी देशभर निदर्शनं सुरू केली.
परिणामी महिंदा राजपक्षे पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून सतरा वर्षांनी श्रीलंकेत सत्ताबदल घडला होता. राजपक्षे कुटुंबाला सत्तेतून दूर सारण्यात आलं होतं.
राजपक्षे कुटुंबाचा राजकीय ऱ्हास श्रीलंकेतील नागरिकांनी साजरं केला. तेव्हा असंच वाटत होतं की राजपक्षे कुटुंबाचं राजकारण संपलं आहे.
मात्र खरोखरंच तसं झालं होतं का?
राजपक्षे पुन्हा सत्ता मिळवण्याच्या तयारीत
राजकारण इतकं सहजसोपं नसतं. सरळमार्गी तर अजिबात नसतं.
त्यानंतर दोनच वर्षांनी...येत्या 21 सप्टेंबरला श्रीलंकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महिंदा राजपक्षे यांचे चिरंजीव नमल राजपक्षे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
"ज्या लोकांना जनतेच्या आंदोलनाद्वारे सत्तेतून हुसकावून लावण्यात आलं होतं, तीच माणसं आता निवडणुकीत उभी आहेत यासारखी वाईट गोष्ट दुसरी नाही," असं लकशान संदरुवन बीबीसीला म्हणाला.
तो विद्यापीठात शिकणारा विद्यार्थी आहे. श्रीलंकेतील त्या आंदोलनात, निदर्शनांमध्ये त्यानं देखील भाग घेतला होता.
"याहूनही वाईट गोष्ट म्हणजे एवढं सगळं घडल्यावरसुद्धा श्रीलंकेतील काही लोक त्या कुटुंबाला (राजपक्षे) प्रत्यक्षात मतं देखील देऊ शकतात," असं तो पुढे म्हणतो.
श्रीलंकेच्या राजकारणाच्या पटलावर पुन्हा दिसणारे, नमल हे काही राजपक्षे कुटुंबातील एकमेव सदस्य नाहीत.
ज्या गोटाबाया राजपक्षे (पदच्युत माजी राष्ट्राध्यक्ष) यांना संतापलेल्या आंदोलकांनी देशाबाहेर पलायन करण्यास भाग पाडलं, ते स्वत: देखील श्रीलंकेपासून फार काळ दूर राहिले नाहीत.
लाजिरवाण्या पद्धतीनं सत्तेतून पायउतार व्हावं लागल्यानंतर गोटाबाया राजपक्षे आधी सिंगापूरला गेले आणि त्यानंतर थायलंडला गेले. श्रीलंकेतून पलायन केल्यानंतर फक्त 50 दिवसांनी ते मायदेशी परत आले.
श्रीलंकेत परतल्यावर गोटाबाया यांना माजी राष्ट्राध्यक्षाचे विशेषाधिकार देखील देण्यात आले. त्यामुळे साहजिकच त्यांना निवासासाठी एक आलिशान बंगला मिळाला, सोबत सुरक्षा व्यवस्था देखील पुरवण्यात आली.
श्रीलंकेतील तत्कालीन सरकारकडूनच त्यांना या सुविधा देण्यात आल्या होत्या.
गोटाबाया सत्तेतून पायउतार झाले त्यावेळेस त्यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण होण्यास दोन वर्षे बाकी होती.
रनिल विक्रमसिंघे तेव्हा श्रीलंकेतील विरोधी पक्षातील राजकारणी होते. उरलेल्या दोन वर्षांसाठी रनिल यांचीच श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
श्रीलंका पोदु जन पेरामुना पार्टी (SLPP)हा राजपक्षे कुटुंबाचं वर्चस्व असलेला राजकीय पक्ष आहे.
गोटाबाया यांना सत्तेतून हटवण्यात आलं तेव्हा या पक्षाला श्रीलंकेतील संसदेत दोन-तृतियांश बहुमत होतं.
एसएलपीपीनं रनिल विक्रमसिंघे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांचा राष्ट्राध्यक्ष होण्याचा मार्ग सुकर झाला होता.
रनिल विक्रमसिंघे आणि राजपक्षे कुटुंबीय
रनिल विक्रमसिंघे यांच्यासाठी राष्ट्राध्यक्षपदाची संधी ही पूर्णत: अनपेक्षित होती. रनिल विक्रमसिंघे यांनी त्याआधी सहा वेळा श्रीलंकेचं पंतप्रधानपद भूषवलं होतं.
मात्र 2020 च्या संसदीय निवडणुकीत त्यांच्या युनायटेड नॅशनल पार्टी या पक्षाची पुरती पीछेहाट झाली होती. त्यांच्या पक्षाचे ते एकमेव खासदार निवडून आले होते.
राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर रनिल विक्रमसिंघे यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्यावर लक्ष केंद्रीत केलं होतं. मात्र त्यांच्यावर राजपक्षे कुटुंबाला संरक्षण दिल्याचा, पुन्हा एकत्र येऊ देण्याची संधी दिल्या आरोप करण्यात आला आहे.
रनिल यांनीच राजपक्षे कुटुंबावर खटला चालवण्यापासून देखील संरक्षण दिलं, असाही आरोप आहे. हे सर्व आरोप रनिल यांनी नाकारले आहेत.
रनिल विक्रमसिंघे राष्ट्राध्यक्ष झाल्याबरोबर काही तासांतच कोलंबोतील गॅले फेस या ठिकाणी जमलेल्या जमावाला पांगवण्यासाठी लष्कराची नियुक्ती करण्यात आली होती. गॅले फेस हेच निदर्शनांचं केंद्रस्थान होतं.
त्यानंतर सैनिकांनी निदर्शनं होत असलेल्या ठिकाणी हल्ला चढवला. निदर्शकांचे तंबू आणि इतर सामान उद्ध्वस्त करण्यात आले. निदर्शकांना तिथून पांगवण्यासाठी त्यांनी हे केलं होतं.
त्यानंतर काही महिन्यांतच परिस्थिती बदलली. ज्या निदर्शकांनी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता आणि त्या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून त्यांच्या भवनातील बेडशीट किंवा एखादी वस्तू सोबत घेऊन बाहेर पडले होते अशा निदर्शकांना तुरुंगात टाकण्यात आलं.
राजकीय विश्लेषक जयदेव उयांगोडा रनिल विक्रमसिंघे यांच्यावर राजपक्षे कुटुंबाची पाठराखण केल्याचा आरोप करतात.
"रनिल विक्रमसिंघे यांनी राजपक्षे कुटुंबाला जनक्षोभापासून संरक्षण दिलं. त्याचबरोबर राजपक्षे कुटुंबाचं वर्चस्व असलेल्या एसएलपीपी पक्षाचं बहुमत असलेली संसद, मंत्रिमंडळ आणि सरकार कायम राहून त्यांचं श्रीलंकेच्या सत्तेवर वर्चस्व कसं राहील याची काळजी घेतली."
"देशातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी त्यांनी काहीही केलं नाही. इतकंच काय राजपक्षे कुटुंबातील सदस्यांविरोधात सुरू असलेल्या तपासाला देखील खीळ घातली," असं जयदेव उयांगोडा म्हणाले.
"श्रीलंकेत मानवाधिकारांचं मोठ्या प्रमाणात आणि गंभीररीत्या उल्लंघन होण्यासाठी आणि युद्ध काळातील गैरकृत्यांसाठी राजपक्षे कुटुंब जबाबदार असून त्यासाठी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दबाव होता. मात्र रनिल यांनी राजपक्षे कुटुंबाचा त्यापासून बचाव केला," असंही ते पुढे सांगतात.
हालअपेष्टांमधील श्रीलंकन नागरिक
या सर्व पार्श्वभूमीमुळे, दैनंदिन जीवनाचा संघर्ष करत असलेल्या, राहणीमानाच्या खर्चाला तोंड देत असलेल्या आणि अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याच्या हेतूनं केलेल्या सुधारणांमुळे अधिक अडचणींना तोंड देत असलेल्या, असंख्य श्रीलंकन नागरिकांच्या मनात प्रचंड राग आहेत. ते या सर्व गोष्टींविषयी संतप्त आहेत.
श्रीलंकेत वीजेचा तुटवडा नसला किंवा वीजकपात होत नसली तरी महागाई गगनाला भिडली आहे. त्याचबरोबर सरकारनं वीजेसारख्या अत्यावश्यक बाबींवरील सबसिडी रद्द केली आहे. अनेक कल्याणकारी योजनांवरील खर्चात कपात केली.
दरम्यान, रनिल विक्रमसिंघे यांनी कराच्या दरात मोठी वाढ केल्यामुळे आणि सरकारचा महसूल वाढवण्यासाठी अनेक कर लादल्यामुळे श्रीलंकेत सर्वसामान्य नागरिकांवरील कराचा बोझा वाढला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील कर्जाची परतफेड करण्यासाठी, त्यांची पुनर्रचना करण्यासाठी आणि कर्जातून मार्ग काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटींना चिकटून राहत काही कठोर पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. त्यातूनच श्रीलंकेतील श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य आणता येईल, असं काही अर्थतज्ज्ञांचं मत आहे.
आर्थिक संकटाच्या काळात श्रीलंकेचा परकीय चलनसाठा फक्त 2 कोटी डॉलरवर आला होता. तो आता वाढून 6 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. तर महागाई जवळपास 0.5 टक्के आहे.
मात्र प्रत्यक्षात या सर्व आर्थिक संकटाचा लाखो सर्वसामान्य श्रीलंकन नागरिकांवर झालेला परिणाम भयंकर आहे.
लिर्ने एशिया या धोरणांबाबत अभ्यास, संशोधन करणाऱ्या संस्थेनं यासंदर्भात 10,000 कुटुंबांचा अभ्यास केला. त्यांच्या अंदाजानुसार, 2023 मध्ये श्रीलंकेतील तीस लाख लोक दारिद्र्य रेषेखाली होते.
यामुळे गरीबांची संख्या चाळीस लाखांवरून सत्तर लाखांवर पोहोचली आहे.
या गरीब लोकांना त्यांच्या कुटुंबाला खायला पुरेसं अन्न नाही. त्यांना त्यांच्या आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी अधिक पैशांची आवश्यकता आहे. पैशाअभावी ते त्यांच्या मुलांना शाळेतून काढून घेत आहेत.
राजपक्षे यांनी कोणताही गैरव्यवहार किंवा काहीही चुकीचं केल्याचा आरोप फेटाळला होता.
मात्र 2023 मध्ये श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला होता की 2019 ते 2022 दरम्यान आलेल्या आर्थिक संकटासाठी, आर्थिक गैरव्यवस्थापनासाठी गोटाबाया आणि महिंदा यांच्यासह राजपक्षे कुटुंब थेटपणे जबाबदार आहे.
निमेशा हंसिनी कोलंबोतील विद्यापीठातील विद्यार्थिनी आहे. तिनं बीबीसीला सांगितलं की "तिला वाटतं की राजपक्षेंच्या कार्यकाळात विकास योजनांच्या नावाखाली जे आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार करण्यात आले त्यामुळेच आर्थिक संकट उद्भवलं. या गोष्टीला राजपक्षे थेट जबाबदार आहेत."
"मात्र त्यांच्यासाठी काहीही बदलेलं नाही. फक्त त्यांची राजकीय ताकद कमी झाली आहे," असं ती पुढे म्हणते.
केवळ विद्यार्थीच नाहीत तर शेतकरी देखील त्यांच्यावर नाराज आहेत.
"त्यांच्याविषयी बोलण्यासाठी माझ्याकडे फारसं काही नाही," असं रश्मी म्हणतात. त्या राजपक्षे यांचा पारंपारिक बालेकिल्ला असलेल्या हंबनटोटा भागातील शेतकरी आहेत.
"त्यांनी जे काही केलं आहे त्याचे परिणाम आम्ही भोगत आहोत. आधी आम्ही त्यांना मतं दिली होती, मात्र यापुढे तसं कधीही होणार नाही," असंही रश्मी म्हणतात.
नमल यांच्यामुळे पुन्हा राजपक्षे कुटुंबाचे वर्चस्व वाढेल का?
नमल राजपक्षे यांना पुन्हा त्यांचा राजकीय पाया भक्कम करायचा आहे. लोकांचा पाठिंबा मिळवून निवडणूक जिंकायची आहे. त्यासाठी अशा प्रकारे रोष असलेल्या, संतप्त असलेल्या नागरिकांचं मतपरिवर्तन करता येईल अशी आशा त्यांना आहे.
त्यांचे वडील महिंदा राजपक्षे यांच्या वारशाभोवती, त्यांनी केलेल्या कामांभोवती नमल राजपक्षे यांचा निवडणूक प्रचार केंद्रीत आहे. कारण अजूनही काही श्रीलंकन नागरिकांना महिंदा राजपक्षे नायक वाटतात.
महिंदा राजपक्षे यांच्यावर युद्धगुन्ह्यांसाठी खटला चालवण्यात यावा, त्यांना शिक्षा करण्यात यावी यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून काही मागण्या होत असतानाही काही स्थानिकांना ते हिरो वाटतात.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार श्रीलंकन सैन्य आणि एलटीटीई यांच्यातील संघर्षाच्या अखेरच्या टप्प्यात श्रीलंकन सैन्याकडून एक लाख लोक मारली गेली. त्यात 40 हजार तामिळ नागरिकांचाही समावेश होता.
मात्र महिंदा राजपक्षे यांच्यावर त्यासाठी खटला चालवून त्यांना यासाठी कधीही दोषी ठरवण्यात आलं नाही. शिवाय महिंदा राजपक्षे हे आरोप फेटाळत आले आहेत.
नमल राजपक्षेंचा निवडणूक प्रचार आणि सर्वसामान्यांच्या भावना
नमल राजपक्षे यांच्या निवडणूक प्रचार सभांमध्ये महिंदा यांचे फोटो असतात. नमल यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये ते जेव्हा लहान होते त्यावेळी त्यांचे वडील महिंदा यांच्यासोबत काढलेले फोटो लावले जातात.
इतकंच काय नमल त्यांचं वडिलांशी म्हणजे महिंदा राजपक्षे यांच्याशी असलेलं साधर्म्य देखील दाखवण्याचा प्रयत्न करतात. वडिलांप्रमाणेच दिसण्याचा प्रयत्न करतात.
त्यांनी वडिलांसारख्याच मिशा ठेवल्या आहेत आणि वडिलांची खास ओळख असलेलं लाल रंगाचं उपरणं देखील नमल परिधान करतात.
नमल यांच्या निवडणूक प्रचारासाठीच्या अनेक पोस्टमध्ये आव्हान देणारी एक ओळ असते. त्यात ते म्हणतात, "आम्ही आव्हानांना घाबरत नाही. किंबहुना आम्ही त्यांचं स्वागतच करतो. हे मी माझ्या वडिलांकडून शिकलो आहे."
आणखी एका पोस्टमध्ये नमल यांना "देशभक्त, साहसी आणि भविष्याचा विचार करणारा" म्हटलं आहे.
"मला असं दिसतं की नमल राजपक्षे यांना वाटतं की त्यांच्या वडिलांचा वारसा दाखवल्यामुळे त्यांना वडिलांची पारंपारिक मतं मिळवता येतील आणि त्यातून त्यांना फायदा होईल आणि त्यांचा तसा विचार करणं चुकीचं नाही," असं प्राध्यापक उयांगोडा म्हणाले.
"त्यांच्या एसएलपीपी पक्षानं गमावलेला, उद्ध्वस्त झालेला जनाधार, मतं पुन्हा उभी करण्याचा हा एक मार्ग आहे," असं ते पुढे सांगतात.
मात्र अनेक मतदार त्यांच्या या प्रचाराला भुलत नसल्याचं दिसतं आहे. शिवाय जनमत चाचण्यांचा कौलदेखील सर्वोच्च पदासाठी नमल हे प्रबळ दावेदार असल्याचं दाखवत नाहीत.
नमल यांच्या इंस्टाग्राम खात्यावर प्रचारासाठी टाकण्यात आलेल्या एका पोस्टवर आलेली एक प्रतिक्रिया तर त्यांच्यावर बोचरी टीका करणारी होती. त्यात म्हटलं होतं, "राजपक्षे कुटुंबाचा नवा वारस राष्ट्राध्यक्षपदावर डोळा ठेवून आहे? हा अगदी कौटुंबिक व्यवसायच आहे नाही का?"
"प्रत्यक्ष लोकांमधील प्रतिक्रिया तर अधिक कडवट आणि राग व्यक्त करणाऱ्या होत्या. मी नमल राजपक्षे यांना कधीही मत देणार नाही. इतकी वर्षे आम्ही ज्या त्रासातून गेलो तो या कुटुंबासाठी शाप आहे," असं श्रीलंकेच्या उत्तरेत असणाऱ्या वावुनिया प्रांतात स्थलांतरित झालेल्या एच एम सेपालिका यांनी बीबीसीला सांगितलं.
"या देशातील लोक एकत्र आले आणि त्यांनी हा संघर्ष केला, कारण त्यांना राजपक्षे कुटुंबीय नको होते. मात्र अजूनही या कुटुंबाला सत्तेची इतकी हाव आणि लालसा आहे की ते पुन्हा सत्तेत परतण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते लोकांना मतं देण्यास सांगत आहेत," असं निशांती हारापीतिया म्हणाले. ते हंबनटोटा इथं दुकानात काम करतात.
इतर मतदार म्हणतात की ते नमल यांना गांभीर्यानं घेत नाहीत.
"त्यांनी आमची मतं का मागावीत? अजून त्यांना कोणताही अनुभव नाही. त्यांना मत कोण देणार? जोपर्यंत लोकं त्यांना त्यांच्या वडिलांबद्दल सहानुभूती दाखवून मतं देत नाहीत, तोपर्यंत ते राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येणार नाहीत," असं मोहम्मद हलादीन म्हणतात. ते पूर्व श्रीलंकेतील कथनकुडी भागातील व्यापारी आहेत.
निवडणुकीत मुख्य लक्ष आता तीन उमेदवारांवर केंद्रीत झालं आहे. विरोधी पक्षनेते सजिथ प्रेमदासा, द लेफ्टिस्ट नॅशनल पीपल्स पार्टी अलायन्सचे अनुरा कुमारा दिसनायके आणि अपक्ष उमेदवार असलेले विक्रमसिंघे.
मात्र नमल राजपक्षे कदाचित दीर्घकालीन विचार करून राजकारण करत असू शकतात.
अलीकडेच झालेल्या निवडणुकांमध्ये दिसलं की एकेकाळी लोक ज्यांच्यावर नाराज होते, अशा बलाढ्य व्यक्तींची कुटुंबं किंवा त्यांचे राजकीय सहकारी जोरदार राजकीय पुनरागमन करतात.
उदाहरणार्थ फिलिपाईन्समधील बोंगबोंग मार्कोस किंवा अगदी इंडोनेशियातील प्राबोवो सुबिआंटो.
नमल राजपक्षे यांच्या राजकारणाचं विश्लेषण करताना प्राध्यापक उयांगोडा म्हणतात,
"नमल राजपक्षे यांना राजकारणात सक्रिय राहायचं आहे, त्यांचं अस्तित्व दाखवायचं आहे. त्यांच्या एसएलपीपी या पक्षाचा गमावलेला जनाधार परत मिळवायचा आहे. त्यांना 2029 पर्यंत राजकीयदृष्ट्या सक्रिय राहायचं आहे."
निदर्शनांमध्ये भाग घेतलेला लकशान संदरुवन हा विद्यापीठातील विद्यार्थी त्यांच्याशी सहमत आहे.
नमल यांच्या राजकारणाबद्दल बोलताना लकशान पुढे सांगतो, "नमल आता निवडणूक लढवत आहेत कारण त्यांना या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून यायचे आहे म्हणून नाही. तर त्यांना 2029 च्या निवडणुकीसाठी एक पार्श्वभूमी तयार करायची आहे."
"मात्र जर लोकांनी विचारपूर्वक मतदान केलं नाही, तर लोक स्वत:च पुन्हा एकदा राजपक्षेला राष्ट्राध्यक्ष बनवतील."
( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)