You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
श्रीलंकेमधलं आर्थिक-राजकीय संकट काय आहे?
श्रीलंकेची आर्थिक आणि राजकीय स्थिती गेल्या काही महिन्यांत अधिकाधिक बिघडत चालली आहे. रोजच्या आयुष्यात लागणाऱ्या वस्तू, इंधन तसेच इतर वस्तूंच्या तुटवड्यामुळे देशात अनागोंदीचे वातावरण तयार झाल्याचे आपण बातम्यांमधून वाचले आहे. इथे राष्ट्राध्यक्षांना देश सोडून जावं लागलं. पंतप्रधान विक्रमसिंघे यांना राजीनामा द्यावा लागला आणि नंतर त्यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. सरकारविरोधात होत असलेली आंदोलनं थांबवण्याचा प्रयत्न आता केला जात आहे.
बीबीसी मराठीने या संदर्भातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपल्यासमोर आणल्या आहेत.
मूळात श्रीलंकेवर अशी वेळ का आली आणि देशाचं आर्थिक गणित नेमकं कसं बिघडत गेलं हे बघूया…
श्रीलंकेची आर्थिक घडी कशी बिघडली?
भारताच्या आग्नेय दिशेला 65,600 वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाचा छोटासा देश आहे श्रीलंका. भारताच्या पाठोपाठ 1948च्या फेब्रुवारीत या देशालाही ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालं (4 फेब्रुवारी 1948). आणि सध्या हा देश स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांतल्या सगळ्यांत मोठ्या आणि अभूतपूर्व आर्थिक संकटाशी सामना करत आहे.
पेट्रोल आणि डिझेलचा इतका तुटवडा आहे की, खाजगी वापरासाठी हे इंधन विकण्यावर बंदी आहे. कारण, औद्योगिक वापरासाठीच सध्या ते कमी पडतंय. आणि इंधन खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे परकीय चलनही उपलब्ध नाही. सरकारी तिजोरीत इतका खडखडाट आहे की, मे महिन्यात श्रीलंका परकीय कर्जाचा हप्ताही भरू शकलेला नाही.
डिसेंबर 2021 पासून महागाई दर इतका वाढलाय की आता एप्रिल पर्यंत तो 45 टक्क्यांच्यावर गेलाय. महागाईमुळे जनता कमालीची त्रस्त आहे. सध्या तिथे शाळा बंद आहेत. आणि 22 लाखांहून जास्त लोकांना घरूनच काम करायला सांगण्यात आलंय. पण, श्रीलंकेवर ही वेळ का आली. देश इतक्या मोठ्या आर्थिक संकटात कसा सापडला?
आर्थिक ऱ्हासाची मूळं 2000च्या दशकांत?
जानेवारी 2022मध्ये जगाला श्रीलंकेतल्या संकटाची पहिली कुणकूण लागली. तेव्हा अध्यक्ष गोटाबया राजपक्षे यांनी कोव्हिडला आणि त्यापूर्वी 2019मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दोष दिला होता.
कोव्हिडमुळे देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या पर्यटन उद्योगाला फटका बसला असा त्यांचा दावा होता. पण, तज्ज्ञांच्या मते ही कारणं वरवरची आहेत. आणि आर्थिक चक्र फसायला 2000च्या नव्या सहस्त्रकात सुरुवात झालेली होती. त्याची काही कारणं बघूया…
1. नागरी युद्धानंतरची अर्ध-संकुचित अर्थव्यवस्था
श्रीलंका देश छोटा असला तरी स्थापनेपासूनच देशातल्या तामिळ पार्श्वभूमी असलेल्या लोकांमध्ये असंतोष होता. या लोकांचा नेता वेलूपिल्लाई प्रभाकरन याने LTTE संस्था स्थापन केली. आणि हे लोक स्वत:ला तामिळी वाघ म्हणवून घेत.
वेळोवेळी या संघटनेचे श्रीलंकन सरकारशी खटके उडत होते. श्रीलंकन लष्कर आणि तामिळ वाघ यांच्यामध्ये 1983 ते 2008 दरम्यान अनेकदा लढाया झाल्या.
यालाच श्रीलंकन नागरी युद्ध म्हणतात. अखेर 2009मध्ये प्रभाकरन यांच्या मृत्यूनंतर हे युद्ध संपलं.
पण, सततच्या छुप्या लढाया आणि नागरी युद्ध यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मात्र फटका बसला. देशात उद्योग उभे राहू शकले नाहीत. आणि सामान्य लोकांचं जगणंही युद्धांमुळे जिकिरीचं झालं.
त्यांना दिलासा म्हणून 2009 नंतर नव्या राजपक्षे राजवटीने उपाय शोधला तो स्थानिक बाजारपेठेत वस्तूंच्या उपलब्धतेवर. लोकांसाठी वस्तू उपलब्ध व्हाव्यात म्हणून सरकारने प्रसंगी निर्यात थांबवली. आणि आयात वाढवली.
पण, देशांतर्गत उत्पादन वाढलंच नाही. आणि आयात-निर्यातीवर मात्र सरकारी नियंत्रण राहिलं. परिणामी, 1990 पासून जग जागतिकीकरणाकडे जात असताना श्रीलंकेचा प्रवास मात्र उलट्या दिशेनं झाला.
आताही 2021मध्ये देशाची आयात निर्यातीपेक्षा तब्बल 3 अब्ज अमेरिकन डॉलर्सनी जास्त आहे. म्हणूनच देशाकडे परकीय चलनाचा तुटवडा आहे.
अगदी अलीकडे सरकारने जाहीर केल्या प्रमाणे त्यांच्याकडे फक्त 45 लाख अमेरिकन डॉलर इतकाच परकीय चलन साठा शिल्लक आहे. बहुतेक इंधनाची गरज परदेशातून भागवली जात असल्यामुळे सध्या तिथं इंधन टंचाई आहे.
2.श्रीलंकेवरील परकीय कर्ज
श्रीलंकेवर तब्बल 51 अब्ज अमेरिकन डॉलरचं कर्ज आहे. आणि यावर्षीचे त्यांचे सगळे हप्ते फेडण्यासाठी देशाला 7 अब्ज अमेरिकन डॉलरची गरज आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदतीचं आवाहन अध्यक्षांनी केलं होतं.
यातलं साडेसहा अब्ज अमेरिकन डॉलरचं कर्ज त्यांनी चीनकडून पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी घेतलेलं आहे. चीनला कर्जाची परतफेड न करता आल्यामुळे अलीकडेच श्रीलंकेला हंबनटोटा बंदराचा प्रकल्प 99 वर्षांच्या भाडेकरारावर चीनलाच द्यावा लागला.
चिनी कंपन्यांकडून घेतलेलं कर्ज हे अनेकदा जाचक अटींचं आणि व्यापारी हेतूनं दिलेलं असतं. यालाच चायनीज ड्रॅगनचा विळखा असं म्हणतात. आणि या विळख्यात श्रीलंका अलगद अडकली. शिवाय चीनच्या सहकार्याने उभारलेले अनेक रिअल इस्टेट प्रकल्प देशासाठी आवश्यकच नव्हते, असंही त्याबद्दल म्हटलं गेलं.
3.राजपक्षे बंधूंची राजवट
पण, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन लोकांचा सगळ्यात जास्त राग हा अध्यक्ष गोटबया राजपक्षे आणि त्यांचे मोठे भाऊ महिंदा राजपक्षे यांच्यावर आहे.
यापैकी महिंदा यांनी काही महिन्यांपूर्वी नाईलाजाने राजीनामा दिला आहे. राजपक्षे बंधूचा श्रीलंकन राजकारणात उदय झाला तो 2000 पासून. आणि नागरी युद्धानंतर तर अध्यक्ष आणि पंतप्रधान पदावर याच कुटुंबाचा वरचष्मा राहिला.
लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत राजपक्षे यांनी काही विचित्र आणि अर्थव्यवस्थेला मारक निर्णय घेतले असा त्यांच्यावर आरोप होतो.
नागरी युद्धामुळे बेजार झालेल्या जनतेला 2009मध्ये राजपक्षेंनी 'करातून सवलती'चं गाजर दाखवलं. पण, परिणामी सरकारी तिजोरीवर ताण पडला. सरकारचा वर्षाला दीड अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंतचा महसूल बुडला. आयातीमुळे परकीय चलनावर ताण पडतच होता.
अशातच त्यांनी रासायनिक खतांवर देशात बंदी आणली. खरं कारण हे होतं की, रासायनिक खतं आयात करावी लागत होती. आणि ती आणायला डॉलर लागणार होते. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना सेंद्रीय खतांची हाक दिली. आणि शेतीचं उत्पन्नच बसलं. शेवटी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सरकारला खतांवरची बंदी उठवावी लागली.
पण, तोपर्यंत कोव्हिडने मूळ धरलं होतं. आणि आधीच कमी झालेलं शेती उत्पन्न वर आलंच नाही. कॉफीची निर्यातही कमी झाली. कोव्हिडने पर्यटन व्यवसायालाही फटका बसला.
आणि या सगळ्याचा परिणाम मागच्या वीस वर्षांत अर्थव्यवस्था जर्जर होण्यात झाला आहे.
2021मध्ये श्रीलंकेची अर्थव्यवस्था जीडीपीचा विचार करता 3 लाख अब्ज अमेरिकन डॉलर इतकी मोठी होती. पण, जीडीपी विकासदर मात्र सातत्याने उणे 3 टक्क्यांच्या घरात आहे.
आताच्या परिस्थितीतून वाट काढण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा जी-7 देश आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे कर्जाऊ मदत मागितली आहे. थोडक्यात देश सध्या दुष्टचक्रात अडकलाय.
गोटाबाया यांच्यानंतर विक्रमसिंघे राष्ट्राध्यक्षपदी
गोटाभया राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत नव्या राष्ट्राध्यक्षांची निवड झाली.
राष्ट्राध्यक्षपदासाठी तीन नावं शर्यतीत होती. पंतप्रधान आणि काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष रनिल विक्रमासिंघे, दलस अलापेरुमा आणि डाव्या विचारसरणीच्या नॅशनल पीपुल्स पॉवर पार्टीचे अनुरा कुमार दिसानायके हे तिघे रिंगणात होते.
रनिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे 8 वे कार्यकारी राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. संसदेत 223 जणांनी मतदान केले त्यातील 134 जणांनी विक्रसिंघे यांना पाठिंबा दिला.
रनिल यांना कडवी टक्कर देणारे सत्तारूढ पक्षाचेच असंतुष्ट उमेदवार दलस अलापेरुमा होते. विरोधी पक्षाने त्यांच्या नावाला पाठिंबा दिला होता.
नव्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ 2024 मध्ये संपणार आहे.
गोटाबाया राजपक्षे सिंगापूरमध्ये
आर्थिक अडचणींतून निर्माण झालेल्या संकटांमुळे श्रीलंकेत अराजकासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी पदाचा राजीनामा द्यावी ही मागणी तीव्र झाली आहे. आंदोलकांनी घेतलेल्या पावित्र्यामुळे राजपक्षे हे काही दिवस अज्ञातवासात होते, नंतर ते मालदीवला पोहोचले आणि आता ते सिंगापूरला पोहोचल्याचे समोर आले आहे.
आंदोलकांच्या वाढत्या दबावामुळे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे हे देश सोडून पळून गेले होते. मंगळवारी म्हणजे 12 जुलै रोजी राष्ट्राध्यक्ष राजपक्षे सैन्याच्या मदतीने श्रीलंकेतून पळाले आणि मालदीवला पोहोचले. तिथून ते सिंगापूरला पोहोचले आहेत.
त्यांनी सिंगापूर येथे आश्रय घेतला, अशी देखील चर्चा सुरू होती. त्यावर सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे.
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे हे खासगी दौऱ्यावर आहेत. त्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यांनी राजकीय आश्रय घेतलेला नाही. सिंगापूर कुणाला राजकीय आश्रय देत नाही.
त्यांनी अद्याप आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही.
श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान सैन्याच्या ताब्यात, आंदोलकांना बाहेर काढलं
श्रीलंकेतील कोलंबोस्थित राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानातून आंदोलकांना बाहेर काढण्यात आलंय. राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान आता श्रीलंकेच्या सैन्यानं आपल्या नियंत्रणात घेतलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवासस्थानात आंदोलक होते.
राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी आता केवळ सैनिक आणि पत्रकार उपस्थित आहेत.
वाढती महागाई, इंधनाची कपात आणि बेरोजगारी यामुळे मार्च महिन्यापासून श्रीलंकेतील लोकांमध्ये असंतोष पसरला आहे. लोक मोठ्या संख्येत रस्त्यावर उतरून आंदोलनं करत आहेत.
श्रीलंकेत आणीबाणी घोषित करण्यात आलीय. या आणीबाणीनंतर पोलीस आणि लष्कर सक्रीय झालं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)