You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
श्रीलंका संकट : आता ते राष्ट्राध्यक्षांच्या पलंगावर लोळताहेत, सेल्फी काढताहेत आणि...
- Author, अनबरासन एथिराजन
- Role, बीबीसी प्रतिनिधी, कोलंबोहून
"मी आयुष्यात कधी श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात पाऊल ठेवेन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं..." रश्मी कविंध्या सांगत होत्या.
श्रीलंकेतल्या सर्वाधिक सुरक्षित मानल्या गेलेल्या इमारतीत प्रचंड जनसमुदाय घुसला. रश्मी कविंध्या यांच्यासारखे हजारो लोक या इमारतीच्या कंपाउंडमध्ये इकडे तिकडे फिरत होते.
श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांचं हे निवासस्थान ब्रिटीशकालीन स्थापत्यशैलीत बांधलं आहे. यामध्ये अनेक व्हरांडे आहेत. मीटिंग रुम्स, बैठकीच्या खोल्या, स्विमिंग पूल आणि प्रचंड मोठं लॉन.
शनिवारी (9 जुलै) झालेल्या हिंसक आणि नाट्यमय घडामोडींनंतर राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्यावर पळ काढण्याची वेळ आली. शनिवारी श्रीलंकेत नेमकं काय घडलं आणि त्यानंतरच्या घडामोडी तुम्ही इथे वाचू शकता.
"या निवासस्थानाची श्रीमंती आणि इथले ऐशोआराम पाहा ना..." कविंध्या म्हणतात. त्या इथे आपल्या चार मुलांसोबत आल्या आहेत.
"आम्ही एका खेड्यात राहतो. आमचं घर खूप लहान आहे. ही वास्तू खरंतर लोकांची आहे आणि त्यांच्याच पैशानं ती बांधली आहे."
हजारो पुरूष, स्त्रिया आणि मुलं हे कंपाउंड ओलांडून आत येण्याचा प्रयत्न करत होते. आंदोलनाचे आयोजक या जमावाला आवरण्याचा प्रयत्न करत होते. श्रीलंकन पोलीस आणि विशेष सुरक्षा दलं हे एका कोपऱ्यात थांबले होते आणि जे घडतंय ते शांतपणे पाहात होते.
इथल्या खोल्यांमधून फिरताना लोक सागवानी टेबल, सुंदर पेंटिंग्जसमोर तसंच बैठकीच्या खोल्यांमध्ये सेल्फी काढताना दिसत होते.
मोडक्या खुर्च्या, खिडक्यांच्या काचांचे तुकडे आणि नासधूस झालेल्या इतर वस्तूंचे अवशेष इकडेतिकडे विखुरले होते. राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात आक्रमक झालेला जमाव घुसल्यानंतर जो काही गोंधळ उडाला होता, त्याची साक्ष या तुटक्या-फुटक्या वस्तूंमधून मिळत होती.
"असा प्रासाद पाहणं म्हणजे माझ्यासाठी स्वप्न साकार झाल्यासारखं आहे," एएल प्रेमवर्धने सांगतात. ते मुलांसाठीच्या अम्युजमेंट पार्कमध्ये काम करतात.
"आम्ही रॉकेल, गॅस, अन्न मिळवण्यासाठी लांबच लांब रांगांमध्ये ताटकळतोय, पण राजपक्षे मात्र वेगळंच जीवन जगत होते."
या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की, जोपर्यंत राष्ट्राध्यक्ष राजपक्षे आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे हे त्यांच्या पदावरून पायउतार होत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही.
ज्यापद्धतीने जमाव बिल्डिंगमध्ये घुसत होता, ते पाहता चेंगराचेंगरी होण्याची खूप शक्यता होती. पण तरीही सशस्त्र सैन्यदलं आणि विशेष पोलिस दलं बाजूलाच उभी राहिली. काहीकाळ या आंदोलनातील स्वयंसेवकांनीच गर्दीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानातला स्विमिंग पूल हा लोकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला. या पूलच्या कडेला लोक उभे राहिले होते. जेव्हा काही तरूणांनी या स्विमिंग पूलमध्ये उड्या मारल्या तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी टाळ्या वाजवून आणि मोठ्याने ओरडून आपला आनंद व्यक्त केला. शनिवारी (9 जुलै) या पूलमध्ये आंदोलकच दिसत होते.
आपल्या दोन वयात येणाऱ्या मुलींसोबत इथे आलेल्या निरोशा सुदर्शिनी हचिसन यांनी आपल्याला या सगळ्याचं वाईट वाटत असल्याचं म्हणतात.
"लोकशाही पद्धतीने देशाचा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या माणसाला अशा लाजिरवाण्या पद्धतीने देश सोडावा लागला. त्यांना मत दिल्याबद्दल आता आम्हालाच लाज वाटतीये. त्यांनी देशाचा जो पैसा चोरलाय तो परत करावा अशी लोकांची भावना आहे."
अनेक तरूणांचे घोळके इथल्या प्रशस्त पलंगांवर पहुडलेले दिसताहेत. श्रीलंकेची मुख्य भाषा असलेली सिंहला तसंच तमीळ आणि इंग्रजीमधले संवाद खोल्यांमधून, वऱ्हांड्यांमधून ऐकू येताहेत. लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसतोय.
या वास्तूच्या बाहेर, नीटनेटक्या कापलेल्या हिरवळीवर शेकडो लोक- मग ते बौद्ध असतील, हिंदू असतील किंवा ख्रिश्चन- फिरताना दिसत आहेत. अनेक कुटुंबं तर सहलीला आल्यासारखी फिरताहेत. 24 तासांपूर्वी त्यांना या ठिकाणी डोकावण्याचीही परवानगी नव्हती.
अनेक महिने सुरू असलेल्या आंदोलनानं आपल्या देशाच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला जबाबदार असलेल्या नेत्यांना पायउतार व्हायला लावलं अशी श्रीलंकन लोकांनी भावना आहे. त्यातून या वास्तूमधून फिरताना या नेत्यांच्या जीवनशैलीची जी झलक त्यांना पाहायला मिळतीये त्यातून त्यांचा रोष अजूनच वाढतोय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)