You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
श्रीलंका : 'मला दाबलं, कपडे फाडले, फरपटत नेलं; आमचा देश असा कसा खराब झाला?'
- Author, नितीन श्रीवास्तव
- Role, बीबीसी प्रतिनिधी
श्रीलंकेतली परिस्थिती सुधारण्याची कोणतीही चिन्हं नाहीत. गुरुवारी संध्याकाळी रनिल विक्रमसिंघे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे.
माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिला आहे. ते देशाच्या पूर्व भागात जाऊन लपून बसले होते. पंतप्रधान असताना ते तिथे फार कमी वेळा जात असत. त्यांचे भाऊ गोटाबाया राजपक्षे अजूनही राष्ट्राध्यक्षपदावर आहेत. त्यांच्याविरुद्धसुद्धा रोष वाढतो आहे तरी ते राजीनामा द्यायला तयार नाहीत.
कोलंबोच्या एका मॅजिस्ट्रेटने महिंदा राजपक्षे यांच्यासकट त्यांच्या कुटुंबातील 13 लोकांना बाहेरच्या देशात जाण्यास मनाई केली आहे.
त्यांचा मुलगा नवल राजपक्षे यांनी ट्वीट केलं आहे. ते सांगतात, "देशात हिंसाचार आणि द्वेष पसरवणाऱ्या लोकांच्या विरोधात कारवाई व्हायला पाहिजे. सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणारे आणि जमावाविरुद्धही कारवाई करायला हवी."
9 मेची ही गोष्ट आहे. कोलंबोमध्ये महागड्या गॉल स्ट्रीट भागात टेम्पल ट्रीज नावाचा बंगला होता. महिंदा राजपक्षे यांचं ते घर होतं.
या घराबाहेर महिंदा राजपक्षे आणि सरकारविरुद्ध शांतपणे निदर्शनं चालू होती. त्या निदर्शनांना हिंसाचाराचं गालबोट लागलं.
42 वर्षीय नूरा नूरा गेल्या काही आठवड्यांपासून श्रीलंकेच्या परिस्थितीबाबत रस्त्यावर निदर्शनं करत आहे.
ती रात्र आठवली की अजूनही त्यांच्या अंगावर काटा येतो.
"आम्ही लोक गॉल फेसवर निदर्शनं करायला बसलो होतो. फेसबुकवर मेसेज यायला सुरुवात झाली की राजपक्षे यांचे समर्थक आमच्या दिशेने यायला सुरुवात झाली आहे. त्यांच्या घराजवळ येताच त्या लोकांनी आम्हाला मारहाण करायला सुरुवात केली. किमान दोन डझन लोकांमध्ये मी तिथे एकटी महिला होते. माझं शरीर दाबलं गेलं, कपडे फाडले, मला फरपटत नेलं आणि ते पुढे गेले," हे सांगत असताना नूर यांचे डोळे पाणावले.
या धक्क्यातून सावरत आता त्या पुन्हा निदर्शनं करायला बसल्या आहेत. गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा दिल्याशिवाय इथून हलणार नाही, असा त्यांचा निर्धार आहे.
त्या रात्रीच्या हिंसाचारानंतर महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिला. तरीही लोकांचा राग कमी झाला नाही दुसऱ्या दिवशी मंगळवारी संध्याकाळपर्यंत सत्ताधारी पक्षाच्या लोकांविरुद्ध ही मोहीम सुरू होती.
तेव्हापासून राजधानी कोलंबोत संचारबंदी लागू करण्यात आली. गुरुवारी या संचारबंदीत सूट देण्यात आली होती.
श्रीलंकेतल्या आर्थिक संकटाशी लढा देण्यात अपयशी ठरलेल्या सरकारविरोधात निदर्शनं चालू आहेत. गुरुवारी संध्याकाळी रनिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, मात्र लोक तरीही फारसे समाधानी नाहीत.
गुरुवारी जेव्हा संचारबंदीत सूट मिळाली तेव्हा मोठ्या संख्येने लोक आंदोलकांचा उत्साह वाढवण्यासाठी आले.
श्रीलंकेचे क्रिकेटपटू कुमार संगकारा यांची पत्नी येहाली सुद्धा आंदोलकांचा उत्साह वाढवण्यासाठी तिथे आल्या होत्या.
त्या म्हणाल्या, "आम्हा लोकांना देशात शांतता हवी आहे. बाकी काही नाही. हे आंदोलक शांतताप्रिय आहेत. आम्ही इथे आलो आहोत कारण हे लोक या देशाचं भवितव्य आहेत."
महिंदा राजपक्षे एकेकाळी सिंहला समुदायाचे योद्धा म्हणून ओळखले जायचे. एलटीटीईला रोखण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं बोललं जातं. त्यामुळे राजपक्षे यांना तिथे विशेष आदर दिला जातो.
कोलंबो विद्यापीठातील राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक फर्नांडो यांच्या मते, "तुम्ही लोकांकडून कर्ज घेत गेले. मात्र त्या कर्जाचं पुढे काय झालं हे स्पष्ट झालं नाही. आपल्या गंगाजळीतून परकीय चलन कमी होतंय यावरही तुम्ही लक्ष दिलं नाही. आता काय सांगून लोकांचा राग शांत कराल?"
श्रीलंकेच्या इतिहासात प्रत्येक समुदायाच्या लोकांमध्ये प्रचंड रोष आहे, असं पहिल्यांदाच दिसत आहे.
गॉल फेस या आंदोलन स्थळापासून काही अंततरावर आम्हाला काही ख्रिश्चन सिस्टर्स दिसल्या. त्या गेल्या एक महिन्यापासून तिथे आहेत आणि त्या होली फॅमिली चर्चशी निगडीत आहेत.
त्यातल्या एक सिस्टर शिरोमी म्हणाल्या, "आम्हा लोकांना कोणतेच लाभ नको आहेत. मात्र देश कोणत्या गर्तेत जातोय हे पाहणं दिवसेंदिवस असहनीय होत आहे. 9 मे ला जे झालं ते अतिशय लाजिरवाणं आहे. राजकीय समर्थकांनी नि:शस्त्र लोकांवर हल्ला केला. महिलांना कशी वागणूक दिली हे मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं आहे. विद्यार्थ्यांना मारहाण झाली. असं झालं नसतं तर देशात इतका संताप का उसळला असता?"
आजच्या घडीला श्रीलंकेत खाण्याच्या पिण्याचे पदार्थ, दूध, गॅस, केरोसिन, तेल आणि औषधाच्या किंमती आभाळाला भिडल्या आहेत. पेट्रोल पंप ओस पडले आहेत. कारण तेल आयात करण्यासाठी आता सरकारकडे पैसा नाही.
नूरा नूरा शेवटी म्हणतात, "आमचा देश असा कसा खराब झाला? वीज नाही, पाणी नाही, पेट्रोल नाही, अन्न नाही, आमच्या मुलांकडे पैसा नाही. आता जर काही झालं नाही तर आम्हाला पूर्वीसारखं श्रीलंका दिसणार नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)