श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देशात परतले

जुलै महिन्यात देशात मोठ्या प्रमाणावर निदर्शनं झाल्यानंतर श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देशात परतले आहेत.

राजपक्षे तात्पुरत्या व्हिसावर थायलंडमध्ये राहिले होते आणि सिंगापूरमार्गे ते मायदेशी परतले.

श्रीलंकेच्या काही मंत्र्यांनी त्यांची विमानतळावर भेट घेतल्याचं वृत्त आहे.

देशाच्या इतिहासातील सर्वांत वाईट आर्थिक संकटासाठी श्रीलंकेचे लोक राजपक्षे यांच्या सरकारला दोष देतात. देशात परकीय चलनात घट झाल्यामुळे अन्न आणि इंधनाची भीषण टंचाई निर्माण झाली.

अन्न आणि इंधनाच्या किमतीत तीव्र वाढ झाल्यानंतर एप्रिलमध्ये निदर्शनं सुरू झाली.

राजपक्षे आणि त्यांचे मोठे बंधू महिंद्रा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सर्व स्तरातील आणि समुदायातील लाखो लोकांनी निदर्शन केली. मे महिन्यात राजपक्षे यांनी राजीनामा दिला.

श्रीलंकेत आर्थिक आणीबाणी

श्रीलंकेत आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी ही घोषणा केली.

देशातील आर्थिक स्थितीमुळे राजधानी कोलंबोमध्ये लोकांनी हिंसक आंदोलन सुरू केलं होतं.

हजारो आंदोलक पंतप्रधान कार्यालयाकडे चाल करून गेले होते.

कोलंबोमध्ये तणाव

जुलै महिन्यात राजधानी कोलंबोमध्ये परिस्थिती खूपच तणावपूर्ण झाली होती.

आंदोलक पंतप्रधानांच्या कार्यालयात घुसले होते. हजारोंच्या संख्येनं जमलेले हे आंदोलक अजिबात मागे हाटण्याच्या स्थितीत नव्हते.

हिंसक आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यानंतर एकच धुमश्चक्री सुरू झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

राजपक्षेंचं पलायन

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या देश सोडून जाण्यावर श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी ट्विटरवर एक निवेदन प्रसिद्ध केलं होतं.

गोटाबाया राजपक्षे आणि श्रीलंकेचे माजी अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांना श्रीलंकेतून बाहेर पळून जाण्यासाठी भारताने मदत केली असं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. भारतीय उच्चायुक्ताने आपल्या निवेदनातून या सगळ्या बातम्यांचं खंडन केलं होतं.

आपण श्रीलंकेच्या नागरिकांसोबत आहोत, या भूमिकेचा उच्चायुक्तांनी पुनरुच्चार केला होता.

याआधी 10 जुलैलाही उच्चायुक्तांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं होतं. भारत श्रीलंकेत आपलं लष्कर पाठवत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसिद्ध होत होत्या. या बातम्या निराधार असल्याचं 10 जुलैच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं होतं.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे हे देश सोडून पळाले होते. लष्कराच्या जेट विमानातून राजपक्षे यांनी देशाबाहेर पलायन केलंय.

राजपक्षे यांच्या या गच्छंतीनंतर श्रीलंकेवर गेली अनेक दशके असलेली या कुटुंबाची सत्ता संपुष्टात आली.

राष्ट्राध्यक्षांच्या पलायनाचे वृत्त कळल्यानंतर नागरिकांनी जल्लोष सुरू केला होका. राजधानी कोलंबोमध्ये गॉल फेस ग्रीन इथे आंदोलन करत असलेल्या हजारो नागरिकांनी जल्लोष केला.

श्रीलंका ज्या आर्थिक संकटाला सामोरी जात आहे, त्यासाठी राजपक्षे यांचं प्रशासन जबाबदार असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. अनेक महिन्यांपासून श्रीलंकेतील लोकांना अन्न, इंधन आणि औषधं यांसारख्या मुलभूत गोष्टी मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागतोय.

राष्ट्राध्यक्षपदावर असेपर्यंत राजपक्षे यांना न्यायालयीन कारवाईपासून संरक्षण होतं. मात्र पदावरून पायउतार झाल्यावर येणाऱ्या नवीन सरकारकडून अटकेच्या कारवाईची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी आधीच देश सोडल्याचं म्हटलं जात होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)