एसटीच्या फेऱ्या कमी झाल्या आणि शिक्षण सुटलं; बसगाड्या कमी झाल्यामुळे मुलींच्या शिक्षणावर परिणाम

- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कॉलेजला पोहोचायचं तर सकाळीच इस्लामपूर जवळच्या काळमवाडीच्या आरतीची पायपीट सुरू होते. तीच परिस्थिती इचलकरंजी जवळच्या सानिया जमादारचीही.
कारण एकच- एसटी मिळेल आणि आपण कॉलेजला वेळेत पोहोचू याची शाश्वती नाही. एसटीच्या कमी झालेल्या फेऱ्यांचा हा फटका सगळ्यांनाच बसतोय.
पण हा फटका फक्त वेळ जाण्यापुरता आणि पायपीटी पुरताच मर्यादीत नाही.
आरती सांगते, "आमचा ग्रुप जवळजवळ 20-25 जणींचा होता. आम्ही आत्ता 6 जणीच येतोय कॉलेजला. बाकीच्या मुलींच्या पालकांनी विचार केला गावात एसटी नाही. मग त्यांची लग्न अशा ठिकाणी करुन देऊ जिथं एसटी पोहोचत असेल."
पुढं ती म्हणाली, "अशी अनेक मुलींची लग्नं झाली आणि आधी अधेमध्ये नंतर परीक्षेसाठीच जा असं करत करत त्यांचं शिक्षण सुटलंच. म्हणजे पालकांनी लग्न करुन दिली शिक्षण व्हावं म्हणून. पण एसटी नसण्याचा परिणाम असा झाला की त्यांचं शिक्षणच थांबलं "
फेऱ्या कमी होण्याचं कारण काय?
कोव्हिडमध्ये एसटी गाड्या बंद झाल्या. त्यापूर्वी काही गावात तासाला तर काही गावांमध्ये दोन तासाला वगैरे एसटीची फेरी होत होती.
'गाव तिथे एसटी' अशी घोषणा होती. त्यामुळे प्रवासी असो की नसो गावात एसटी मात्र पोहोचायचीच. कोरोनानंतर थांबलेल्या फेऱ्या हळूहळू सुरू झाल्या.
मात्र त्या पूर्ववत कधीच झाल्या नाहीत.


विद्यार्थीनी सांगतात की पुर्वी तासा-दोन तासाला गावात एसटी असायची. आता मात्र दिवसातून दोन किंवा तीन फेऱ्या असतात. त्यातही अनेकदा या फेऱ्या कॅन्सल केल्या जातात.
याचा परिणाम थेट विद्यार्थीनींच्या शिक्षणावर होताना दिसत आहेत.
आरतीचा रोजचा प्रवास हे त्याचंच उदाहरण. काळमवाडी या तिच्या गावात येणारी एसटी कधी येते तर कधी नाही. त्यामुळे आरती गावातून कोल्हापूर हायवेवरच्या रस्त्यापर्यंत सकाळी चालत येते.
चालण्याचं हे अंतर दोन अडीच किलोमीटरचं. तिथं आलं की एसटीची वाट पहायची. हायवे असला आणि एसटी बसेसची संख्या जास्त असली तरी फक्त काळ्या बोर्डच्या गाड्या थांबत असल्याचं आरती सांगते.
बस मिळाली की इस्लामपूरच्या स्टॅण्डपर्यंत जायचं आणि पुढे पुन्हा पायपीट करत कॉलेज मध्ये. यात लेक्चरला वेळेत पोहोचणं जमेल याची शाश्वती नाही.
सकाळी ही परिस्थिती तर माघारी जातानाही दुपारच्या बस रद्द. त्यामुळे पुन्हा थांबणं आलंच.

शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तिनं इस्लामपूरमध्ये राहण्याचाही प्रयत्न करुन पाहिला. पण घरची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन पुन्हा हा बसचा प्रपंच करण्याचं ती ठरवत आहे.
कोव्हिडनंतर गावातल्या बसेसची संख्या निम्म्यावर आली आणि त्याचा परिणाम म्हणून हे चित्र दिसत असल्याचं ती सांगते.
बीबीसी मराठीशी बोलताना आरती म्हणाली, "कोरोनानंतर आमच्या तीन ते चार बस बंद केल्या त्या तात्पुरत्या म्हणून. म्हणजे त्यांनी सांगितलं की कोरोना नंतर तुमच्या बस आम्ही परत सुरु करतो. एक दोन बस सुरु केल्या. पण 10 ची जी बस आम्हाला जायला लागते ती बस किंवा शाळा सुटल्या नंतर आम्हाला यायला बस लागते ती त्यांनी सुरूच केली नाही. जायलाही बस नाही. यायलाही बस नाही"
"आम्हाला 8 वाजता कॉलेज असतं. घरातून 6 वाजता निघायला लागतं. कारण आमच्या गावाला 7 ची एकच बस असते, ती पण दररोज लावत नाहीत. ती बस नसेल तर आम्हांला आमच्या गावापासून केदारवाडीला एक दोन अडीच किलोमीटर आहे तिथपर्यंत चालत यायला लागतं आणि तिथं हायवेला थांबायला लागतं. त्यातपण व्हाईट बोर्डवाल्या बस थांबत नाहीत." असंही ती सांगत होती.
पुढं ती म्हणाली,"फक्त ब्लॅक बोर्ड वाल्याच थांबतात. ब्लॅक बोर्ड वाली पण भरून आली असेल तर थांबत नाही. मग वाट पहावी लागते. त्यात एक दोन लेक्चर आमचे होतच नाहीत. फक्त एक दोन लेक्चरच बसायला मिळतात .माघारी येताना पण 12 ची बस त्यांनी बंद केली आहे. त्यामुळे 4 वाजताच बस आहे. ती पण कधी लावतात कधी नाही"

इचलकरंजी जवळच्या सानिया जमादारसाठी रोजचा प्रवास 20-25 किलोमीटरचा. पण त्यासाठी तिला घरून सहा साडेसहालाच बाहेर पडावं लागतं.
सुर्योदय होता होता किंवा कधी अंधारातच तिच्यासह तिच्या मैत्रीणी बस थांब्यावर पोहोचतात. मग सुरु होतं बसची वाट पहाणं. बसमध्ये बसल्यानंतर दोन तीन गावं जाता जाताच बस मध्ये तुडूंब गर्दी होते.
परत येताना कधी गावापर्यंत बस असते तर कधी पुढच्या गावात घरातल्या कोणाला तरी सोडण्याची विनंती करणं भाग पडतं.
सानिया जमादार सांगते, "पहिल्यापासून अडीच वाजता बस आहे आणि साडेअकरा वाजता. कॉलेज माझं 11.35 ला सुटते. त्यामुळे चौथं लेक्चर मी बंक करत नाही. मग मला 2.30 वाजता बस असते. ती कधी वेळेत येते कधी नाही. त्यामुळे घरी जायला साडेचार वाजतात. मग अशात अभ्यासात नीट लक्ष लागत नाही आणि इकडं पण नाही."
पुढं ती म्हणाली,"कमी झालेल्या फेऱ्यांमुळे बस मध्ये गर्दी इतकी की काही वेळा बस काही गावात न थांबताच पुढे जाते. फॅमिली प्रॉब्लेम होत्यात. नको म्हणतात शिक्षण. एवढं तुमच्यासाठी थांबायचं म्हणजे दिवसाची 400 रुपये हजेरी भेटतीया. ती हजेरी सोडून तुमच्यासाठी इस्लामपुरातून घ्यायला यायचं, आमचा दिवस अख्खा त्यातच जातो. जर साडेबाराची बस गेली तर मला 5 पर्यंत थांबवं लागतंय."
कन्या कॉलेज मध्ये शिकणारी सरोज कुंटवळे सांगते, "आमच्या इथं बस थांबतच नाही ती बस. जागा असते भरपूर पण बस थांबतच नाही. त्यामुळे एक बस येते ती थांबतच नाही. ती पण अनेकदा कॅन्सल होते जशी आज कॅन्सल झाली. अचानक अशी एक एकदा कॅन्सल होते."
याचा थेट परिणाम विद्यार्थीनींच्या शिक्षणावर होतो
याचा थेट परिणाम विद्यार्थीनींच्या शिक्षणावर होतो आहे. बीबीसीच्या टीमशी बोलताना अनेक मुलींनी कॉलेजवरून कधीपर्यंत घरी येता येईल याची शाश्वतीच नसल्याचं थेट बोलून दाखवलं.
आयेशा मुजावर म्हणाली, "आम्हांला घरी जायला खूप प्रॉब्लेम होतो. मग घरातले ओरडतात आणि कॉलेज पण बुडवून चालत नाही. तिथं लवकर सोडत पण नाही."
पालकांनाही प्रत्येक वेळी मुलींना महाविद्यालयापर्यंत सोडणं शक्य नसल्याचं निर्जला जाधव सांगते. तिचे पालक शेतमजूरी करतात.

तीन भावंडं असणारी निर्जला सांगते की, अनेकदा वेळेत एसटी मिळाली नाही तर पालकांना बोलावून घ्यावं लागतं आणि त्यात त्यांची दिवसाची 400 रूपयांची मजुरी बुडते.
यातच चुलत बहीणींची लग्नं लागली आणि आपल्या पालकांना ही ने-आण अवघड होत असल्याचंही ती म्हणते.
निर्जला म्हणाली, " आम्हांला सोडायला यायचं तर दिवसाची मजुरी बुडते. मग वडील म्हणतात सारखं शक्य नाही असं करणं. कधी चुलत भावाला बोलावून घ्यावं लागतं."
कॉलेज आणि ग्रामपंचायतींची मागणी
कमी झालेल्या या एसटीच्या फेऱ्यांचा विद्यार्थ्यांना होत असलेला त्रास पाहून अनेक महाविद्यालयं, शाळा आणि ग्रामपंचायतींनी एसटी महामंडळाकडे पत्रव्यवहार केलाय.
पण त्यात त्यांना कधी पॅसेंजर मिळतील याची शाश्वती मागीतली गेली तर कधी गावातून खासगी वाहतूक होत असल्याचंही कारण मांडण्यात आलं.
इचलकरंजीच्या कन्या महाविद्यालयाच्या प्राध्यापक त्रिशला कदम त्यांच्या महाविद्यालयात येणाऱ्या मुलींची संख्या निम्म्यापेक्षाही कमी झाल्याचं सांगतात.
बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, " साधारण लॉकडाऊननंतर शाळा महाविद्यालयं सुरु झाली तेव्हा विद्यार्थीनींची संख्या कमी झाली. लॉकडाऊनमध्ये फेऱ्या पूर्णच बंद होत्या. त्यानंतर आम्ही त्याची खोलात जाऊन चौकशी केली तर लक्षात आलं की एसटीच्या फेऱ्या कमी आहेत, त्यामुळे विद्यार्थीनींची संख्या कमी असल्याचं आमच्या लक्षात आलं."

पुढं त्या म्हणाल्या, "संख्या खूप घटली त्याच्यामुळे. आमच्याकडेच पाहिलं तर 2,000 विद्यार्थीनी लॉकडाऊनच्या अगोदर असायच्या. आता त्या सगळ्या विद्यार्थीनी कमी झाल्या. 900-950 वर विद्यार्थीनी संख्या आमच्याकडे आलेली आहे."
अनेक ग्रामपंचायतींनी देखील बसच्या फेऱ्या वाढवण्याची विनंती केली. एसटीला प्रवासी मिळावेत म्हणून चंदूरच्या ग्रामपंचायतीने तर थेट घंटागाडी फिरताना एसटीच्या वेळापत्रकाचीच घोषणा केली.
यानंतर एसटीच्या फेऱ्या सुरु झाल्या. पण तरीही त्या पुरेशा नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना चंदूरचे ग्रामपंचायत सदस्य संदीप कांबळे म्हणाले, "एसटी महामंडळ म्हणतंय की आम्ही फेऱ्या वाढवायला तयार आहे, पण तसा पॅसिंजरचा आम्हांला रिस्पॉन्स मिळाला पाहीजे. एखादी फेरी जाऊन येऊन आल्यानंतर त्यात पॅसिंजर नसतील तर नुकसान होईल. अशा पद्धतीनं त्यांच्याकडून उत्तर आलेलं आहे."
पण हा परिणाम कशामुळे ?
एसटी महामंडळाचे अधिकारी सांगतात की, कोव्हिडनंतर दिसत असलेला हा परिणाम एसटीच्या कमी झालेल्या संख्येमुळे आहे.
स्क्रॅपमध्ये जाणाऱ्या बसेस, नादुरुस्त बसची संख्या या सगळ्यामुळे बसची संख्या कमी झाली आणि त्याचे हे दृश्य परिणाम आता दिसायला लागले आहेत.
एमएसआरटीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हीडपुर्वी एमएसआरटीसीकडे असलेल्या राज्यभरातल्या बसेसची संख्या 19,000.
कंत्राटावरच्या बसेस सह महामंडळाकडे असणाऱ्या बसची संख्या 15 हजार. दरवर्षी स्क्रॅप मध्ये जाणाऱ्या बस ची संख्या 2 ते 2.5 हजार
सध्या एमएसआरटीसीनी 3,000 नवीन बसेसची ऑर्डर दिली आहे. पण स्क्रॅप होणाऱ्या बसेस आणि नव्यानं येणाऱ्या बसेस यांचं प्रमाण जुळत नाही आणि या सगळ्याचाच परिणाम फेऱ्या कमी होण्यावरती होतोय.

कोल्हापूर विभागातली परिस्थिती मांडताना विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे म्हणाले, "कोरोनाआधी 2019 ला कोल्हापूर विभागात 950 बसेस होत्या. सद्यस्थितीत आपल्याकडे 700 बसेस आहेत. शैक्षणिक फेऱ्यांना आम्ही प्राधान्य देतो. शालेय फेऱ्या चालू करतो. काही ठिकाणी शाळेची वेळ शाळेकडून किंवा कॉलेजकडून बदलण्यात येते."
पुढं ते म्हणाले, "अशावेळी त्यांच्याकडून वेळ बदलण्याची मागणी येते. अशावेळी त्या बसेस आपण त्यांना चालू करुन दिलेल्या आहेत.आता बसेस कमी झाल्यामुळे आणि विविध घटकांना सवलती दिलेल्या आहेत. विशेषत: ज्येष्ठ आणि महिलांना सवलती दिल्यामुळे बसेसना गर्दी पण आहे. पण ज्यावेळी शाळेची कॉलेजची मागणी असेल त्यावेळी आपण बसेस चालू केलेल्या आहेत."
कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुलींचे होणारे हे हाल हे केवळ उदाहरण. राज्यभरात शिक्षणासाठी अनेक मुली एसटी महामंडळावर अवलंबून आहेत.
एकीकडं शासन 'निम्म्या तिकिटात प्रवास' अशा योजना राबवत आहे. दुसरीकडं मात्र प्रवाशांना एसटीच नाही अशी स्थिती आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये एसटी खरेदीसाठी निधीची तरतूद केली गेली आहे. पण ती खरेदी होऊन बस मिळाल्या तरी त्या पुरेशा ठरणार की विद्यार्थीनींचे हे प्रश्न कायम राहणार ?
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











