रायगडावर समाधी असलेल्या वाघ्या कुत्र्यावरून का होतोय वाद? काय आहे खरा इतिहास?

वाघ्या
    • Author, रेणुका कल्पना
    • Role, बीबीसी मराठीसाठी

महाराष्ट्रातील इतिहासाबाबत ऐतिहासिक तथ्यांवरून सुरू झालेल्या वादात आणखी एक भर पडली आहे. रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून हा वाद सुरू झाला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी हा पुतळा काढण्याची मागणी केली आहे. तर काहींनी त्याला विरोध केला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत बुधवारी (26 मार्च) पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना एक पत्रही दिलं. तसंच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विरोध करणाऱ्यांना उत्तरही दिलं.

याआधीही अशी मागणी करणारं एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं होतं.

वाघ्या कुत्र्याचे इतिहासात कोणतेही पुरावे सापडत नसल्याने त्याची समाधी रायगडावरून कायमस्वरुपी हटवण्यात यावी, असं आवाहन त्यांनी पत्राद्वारे केलं होतं.

पण, धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यास विरोध केला. गरज पडली तर यासाठी तीव्र आंदोलन करू, न्यायालयात जाऊ असं त्यांनी म्हटलं.

या वादात इतिहासकारांनी दोन्ही बाजुंनी मतं मांडली आहेत. काही इतिहास अभ्यासकांनी वाघ्याचे कोणतेही संदर्भ सापडत नसून, ते राम गणेश गडकरी यांच्या नाटकातील काल्पनिक पात्र आहे, असं म्हटलं.

तर काहींनी वाघ्या कुत्र्याचा उल्लेख कुठे झाला त्याचे पुरावे दिले. त्यामुळे आता या प्रकरणावरून महाराष्ट्रात पुन्हा वाद पेटणार असल्याचं म्हटलं जातंय.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

संभाजीराजेंच्या पत्रात काय म्हटलं?

संभाजीराजे छत्रपती हे रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. प्राधिकरणाच्याच शीर्षक पत्रावर 22 मार्च 2025 च्या तारखेचं मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेलं पत्र त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनही प्रसिद्ध केलं.

शिवकालीन इतिहासात या वाघ्या कुत्र्याचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ सापडत नाही. भारतीय पुरातत्व विभागानंही या समाधीबद्दल किंवा वाघ्या कुत्र्याबद्दल कोणतीही ऐतिहासिक माहिती किंवा पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे, असं या पत्रात लिहिलंय.

संभाजीराजे छत्रपती यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेले पत्र.

फोटो स्रोत, facebook/YuvrajSambhajiraje

फोटो कॅप्शन, संभाजीराजे छत्रपती यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेले पत्र.

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी एका कल्पनेतल्या कुत्र्याची समाधी आणि पुतळा उभारणं म्हणजे हे महाराष्ट्राचं दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा आणि महाराजांशी केलेली घोर प्रतारणा आहे, असंही पुढे पत्रात म्हटलंय.

भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस 100 वर्ष पूर्ण होण्याआधीच ती हटवणं अत्यंत आवश्यक असल्याचंही संभाजीराजेंनी म्हटलं.

कुत्र्याच्या समाधीचे पुरावे नाहीत

संभाजीराजे छत्रपती यांनी भारतीय पुरातत्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची भेट घेऊन हा पुतळा हटवण्याची मागणी करणारे पत्र दिले. उजव्या बाजुला रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा फोटो.

फोटो स्रोत, facebook/YuvrajSambhajiraje

फोटो कॅप्शन, संभाजीराजे छत्रपती यांनी भारतीय पुरातत्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची भेट घेऊन हा पुतळा हटवण्याची मागणी करणारे पत्र दिले. उजव्या बाजुला रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा फोटो.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

संभाजीराजे छत्रपती ही मागणी अतिशय योग्य असल्याचं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचं म्हणणं आहे.

इंद्रजित सावंत यांनी रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा इतिहास सांगणारं 'शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध' हे पुस्तक लिहिलं आहे.

इतक्या वर्षांच्या कालावधीत कुत्र्याच्या स्मारकाचा पुरावाच उपलब्ध झालेला नाही. उलट, स्मारक नव्हतं असं सांगणारे अनेक लिखित आणि फोटो पुरावेही उपलब्ध आहेत, असं ते बीबीसी मराठीशी बोलताना सांगत होते.

"राजसंन्यास या शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या नाटकाची अर्पण पत्रिका या स्मारकात कोरलेली आहे. त्यामुळे हे शुद्ध हेतूने बसवलं आहे असं आपण म्हणू शकत नाही," ते म्हणाले.

रायगडाचा अभ्यास करण्यासाठी 2000 च्या आसपास पुण्यातील एक आर्किटेक्ट गोपाळ चांदोरकर यांनी काही लोकांसोबत 'शिवराई' नावाची संस्था काढली. त्यातून त्यांनी 'शोध शिवसमाधीचा' नावाची एक पुस्तिका लिहिली.

त्या पुस्तकात आत्ता जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची अष्टकोनी समाधी आहे तिथे त्यांची समाधी नसून खरी समाधी कुत्र्याचं स्मारक आहे तिथेच आहे असा गंभीर, संवेदनशील आणि असत्य दावा केला गेला, असं सावंत सांगत होते.

ते खोटं वाचल्यानंतर त्यांनी महाराजांच्या समाधीबद्दल शोधाशोध सुरू केली.

इतिहासकार इंद्रजित सावंत

फोटो स्रोत, facebook/Indrajit9000

फोटो कॅप्शन, इतिहासकार इंद्रजित सावंत

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या दहनाचे संदर्भ सापडतात. त्यानंतर त्यांच्या समाधीबद्दलचा कोणताही उल्लेख 1818 पर्यंत सापडत नाही, असं सावंत सांगत होते.

10 मे 1818 ला पेशव्यांकडून रायगड ताब्यात घेणारा इंग्रज अधिकारी कर्नल प्रॉथर, 1869 ला रायगडाला भेट देऊन त्याबद्दल 'दीनबंधू'मध्ये लिहिणारे महात्मा फुले, महाराष्ट्रातील सगळ्या किल्ल्यांना भेट देणारा, बुक ऑफ बॉम्बे पुस्तकाचा लेखक, ब्रिटिश इतिहास अभ्यासक जेम्स डग्लस यांपैकी कोणाच्याही लिखाणात कुत्र्याच्या स्मारकाचा उल्लेख येत नाही.

काही संशोधक जर्मन लोकांचा संदर्भ देतात. पण ती मांडणी खोटी असल्याचं सावंतांचं म्हणणं आहे.

"एच.डी. कँडल नावाच्या बांधकाम विभागात काम करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्याने अष्टकोनी समाधीचे नकाशे तयार करून घेतले. ते सगळीकडे प्रसिद्ध आहेत. त्यातही कुत्र्याच्या स्मारकाचा पुसटसाही उल्लेख नाही," ते म्हणतात.

त्यानंतर 1896 ला लोकमान्य टिळक रायगडावर गेले. त्यांच्याही कुठल्या लिखाणात वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आढळत नाही, असं सावंत सांगतात.

समाधी आली कुठून?

कुत्र्याबाबत पहिला उल्लेख 1905 साली 'रायगड किल्ल्याचं वर्णन' नावाच्या एका पुस्तकात चि. ग. गोगटे यांनी पहिल्यांदा केलेला सापडतो, असं सावंत सांगत होते.

कुत्र्यानं महाराजांच्या चितेत उडी मारली असा उल्लेख तिथे पहिल्यांदा येतो. पण त्यात कुत्र्याचं नाव वाघ्या आहे असं कुठे लिहिलेलं नाही.

पुढे 1916-17 च्या दरम्यान राम गणेश गडकरी यांच्या राजसंन्यास नाटकात कुत्र्याचं पात्र आणलं, असं सावंत सांगतात.

हे सगळं झाल्यानंतर 1926 ला ब्रिटिश सरकारने, त्यावेळेच्या पुरातत्त्व खात्याने आणि शिवाजी रायगड समितीने मिळून शिवाजी महाराज्यांच्या समाधीचा जिर्णोद्धार करण्याचं ठरवलं.

त्याबद्दलच्याही कोणत्या कागदपत्रांमध्ये कुत्र्याच्या स्मारकाचा उल्लेख आढळत नाही. 1936 ला ते कुत्र्याचं स्मारक बांधलं गेलं असं तिथला शिलाफलक सांगतो.

त्यामागे असलेली एक कथा अनेक पुस्तकात नोंद करून ठेवली आहे असं इंद्रजित सावंत सांगतात.

ती कथा अशी की जिर्णोद्धाराच्या कामासाठी इंदोर संस्थानाच्या तुकोजी होळकर महाराजांकडे निधीची मागणी करण्यात आली.

महाराज्यांच्या समाधीसाठी निधी दिला तर ब्रिटिश सरकारची अवकृपा होईल अशी भीती त्यांच्यात होती. त्यामुळे त्यांच्या राणीचं आवडतं कुत्र वारल्यामुळे ते सुतकात आहेत असा बहाणा त्यांनी केला, असं इंद्रजित सावंत सांगतात.

म्हणून स्मारक समितीतील लोकांनी शिवाजी महाराज्यांच्या समाधीला नको तर कुत्र्याच्या स्मारकाला निधी द्या, असं म्हटलं आणि त्यातून ते स्मारक उभारलं गेलं असं सांगितलं जातं.

ग्राफिक्स

ही कथाही त्यांना खोटी वाटते असं त्यांनी आवर्जून नमूद केलं.

"पण तुकोजी होळकर हे अत्यंत शिवप्रेमी, पुरोगामी विचारांचे होते. त्यांचे चिरंजीव यशवंतराव होळकर आणि राजर्षी शाहू महाराज यांची बहिण चंद्रप्रभा यांचा धनगर मराठा आंतरजातीय विवाह झाला होता," सावंत सांगतात. या कथेतून तुकोजी होळकर यांचीही बदनामी होते आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं.

"धनगर आणि कुत्रा असं एक इक्वेशन तयार करायचं आणि त्याचा जातीत तेढ निर्माण करण्यासाठी उपयोग करायचा असे सगळे हेतू ठेऊन अत्यंत चाणाक्ष, क्रूर बुद्धीनं हे स्मारक तिथे उभारलं गेलं आहे," असं सावंत यांचं म्हणणं आहे.

गोगटे यांनी 2000 साली लिहिलेल्या पुस्तकाचा पुन्हा संदर्भ घेऊन ते म्हणतात, "आधी कोणताही पुरावा नसताना स्मारक उभं केलं गेलं. पुन्हा त्या खालीच शिवाजी महाराजांची खरी समाधी आहे असं म्हटलं जाऊ लागलं."

महाराजांचा अपमान करू पाहणारी ही प्रशांत कोरटकरांसारखी मनोवृत्ती आहे, असं ते म्हणाले. महाराष्ट्राला उशीरा जाग आली असली तरी लवकरात लवकर स्मारक काढून टाकलं जावं असं त्यांचं म्हणणं आहे.

धनगर समाजाचा विरोध का?

पण 25 मार्चला पत्रकार परिषदेत बोलताना ओबीसी आणि धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजेंच्या कुत्र्याचं स्मारक हटवण्याच्या विनंतीला विरोध केला.

"आमची ही विनंती आहे की संभाजीराजेंनी किल्ल्याचे योग्य प्रकारे संवर्धन करावे. मात्र, सध्या रायगडावर जे घडत आहे, ते किल्ल्याच्या जतनाच्या विरोधात आहे," ते म्हणाले.

संभाजीराजेंनी स्मारक 31 मे पर्यंतची अंतिम चेतावणीच सरकारला दिली असं त्यांचं म्हणणं आहे.

"संभाजीराजेंनी नेमकी 31 मे हीच तारीख का निवडली? याबाबत आमचा आक्षेप असा आहे की याच दिवशी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती असते आणि यावर्षी ती त्रिशतकोत्तर जयंती आहे," ते म्हणाले.

त्यांच्या जन्मगावी पंतप्रधानांना आणण्याचे प्रयत्न सुरू असताना संभाजीराजे भोसलेंनी तीच तारीख निवडल्याने त्यांच्या हेतूंवर शंका उत्पन्न होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

ग्राफिक्स

विशाळगडप्रमाणेच वाघ्याच्या समाधीवरून लक्ष वेधून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न संभाजीराजे करत आहेत, असा त्यांचा आरोप होता.

त्यांच्यासोबत पत्रकार परिषदेत वाघ्या या कुत्र्याचा इतिहासात उल्लेख सापडतो हे सांगण्यासाठी इतिहास अभ्यासक संजय सोनावणीही होते.

कर्नाटकातल्या बेलवडी गढीच्या तहाची आठवण म्हणून शिवाजी महाराज्यांच्या काळात एक शिल्प उभारण्यात आलं होतं. या शिल्पात शिवरायांसोबत चाललेला एक कुत्रा दाखवला आहे, असं संजय सोनावणी यांचं म्हणणं होतं.

बीबीसी मराठीसोबत बोलताना त्यांनी या सर्व पुराव्यांची पुनरावृत्ती केली.

"संगम माहुली इथं छत्रपती शिवरायांचे नातू शाहु महाराज (सातारा) यांच्याही खंड्या या लाडक्या कुत्र्याची समाधी आहे आणि ती जवळपास शिवरायांच्या वाघ्या सारखीच आहे.

हे स्मारक शिवाजी महाराजांच्या निधनानंतरच सुमारे 40-50 वर्षांनी बनवलं गेलं होतं. याचाच अर्थ असा होतो की तत्कालीन सुस्थीतीत असलेल्या वाघ्या स्मारकाचीच प्रेरणा या स्मारकामागे असावी," ते म्हणतात.

वाघ्या कुत्र्याचे पुरावे कोणते?

निगोसिएशन्स : ऑथर्स अँड सब्जेक्ट ऑफ बुक्स (Negotiations: authors and subjects of books I-X (1834-1852)) या 1930 साली प्रकाशित झालेल्या जर्मन पुस्तकात कुत्र्याबद्दलचे उल्लेख आढळतात असं ते सांगत होते.

या पुस्तकात जे लिहिले आहे त्याचा मराठी अनुवाद सोनावणी असा सांगतात :

"शिवाजी नैसर्गिक मृत्युने रायगड येथे 1680 साली मरण पावला. त्याच्या दहनस्थळी स्मारक बांधण्यात आले. त्याबाजुलाच एका पाषाणस्तंभ असुन त्यावर दगडात ताशीवपणे बनवलेला कुत्रा (शिवस्मारकाकडे) पहात आहे. हाच वाघ्या...शिवाजीचा लाडका कुत्रा, ज्याने जळत्या चितेत उडी घेतली होती..."

या ग्रंथात फक्त 1834 ते 1852 या काळात प्रसिद्ध झालेल्या ऐतिहासिक पुस्तकांची नोंद आहे, म्हणजेच वाघ्याबाबतचा मजकुर याच काळात लिहिल्या गेलेल्या कोणत्यातरी पुस्तकातुन या सुचीत घेण्यात आला आहे हे उघड आहे, असं ते म्हणाले

या सुचीचं पुनर्मुद्रण 1930 सालचं आहे. वाघ्याचा नवा पुतळा पुन्हा बसवण्यात आला तो 1936 साली.

शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी हा पुतळा ब्राह्मणांनी 1936 साली बसवला असा आरोप असला तर 1834 ते 1852 साली अधेमधे प्रसिद्ध झालेल्या, त्याही जर्मन ग्रंथात, वाघ्या कसा आला? असा प्रश्न ते विचारतात.

"धनगर समाजाला कुत्रा हा देवासमान आहे आणि म्हणुनच तुकोजींनी वाघ्याचेही स्मारक करायचे घाटले. यात कोणता ब्राह्मणी कावा आहे? यात शिवरायांचा अवमान कसा होतो?" ते विचारतात.

महाराष्ट्राला एका नव्या वादात ढकलू नये अशी विनंती त्यांनी केली.

संभाजीराजे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

26 मार्चला घेतलेल्या पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपती यांनी सगळ्या आरोप-प्रत्यारोपांवर भाष्य कें.

"सर्व इतिहास अभ्यासकांना, आम्हाला आणि समाधी हटवण्यास विरोध करत आहेत त्यांनाही सरकारने एकत्र बोलवावं आणि पुरावे कुठे आहेत त्याची चर्चा करावी," ते म्हणाले.

स्वराज्यासाठी, महाराजांसाठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांचं स्मारक नाही. पण कुत्र्याच्या स्मारकाची उंचीही महाराजांच्या समाधीपेक्षा उंच आहे हे महाराष्ट्राला आवडेल का? असं ते म्हणत होते.

"इंदुरच्या तुकाराम महाराज होळकरांचं नाव तिथे लिहिलं आहे. त्यांनी कुत्र्याच्या स्मारकासाठी मदत केली असं म्हटलं आहे. हिंदवी स्वराजासाठी होळकर घराण्याच्या मल्हारराव, यशवंतराव, अहिल्यादेवी होळकर यांनी आयुष्य दिलं. अशावेळी एका कुत्र्याच्या समाधीसाठी ते कशी मदत करतील?"

उलटं तुकोजी महाराजांची यातून बदनामीच होत आहे, असं संभाजीराजे म्हणाले. तुकोजी होळकर खरे शिवभक्त आणि राजर्षी शाहू महाराजांचे जवळचे मित्र होते.

रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष असलेले संभाजीराजे छत्रपती स्वतः रायगडच्या कामावर लक्ष ठेवून आहेत.

फोटो स्रोत, facebook/YuvrajSambhajiraje

फोटो कॅप्शन, रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष असलेले संभाजीराजे छत्रपती स्वतः रायगडच्या कामावर लक्ष ठेवून आहेत.

"कृष्णाजीराव केळूसकरांनी लिहिलेल्या शिवाजी महाराजांच्या पहिल्या स्मारक ग्रंथाच्या अनेक प्रती विकत घेऊन तुकोजी महाराजांनी देशभरातल्या संग्रहालयात वाटल्या होत्या. याच स्मारक ग्रंथाचं इंग्रजीत भाषांतरही त्यांनी करून घेतलं," ते म्हणाले.

छत्रपती घराण्याचे आणि होळकर घराण्याचे चांगले संबंध आणि तुकोजी होळकर यांच्या मुलाशी शाहू महाराजांच्या बहिणीशी झालेल्या आंतरजातीय लग्नाचाही उल्लेख त्यांनी केला.

"धनगर समाज हा इतका विश्वासू आहे. ज्यांनी मला आयुष्यभर सांभाळलं ते आमच्या नवीन राजवाड्यातले प्रमुख आचारी, माझा विश्वासू गाडी चालक, माझा अंगरक्षकही धनगरच आहे," ते म्हणाले.

यात जातीचा मुद्दा नसून त्याला मुद्दाम तसा फाटा फोडला जात आहे याची खंत त्यांनी व्यक्त केली.

वाघ्या कुत्र्याचं स्मारक सांविधानिक पद्धतीने काढलं जावं आणि पायथ्याला चांगली जागा पाहून सन्मानपुर्वक तिथे स्थलांतरित करण्यात यावं असं त्यांनी सुचवलं.

"कुत्र्याने उडी मारली असं सांगणारा एकही पुरावा नसताना शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजुलाच ते स्मारक कशासाठी?" असा त्यांचा प्रश्न होता.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.