राज्याभिषेक दिन : छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली होती का? इतिहासकारांचे मत काय?

शिवाजी महाराज
    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडकामाचा उल्लेख केला आणि त्यावरून टीका-प्रतिटीका झाली. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंदर्भात भूमिका मांडताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख केला.

याबाबतची सविस्तर बातमी तुम्ही येथे वाचू शकता.

सचिन सावंत यांच्या वक्तव्यामुळे आता नवीनच वादाला सुरुवात झालीय. आपण हा वाद आणि त्यावरील इतिहास क्षेत्रातील जाणकारांची मतं जाणून घेऊ. तत्पूर्वी, या वादाला तोंड कुठून आणि कसं फुटलं याची थोडक्यात माहिती घेऊ.

विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सुरू असलेल्या चर्चेत बाबरी मशीद पाडकामाचा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

'या' वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटलं

बाबरीबद्दल झालेल्या उल्लेखाच्या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी भूमिका मांडताना म्हटलं, "बाबरी मशीद पाडणे हा भारतीय लोकशाहीवरील कलंक होता आणि शिवरायांच्या विचारांच्या विरोधातही आहे. शिवरायांनी मशीद पाडली नाही, बांधून दिली. शिवरायांचे नाव घेऊन त्यांच्या विचारांना विरोध कसा होऊ शकतो? भाजपला ते भूषणावह वाटणं असेल तर न्यायालयात मान्य का नाही केलं? पळ का काढला?"

शिवाजी महाराज

फोटो स्रोत, Twitter/@sachin_inc

सचिन सावंत यांच्या या भूमिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या संदर्भानं नवीन चर्चा सुरू झालीय. सचिन सावंत यांच्यावर टीकाही होतेय आणि त्यांच्या बाजूनेही बोललं जातंय, अशा दोन्ही बाजूंनी सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे.

ही चर्चा लक्षात घेता, बीबीसी मराठीनं इतिहासकारांचं याबाबतचं मत जाणून घेतलं.

'रायगडावर शिवाजी महाराजांनी मशीद बांधली म्हणणं धाडसाचं'

ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्याशी बीबीसी मराठीनं बातचीत केली.

पांडुरंग बलकवडे म्हणतात, "शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली हा दावा कोणत्या आधारांवर केला जातो, हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय शिवाजी महाराजांनी मशीद बांधल्याचा दावा करणं हे अत्यंत धाडसाचं आहे."

"माझा जितका अभ्यास आहे, त्या माझ्या समजुतीनुसार कोणत्याच कागदपत्रात शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधल्याचा कुठेही उल्लेख नाही. कोणत्याच कागदपत्रात याबाबत लिहिलेलं नाही. 1689 मध्ये रायगड किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर 1707 पर्यंत हा किल्ला मुघलांच्याच ताब्यात होता. मुघलांनी 1707 पासून ते 1733 दरम्यान हा किल्ला जंजिऱ्याच्या सिद्दी जौहरच्या ताब्यात दिला होता. तब्बल 44 वर्षे रायगड किल्ला मुस्लीम शासकांच्या ताब्यात होता."

रायगड

पांडुरंग बलकवडे यांनी पुढं म्हटलं, "यादरम्यान त्यांनी रायगडावर मशीद बांधली असेल, याची शक्यता गृहीत धरायला हरकत नाही. याचा अर्थ रायगडावर मशीद किंवा त्यासारखी वास्तू असेल तर ती शिवाजी महाराजांनी बांधली असं म्हणणं अत्यंत धाडसाचं ठरेल. कागदोपत्री आजपर्यंत आपल्याकडे शिवाजी महाराजांनी किंवा संभाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधल्याचा कुठलाही पुरावा नाही. त्यांनी याबाबत कागद दाखवल्यास आम्ही ते स्वीकारायला तयार आहोत. "

"1733 मध्ये रायगड किल्ला सिद्दी जौहरकडून पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यावेळी शाहू महाराजांची सत्ता होती. तेव्हापासून 1818 ला इंग्रजांच्या ताब्यात रायगड किल्ला जाईपर्यंत येथील मोडी भाषेतील 92 रुमाल आहेत. त्यामध्येही कुठे रायगडावर मशिदीचा उल्लेख नाही. ब्रिटिशांनी रायगड किल्ल्याचा ताबा घेतानाही मशिदीचा कुठे उल्लेख केलेला नाही.

कुठल्याही एका पुस्तकावरून शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली असं म्हणता येणार नाही. कांदबरीकार किंवा लेखक पुस्तकात काहीही लिहू शकतो. आवळसकर यांनीही अशा प्रकारचं काही लेखन केल्याचं माझ्या निदर्शनास आलेलं नाही," असं पांडुरंग बलकवडे यांनी म्हटलं.

शिवाजी महाराज

फोटो स्रोत, Getty Images

याबाबत बीबीसी मराठीनं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्याशीही बातचीत केली.

'रायगडावर मशीद बांधल्याचा समकालीन पुरावा नाही'

छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली होती का असे विचारले असता इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत सांगतात, "छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली याचा समकालीन पुरावा नाही."

"शिवाजी महाराजांच्या निधनानंतर रायगड आधी औरंगजेबाच्या ताब्यात गेला त्यावेळी औरंगजेबाने त्याचे नाव इस्लामगड ठेवले होते. 1707 ते 1733 काळात हा किल्ला जंजीऱ्याच्या सिद्दींकडे होता. त्या काळात अनेक स्थित्यंतरं झाली होती. म्हणून त्याकाळात तिथे मशीद बांधण्यात आलेली असण्याची शक्यता आहे.

सचिन सावंत यांच्या ट्वीट नंतर शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली होती की नव्हती याचा वाद सोशल मीडियावर सुरू झाला. यासंदर्भात इंद्रजीत सावंत सांगतात, की "सचिन सावंत यांनी दिलेला पुरावा हा उत्तरकालीन आहे. तो ऐतिहासिक पुरावा म्हणून मान्य करण्याची आवश्यकता नाही. पुरावेच नसतील तर ते मान्य देखील करावे लागतात. पण सचिन सावंत यांना असे म्हणायचे असेल की शिवाजी महाराज हे मुस्लीमद्वेष्टे नव्हते तर त्यांचे म्हणणे योग्य आहे."

'शिवाजी महाराज मुस्लीमद्वेष्टे नव्हते'

शिवाजी महाराजांचा सर्व समाजाकडे पाहण्याचा उदार दृष्टिकोन होता असं सांगताना इंद्रजीत सावंत सांगतात की "शिवाजी महाराजांनी मुळातच इतर राज्यकर्त्यांच्या तुलनेत कमी धार्मिक वास्तू बांधल्या आहेत. त्यांनी बांधलेल्या मंदिरांचीच संख्या कमी आहे तेव्हा ते मशीद बांधण्याचा प्रश्न कुठून येतो. पण याचा अर्थ ते मुस्लीमविरोधी होते की मुस्लीमद्वेष्टे होते असा नाही.

"शिवाजी महाराजांनी बाबा याकुत यांच्या दर्ग्याला अनेक देणग्या दिल्या आहेत. त्याचे समकालीन पुरावे आहेत. पन्हाळागडचा सादोबाचा दर्गा असो वा विशालगडाचा मलिक रिहान दर्गा असो शिवाजी महाराजांनी त्यांचा योग्य तोच आदर केला आहे."

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)