राष्ट्रीय स्वयंसेवक संघ औरंगजेबापेक्षा दारा शिकोहला अधिक प्राधान्य का देत आहे?

दारा शिकोह (डावीकडे) आणि औरंगजेब (उजवीकडे) यांचं चित्र.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दारा शिकोह (डावीकडे) आणि औरंगजेब (उजवीकडे) यांचं चित्र.
    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बीबीसी हिंदी
    • Reporting from, बंगळुरु

छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून मुघल सम्राट औरंगजेबाची देशभरात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. औरंगजेब आणि त्याच्या कबरीवरुन महाराष्ट्रातही वातावरण तापलं आहे.

याचदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं (आरएसएस) औरंगजेबावरून सुरू असलेल्या वादाला आता नवा आयाम दिला आहे. औरंगजेबनं ज्या भावाची हत्या केली त्या दारा शिकोहला का आदर्श म्हटलं जाऊ शकतं, याबाबत संघानं भाष्य केलं आहे.

संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी 'औरंगजेब आज प्रासंगिक का नाही' या संघटनेच्या भूमिकेचं समर्थन केलं. त्याचबरोबर दारा शिकोहच्या जागी औरंगजेबाला देण्यात आलेल्या अयोग्य प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या (एबीपीएस) तीन दिवसीय बैठकीच्या शेवटी पत्रकार परिषदेला संबोधित करताना, होसबळे यांनी त्यांच्या संघटनेचा मुघल सम्राटाला विरोध असल्याचं स्पष्ट केलं.

"भारतात मुद्दा हा आहे की, भारताच्या नीतीच्या किंवा नैतिकतेच्या विरोधात गेलेल्या व्यक्तीला (म्हणजे औरंगजेब) आयकॉन बनवायचं की, इथं जन्मलेल्या आणि भारताच्या नीतीप्रमाणे चालणाऱ्या लोकांना (दारा शिकोह) आयकॉन बनवायचं?," असा प्रश्न होसबळे यांनी उपस्थित केला.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

'इंग्रजांविरुद्धचा लढा हा एकमेव स्वातंत्र्य संग्राम नाही'

दत्तात्रय होसबळे म्हणाले की, "दारा शिकोहला कधीच आयकॉन बनवलं गेलं नाही. जे लोक गंगा-जमुना संस्कृतीबद्दल बोलतात, ते कधीच दारा शिकोहला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत नाहीत."

सम्राट शाहजहानचा उत्तराधिकारी दारा शिकोह हा उदारमतवादी मानला जातो. तर त्याचा भाऊ औरंगजेब याचा लष्करी रणनीतीकडे अधिक कल होता, असं म्हटलं जातं. दारा शिकोहने उपनिषदांचे फारसी भाषेत भाषांतर केले होते, असंही बोललं जातं.

होसबळे पुढं म्हणाले की, "स्वातंत्र्य मिळालेल्या प्रत्येक देशाचा निर्णय घेणं हा अधिकार आहे. इंग्रजांविरुद्धचा स्वातंत्र्याचा लढा हा एकमेव स्वातंत्र्य लढा नाही.

इंग्रज येण्यापूर्वी परकीय आक्रमकांना विरोध करणारे लोकही स्वातंत्र्य चळवळीत होते. राणा प्रताप यांनी जे केलं तीही स्वातंत्र्य चळवळ होती."

इतिहास

फोटो स्रोत, Getty Images

होसबळे यांच्या मते, हा परदेशी विरुद्ध स्वदेशी किंवा धर्म असा प्रश्न नाही.

ते म्हणतात की "व्यक्ती ख्रिश्चन जरी असली तरी देशाबद्दलची ही धारणा आहे. त्यामुळं जे लोक आक्रमक मानसिकतेने पीडित आहेत, ते आजही आपल्या देशासाठी धोकादायक आहेत."

ते म्हणाले की, पूर्वी 'औरंगजेब मार्ग' नावाचा रस्ता होता, तो बदलून 'अब्दुल कलाम रोड' करण्यात आला.

दारा शिकोह कोण होता?

दारा शिकोह हा औरंगजेबाचा मोठा भाऊ होता. तो आजोबा अकबरसारखा विद्वान होता आणि शाहजहानचा आवडता मुलगा होता.

तत्त्वज्ञान आणि गूढवादाकडे त्याचा अधिक कल होता. उपनिषदांच्या काही भागांचं फारसीमध्ये भाषांतर करण्याचं श्रेय त्याला जातं. त्यांनं उपनिषदांच्या प्रमुख भागांचं भाषांतर करण्यासाठी तज्ज्ञांचीही मदत घेतली होती.

तो एक सुफी विचारवंत होता, ज्यानं सूफीवादाला वेदांत तत्त्वज्ञानाशी जोडलं होतं.

ग्राफिक्स

अनिरुद्ध कनिसेट्टी सारख्या इतिहासकारांनी असंही लिहिलं आहे की, जर औरंगजेबानं वडील मृत्यूशय्येवर असताना आपल्या मोठ्या भावाला युद्धात मारलं नसतं तर भारतीय उपखंडाचं चित्र आज वेगळं असतं.

काही लोकांना 'औरंगजेबाची औलाद' म्हटलं जातं, अशावेळी समाजात एकोपा कसा राहू शकतो, असा सवालही त्यांना केला.

यावर होसबळे म्हणाले की, "अशा भावनांच्या वर येऊन समरस, सामंजस्यपूर्ण समाजाची स्थापना करावी लागेल. रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चटर्जी आणि महात्मा गांधींच्या रामराज्यात मांडलेल्या आमच्या सांस्कृतिक वारशातून आणि आमच्या तत्त्वांपासून आम्ही प्रेरणा घेतो."

ते पुढं म्हणाले, "जर कोणी आक्रमकांकडून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करत असेल आणि जर कोणाला विकृत कथा मांडायची असेल, तर आपल्याला त्यांच्या मनातून उपनिवेशवाद किंवा वसाहतवाद संपवण्याची गरज आहे."

भाजपबाबत काय म्हणाले?

भाजपच्या 11 वर्षांच्या राजवटीत सरकारच्या कामगिरीकडे आरएसएस कसं पाहतं? आणि सरकारनं आता कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे?

या प्रश्नाला उत्तर देताना दत्तात्रय होसबळे म्हणाले की, "आरएसएस आणि देश वेगळे नाहीत. सरकारनं काय करावं आणि काय करू नये हे आम्ही सांगणार नाही.

आरएसएसकडून प्रेरणा घेणाऱ्या प्रमुख संस्था आहेत, ज्या सरकारशी संवाद साधतील. गरज पडल्यास, काही यंत्रणा आहेत जे त्यांचं काम करतील. लोकांना त्यांचं मत मांडण्याची संधी मिळते.''

ग्राफिक्स

यावर्षी आरएसएसला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. अशा स्थितीत ही संस्था कोणत्या निकषांवर आपली कामगिरी मोजणार?

यावर होसबळे यांनी उत्तर दिलं, "हा शैक्षणिक चर्चेचा विषय आहे. आमच्याकडे कामगिरीचं मूल्यांकन करण्यासाठी कोणतेही निकष नाहीत. राममंदिर उभारणं हे आरएसएसचं यश नसून ते जनतेचं कर्तृत्व आहे. त्यामुळे भारतीय ओळख पुन्हा प्रस्थापित करण्यात मदत झाली."

"आमच्या दृष्टिकोनातून, आरएसएस ही एक हिंदू संघटना आहे. आम्ही हिंदू आहोत हे सांगायला आम्हाला अभिमान वाटतो. ही एक सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सभ्य अभिव्यक्ती आहे.

हे धर्माबद्दल नाही. विविधतेमुळे हिंदू समाजाचं संघटन करणं अवघड काम होतं. परंतु, हिंदू समाज पुन्हा जागृत होत आहे, असं म्हटलं पाहिजे."

"अंतर्गतरित्या" अनेक सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, हे त्यांनी मान्य केलं.

ते स्पष्ट करतात, "अस्पृश्यता आणि स्त्रियांची समानता या दोन्ही गोष्टी मानकानुसार योग्य नाहीत. संघाचा असा विश्वास आहे की, अधिकृत आंतरजातीय विवाह व्हायला हवेत. यासाठीचा संदेश शाखांच्या माध्यमातून दररोज दिला जातो."

भाजपचा पुढील अध्यक्ष कोण?

आरएसएस स्वतःचं एक गैर-राजकीय सांस्कृतिक संघटना म्हणून वर्णन करते. परंतु त्यांना भारतीय जनता पक्षाचे (भाजप) 'पालक' म्हणून पाहिलं जातं.

आरएसएस आपल्या संबंधित संघटनांच्या कारभारात हस्तक्षेप करत नाही, असं होसबळे यांनी स्पष्ट केलं.

भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीच्या मुद्द्यावर ते म्हणाले, "अध्यक्ष किंवा पदाधिकारी कोण हे त्यांना (भाजप) ठरवायचं आहे. ते निर्णय घेण्याइतके परिपक्व आहेत."

मणिपूरमध्ये सरकारनं कोणता पुढाकार घ्यावा हे आरएसएसने सांगितलं नाही, असं मणिपूरच्या प्रश्नावर सरकार्यवाह म्हणाले.

ते म्हणतात, "त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू केली आहे, लोकांची शस्त्रे घेतली आहेत आणि महामार्ग खुले केले आहेत. या सगळ्यामुळे काही आशा निर्माण झाल्या आहेत. आम्ही आनंदी आहोत, कारण लोकांना वाटतं की तिथे सरकार आहे. "

या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीपासून सुरू होणारी शताब्दी साजरी करण्यासाठी आरएसएसनं विविध कार्यक्रमांची तयारी सुरू केली आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.