औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरातील गूढ मकबरा, अन् नातवाला मुस्लिमांचा खलिफा करण्यासाठीची निजामाची गुप्त योजना

अखेरच्या खलिफासाठी तयार करण्यात आलेला मकबरा.

फोटो स्रोत, Imran Mulla

फोटो कॅप्शन, अखेरच्या खलिफासाठी तयार करण्यात आलेला मकबरा.
    • Author, इमरान मुल्ला
    • Role, इतिहासकार आणि पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद)मध्ये खुलताबाद याठिकाणी औरंगजेबाची कबर आहे. इतिहासाच्या इतरही अनेक पाऊलखुणा या परिसरात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 20 व्या शतकातला एक मकबरा.

ऑटोमन साम्राज्याचे शेवटचे खलिफा अब्दुल माजीद द्वितीय यांच्या कबरीसाठी हा मकबरा बांधण्यात आला होता. ठरल्याप्रमाणं त्यांची कबर इथं असती, तर हा परिसर मुस्लीम इतिहासातील एक महत्त्वाचं केंद्र ठरला असता. पण तसं झालं नाही.

त्यापूर्वी मुघल बादशहा औरंगजेबाच्या निधनानंतर त्याची कबरही त्याच्या इच्छेनुसार खुलताबाद परिसरातच बांधण्यात आली होती.

अब्दुल माजीद ऑटोमन साम्राज्याचे खलिफा म्हणून नियुक्त झालेले अखेरचे सदस्य होते. मोहम्मद पैगंबराच्या राजकीय वारशाचं प्रतिनिधित्व ते करत होते. कवी आणि संगीतप्रेमी अशी त्यांची ओळख होती.

या मकबऱ्याच्या जवळपास 15 मीटर लांबी आणि आठ मीटर रुंद असलेल्या खड्ड्यामध्ये मजार तयार केली जाणार होती. हैदराबाद संस्थानाच्या माध्यमातून भारतात राजवंश सुरू ठेवण्याची त्यांची इच्छा होती. पण संस्थानच्या पाडावामुळं ते होऊ शकलं नाही.

त्यामुळं ऑटोमन तुर्की शैलीमध्ये तयार केलेल्या या मकबऱ्यात खलिफाला दफन करण्याबरोबरच खलिफा पद मिळवण्याचा निजामाचा प्रयत्नही पूर्ण होऊ शकला नव्हता.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

तुर्कीच्या सरकारनं ऑटोमन साम्राज्याचा अंत झाल्यानंतर नोव्हेंबर 1922 मध्ये इस्तंबुल याठिकाणी त्यांची खलिफा म्हणून नियुक्ती केली होती. पण मार्च 1924 मध्ये तुर्कीनंच खलिफा पद संपुष्टात आणलं आणि अब्दुल माजीद यांना कुटुंबासह स्वित्झर्लंड रेल्वेतून पाठवून दिलं होतं.

त्यावेळी हैदराबादच्या अखेरचे निजाम मीर उस्मान यांनी त्यांची मदत केली होती. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून टाइम्स मॅगझिनमध्ये त्यांचा एकेकाळी उल्लेख झाला होता.

मदतीसाठी सरसावले निजाम

मुघल साम्राज्यातील सांस्कृतिक वारशासाठी हैदराबादला ओळखलं जात होतं. याठिकाणच्या महालांची भव्यता आवाक करणारी होती.

हैदराबाद ब्रिटिश राजवटीतील भारतातलं सर्वात मोठं संस्थान होतं. निजामांच्या संस्थानात मोठ्या प्रमाणावर हिंदू लोकसंख्याही होती. त्यांनी मंदिरं, गुरुद्वारा, मशिदी आणि सुफी दर्ग्यांना संरक्षण दिलं होतं.

त्यामुळं मुस्लीम समुदायामध्ये प्रतिमा उंचावण्यासाठी निजामानं अब्दुल माजीद यांना मदत देऊ केली होती.

मीर उस्मान अली शाह.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली शाह.

ऑक्टोबर 1924 मध्ये फ्रान्सच्या नीस शहराच्या समुद्र किनाऱ्यावरील बंगल्यात अब्दुल माजीद यांची व्यवस्था करण्यासाठी लागलेली आर्थिक मदत निजामानं केली होती.

त्यानंतर अब्दुल माजीद यांनी तिथून खलिफा पद पुन्हा पुनर्जिवीत करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी मार्च 1931 मध्ये मौलाना शौकत अली यांच्याशी हात मिळवणी केली. मौलाना शौकत अली हे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील एक नेते आणि महात्मा गांधींचे नीकटवर्तीय होते.

निजाम-अब्दुल माजीद कुटुंबातील नातेसंबध

अब्दुल माजीद यांची नजर त्यावेळी डिसेंबरमध्ये जेरुसलेममध्ये होणाऱ्या इस्लामिक काँग्रेसकडं लागलेलं होतं.

अब्दुल माजीदनं जेरुसलेमला जाऊन या परिषेदला संबोधित करून खलिफा पदासाठी पाठिंबा मिळवण्याची योजना आखली. पण ब्रिटिश सरकारनं त्याला धक्का दिला. ब्रिटिश सरकानं त्यांच्या ताब्यात असलेल्या पॅलेस्टाईनमध्ये अब्दुल माजीद यांच्या प्रवेशावर बंदी घातली.

पण त्यांनी दुसरीही एक योजना आखली होती. ऑक्टोबर 1931 मध्ये अब्दुल माजीद यांची मुलगी राजकुमारी दुर्रुशेहवर हिचा निकाह निजामांचा सर्वात मोठा मुलगा प्रिन्स आझम याच्याशी झाला.

राजकुमारी दुर्रुशेहवर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राजकुमारी दुर्रुशेहवर

शौकत अली आणि ब्रिटिश विचारवंत मार्माड्यूक पिकथॉल यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता.

"या तरुण जोडप्यानं एका मुलाला जन्म द्यावा आणि त्याला खरा खलिफा जाहीर केलं जावं का?" असं त्यानंतर टाइम मॅगझिनमध्ये छापून आलेल्या वृत्तात म्हटलं होतं.

अब्दुल माजीद यांनी म्हटलं की, "या नात्यामुळं संपूर्ण मुस्लीम जगतावर चांगला प्रभाव पडेल."

नीसमध्ये हा सोहळा झाला. त्यानंतर काही दिवसांनी शौकत अली यांच्या वक्तव्याच्या आधारे तत्कालीन बॉम्बेच्या उर्दू वृत्तपत्रांनी खलिफा पद देण्याबाबतच्या बातम्या दिल्या.

पण त्यामुळं ब्रिटिश अधिकारी घाबरले त्यांनी निजामाला अब्दुल माजीद यांचा हैदराबाद दौरा रद्द करण्यास भाग पाडलं.

दस्तऐवजांच्या सत्यतेबाबत शंका

काही लोकांच्या मते, या विवाहाच्या काही दिवसांनंतर अब्दुल माजीद यांनी एका अशा दस्तऐवजावर सही केली ज्यामुळं संपूर्ण जगाचा इतिहासच बदलणार होता. सय्यद अहमद खान यांना 2021 मध्ये हैदराबादच्या त्यांच्या घरात याबाबचे पुरावे असलेले दस्तऐवज सापडले होते.

या कुटुंबानं एप्रिल 2024 मध्ये मला संशोधनासाठी त्यांच्या घरी बोलावलं होतं.

त्यावेळी खान मला म्हणाले की, त्यांना डिसेंबर 2021 मध्ये त्यांच्या आजोबांच्या कागदपत्रात हे पुरावे मिळाले. सय्यद मोहम्मद अमरुद्दीन थान हे सातव्या निजामाचे लष्कराचे अधिकारी होते. 2012 मध्ये वयाच्या 99 व्या वर्षी त्यांचं निधन झालं होतं.

या दस्तऐवजांमध्ये जाड कागडावर अरबी लिपित निजामाला संबोधित करत पत्र लिहिलेलं होतं. त्यावर अब्दुल माजीद यांची सही होती. नीसमध्ये झालेल्या या विवाहाच्या आठवडाभरानंतर हे पत्र लिहिण्यात आलं होतं.

या पत्राद्वारे अब्दुल माजीद यांनी त्यांचं खलिफा पद निजामांला हस्तांतरीत केलं होतं. हा करार प्रिन्स आझम आमि दुर्रुशेहवर यांच्या मुलाच्या जन्मापर्यंत गोपनीय ठेवला जाणार होता.

मकबऱ्याची आतील बाजू.

फोटो स्रोत, Imran Mulla

फोटो कॅप्शन, मकबऱ्याची आतील बाजू.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तुर्कीतील लेखक मुरात बरदाच यांच्यासह काही अभ्यासकांनी मात्र हे दस्तऐवज खोटे असल्याचं म्हटलं आहे.

"ही कागदपत्रं काही वर्षांपूर्वी तयार केली आहेत. त्यामुळं ती खोटी आहेत. यावर असलेल्या सह्या खऱ्या नाहीत," असं मुरात बरदाच म्हणाले.

पण काही लोकांच्या मते ही कागदपत्रं खरी आहेत.

इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कनव्हर्जन ऑफ मॅन्युस्क्रिप्टमध्ये काम करणारे डॉ. सय्यद अब्दुल कादरी यांच्या मते, "या दस्तऐवजांवर अब्दुल माजीद यांची असलेली सही आणि इतर दस्तऐवजांवर असलेली त्यांची सही सारखीच आहे."

"यामध्ये वापरलेली शाई ही युवराज किंवा राज्यकर्त्यांसाठी तयार केली जाणारी गडद काळ्या रंगाची तीच शाई आहे. तसंच अशाप्रकारचे कागद शासकांच्या काळातच वापरले जात होते. सामान्य लोकांच्या आवाक्यात ते नाहीत," असंही ते म्हणाले.

अहमद अली हे भारत सरकारच्या सालार जंग संग्रहालयाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांच्या मते, "खलिफांशिवाय इतर शब्दही असली आहेत. तसंच ते इतर दस्तऐवजांशीही साम्य असलेले आहेत."

पण यावर अजूनही युक्तिवाद सुरुच आहे. सय्यद अहमद खान यांनी कुटुंबाच्या वतीनं प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की, "खलिफा पद धार्मिक किंवा राजकीय कारणाने पुनर्जिवीत करण्याचा विचार आमचा काहीही विचार नाही.

खुलताबादमध्ये दफन करण्याची योजना

अब्दुल माजीद यांना खलिफा पद हैदराबादमध्ये देण्याची इच्छा होते याबाबतचे काही ठोस पुरावे मी इतरही काही ठिकाणाहून गोळा केले आहेत.

6 ऑक्टोबर 1933 मध्ये नीस याठिकाणी दुर्रुशेहवर यांनी मुकर्रम जाह यांना जन्म दिला. ते अब्दुल मजीद आणि निजामांचे नातू होते. मुकर्रम जाह लहान असतानाच ते आपले वारसदार असल्याचं निजामानं नीकटवर्तियांना सांगायला सुरुवात केली होती.

ऑगस्ट 1944 मध्ये खलिफा अब्दुल माजीद यांचं निधन झालं. नोव्हेंबर 1944 मध्ये सर ऑर्थर लोथियन यांनी हैदराबादमधील त्यांच्या प्रतिनिधीला गोपनीय पत्र लिहिलं होतं. "पंतप्रधानांनी अब्दुल माजीद यांचं मृत्यूपत्र पाहिलं आहे. त्यांना भारतात दफन केलं जावं आणि इथे त्यांचा नातू पुढचा खलिफा असेल, अशी त्यांची इच्छा होती."

खलिफासाठी तयार केलेला मकबरा

फोटो स्रोत, James Wrathall

दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी 1946 मध्ये एकमेकांना पाठवलेल्या गोपनीय पत्रांमधूनही हे समोर येतं की, अब्दुल माजीद यांनी जाह यांना वारसदार जाहीर केलं होतं. ते त्यांना गोपनीय ठेवायचं होतं.

त्यामुळं निजामानं त्याचदिवशी खुलताबादमध्ये मकबरा तयार करण्याचा आदेश दिला. महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगरमधील (तेव्हाचे औरंगाबाद) हा भाग निजामाच्या अख्त्यारित होता. हैदराबादच्या पहिल्या निजामाला दफन करण्यात आलं त्या ठिकाणाच्या जवळच ही जागा आहे.

ब्रिटिशांनी भारत सोडल्यानंतर सप्टेंबर 1948 मध्ये या मकबऱ्याचं काम पूर्ण झालं. पण त्याच महिन्यात भारतीय लष्करानं आक्रमण करत निजामाला सत्तेवरून पायउतार केलं. त्यात जवळपास 40 हजार लोकांचा जीव गेला. त्यामुळं अब्दुल माजीद यांचा मृतदेह भारतात दफन करण्याची योजना पूर्ण होऊ शकली नाही.

त्यानंतर 1954 मध्ये म्हणजे निधनाच्या 10 वर्षांनंतर अब्दुल माजीद यांना सौदी अरेबियाच्या मदिनामध्ये दफन करण्यात आलं.

खुलताबाद मुस्लीम चळवळींचे केंद्र

इसवीसन 1300 साली दिल्लीच्या निजामुद्दीन अवलियाने दख्खनमध्ये इस्लामचा प्रसार करण्यासाठी त्यांचा शिष्य मुन्तजिबुद्दीन जर जरी जर बक्ष याला 700 पालखींसह (700 सुफी फकीर) देवगिरीला पाठवलं. त्यावेळी दिल्लीच्या अलाउद्दीन खिलजीनं राजा रामदेवराय यादव याला आपला मांडलिक बनवलं होतं.

मुन्तजिबुद्दीनने दौलताबादला केंद्र ठेवून बाकी 700 जणांना इथूनच संपूर्ण दक्षिण भारतात पाठवलं. 1309 मध्ये त्याचं निधन झालं. त्यांचा दर्गा खुलताबादमध्ये हुडा टेकडीच्या पायथ्याशी बांधण्यात आला.

इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी सांगतात की, "आपली चळवळ सुरू ठेवण्यासाठी निजामुद्दीन अवलियाने आपला उत्तराधिकारी बुऱ्हानुद्दीन गरीब याला आणखी 700 पालखी, प्रेषित महंमद पैगंबर यांचा पोशाख (पेहरन शरीफ), त्यांच्या मुखावरील केस (मुहे मुबारक) देऊन खुलताबादला पाठवलं. तेव्हापासून खुलताबाद हे दख्खनेतील इस्लामी चळवळीचं केंद्र बनलं. बुऱ्हानुद्दीनला 29 वर्षांचा कार्यकाळ लाभला."

नगारखाना, खुलताबाद

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc

फोटो कॅप्शन, नगारखाना, खुलताबाद

"त्याच्यानंतर देवगिरीला महंमद तुघलकाने आपली राजधानी बनवलं. तेव्हा त्या दरबारातील काझी आणि इस्लामी विद्वान असलेल्या दाऊद हुसेन शिराजी याला जैनुद्दीनने आपला उत्तराधिकारी नेमले. त्याचे नामकरण जैनुद्दीन दाऊद हुसेन शिराजी असे झाले.

जैनुद्दीनने 1370 पर्यंत सुफी चळवळ मजबूत केली. जैनुद्दीन ख्वाजा परंपरेतील 22 वे खलिफा ठरले. मात्र आपल्यानंतर कोणी खलिफा होण्याच्या योग्यतेचा दिसत नाही, असे म्हणून झैनुद्दीनने उत्तराधिकारी नेमला नाही. त्यामुळे त्याच्यानंतर ही चळवळ खंडित झाली आणि खुलताबादचे महत्त्व थोडे कमी झाले."

खुलताबाद हे धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा असलेलं गाव आहे. भद्रा मारुती या धार्मिक स्थळासोबतच या गावात सूफी संत आणि इतर काही इतिहासकालीन राजघराण्यांतील आणि सरदार घराण्यांतील व्यक्तींच्या कबरी आहेत.

खुलताबादला जुन्या काळात 'जमिनीवरचा स्वर्ग' असं संबोधलं जायचं. इसवीसन 1300 साली मुन्तजिबुद्दीन जर जरी जर बक्षच्या आगमनापासून सुफींचं आगमन इथं व्हायला सुरुवात झाली. हे सुफी काबूल, बुखारा, कंदाहार, समरकंद, इराण, इराक, पर्शिया, या देशांमधून प्रवास करायचे आणि खुलताबादला यायचे.

मुकर्रम जाह यांचे निधन

मुकर्रम जाह आजोबांच्या निधनानंतर 1967 मध्ये नावापुरते निजाम बनले. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे अधिकार मात्र नव्हते. खलिफाचं पद मिळवण्याची तर त्यांची स्थितीच नव्हती.

भारत सरकारनं 1971 मध्ये त्यांचं संस्थान खालसा केलं. तसंच त्यांची मालमत्ता कर आणि भूमी अधिनयमांतर्गत जाब्यात घेतली. त्यानंतर जाह यांनी वेगळा मार्ग निवडला आणि 1973 मध्ये ते पश्चिम ऑस्ट्रेलियाला निघून गेले. त्याठिकाणी त्यांनी 2 लाख हेक्टरचा शेळ्यांचा फार्म खरेदी केला.

त्यानंतर ते तुर्कीला गेले आणि 14 जानेवारी 2023 ला इस्तंबूलमध्ये अज्ञातवासातच त्यांचं निधन झालं. त्यांचा मोठा मुलगा राजकुमार अजमत जाह यांना नावापुरतं निजामपद मिळालं. ते नववे निजाम ठरले. अजमत जाह ब्रिटिश फिल्ममेकर असून हैदराबादमधील अनेक मालमत्ता त्यांच्या मालकीच्या आहेत.

अब्दुल माजीद आणि मीर उस्मान अली यांच्या कुटुंबातील नातेसंबंधांकडं मुस्लीम जगतात दोन मोठ्या कुटुंबांच्या संबंधांच्या दृष्टीनं पाहिलं.

ब्रिटिश सत्तेच्या अंतानंतर हैदरबाद स्वतंत्र देश बनला असता तर राजकुमार मुकर्रम जाह यांनी निजाम बनल्यानंतर खलिफा पदावरही दावा केला असता.

मुकर्रम जाह

फोटो स्रोत, Getty Images

पण तसं घडलं नाही. इतिहासकार जॉन झुबरझिकी यांनी 2005 मध्ये तुर्कीमध्ये मुकर्रम जाह यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी ते या इतिहासाबाबत मुकर्रम काय विचार करत होते, हे मी जॉन यांना विचारलं.

झुबरझिकी यांना खलिफा अब्दुल माजीद यांच्या मृत्यूपत्राशी संबंधित एक महत्त्वाचं पत्र मिळालं होतं.

"निजाम मीर उस्मान अली खान एक चतुर रणनितीकार होते. नातवाला थखिलाफा बनवण्याची त्यांची योजना होती," असं झुबरझिकी सांगतात.

झुबरझिकी 2005 मध्ये जाह यांना भेटले तेव्हा त्यांचं व्यक्तिमत्त्वं विनम्र, उदार आणि त्याचवेळी जादुई असल्याचं त्यांना जाणवलं होतं.

"जीवनात ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला, त्याचं त्यांना दु:ख झालेलं होतं."

अखेर शेवटच्या खलिफांच्या नातवाला हैदराबादच्या मक्का मशिदीत दफन करण्यात आलं.

(इतिहासकार इमरान मुल्ला 'द इंडियन कॅलिफेट: एक्झाइल्ड ऑटोमन्स अँड द बिलेनियर प्रिन्स' पुस्तकाचे लेखकही आहेत.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.