मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन : निजामाच्या तावडीतून सुटका होण्यापूर्वी मराठवाड्यात वातावरण कसं होतं?

- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
'मध्यरात्री बारा वाजता जेव्हा सर्व जग शांतपणे झोपलेलं असेल त्यावेळी या भारतात स्वातंत्र्याची नवी पहाट उगवलेली असेल,' पंडित नेहरू यांच्या 'ट्रिस्ट विथ डेस्टिनी' किंवा 'नियतीशी करार' या जगप्रसिद्ध भाषणातले हे उद्गार आहेत. भारत स्वतंत्र झाल्यावर पंडित नेहरूंनी हे भाषण दिलं होतं.
14 ऑगस्टच्या मध्यरात्री म्हणजेच 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला आणि भारतभर आनंदोत्सव साजरा झाला. 150 वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं होतं. पण त्याच वेळी भारताचा अंदाजे सव्वा दोन लाख स्क्वेअर किमीचा भूभाग पारतंत्र्यात होता. हा भूभाग म्हणजे हैदराबादचे संस्थान.
हैदराबादच्या संस्थानात आजचं संपूर्ण तेलंगणा, कर्नाटकचे 2 जिल्हे आणि संपूर्ण मराठवाडा इतका भाग येत होता.
हैदराबादचा निजाम मीर उस्मान अलीने अद्यापही या भागावरचा ताबा सोडला नव्हता आणि तो सोडण्याच्या तयारीत देखील नव्हता. उलट हैदराबाद संस्थानावरची पकड मजबूत करण्यासाठी त्यांनी इत्तेहाद मुसलमीन आणि रझाकार सारख्या जात्यंध संघटनांना खतपाणी घालून हैदराबादच्या जनतेवर अत्याचार सुरू केले होते.

फोटो स्रोत, Getty Images
हैदराबाद संस्थानाला स्वातंत्र्याची पहाट पाहण्यासाठी 1948 हे साल उजडू द्यावं लागलं होतं. या 13 महिन्यात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात हैदराबाद संस्थानातील प्रजेनी निजामाविरोधात निकराचा लढा दिला.
हिंदुस्तान टाइम्सने भारतीय स्वातंत्र्याचं वर्णन 'न्यू स्टार राइजेस इन द इस्ट' असं केलं होतं. भारतातील ब्रिटिश राज संपले, असाच मथळा हिंदुस्तान टाइम्सने दिला होता. पण याच भारताच्या मधोमध असलेली निजामाची राजवट अजूनही संपली नव्हती.
त्यामुळे ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी या संस्थानात नेमकी काय परिस्थिती होती, असा प्रश्न अनेकांना पडतो. 15 ऑगस्ट रोजी हैदराबाद संस्थानात नेमकी काय परिस्थिती होती याचा घेतलेला हा आढावा.

फोटो स्रोत, Twitter@Hindustantimes
देश स्वतंत्र झाल्यावर तिरंगा फडकावणे ही भारतीयांची नैसर्गिक प्रतिक्रिया होती. पण भारत स्वतंत्र झाल्यावर तिरंगा फडकावला तर याद राखा, अशी ताकीद निजामाने आणि त्याच्या रझाकार संघटनेनी लोकांना देऊन ठेवली होती.
निजामाच्या या धमकीला न जुमानता स्टेट काँग्रेस कमिटीने ठरवलं होतं की, 7 ऑगस्ट रोजी ज्यावेळी देशातील सर्व संस्थाने भारतात सामील होतील त्या दिवशी आपण भारतीय एकता दिवस पाळायचा आणि जागोजागी तिरंगा फडकावायचा.
याच दिवशी स्वामी रामानंद तीर्थांनी हैदराबादेत ध्वज फडकावला होता. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली आणि त्याच दिवशी त्यांची सुटका करण्यात आली होती.
'जीव गेला तरी चालेल पण तिरंगा फडकवणारच'
हैदराबादला जरी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं तरी हाच दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करा, असं आवाहन स्वामीजींनी केलं होतं.
स्वामी रामानंद तीर्थ म्हणाले होते, "जीव गेला तरी बेहत्तर पण आम्ही तिरंगा फडकवणारच." अशा परिस्थितीत हैदराबाद संस्थानात काय चित्र पाहायला मिळणार याची कल्पना कुणालाच नव्हती.

फोटो स्रोत, Getty Images
इत्तेहाद मुसलमीनचे नेते आणि कृती समतीचे संयोजक यामीन झुबेरी यांनी स्पष्ट इशारा दिला होता की, 15 ऑगस्टला जर कुणी रेल्वे स्टेशन किंवा पोस्ट ऑफिसवर 'भारताचा परका ध्वज' कुणी फडाकवला तर तुम्हाला परिणामांना सामोरं जावं लागेल.
त्यांच्या या धमकीला रामानंद तीर्थांनी निवेदनाद्वारे प्रत्युत्तर दिले, "काय वाटेल ते झाले तरी उद्या सर्वत्र हिंदी संघराज्याचा ध्वज फडकविला जाणारच ! तुरुंगवासाची आणि परिणामांच्या धमक्यांची आम्हाला तमा नाही. हा ध्वज आम्ही परका मानीत नाही तर आमचाच मानतो. आज ना उद्या हैदराबादला हा ध्वज स्वीकारावा लागेल."
रामानंद तीर्थांचे हे शब्द खरे ठरले पण ते खरे ठरवण्यासाठी संस्थानातील जनतेला अग्निदिव्यातून जावं लागलं. मराठवाड्यातील अनेकांना आपलं घर सोडून दुसऱ्या राज्यात आश्रय घ्यावा लागला होता.
मराठवाड्यातील अनेक कुटंबांनी घेतला राज्याबाहेर आश्रय
अनेकजण मराठवाडा सोडून मध्य प्रांतात म्हणजे अमरावती, नागपूर अशा ठिकाणी आश्रयाला गेले होते.
आता 83 वर्षांचे असणारे परभणीचे अॅड. अनंत उमरीकर सांगतात की, रझाकारांचा जाच इतका झाला होता की आमच्या कुटुंबीयांना अमरावतीमध्ये आश्रय घ्यावा लागला होता. माझ्या ओळखीतील सात-आठ कुटुंब विशेषतः हैदराबाद मुक्तिसंग्रामात भाग घेणाऱ्या कार्यकर्त्यांची बायका मुलं दुसऱ्या राज्यात आश्रयासाठी गेली होती."
"आम्ही ऑगस्ट 1946 ला घर सोडलं होतं आणि अमरावतीतील वलगाव या ठिकाणी राहिलो होतो. जेव्हा मराठवाडा स्वतंत्र झाला तेव्हा आम्ही परतलो. त्यावेळी माझं वय 9 वर्षं होतं. 15 ऑगस्ट 1947 ला परभणीत काय वातावरण असेल याची मला कल्पना करता येणे देखील कठीण आहे," उमरीकर सांगतात.
भारताचे झेंडे रझाकारांनी ओरबाडून काढले
15 ऑगस्ट 1947 ला परभणीत वातावरण कसं होतं याचा संदर्भ अनंत भालेराव यांच्या 'हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा' या पुस्तकात आहे.
15 ऑगस्ट रोजी परभणीच्या पोस्ट ऑफिसवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिरंगा लावला होता. इत्तेहाद मुसलमीन आणि रझाकारांच्या नेतृत्वात हजारो जणांचा समुदाय पोस्ट ऑफिसवर चालून गेला. मजलिसचे संघटक जलील अहमद यांनी तिरंगा काढला आणि त्या जागी निजामाचा पिवळा झेंडा लावला आणि अत्यंत विखारी भाषण केले.
फक्त परभणीच नाही तर लातूर, औरंगाबाद, उस्मानाबाद या ठिकाणी असलेले झेंडे उतरवण्यात आले होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम येथे झेंड्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
इत्तेहादची ही प्रतिक्रिया उत्स्फूर्त नव्हती तर त्यांनी हे ठरवून केलं होतं असं याची साक्ष हा गुलबर्गा स्टेशनचा प्रसंग देतो. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री मुंबई-मद्रास एक्सप्रेस गुलबर्गा स्टेशनवर पोहोचली. भारतीय स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी ही गाडी झेंड्यांनी सजवली गेली होती.
गाडी थांबताच क्षणार्धात रझाकारांनी इंजिन आणि डब्यांना लावलेले झेंडे अक्षरशः ओरबडून काढले त्याच्या चिंध्या केल्या. हे काम आपलं नाही तर रझाकारांचं होतं, असं निजामाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हटलं होतं पण निजामाचे पोलीस यावेळी बघ्याची भूमिका घेत होते. त्यांच्या डोळ्यादेखत भारताच्या तिरंगाच्या चिंधड्या केल्या जात होत्या.
प्रभातफेऱ्या आणि लाठीहल्ले
भारतीय स्वातंत्र्य चळवळीबरोबरच हैदराबादच्या स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली होती. पण या चळवळीने शिखर गाठलं ते भारताचा स्वातंत्र्य दिन जवळ आल्यावर आणि तेव्हापासून ती चळवळ वाढतच गेली. जेव्हा हैदराबादला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाच ही चळवळ थांबली.
औरंगाबाद शहरावर निजामाची करडी नजर होती. 15 ऑगस्टच काय त्याआधी सुद्धा लोकांना काही जल्लोष साजरा करता येणार नाही याची खबरदारी म्हणून निजामाने जागोजागी पोलीस आणि घोडेस्वार तैनात केले होते. रझाकारांची फौजही त्यांच्या हाताशी होती. औरंगाबादला छावणीचं स्वरूप आलं होतं.

भारतीय एकता दिन म्हणजे सात ऑगस्टला काँग्रेसने एक प्रभात फेरी काढण्याचं ठरवलं. या प्रभातफेरीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. तिरंगा ध्वज आणि भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषात ही प्रभातफेरी चालू लागली. ही प्रभातफेरी पाहताच रझाकारांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली.
प्रभातफेरीमध्ये समोर विद्यार्थी होते. त्यांच्यावर लाठीहल्ला करण्यात आला. हा लाठीहल्ला विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी नव्हता तर त्यांना लक्ष्य करून नामोहरम करण्यासाठी होता. कारण पळणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाठलाग करून त्यांना चोप देण्यात आला होता. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी मात्र पोलिसांचा प्रतिकार केला. त्यांच्यात आणि पोलिसांत जबर मारहाण झाली. पोलिसांनी अनेकांना अटक केली आणि तुरुंगात डांबून ठेवलं.
आंदोलनात सहभाग घेतल्याची किंमत अनेकांना आपल्या शैक्षणिक वर्षाने चुकवावी लागली. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना निजाम सरकारने निलंबित केले. मग या विद्यार्थ्यांनी नागपूर येथील राष्ट्रीय शाळांमध्ये प्रवेश घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले.
त्याच दिवशी संध्याकाळी स्टेट काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सभासद माणिकचंद पहाडे यांची गुलमंडीवर सभा आयोजित करण्यात आली होती. पोलिसांनी गुलमंडीला चारी बाजूंनी वेढलं. कार्यकर्तेच काय मुंगीला जायला जागा मिळणार नाही असा बंदोबस्त त्यांनी केला होता. त्यांची नजर चुकवून पहाडे गुलमंडीमध्ये शिरले.
पोलिसांना काही कळायच्या आत हजारोंच्या संख्येनी जनसमुदाय तिथे पोहोचला आणि पहाडेंची सभा सुरू झाली. पहाडेंच्या हातात तिरंगा होता. पोलीस गर्दी हटवत हटवत पहाडेंपर्यंत पोहोचले आणि त्यांनी पहाडेंना काठ्या, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि नंतर अटक केली.
14 ऑगस्टची रात्र आणि लोकांच्या उत्साहाला भरती
14 ऑगस्टच्या रात्रीपासूनच देशभरात स्वातंत्र्याच्या आगमनाचा जल्लोष सुरू होता. जिथं-जिथं रेडिओ होते तिथे लोक गर्दी करून प्राण कानाशी आणून राष्ट्रीय नेत्यांची भाषणं ऐकत होते. 14 ऑगस्टच्या रात्री बराच वेळ स्वामीजी जागेच होते. जर ध्वज फडवण्याआधीच अटक झाली तर काय करायचं ही योजना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनी सांगितली होती.
15 ऑगस्टच्या दिवशी हैदराबादमध्ये उत्साहाचे वातावरण होते. एकीकडे निजामाच्या पोलिसांचा कडक पहारा पण दुसरीकडे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. याचे कारण म्हणजे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ हे हैदराबादेतच होते आणि या दिवशी आपण ध्वजारोहण करणार असे त्यांनी आधीच सांगून ठेवलेले होते.

एकदा दिल्लीला गेले असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वामीजींनी एक तिरंगा दिला होता. हाच तिरंगा 15 ऑगस्ट रोजी फडकावण्याच्या उद्देशाने स्वामीजी घराबाहेर पडले होते. हा तिरंगा खांद्यावर घेऊन त्यांनी स्वातंत्र्य दिनाची मिरवणूक काढली. त्यांच्याबरोबर डॉ. मेलकोटे आणि कृष्णाचार्य जोशी हे कार्यकर्ते होते.
हैदराबाद येथील सुलतान बाजारात आलेल्या हजारोंच्या जनसमुदायाला त्यांनी म्हटलं, "आज आपले देशबांधव स्वतंत्र लोकशाहीप्रधान हिंदुस्थानचे नागरिक म्हणून आनंदाचा सोहळा साजरा करीत आहेत. त्यांच्या त्या आनंदात आपण इच्छेप्रमाणे भाग घेऊ शकत नाहीत हे आपले दुर्भाग्य आहे. आपण (हैदराबादचे लोक) अद्यापही बेबंद आणि एकतंत्री राजवटी खाली भरडले जात आहोत. तथापी त्या नागरिकांच्या (हैदराबाद संस्थान वगळता ) ज्या भावना आहेत त्याच आमच्याही भावना आहेत."
त्यानंतर त्यांना अटक झाली आणि त्यांची रवानगी चंचलगुडा तुरुंगात करण्यात आली.
भारताचा झेंडा फडकवण्याची शिक्षा तीन वर्षं
15 ऑगस्टपासून हैदराबादेतील वातावरण देशभक्तीच्या रसात न्हाऊन गेले. हजारोंच्या संख्येनी विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले. विद्यार्थी संघाच्या कार्यालयावर झेंडा उभारण्यात आला. या ठिकाणी रफी अहमद नावाच्या एका विद्यार्थ्याने देशभक्तीपर भाषण केले होते. त्यावेळी 8 हजारांहून अधिक विद्यार्थी तिथे जमा झाले होते.

नंतर या विद्यार्थ्यांची मिरवणूक निघाली आणि ते सुल्तान बाजारात आले. स्वामी रामानंद तीर्थांचे घर सुल्तान बाजारातच होते. ते तुरुंगात असताना विद्यार्थी तिथे जमले आणि 'भारत माता की जय'च्या घोषणा देऊ लागले. पोलिसांना ही गर्दी आवरता आवरत नव्हती.
हैदराबाद संरक्षण नियमाच्या 58 व्या कलमानुसार राष्ट्रध्वज फडकावणाऱ्याला तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली होती पण अनेकांनी हा नियम धाब्यावर बसवला.
स्वातंत्र्याचा उत्सव साजरा न करण्यापेक्षा अनेकांनी तीन वर्षांची शिक्षा पसंद केली. अर्थात ही शिक्षा त्यांना पूर्ण भोगावी लागली नाही कारण त्याआधीच निजाम शरण गेला होता आणि 1948मध्ये या स्वातंत्र्यसैनिकांची सुटका झाली.
य. दि. फडकेंच्या विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या पाचव्या खंडात सांगितलं आहे की, देवीसिंग चौहान, श्रीनिवास अहंकारी, श्रीनिवास मुगळीकर, राजेश्वरकर, दिगंबरराव पोतदार आणि शंकरराव कार्लेकर यांना ध्वजारोहणाची शिक्षा ठोठवण्यात आली होती.
भारताचा तिरंगा हा स्वातंत्र्याचं प्रतीक बनला होता. जनतेच्या या इच्छेसमोर निजाम झुकणारा नव्हता. 14 ऑगस्ट रोजी मीर उस्मान अलींनी भाषण केले होते. त्यात आपले मनसुबे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. हिंदुस्तानातून इंग्रज जेव्हा जातील तेव्हा मी स्वतंत्र आणि सार्वभौम बनेन. भारत आणि पाकिस्तान ही नव्याने कायम होणारी दोन राष्ट्रे कोणताही निर्णय घेवोत मी मात्र हैदराबादला ब्रिटिश राष्ट्रकुटुंबामध्येच ठेवीन.
निजामाचा निर्धार आणि जनतेचा संकल्प
एकीकडे निजामाचा निर्धार तर दुसरीकडे स्वातंत्र्यासाठी आसुसलेल्या लाखो लोकांचा संकल्प अशी लढत तेव्हा जुंपली. यावर भारताच्या सरकारचं लक्ष नव्हतं असं नाही.
केंद्र सरकारच्या निजामाबरोबर वाटाघाटी सुरू होत्या पण निश्चित तोडगा निघत नव्हता. त्यात कित्येक महिने निघून गेले. लोकांच्या इच्छेकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला सरदार वल्लभभाई पटेलांनी निजामाला दिला होता. पण त्याने त्याकडे कानाडोळा केला.
11 नोव्हेंबर 1947 रोजी प्रसिद्ध झालेल्या 'न्यू इंडियन एक्सप्रेस'च्या अंकात सरदार वल्लभभाई पटेलांचे उद्गार देण्यात आले आहेत. सरदार वल्लभभाई पटेल तेव्हा म्हणाले होते जर निजाम लोकांच्या भावना पायदळी तुडवणार असेल तर त्याचा विनाश अटळ आहे.

फोटो स्रोत, New inddian express archives
मीर उस्मान अलींनी सरदार पटेलांची ही सूचना गांभीर्याने घेतली नाही. त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला. 1948 मध्ये सरदार वल्लभभाई पटेलांनी पोलीस अॅक्शन घेतली.
109 तासांमध्ये त्यांनी निजाम, इत्तेहाद आणि रजाकारांच्या फौजेला गुडघे टेकायला भाग पाडले. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद स्वतंत्र झाला. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ आणि इतर नेत्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली.
हैदराबाद संस्थानातील लोकांना स्वातंत्र्य 13 महिने उशिरा जरी मिळालं तरी 15 ऑगस्ट 1947चं महत्त्व किंचितही कमी होत नाही. कारण या दिवसापासूनच हैदराबाद संस्थानातील लोकांच्या मनात निजामाविरुद्ध लढण्याची उमेद कैकपटींनी वाढली होती.
(संदर्भ आणि अधिक वाचनासाठी उपयोगी पुस्तके - हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा- अनंत भालेराव, पेटलेले दिवस - अनंत भालेराव, कर्मयोगी संन्यासी - स्वामी रामानंद तीर्थांचे चरित्र - नरेंद्र चपळगावकर, विसाव्या शतकातील महाराष्ट्र, खंड 5 वा- य. दि. फडके)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









