'या' धार्मिक पंथामध्ये कितीही लग्न करता येतात, पण दारू आणि कॉफी पिता येत नाही

फोटो स्रोत, Public domain
- Author, अॅडिसन वेगा
- Role, बीबीसी न्यूज ब्राझील
चर्च ऑफ जिझस ख्राइस्ट ऑफ लॅटर-डे सेंट्स (चर्च ऑफ मॉर्मन्स नावानं ओळखल्या जाणाऱ्या संघटनेचे अधिकृत नाव) द्वारे वाटप करण्यात आलेल्या एका पॅम्फलेटमध्ये जोसेफ स्मिथ (1805-1844) यांना "ईश्वराचे दूत" संबोधण्यात आलं आहे.
यात एका सुंदर आणि खास शैलीचे कपडे परिधान केलेल्या व्यक्तीचा फोटो आहे. त्याच्या डोक्यावरील केस पांढरे आणि काहीसे तपकिरी असून डोळे निळे आणि चेहऱ्यावर अहंकारी भाव दिसत आहेत.
पण वरमोंट येथील एका शेतकऱ्याच्या या मुलानं 19 व्या शतकात अमेरिकेत एक नवीन ख्रिश्चन चर्चची सुरुवात कशी केली? अभ्यासकांच्या मते, स्मिथ यांच्या अनोख्या दृष्टीकोनाशिवाय यात अमेरिकेच्या संदर्भाचीही मदत झाली.
"मॉर्मोनिझम हे 19 व्या शतकातील अमेरिकेतील एक 'विशिष्ट उत्पादन' आहे," असं मत साओ पाउलोमधील मॅकेन्झी प्रेस्बिटेरियन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक, इतिहासकार, तत्ववेत्ते आणि धर्मशास्त्री लेइट डी मोरेस यांनी बीबीसीबरोबर बोलताना व्यक्त केलं.
"आज पंथ म्हणून वर्गीकरण करण्यात आलेले अनेक धार्मिक समूह त्यावेळी निर्माण झाले होते. फरक फक्त एवढा होता की, ज्या चर्चची स्थापना स्मिथ यांनी केली ते अधिक शक्तिशाली बनलं आणि संपूर्ण जगात त्याचा प्रसार झाला."
चर्चद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या ताज्या रिपोर्टनुसार 2022 च्या अखेरीपर्यंत जगभरात त्यांचे 17 लाख अनुयायी होते. त्यात अमेरिका, मॅक्सिको आणि ब्राझीलमध्ये मॉर्मनची संख्या सर्वात जास्त होती.
मॉर्मोनिझमला 'सर्वोत्कृष्ट अमेरिकन निर्मिती' म्हणताना मोरेस यांनी एक तर्क दिला की, "हा एक प्रकारचा संयुक्त विश्वास आहे. एक असा धर्म ज्यात ख्रिश्चन धर्म, ज्यू धर्म आणि इस्लाम तसंच प्राचीन मूर्तीपूजेच्या तत्वांचाही समावेश आहे.
"आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे याची परिवर्तनशीलता. काळाबरोबर यात बदल झाला आहे. काही गोष्टी सोडून देण्यात आल्या तर काही बदलल्या कारण त्यांचा काहीच परिणाम नव्हता. तर काही गोष्टींना नवा अर्थ देण्यात आला आणि नंतर त्यांची वेगळी व्याख्या तयार करण्यात आली."
'भ्रष्ट धर्म'
जोसेफ स्मिथ किशोरवयीन होते तेव्हा त्यांनी खूप प्रार्थना केली आणि तेव्हाच सर्वकाही सुरू झालं.
मॉर्मोनिझमच्या अधिकृत माहितीनुसार स्मिथ यांनी 14 वर्षाच्या वयात देवाला, कोणत्या चर्चमध्ये सहभागी व्हायला हवं, असं विचारलं.
त्यांनी स्वतः केलेल्या वर्णनानुसार, "ते मोठ्या आंदोलनांचे दिवस होते," त्यात त्यांचं मन "सखोल विचार आणि चिंतनाचं कारण ठरलं."
चर्च ऑफ जिझस ख्राइस्ट ऑफ लॅटर-डे सेंट्सच्या ऐतिहासिक संशोधन आणि आऊटरीच विभागाचे संचालक अमेरिकन इतिहासकार कीथ एरिकसन म्हणाले की, "स्मिथ 19व्या शतकाच्या सुरुवातीला एक तरुण व्यक्ती होते. त्यांनी मोठ्या प्रमाणावर बायबलचा अभ्यास केला. त्यानंतर ईश्वराची इच्छा होती, तसे ते जगत आहेत का, याची त्यांना चिंता होती. 1920 मध्ये त्यांनी ईश्वराकडे क्षमा आणि मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली.
त्यावर स्मिथ यांना ईश्वराकडू प्रतिसाद मिळाला, असं म्हटलं जातं.
एरिकसन यांच्या मते, "दिव्य ईश्वर आणि त्यांचे पुत्र येशू हे स्मिथ यांना दिसले. येशू जोसेफ स्मिथ यांना म्हणाले की, तुमचे पापक्षालन झाले आहे आणि काय करायचे आहे, हे तुम्हाला नंतर कळेल."

फोटो स्रोत, Getty Images
स्मिथ यांच्या वर्णनानुसार, "मी हवेत दोन आकृती तरंगताना पाहिल्या. त्यांचं वैभव शब्दांत वर्णन करणं शक्य नाही. त्यांच्यापैकी एकानं मला नावानं बोलावलं. माझ्याशी बोलले आणि दुसऱ्याकडं इशारा करत म्हटलं, हा माझा लाडका मुलगा आहे. त्याचं म्हणणं ऐक."
प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी लिहिलं की, "आजकालचे सर्व चर्च चुकीचे आहेत. त्यामुळं मी त्यात सहभागी होऊ नये, असं मला सांगण्यात आलं."
स्मिथ यांनी कदाचित येशूकडून ऐकलं असेल की, सर्व संप्रदाय 'तिरस्कारित' आणि धर्माबरोबर 'भ्रष्ट' होते.
एक नवं गूढ
एरिकसन यांच्या म्हणण्यानुसार स्मिथ कुटुंब 11 मुले असलेलं धार्मिक कुटुंब होतं.
ते म्हणाले की, "ते नियमितपणे बायबल वाचायचे. शक्य होईल तेव्हा प्रचारकांचे उपदेश ऐकण्यासाठी विविध चर्च आणि सार्वजनिक सभांमध्ये जायचे. जोसेफ यांची आई आणि त्यांचे तीन भाऊ प्रेस्बिटेरियन चर्चमध्ये सहभागी झाले. नंतर जोसेफ यांनी त्यांचं चर्च स्थापन केल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य त्यात सहभागी झाले."
स्मिथ यांच्या विचारांची माहिती पसरताच त्यांना छळ आणि पूर्वग्रहांचा सामना करावा लागला. विशेषतः इतर चर्चच्या सदस्यांकडून त्यांना त्रास झाला. त्यांच्याच लिखाणानुसार त्यांना तीन वर्षांनंतर सप्टेंबर 1823 एक गूढ उमगलं. त्यावेळी त्यांनी मोरोनी नावाचे एक देवदूत पाहिले.
स्मिथ यांच्या मते, "त्यांनी मला सांगितलं की, सोन्याच्या पत्र्यांवर एक गोपनीय पुस्तक लिहिलं होतं. त्यात या खंडावरील प्राचीन रहिवासी आणि त्यांच्या उत्पत्तीबाबत माहिती आहे. यात जगाचा उद्धार करणाऱ्यानं प्राचीन रहिवाशांना जे ज्ञान दिलं होतं, त्याचीही संपूर्ण कथा आहे," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Edison Veiga
देवदूतानं त्यांना सांगितलं की, तुम्हाला पुस्तकांच्या शेजारी चांदीच्या अंगठ्यांमध्ये दोन दगड मिळतील. "प्राचीन ऋषिंकडे ते दगड होते आणि ते त्याचा वापर करायचे. ईश्वरानं त्यांना या पुस्काच्या अनुवादासाठीच बनवलं आहे."
स्मिथ यांच्या मते, सोन्याच्या प्लेट कोणालाही दाखवायच्या नाही, असं त्यांना सांगण्यात आलं.
तरुणाचं मार्गदर्शन करण्यासाठी सलग चार वर्षांपर्यंत दरवर्षी एक देवदूत येईल. तेव्हा स्मिथला न्यूयॉर्कच्या मँचेस्टर शहराच्या जवळ एका डोंगरावर पुस्तक मिळेल.
ते म्हणाले," त्या प्लेट डोंगराच्या पश्चिमेकडे असलेल्या शिखराच्या जवळ एका दगडाखाली एका दगडाच्या डब्यात ठेवलेल्या होत्या."
पवित्र पुस्तक
हे मॉर्मनचं पुस्तक होतं. त्याला 'मॉर्मनचं पुस्तक' म्हटलं जातं. कारण, मॉर्मन नावाच्या एका प्राचीन भविष्यवक्त्यानं हे पुस्तक संपादित केलं होतं. त्यामुळं हे नाव त्या धर्माच्या अनुयायांमध्ये लोकप्रिय झालं. स्मिथ यांनी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला. स्मिथ यांच्यानुसार मूळ पुस्तक रिफॉर्म्ड इजिप्शियन भाषेत लिहिण्यात आलं होतं.
एरिकसन म्हणाले, "हे पुस्तक मध्य पूर्वेतील एका समुहाची कहाणी सांगतं. ते येशूच्या जन्माच्या 600 वर्षांपूर्वी अमेरिकेत पोहोचले होते."
येशू पुनर्जन्मानंतर अमेरिकेत या लोकांसमोर प्रकट झाले, आणि पुस्तक पश्चिम गोलार्धातील त्यांच्या धर्माचं वर्णन करतं.
पुस्तकातील मूलभूत संकल्पना जपल्या गेल्या नाहीत, असंही म्हटलं गेलं. स्मिथ यांच्या मते, अनुवादाचं काम पूर्ण झाल्यानंतर प्लोटो पुन्हा अंतराळात गेला.
चर्चचे अनुयायी या पुस्तकाला एक प्रकारचे 'थर्ड टेस्टामेंट' मानतात. ती जुन्या आणि नव्या टेस्टामेंटची सुधारीत आवृत्ती आहे.
मोरेस यांच्या मते, "त्यामुळं एखादं महान गूढ उकलल्यासारखा अधिकार प्राप्त होतो. जुन्या बायबलमध्ये जे सांगण्यात आलं आहे, त्याला पूरक आणि संशोधित करतं."

फोटो स्रोत, Edison Veiga
"व्यवहारामध्ये त्यांच्यासाठी मॉर्मनचं पुस्तक बायबलमधील सर्वोत्तम दस्तऐवज आहे."
साओ पाउलोच्या मेथोडिस्ट युनिव्हर्सिटीच्या धार्मिक विज्ञानचे डॉक्टर, इतिहासकार, धर्मशास्त्री, नाझरीन चर्चचे पादरी आणि नाझरीन थियोलॉजिकल सेमिनरी आणि ब्राझीलचे फ्री बाप्टिस्ट सेमिनरीचे प्राध्यापक असलेले विनिसियस कुटो हे याच्याशी सहमत आहेत.
ते म्हणाले, "असं मानलं जातं की, यात इतर दोन नियमांबरोबर सातत्य आहे. ते ख्रिश्चन बायबलला सर्वात महत्त्वाचं पुस्तक मानतात. पण मॉर्मनच्या पुस्तकाला ते सर्वात प्रगत आणि उपयुक्त मानतात."
"जेव्हा मॉर्मन आणि ख्रिश्चन बायबल यांच्यात संघर्ष होतो, तेव्हा ते बायबलला मागं सोडतं. मॉर्मनच्या पुस्तकाचा त्यांचा अनुवाद आधुनिक, अद्ययावत आणि स्पष्ट आहेत.
कॉफी आणि दारु हराम नाही?

फोटो स्रोत, Getty Images
या आधुनिकीकरणाचे एक सरळ उदाहरण मादक पदार्थांच्या सेवनासंबंधी आहे. जर येशूनं मद्यपान केलं होतं आणि त्यांचं अखेरचं भोजन दारु आणि ब्रेड होतं तर मग बायबल मद्यावर पूर्णपणे बंदी कशी योग्य ठरवू शकतं?
मॉर्मन चर्चच्या एका सदस्यानुसार "आपल्याला वर्तमान काळाच्या बाबत विचार करावा लागेल. आज आम्हाला समजलं की, मद्यपान किती हानिकारक आहे."
कॉफीच्या बाबतीतही तेच सत्य आहे. स्मिथ यांनी 27 जानेवारी 1833 च्या एका आदेशाचा हवाला देताना लिहिलं की, "मद्य, स्ट्राँग ड्रिंक, तंबाकू आणि गरम पेय याचा वापर निंदनीय आहे."
मॉर्मनच्या व्याख्येनुसार यात कॉफीचाही समावेश आहे.
एरिकसन यांच्या मते, "वर्तमान आज्ञा लोकांना त्यांच्या भौतिक शरिराची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहीत करते. म्हणजे त्यांना आरोग्य आणि ज्ञान असे अध्यात्मिक पुरस्कार मिळवता येतील."
"अशा प्रकारे काही काही आदेश आरोग्यासाठी फायदेशीर गोष्टींवर जोर देतात. त्यात फळं, धान्यांचा आहार आणि मद्य, तंबाखू आणि गरम पेय यासह आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या अनेक खाद्य पदार्थांना वर्ज्य ठरवते. चर्चचे सदस्य 1840 च्या दशकापासून कॉफी आणि काळ्या चहासाठी 'हॉट ड्रिंक' शब्दाचा वापर करतात.
बहुपत्नित्व परंपरेस मान्यता
या धार्मिक समूहाशी संबंधित सर्वात वादग्रस्त परंपरा बहुपत्नित्व ही आहे. पण, चर्च आता भूतकाळातील या परंपरेचं पालन करत नाही. (याच्या अधिकृत वेबसाइटनुसार एकापेक्षा अधिक विवाह करणाऱ्यांना बहिष्कृत करण्याचा नियम 1904 पासून लागू आहे.)
जोसेफ स्मिथ यांच्या जवळपास 40 पत्नी होत्या, असा चरित्र लेखकांचा दावा आहे.
एका अधिकृत माहितीत असं म्हटलं आहे की, "1852 पासून 1890 पर्यंत लॅटर-डे संतांनी थेटपणे बहुपत्नित्वाचा अभ्यास केला. त्यापैकी बहुतांश यूटामध्ये राहत होते. या परंपरेचं पालन करणारे बहुतांश पुरुष आणि महिला आव्हानं आणि अडचणींचा सामना करतात. पण त्यांना कुटुंबांमध्ये प्रेम आणि आनंदही मिळतो.
"हा ईश्वराचा आदेश होता आणि त्याचं पालन केल्यानं त्यांना आणि त्यांच्या वंशजांना ईश्वराचा आशीर्वाद मिळेल असं त्यांचं मत होतं. चर्चच्या नेत्यांनी उपदेश दिला की, बहुपत्नी संबंध असलेल्या सर्वांनी निस्वार्थपणाची उदार भावना आणि येशूसाठी शुद्ध प्रेम विकसित करण्याचा प्रयत्न करायला हवा.
एरिकसन यांनी एका गैरसमजाचा उल्लेख करताना म्हटलं की, "खूप लोकांचं असं मत होतं की, बहुपत्नित्व हीच या चर्चची ओळख होती."
"जोसेफ स्मिथ यांनी त्यांच्या जीवनातील अंतिम वर्षांमध्ये त्यांच्या जवळच्या लोकांच्या एका छोट्या समुहाला एका व्यक्तीद्वारे बहुपत्नित्वाची प्रथा सुरू करण्याचा ईश्वराचा आदेश दिला," असा उल्लेख त्यांनी केला.

फोटो स्रोत, Getty images
ते म्हणाले की, बायबलमध्ये अनेक देवदुतांनी या प्रथेचं पालन केलं. यात मुसा, इब्राहीम आणि जॅकब किंवा इस्रायल यांचा समावेश होता. ही प्रथा त्यांच्या मृत्यूनंतर सुरू करण्यात आली आणि सुमारे 50 वर्षे लागू राहिली. पण 1904 नंतर एका व्यक्तीनं बहुपत्निच्वाच्या प्रथेवर बंदी लावली.
याची अनेक सामाजिक-ऐतिहासिक कारण होती. त्यांना नव्या भूमीसाठी अधिक मुलं जन्माला घालायची इच्छा होती. त्यावेळी महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक होती.
पण बहुपत्नित्व प्रथा चर्च ऑफ जीसस क्राइस्ट ऑफ लॅटर-डे सेंट्सच्या सदस्यांसाठी एक मोठी समस्या बनली. विशेषतः 1862 नंतर. त्यावेळी अमेरिकेच्या संसदेनं याविरोधात कायदा मंजूर केला होता.
बहुपत्नीत्व परंपरेसंबंधी पुरुष आणि महिलांवर खटला दाखल करण्यास 1880 च्या दशकात सुरुवात झाली होती.
सरकारी अधिकाऱ्यांनी या धार्मिक लोकांना त्यांच्या चर्चवर जप्ती आणण्याची धमकी दिली. कारण कायद्यात दोषींची संपत्ती जप्त करण्याची तरतूद होती. चर्च ऑफ जीसस क्राइस्ट ऑफ लॅटर-डे सेंट्स द्वारे बहुविवाहाची परंपरा समाप्त करण्यासाठी 1890 च्या दशकात सुरू करण्यात आलेल्या एका आंदोलनानं 1904 मध्ये ठोस आकार घेतला.
धार्मिक असहिष्णुता
चला पुन्हा एकदा स्मिथ यांच्या कहाणीकडं येऊया. 1830 मध्ये पहिल्या साक्षात्काराच्या दहा वर्षांनंतर एका नवीन ख्रिश्चन संप्रदायाचा जन्म झाला.
एरिकसन यांच्या मते, "जोसेफ स्मिथ यांनी ईश्वराच्या आदेशानं एका नव्या चर्चची स्थापना केली. त्याला आता चर्च ऑफ जीसस क्राइस्ट ऑफ लॅटर-डे सेंट्सच्या नावानं ओळखलं जातं."
तोपर्यंत स्मिथ यांनी त्यांच्या पहिल्या पत्नी एम्मा हेल स्मिथ यांच्याशी लग्न केलं होतं आणि तिच्याबरोबर पेन्सिल्व्हेनिया (आताचे हॉकलंड) मधील हार्मनी मध्ये राहत होते. चर्चला सुरुवातीपासूनच छळाचा सामना करावा लागला यात काही शंका नाही. परिणामी संस्थापक म्हणून स्मिथ त्यांचे मुख्य लक्ष्य ठरले.
सामाजिक अव्यवस्था पसरवल्याच्या आरोपात त्यांना अनेकदा अटक करण्यात आली होती. त्यामुळं त्यांना अनेक शहरांमध्ये राहावं लागलं. त्यांनी प्रत्येकवेळी नवीन अनुयायांना दीक्षा दिली आणि त्यांच्या चर्चसाठी नवी केंद्रं सुरू केली.
स्मिथ यांच्यावर 25 जून 1844 ला देशद्रोहाच्या आरोपात खटला चालवण्यात आला. पुन्हा एकदा त्यांना अटक करण्यात आली. त्यांना कार्टागो तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. दोन दिवसांनंतर एका सशस्त्र गर्दीनं कार्टागो तुरुंगावर हल्लाबोल केला. स्मिथ यांनी तुरुंगाच्या खिडकीतून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला, पण सुरक्षा रक्षकांनी त्यांना गोळी घालत ठार केलं.
त्यांच्या मृत्यूचं वर्णन करताना स्थानिक वृत्तपत्रांनी त्यांना कट्टर ठरवलं, पण मॉर्मन समुदाय त्यांना शहीद मानू लागला आणि त्यामुळं चर्च ऑफ जीसस क्राइस्ट ऑफ लॅटर-डे सेंट्सच्या प्रगतीला वेग आला.
मोरेस यांच्या मते, "चर्चच्या स्थापनेबाबत अनेक वाद आहेत. याच्या संपूर्ण इतिहासात एक तथ्य आहे. ते म्हणजे कोणतंही मूळ पुस्तक पाहण्यात आलेलं नाही. पण स्मिथ यांनी अत्यंत पवित्र जीवन जगलं आणि एका नव्या चर्चची स्थापना केली. अनेक अडथळ्यांनंतरही अनेक लोक अखेरपर्यंत यात सहभागी होत गेले."

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर चर्चच्या नेतृत्ववाची जबाबदारी ब्रिघम यंग यांच्याकडं गेली. त्यांनी अमेरिकेच्या पश्चिम भागात एका प्रवासाद्वारे मॉर्मनचं नेतृत्व केलं.
चर्चच्या सदस्यांनी अखेर सॉल्ट लेक सिटीची स्थापना केली आणि यूटा राज्यात स्थायिक झाले. त्याठिकाणी बहुतांश अनुयायी राहतात आणि चर्चही मुख्यालयही त्याठिकाणीच आहे.
मोरेस यांच्या मते, "रंजक बाब म्हणजे, संपूर्ण प्रक्रिया लोकांची ओळख निर्माण करण्याची कहाणी आहे. स्वतःच्या धर्माचं पालन करण्यासाठी त्रास देण्यात आलेल्या एका अशा समुहाची कहाणी ज्यांनी एक अनोखी भूमी तयार केली.
मोरेस म्हणाले, "त्या लोकांनी महान अग्रदुतांसारखं काम केलं आहे."
"ते प्रामाणिक आणि मेहनती आहेत. ते त्यांच्या उत्पन्नाचा दहावा भाग धर्मासाठी दान करतात. समृद्धी दृढतेतून प्रकट झाली आणि त्यांनी ती चांगल्या गोष्टीसाठी कामी येईल याची खात्री केली. ते जे योग्य आहे तेच करत होते आणि त्यांना ईश्वराची मंजुरी मिळत होती."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








