आंतरधर्मीय विवाह कुटुंबीयांनी स्वीकारावा यासाठी या जोडप्याला काय करावे लागले?

- Author, मानसी देशपांडे,
- Role, बीबीसी मराठीसाठी
नुकताच आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीवरून महाराष्ट्रात गदारोळ झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर एका आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्याचे अनुभव समजून घेण्याचा बीबीसी मराठीने प्रयत्न केला.
संयोगिता भोसले आणि प्रदीप भोसले यांच्या लग्नाला याच डिसेंबर महिन्यात सात वर्ष पूर्ण होतील. दोन मुलींसोबत त्यांच्या कुटुंबाचा चौकोन पूर्ण झाला आहे. आम्ही आनंदात आहोत हे ते दोघंही ठामपणे सांगतात.
पण एकमेकांना भेटल्यावर मैत्री होणं, मैत्रीचं रूपांतर प्रेमात होणं आणि त्यानंतर एकमेकांशीच लग्न करण्याचा निर्णय घेणं या गोष्टी ज्या सहजतेनं घडल्या त्याच्या विपरित त्यांचं लग्न होणं आणि एकत्र राहायला सुरुवात करण्यामध्ये एकदम 'ड्रामा' होता.
त्याचं कारण म्हणजे की त्या दोघांचेही धर्म वेगळे होते आणि यामुळे संयोगिताच्या घरुन त्यांच्या नात्याला तीव्र विरोध होता.
“मी जैन समाजातली, तर प्रदीप बौद्ध धर्माचा. यामुळे आमचं लग्न माझ्या घरी मान्य होणारच नव्हतं. आम्ही कालेजमध्ये शिकत असताना एका चित्रप्रदर्शनात आमची ओळख झाली.
जेव्हा माझ्या घरी कळलं की प्रदीपची आणि माझी मैत्री आहे तर त्यांनी तेव्हाच विरोध केला. तेव्हा तर आमची फक्त मैत्रीच होती. पुढचा कुठलाही विचार नव्हता.
तरी माझ्या घरच्यांनी सांगितलं की त्याच्याशी मैत्री ठेऊ नकोस. आपल्याच जातीतल्या मुलाशी मैत्री कर. पण जात बघून मैत्री होऊ शकते का?” संयोगिताने सांगितलं.
संयोगिता पुणे शहरातल्या पेठांमध्ये वाढली. तर प्रदीप पुणे शहराजवळच्या वेळू गावात राहणारा. संयोगिताचं शिक्षण तिच्या घराजवळच असणाऱ्या शाळा-कॉलेजातून झालं.
तर प्रदीपने गावातून बसमधून अपडाऊन करत फर्ग्युसन कॉलेजमधून एमसीए पूर्ण केलं. तो एमसीए करत असतानाच त्यांची ओळख झाली.
लग्नाच्या निर्णयापर्यंत आल्यावर तिच्या घरून होणारा विरोध कमी होणार नाही हे दोघांच्या लक्षात आलं आणि तिला स्थळं यायला सुरुवात झाल्यावर दोघांचंही टेन्शन वाढलं.
आपलं परस्पर लग्न तर लावून दिलं जाणार नाही ना, याचा ताण मनावर राहू लागल्याचं संयोगिताने सांगितलं.
“माझ्या समाजात मुलींची लवकर लग्न होतात. त्यामुळे माझ्या मनात भीती होती. यामुळे आम्ही ठरवलं की रजिस्टर लग्न करून ठेवायचं. जेणेकरुन जर माझ्या घरच्यांनी लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला तर त्याला विरोध करण्यासाठी माझ्याकडे काही आधार असेल.
"त्यामुळे आम्ही डिसेंबर 2015मध्ये रजिस्टर लग्न केलं आणि पुढचे अडीच वर्ष माझ्या किंवा प्रदीपच्या घरी काहीच सांगितलं नाही,” संयोगिताने सांगतिलं.

लग्न करूनही ती माहेरीच राहत होती
शिक्षण पूर्ण करुन नोकरी शोधणे, आपल्या कुटुंबालाही लग्नासाठी या नात्यासाठी तयार करणे ही आव्हानं प्रदीपसमोर होती.
त्यामुळे लग्न होऊनही अडीच वर्ष संयोगिता आणि प्रदीपने शांत राहणंच पसंत केलं लग्न झाल्यावरही ते आपल्या घरीच राहत होते. दोघांनीही ठरवलं होतं की जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा सहजीवनाची सुरुवात करायची.
“आमचं लग्न दोन पैकी एका घराने तरी स्वीकारणं आवश्यक होतं. या कसोटीवर मला माझ्या घरच्यांना तयार करणं तुलनेनं सोपं वाटलं. मी गावात राहतो. मला वडील नाहीत पण आजुबाजूला माझा मोठा चुलत परिवार राहतो.
"संयोगिताच्या घरी जास्त विरोध होता. त्यामुळे जेव्हा आम्ही एकत्र राहण्याचा विचार करू लागलो तेव्हा मी तिला माझ्या घरच्यांची मनाची तयारी करण्यासाठी वेळ मागितला,” असं प्रदीपने सांगितलं.
"दोन अडीच महिन्यांचा कालावधी घेऊन प्रदीपने हळूहळू त्याच्या घरामध्ये संयोगिताविषयी सांगायला सुरुवात केली. एक मैत्रीण म्हणून तिची घरच्यांशी ओळख करुन दिली."
"प्रदीपने सांगितलं की त्याच्या काही नातेवाईकांच्या लग्नसोहळ्यातही तो तिला घेऊन गेला. यामुळे कुतूहलापोटी जर कुणी विचारलं की, ‘तू हिच्याशी लग्न करणार आहेस का?’ तर त्याला तो ‘हो’ असं उत्तर देऊ लागला.

आमच्या नात्याला कुटुंबीयांनी कसं स्वीकारलं?
“यामुळे माझ्या घरच्यांना अंदाज आला आणि त्यांच्या मनाची तयारी झाली. आता सगळी परिस्थिती योग्य आहे हे बघून संयोगिताला मी घरी आणलं. त्यादिवशी माझ्या सगळ्या परिवाराने तिचं स्वागत केलं,” असं प्रदिपने सांगितलं.
कॉलेजमध्ये जातेय असं घरी सांगून आलेल्या संयोगिताच्या कुटुंबाला मात्र याची कल्पना नव्हती. “प्रदीपसोबत त्यांचं पूर्ण कुटुंब होतं. पण माझ्यासोबत मात्र फक्त प्रदीपवर असलेला विश्वास होता. त्या भरोशावर मी घरी आले. मधला अडीच वर्षांचा काळ माझ्यासाठी पण कठीण होता.
"मला भीती दाखवली जायची की, या तो कसा वाईट, मला गहाळ केलं जाऊ शकतं, किंवा फसवलंही जाऊ शकतं. मला तर घरचे बाबाजींकडे घेऊन गेले होते. त्यांनी सांगितलं की त्या मुलाचं आधीच एक लग्न झालेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमधून जाऊन आम्ही शेवटी एकत्र आलो,” संयोगिताने सांगितलं.
दुसऱ्या दिवशी संयोगिताच्या घरचे प्रदीपकडे आले. ते तिला परत नेण्यासाठी आले होते. तेव्हा तिने ठामपणे सांगितलं की, ती येणार नाही.
संयोगिता म्हणते की, पुढचं अख्खं वर्ष घरच्यांना हे पटवून देण्यात गेलं की, ती आनंदात आहे. तिची काळजी घेतली जातेय. ती व्यवस्थित आहे. जेव्हा तिच्या घरच्यांना हळूहळू ही खात्री पटली तेव्हा तिच्या आई बाबांनी तिच्या आणि प्रदीपच्या नात्याला स्वीकारायला सुरुवात केली.

संयोगिता आणि प्रदीप सारखे अनेक असे जोडपे आहेत ज्यांना प्रेमविवाह असल्याने घरच्यांच्या नाराजीला आणि विरोधाला सामोरं जावं लागतं. या विरोधामधून क्वचितप्रसंगी अनुचित घटना होतात.
प्रेमविवाह जर आंतरजातीय असेल तर विरोधाची धार अधिक तीव्र होते. काही घटना पोलिसांपर्यंत जातात आणि काही प्रकरणांत कोर्टालाही हस्तक्षेप करावा लागतो.
औरंगाबादचे अॅड. महेश भोसले प्रेमविवाह आणि आंतरजातीय विवाहासंबंधात केसेस हाताळतात. त्यांच्या सांगण्यानुसार बऱ्याच वेळा मुलाने किंवा मुलीने निवडीचं स्वातंत्र्य घेतलंय.
त्यामुळे घरच्यांचा इगो दुखावतो आणि कधी कधी दोघंही एकाच जातीचे असूनही घरुन विरोध होतो. जर आंतरजातीय लग्न असेल तर मग जातीचं एक कारण असतंच.
“आपल्या कायद्याप्रमाणे कोणत्याही दोन सज्ञान व्यक्ती लग्न करू शकतात. पण दोन सज्ञानांनी त्यांच्या मर्जीने केलेला विवाह समाज स्वीकारेलच याची काही खात्री नसते. बऱ्याच वेळा घरच्यांचा विरोध पत्करुन या जोडप्यांना राहावं लागतं,” असं महेश भोसले यांनी सांगितलं.

संघर्ष अनेक पातळीवर
घरच्यांचा विरोध पत्करुन लग्न करू इच्छिणाऱ्या जोडप्यांना काही सामाजिक संघटनांकडून मदतही केली जाते. पुण्यामध्ये अशीच राईट टू लव्ह नावाची एक संस्था आहे जी या जोडप्यांना मदत करते.
लग्न करताना जोडप्यांना येणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्यालाही ही संस्था मदत करते. राईट टू लव्हचे एडव्होकेट विकास शिंदे म्हणाले की, प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रेम करण्याचा जोडीदार निवडण्याचा मुलभूत अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे.
आपली जोडीदार निवडून तिच्यासोबतच लग्न करण्यासाठी रमेशलाही (विनंतीवरुन नाव बदलण्यात आले आहे) त्याच्या कुटूंबियांसोबत संघर्ष करावा लागला.
रमेश आणि त्याची पत्नी वर्षा (विनंतीवरुन नाव बदलण्यात आले आहे) यांचं तीन वर्षांच्या आधी लग्न झालं. पण त्यासाठी त्यांना घरच्यांच्या विरोधाला तोंड द्यावं लागलं.
“आमचं तर आंतरजातीय लग्न होतं आणि संस्कृतीही वेगळी होती. मी राजस्थानचा. ती महाराष्ट्रातली. त्यात जातीचाही फरक. त्यामुळे घरच्यांना समजावण्यात बराच वेळ गेला. त्यांना सगळ्या गोष्टी पटवून दिल्या. शेवटी ते तयार झाले आणि मग त्यांच्या उपस्थितीतच आम्ही लग्न केलं,” असं रमेशने सांगितलं.
एकीकडे प्रेमविवाह, आंतरजातीय विवाहांना विरोध करणारे असताना दुसरीकडे आपल्या मुलांची निवड सामंजस्याने स्विकारणारे पालकही आहेत. पुण्यात राहणारे कन्हैया पाटोळे यांना चार मुली आणि एक मुलगा आहे.
त्यांच्या तीन मुलींची लग्न झाली आहेत आणि त्यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केलेले आहेत. ते म्हणतात की मुलींना उत्तम शिक्षण दिलं पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या जोडीदाराच्या निवडीवर विश्वास ठेवला पाहिजे.
“माझ्या तीन पोरींनी आंतरजातीय विवाह केले आणि माझे तीनही जावई खूप चांगले आहेत. आम्ही समाधानी आहोत. कोणत्याही आई वडिलांना असंच वाटतं की आपली मुलं सुखी असावीत. चांगली राहावी.

'घरच्यांनी जोडीदार निवडून दिला तर सुखी आयुष्याची खात्री असते का'
त्या काळजीपोटीही ते कधी कधी त्यांनी निवडलेल्या जोडीदाराला विरोध करत असावेत. पण जातीत जरी लग्न केलं तरीही पोरं आनंदात राहतील कशावरुन? यापेक्षा त्यांना त्यांच्या आवडीनुसार निवड करू दिली तर ते जास्त योग्य ठरेल,” असं कन्हैय्या पाटोळे यांनी सांगितलं.
जातीत लग्न केल्यानेच सुखी वैवाहिक आयुष्याची शाश्वती मिळते का, असा प्रश्न संयोगिता भोसलेही उपस्थित करते.
“घरच्यांचा विरोध पत्करुनही प्रदीपसोबतच लग्न करण्याचा माझा निर्णय योग्य होता. त्याची जोडीदार म्हणून निवड करताना मी त्याचे विचार, स्वभाव आणि आमच्यात असलेल्या बॉंडिंगला जास्त महत्त्व दिलं.
फक्त जातीत लग्न केल्याने हे सगळं मिळालं असतं का? मला वाटतं की पालकांनी अरेंज मॅरेजसाठीही आंतरजातीय स्थळं बघायला हरकत नाही. कधी कधी एखाद्या मुलीच्या शिक्षण आणि नोकरीच्या योग्यतेचा मुलगा त्या जातीत मिळत नाही.
मग तिला तिच्यापेक्षा कमी योग्यतेच्या व्यक्तीसोबत संसार करायला लावण्यापेक्षा दुसऱ्या जातीतला सुयोग्य जोडीदार शोधायला काय हरकत आहे?,” असं संयोगिताने सांगितलं.
आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती वादात
नुकतंच धर्माबाहेर विवाह करणाऱ्या मुलींसदर्भात महाराष्ट्र सरकारनं स्थापन केलेली एक समिती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
राज्याचे महिला बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ‘आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह – परिवार समन्वय समिती’ची स्थापना केल्याचं सरकारनं जाहीर केलं आणि या वादाला सुरुवात झाली.
या समितीच्या नावात आंतरजातीय/आंतरधर्मीय असा उल्लेख होता. मात्र 15 डिसेंबर रोजी सरकारने नवीन सरकारी आदेश (जीआर) प्रसिद्ध केला.
या नवीन जीआरनुसार आता आंतरजातीय हा शब्द वगळण्यात आला आहे. ही समिती आता केवळ आंतरधर्मीय विवाहांबद्दलच काम करेल. विरोधी पक्षातले नेते आणि राज्यातील प्रमुख महिला संघटनांनीही या समितीला विरोध दर्शवला आहे.
“हे परिपत्रक तातडीने रद्द करण्यात यावे. विशेष विवाह काद्यानुसार नोंदणी विवाह करणाऱ्या जोडप्यांची माहिती आॅनलाईन पोर्टल वर प्रसिद्ध करण्याचीआवश्यकता नसताना जाणीवपुर्वक आंतरजातीय आंतरधर्मीय प्रेम विवाह रोखण्याच्या हेतूने सरकारकडून सदरच्या जोडप्यांची नावं तसेच पत्ते असणारी माहिती प्रसिध्द केली जात आहे.
त्यामुळे त्यांच्या राईट टू प्रायव्हसीच्या मुलभूत अधिकाराचे उल्लंघन होत असून त्यातून अशा जोडप्यांना विवाह करण्यात अडचणी येत आहेत. वारंवार प्रसिद्ध करण्यात येत असलेली माहिती बंद करण्यात यावी अशी मागणी आम्ही करत आहोत,” राईट टू लव्हचे एडव्होकेट विकास शिंदे यांनी सांगितलं.
आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करण्याऱ्या जोडप्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकराच्या काही योजना आहेत. या योजनांतर्गत जोडप्यांना आर्थिक मदतही केली जाते. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन मिळण्यासाठी या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी असं मत जोडप्यांनी व्यक्त केलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








