LGBTQ हक्क : 'समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली तर आमचं आयुष्य बदलेल'

- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी
"आपला देश खूप चांगला आहे, आपल्या देशात खूप संधी आहेत म्हणून मला देश सोडायचा नाहीये. ठिक आहे आपल्या देशात सध्या समलिंगी विवाहासाठी कायदे नाहीत किंवा सरकार असे कायदे करण्याच्या बाजूने नाही. म्हणून मी देश सोडणार नाही," राघव बीबीसी मराठीशी बोलताना सांगत होता.

भारतामध्ये लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं एकत्र येणं नसून शारीरिकदृष्ट्या पुरुष आणि स्त्रीचं एकत्र येण्याची परंपरा असल्याचं सांगत केंद्र सरकारने समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता देण्याला विरोध केलाय.
लग्नाविषयीच्या या परंपरेत कायदेशीर हस्तक्षेप केल्यास त्याने वैयक्तिक कायद्यांचा समतोल ढळण्याची शक्यता असल्याचंही केंद्र सरकारने म्हटलंय.
समलैंगिक विवाहाला हिंदू विवाह कायदा (Hindu Marriage Act), विशेष विवाह कायदा (Specail Marriage Act) आणि फॉरेन मॅरेज अॅक्टखाली कायदेशीर मान्यता मिळावी अशी मागणी करणाऱ्या विविध याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत.
सुप्रीम कोर्टाने समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा नसल्याचा निकाल दिल्यानंतरही आपल्याला लग्नाची नोंदणी करता येत नसल्याचं कोर्टात याचिका करणाऱ्या समलैंगिक जोडप्यांचं म्हणणं आहे. विषयीच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने हे मत मांडलंय. 30 नोव्हेंबरला म्हणजेच आज या याचिकांवरची अंतिम सुनावणी होत आहे.
सरकारतर्फे बोलताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, "समलैंगिक जोडप्यांमध्ये लग्नाला परवानगी देता येईल का हा मुद्दाच नाही. त्याविषयी माननीय न्यायाधीशांनी निर्णय घ्यावा. नवतेज सिंह जोहर खटल्याविषयीच्या काही गैरसमजुती आहेत. या निर्णायमध्ये फक्त परस्परसहमतीद्वारे ठेवण्यात आलेल्या समलैंगिक संबंधांना डीक्रिमिनलाईज म्हणजे गुन्हा नसल्याचं ठरवण्यात आलं. यामध्ये लग्नाचा कुठेही उल्लेख नाही."

'मला भारतातच राहायचं आहे'
भारतात समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता नसल्याने अनेक समलिंगी जोडपी एकतर विदेशात जाऊन लग्न करतात आणि तिथंच ते रजिस्टर्ड करतात. किंवा काही वेळाला ते विदेशातच कायमस्वरुपी स्थलांतरित होतात.
पण राघवला मात्र तसं करायचं नाहीये. त्याला भारतातच राहायचं आहे. त्याने 9 वर्षांपूर्वी त्यांच्या पार्टनरबरोबर भारतातच लग्न केलं आहे. ते ही बेळगावसारख्या शहरात. तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्याने आणि त्याच्या पार्टनरने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबीयांनीसुद्धा त्यांना त्यात साथ दिली.
हिंदू वैदिक आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने त्यांनी खासगी सोहळ्यातच विवाह केला. पण त्यांच्या लग्नाच्या 9 वर्षांनंतरही त्यांना त्यांचा विवाह कायदेशीरपणे नोंदवता आलेला नाही.

फोटो स्रोत, AFP/Getty Images
एका कायदेशीर लग्न केलेल्या स्त्रीपुरूषाच्या जोडप्याला जे अधिकार मिळतात त्यापासून ते अजूनही वंचित आहेत. लग्नाच्या 9 वर्षांनंतरही ते त्यांच्या आई-वडिलांच्याच घरी राहतात. त्यांच्या आईवडिलांचा तसा आग्रहच आहे. आई-वडिलांच्या आग्रहापायी मग तेसुद्धा एकमेकांच्या घरी येऊन-जाऊन असतात. पण त्यांनी स्वतंत्र घर घेतलेलं नाही.
"समाजात आजही लव्ह मॅरेजला कधीकधी मान्यता मिळत नाही, मग समलिंगी विवाहाला मान्यता मिळणं तर दूरच आहे. आमच्या शहराचं वातावरण दोन धर्मांमध्ये विभागलं गेलेलं आहे. अशात स्वतःहून पुढे येऊन उघडपणे समलिंगी संबंध किंवा विवाह मान्य करणं धोक्याचं वाटतं," राघव सागतो.
समलिंगी विवाह करूनही राघव आणि त्याच्या पार्टनरला लपूनछपून राहावं लागलं. बरेचदा त्यांना एकमेकांचे मित्र म्हणून वावरावं लागतं.
लग्न झाल्याचा पुरावा नसल्याने येणाऱ्या अडचणींबद्दल सांगताना राघव म्हणाला, "लग्नाचं प्रुफ नसल्यामुळे काहीच करता येत नाही. एकत्र घर विकत घेता येत नाही. आम्हाला मुलं सरोगेट करायलासुद्धा परवानगी नाही. मुलं दत्तक घेता येत नाहीत."
राघव आणि त्याच्या जोडीदाराला एकत्र एलआयसी पॉलिसी घ्यायची होती. पण पॉलिसी घ्यायला गेल्यावर कळलं की एकत्र पॉलिसी घेण्यासाठी रक्ताचं नातं किंवा लग्न झालेलं असावं लागतं.

तुम्ही दोन मित्र एकत्र पॉलिसी का घेत आहात असे सवालही त्यांना विचारण्यात आले. शेवटी त्यांनी स्वतंत्र पॉलिसी घेतल्या. त्यातही त्यांना एकमेकांना नॉमिनी करता आलं नाही. शेवटी त्यांना त्यांच्या पालकांना नॉमिनी केलं आणि विषय संपवला.
"वेगवेगळ्या सरकारी फॉर्मपासूनच भेदभाव सुरू होतो. प्रत्येक स्तरावर तो आहे. सामान्य नवरा बायकोला जे कायदेशीर अधिकार असतात ते आम्हाला अजिबात नाहीत," राघव सांगतो.
"आमच्या शहरात लोकांची वृत्ती संकुचितआहे. धर्माचा वाढता प्रभाव पाहाता आम्हाला आमचं रिलेशनशिप सांगण्याची भीती वाटते. LGBT हक्क हा विषय फक्त मोठ्यामोठ्या शहरांपुरताच मर्यादित आहे. मी माझ्या ऑफिसमध्ये माझी खरी ओळख सांगितल्यानंतर मला टार्गेट केलं गेलं. टिंगल उडवली गेली. शेवटी मला जॉब बदलावा लागला," राघव सांगतो.
राघवचा जोडीदार एका खूप मोठ्या हुद्द्यावर काम करतो, त्यांच्या हाताखाली काही लोक काम करतात. म्हणून त्याने त्याचं पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ पूर्णपणे वेगळं ठेवलंय.
ट्रान्सजेंडर आणि गे मधला बेसिक फरक लेकांना कळत नाही. त्यामुळे ब्लॉग लिहून लोकांना त्याची माहिती देण्याचा विचार राघवने केला होता. पण एका घटनेनंतर त्याने टाकलेलं पाऊल लगेचच मागे घेतलं.
तो सांगतो, "ब्लॉग लिहून लोकांना प्रबोधन करण्याचा विचार मी केला होता. पण 2017 आणि 2018 दरम्यान स्थानिक वृत्तपत्रांमध्ये काही खोट्या बातम्या छापून आल्या की, आपल्या शहरात समलिंगी लोकांचा सुळसुळाट झाला आहे आणि ते त्यांच्या जाळ्यात सामान्य लोकांना ओढत आहेत. त्यांना स्त्रियांपासून परावृत्त करून आपल्यासारखं करत आहेत. ते त्यांचा समलिंगी रोग सर्वत्र पसरवत आहेत. हे वाचल्यावर तर मी हादरलोच."
"सध्याच्या स्थितीत आम्ही खूप घाबरलेलो आहोत, आम्ही संपूर्ण कुटुंबात ओपन आहोत. पण तरीही आमच्यावर सतत प्रेशर असतं. समाजाकडून स्वीकार आणि पुरक कायदे हे एकाचवेळी होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कायदे तयार झाले तर निदान हक्क तरी मिळतील," असं राघवला वाटतं.
...आणि माझं करिअरच रखडलं
पुण्यात राहणारा इंद्रजीत घोरपडे आयटी इंजिनिअर आहे. गेल्या 3 वर्षांपासून तो रिलेशनशिपमध्ये आहे.
पण भारतात समलिंगी लग्नांना मान्यता नसल्याने त्याचा परिणाम त्याच्या करिअरवर झाल्याचं तो सांगतो.
2 वर्षांपूर्वी त्याला आर्यलंडच्या एका कंपनीकडून चांगली ऑफर आली होती. कंपनीनं त्याला त्याच्या पार्टनरबरोबर आर्यलंडमध्ये शिफ्ट होण्याचीसुद्धा ऑफर दिली.
इंद्रजीत आनंदी झाला. पण त्याचा हा आनंद औटघटकेचाच ठरला. कारण त्याच्यावर त्याच्या पार्टनरबरोबरचं रिलेशनशिप कायदेशीरदृष्ट्या सिद्ध करण्याची जबाबदारी आली. आर्यलंडच्या व्हिसासाठी आणि कंपनीने दिलेल्या सोयीसुविधा मिळवण्यासाठी ते अत्यंत गरजेचं होतं.
एकत्र बँक खातं, प्रॉपर्टी कार्ड किंवा असं कुठलही कागदपत्र ज्यातून ते दोघे एकमेकांचे पार्टनर आहेत असं सिद्ध होईल ते त्याच्याकडून मागण्यात आलं.
"मला आम्ही एकत्र असल्याचा पुरावा देता आला नाही. हाच माझा पार्टनर आहे हे मला सिद्ध करता आलं नाही. भारतात तसे कायदेच नाहीत किंवा आम्हाला कुठल्याही प्रकारचं एकत्र रजिस्ट्रेशन दाखवता आलं नाही, परिणामी मला त्यांना नाही सांगावं लागलं," इंद्रजीत सांगतो.
भारतात समलिंगी लग्नांचं रजिस्ट्रेशन करणं शक्य नसल्यामुळे आम्हाला लग्न करता येत नाहीये आणि लग्न केलं तरीसुद्धा रजिस्ट्रेशनसाठी वाट पाहावी लागेल असं वाटतं, असं तो पुढे सांगतो.
परिणामी आता इंद्रजीत परदेशात जाऊन सेटल होण्याचा विचार करत आहे. त्याच्यामागे फक्त सामाजिकच नाही तर भावनिक कारणही असल्याचं तो सागंतो.

फोटो स्रोत, Inderjeet Ghorpade
"तुमच्या नात्याला कादेशीर मान्यता नसल्याचा मानसिक त्रासही होतो. अनेकदा समाजात किंना नातेवाईकांमध्ये पार्टनरची ओळख बॉयफ्रेंड म्हणून सांगावी लागते. आमचं रिलेशनशिप त्याही पुढे सरकलेलं हे. ते फक्त बॉयफ्रेंड-बॉयफ्रेंड एवढंच नाहीये. त्यामुळे बॉयफ्रेंड सांगताना त्रास होतो. कारण बरेचदा बॉयफ्रेंड या संकल्पनेकडे सिरिअसली पाहिलं जात नाही. म्हणून मग आता आम्ही एकमेकांची ओळख पार्टनर म्हणून करून देतो," असं सांगून इंद्रजीत त्याच्या भावनांना वाट मोकळी करून देतो.
हेट्रोसेक्शुयअल लोकांना स्पाऊस व्हिजा लगेच मिळतो. पण मला तो मिळवताना त्रास झाला. कुठल्याही रिलेशनशिपमध्ये मेडिकल इमर्जन्सी, प्रॉपर्टी आणि इतर विषय असताच इथंही ते आहेच. पण माझ्या करिअरमध्ये याचा मोठा रोडब्लॉक होत आहे. बऱ्याच संधी सोडाव्या लागल्या आहेत. नाहीतर 2 वर्षांपूर्वीच आम्ही आर्यलंडमध्ये राहायला गेलो असतो, इंद्रजित त्याची खंत व्यक्त करतो.
'माझ्या बहिणी असा गैरफायदा घेतात'
मुंबईत राहणारे दीप आता 54 वर्षांचे आहेत. ते आधी एक अॅड फिल्म मेकर होते. त्यांनी युनिसेफसारख्या संस्थांसाठी काम केलंय. पण आपल्याला उभ्या आयुष्यात कधीच लग्न करता आलं नाही याची त्यांना खंत आहे.
खरंतर त्यांना लग्न करायचं होतं. पण, परिस्थितीनं त्यांना साथ दिली नसल्याचं त्यांचं म्हणण आहे. ते गे आणि त्यातही सिंगल असल्याचा गैरफायदा त्यांचे भावडं खूप उचलत असल्याचं ते सांगतात.

दीप यांची कहाणी त्यांचाच शब्दांत वाचा,
"सुरुवातीला मला स्वतःवर संशय होता. स्वतःला स्वीकारण्यातच माझा बराच वेळ गेला. पण ज्यावेळी मी स्वतःला स्वीकारलं तेव्हा भारतीय कायद्यांनुसार मी गुन्हेगार होतो. मी गे असण्याची मला मोठी किंमत चुकवावी लागली आहे.
कालांतराने मला साजेसा पार्टनर लाभला. मला आणि माझ्या पार्टनरला लग्न करायचं होतं. पण, भारतात ते शक्य नव्हतं. म्हणून विदेशात जाऊन लग्न करूया असं माझ्या पार्टनरने सुचवलं.
पण आईवडिलांची तब्येत ठिक नसल्याने त्यांना विदेशात घेऊन जाणं शक्य नव्हतं. मला आईवडिलांना एकटं सोडून जाणं शक्य नव्हतं. परिणामी मला त्या रिलेशनशिपमधून बाहेर पडावं लागलं. माझ्या त्या पार्टनरने कॅनडाला जाऊन दुसऱ्या एका पुरुषाशी लग्न केलं.
खरंतर ते पूर्णपणे अशक्य नव्हतं. माझ्या 2 बहिणींनी माझ्या आईवडिलांची जबाबदारी माझ्याबरोबर शेअर केली असती तर ते शक्य झालं असतं. पण त्यांनी ते करण्यास पूर्णपणे नकार दिला. आमचं लग्न झालंय आणि आम्हाला आमच्या मुलाबाळांकडे पाहायचंय असं सांगून त्यांनी वेळोवेळी त्यांची जबाबदारी झटकली.

फोटो स्रोत, Getty Images
मी एकटा हे सगळं कसं करू असं त्यांना विचारलं तर त्या दोघीही मला मग लग्न कर असा सल्ला देतात. त्यांना माहिती आहे की मी गे आहे. माझी स्थिती त्यांना पूर्णपणे माहिती आहे. मी महिलेशी लग्न करू शकत नाही हे त्यांना माहिती आहे. त्या माझ्या स्थितीचा पूर्णपणे गैरफायदा घेतात.
माझ्या करिअरवरसुद्धा मला त्यामुळे फारसं लक्ष केंद्रित करता आलं नाही. आईवडिलांच्या जबाबदारीमुळे मला बाहेरगावी जाण्याची कामं टाळावी लागली. प्रवासावर बंधनं आली. चांगल्या चांगल्या ऑफर सोडाव्या लागल्या.
मला माझ्या पार्टनरबरोबर भारतातच लग्न करून राहाता आलं असतं तर मला आईवडिलांना साभांळणंही सोपं गेलं असतं आणि माझ्या बहिणींनाही उत्तर देता आलं असतं.
पण आता मात्र तू एकटाच आहेस, तुला काय काम आहे असं सांगून त्या सर्व जबाबदारी माझ्यावर ढकलून मोकळ्या होतात.
मलाही स्वतःचं आयुष्य आहे. मलासुद्धा जगायचं आहे. मलाही आनंदी राहण्याचा अधिकार आहे. पण, सध्या लग्नाचे सोडा मला तर मी सिंगल असण्याचेसुद्धा हक्क मिळत नाहीयेत. सतत माझं लग्न झालं नसल्याचं कारण देऊन माझ्याशी दुजाभाव केला जात आहे.
त्यांचं लग्न कायदेशीर आहे आणि मला कायदेशीर लग्न करता आलेलं नाही म्हणून हे सगळं सुरू आहे असं सतत वाटत राहतं. कधीकधी त्याचं फार मानसिक दडपण येतं. त्याचा माझ्या शारीरिक आरोग्यवरही परिणाम झालाय.
'कायद्याने माझ्यात थोडातरी आत्मविश्वास येईल'
समलिंगी विवाहाचा कायदा झाला तर समाज एका क्षणात बदलेल असं नाही, पण निदान आम्हाला सर्वांच्या बरोबरीने जगण्याचा अधिकार तरी मिळेल, असं भुवनेश्वरमध्ये राहाणारी रुचा सांगते.
रुचाला तिच्या पार्टनरबरोबर लग्न करायचं आहे. गेली 14 वर्षं त्या दोघी रिलेशनशिपमध्ये आहेत. पण अलीकडच्या 3 वर्षापासून त्यांनी एकत्र राहायला सुरूवात केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पण रुचाला त्यासाठी खूप मोठी किंमत चुकवावी लागली आहे. तिच्या कुटुंबाने तिला हाकलून दिलं आहे आणि तिच्याकडून लिहून घेतलं आहे की ती कधीच कुटुंबात तिचा हिस्सा वाटा मागणार नाही.
रुचा सांगते, "मी सुरुवातीपासूनच माझ्या फॅमिली बिझनेसमध्ये काम करत होते. त्याच बरोबरीने मी आणि माझ्या पार्टनरने जॉब कन्सल्टन्सी सुरू केली होती. फॅमिली बिझनेसचा सर्व पैसा बिझनेसच्या खात्यात जात होता. मी माझ्या हातात काहीच ठेवत नव्हते. पण माझ्या पार्टनरचा 2018ला अपघात झाला. त्यात तिला गंभीर इजा झाली. त्यावेळी माझ्या रिलेशनशीपचा आणि मी लेसबियन असल्याचं माझ्या घरच्यांना समझलं. मला आई- वडील नाहीत. माझ्या काका-काकूंनी मला घरातून काढून टाकलं. तसंच संपत्तीत वाटा मागणार नाही असं लिहून घेतलं. माझी गाडीसुद्धा मला दिली नाही. जर कायदे माझ्याबाजूने असते तर मला स्वतःसाठी लढता आलं असतं."
"पार्टनरचा अपघात आणि माझ्या डोक्यावरचं छत्र हरपणं यामुळे आमची जॉब कन्सल्टन्सी बंद पडली आणि माझ्यावरच नवा जॉब शोधण्याची पाळी आली. या काळात पार्टनरच्या आईवडिलांनी समजून घेतलं. आता एका भाड्याच्या घरात आम्ही राहत आहोत आणि मी सध्या नोकरीच्या शोधात आहे."
पण एवढ्या कठीण काळात आम्हाला एकसाथ राहता येत आहे तेच आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे, असं रुचा सांगते.

मान्यता नसल्यामुळे एलआयसी घेता येत नाही, माझ्या पार्टनरला नॉमिनी करता येत नाही. सर्व लपून-छपून करावं लागलं, असे अनुभव ती सांगते.
रुचा तिचा आणखी एक अनुभव सांगते, "एकदा आम्ही एका गायनॅककडे गेलो होतो. माझ्या पार्टनरला बराच त्रास होत होता. त्यावेळी माझ्या पार्टनरला त्या गायनॅकने विचारलं की ही मुलगी का सतत तुझ्याबरोबर येत आहे. हे जर कायदेशीर झालं तर आम्हाला निदान थेट सांगता तरी येईल लोकांना. आताच्या परिस्थितीत सांगितलं तर लोक ते कसं घेतील माहिती नाही. पण कादेशीर झालं तर मला थोडा आत्मविश्वास तरी येईल."
पण हे एवढ्यावरच थांबलेलं नाही. रुचाच्या मनाला सतत आणखी एक भीती सतावत असते.
ती सांगते "माझ्या पार्टनरकडे तिचे अनेक पुरुष मित्र येतात आणि तू हिच्याबरोबर का राहातेस असं विचारतात. आम्ही चांगलं कमावतो आमच्याशी लग्न कर असं तिला बोलत असतात. माझ्या पार्टनरला हे फार सहन करावं लागतं.
"अस्पृश्यता नष्ट करणारे कायदे आले, त्यामुळे सगळंच बदललं असं नाही. पण काहीतरी सुधारणा झाली ना. तसंच आमच्या बाबतीतही असं होईल. निदान लोकांना उत्तरं तरी देता येतील.
केंद्र सरकारने कोर्टात कायदेशीर मान्यता द्यायला नकार देताना भारतीय संस्कृतीचा आधार घेतला आहे. त्यावर रुचा आश्चर्य व्यक्त करते.
"महाभारतात आपल्याला समलिंगी संबंधांच्या अनेक कथा सापडतात. मग हा भारतीय संस्कृतीचा भाग कसा नाही. खजुराहोंच्या मदिरांमध्येसुद्धा समलिंगीसंबंध दाखवण्यात आलेत. मग ते कुठून आलेत," असा सवाल ती करते.
कायदा मला आणि माझ्या पार्टनरला अधिक सुरक्षा देईल. आम्हाला सर्वांच्या बरोबरीने आणण्याचा यातून प्रयत्न होऊ शकतो. आताचा समाज आम्हाला त्यांच्यापेक्षा खालच्या दर्जाने पाहातो, रुचा तिची खंत व्यक्त करते.
प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये समलैंगिकता स्वीकारली जात होती?
या विषयावर अनेकदा चर्चा झाली आहे बीबीसी मराठीने प्रकाशित केलेल्या प्राचीन भारतात समलैंगिकतेला सामाजिक मान्यता होती? या लेखात त्यावर चर्चा करण्यात आली आहे. त्यातील काही अंश इथं देत आहोत.
समलैंगिकतेला जगातल्या इतर देशांमध्ये मान्यता मिळण्यासाठी झगडावं लागलं. पण प्राचीन भारतामध्ये याच समलैंगिकतेला सामाजिक मान्यता देण्यात आली होती.

समलैंगिकता आणि 'तिसरं लिंग' हे भारतीय समाजात कायमच अस्तित्त्वात होतं, असं अमर दास विल्हेम यांच्या 'तृतीय प्रकृती : पीपल ऑफ द थर्ड सेक्स : अंडरस्टँडिंग होमोसेक्शुऍलिटी, ट्रान्सजेंडर आयडेंटिटी थ्रू हिंदूइजम' मध्ये म्हटलं आहे. मध्यकाळातील आणि संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे.
एके काळी समलैंगिक महिलांना 'स्वारानी' म्हटलं जाई, असंही या पुस्तकात कामसूत्राचा दाखला देत म्हटलंय. या महिला दुसऱ्या महिलेशी लग्न करत. त्यांना 'थर्ड जेंडर' आणि सामान्य समाजानेही सहज स्वीकारलं होतं.
याच पुस्तकात समलैंगिक पुरुषांना 'क्लीव' असं नाव देण्यात आलेलं आहे. आपल्या समलैंगिक प्रवृत्तीमुळे महिलांमध्ये रस नसणारे नपुंसक पुरुष असं त्यांचं वर्णन करण्यात आलं आहे.
कामसूत्रातही उल्लेख
गुप्त काळात रचलेल्या वात्सायनलिखित कामसूत्रामध्ये देखणे पुरुष सेवक तसंच मालिश तसंच हजामत करणाऱ्या पुरुषांसह पुरुषांच्याच संबंधाचं तपशीलवार वर्णन करण्यात आलं आहे. या संभोग सुखाचे प्रकारही विषद करण्यात आले आहेत.
तेव्हा बायकी हावभाव असणाऱ्या पुरुषांना पापी किंवा अपराधी ठरवण्यात येत नसे. स्त्रियांच्या एकमेकींच्या रतिक्रीडेचंही सहजतेनं वर्णन करण्यात आलं आहे. खजुराहो किंवा ओडिशातील मंदिरांमध्ये हाच विचार खुलेपणाने मांडलेला दिसतो. मध्य काळातील सखी भाव परंपरेला समलैंगिकतेचं उद्दातीकरण मानलं जाऊ शकतं.
याबाबत तुम्ही इथं अधिक वाचू शकता - कलम 377 : 'मोहिनी रूपातील विष्णू चालतो, मग समलिंगींना विरोध का?'
(विनंतीनुसार या लेखातील काही व्यक्तींची नावं आणि शहरं बदलण्यात आली आहेत.)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)









