'या' पाच लाख 'लाडक्या बहिणीं'ना पैसे मिळणं होणार बंद, लाभ बंद होण्याचे निकष जाहीर

फोटो स्रोत, Getty Images
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
महाराष्ट्र सरकारनं ऐन निवडणुकीच्या आधी 'लाडकी बहीण योजना' सुरू केली. त्याद्वारे महिलांच्या खात्यात 1500 रुपये थेट जमा करण्यात आले.
मात्र, आता निवडणुकीनंतर काही निकषांनुसार महिलांच्या पात्रतेची छाननी करुन काही महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये एकूण 5 लाख महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
नेमकं कोणत्या महिलांना राज्य सरकारकडून अपात्र ठरवण्यात आलं आहे, ते पाहूयात.
5 लाख महिला ठरल्या अपात्र
महिला वा बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतून वगळण्यात येत आहे."
पुढे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचं विवरण दिलंय. त्यांनी दिलेल्या विवरणानुसार,
- संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला - 2 लाख 30 हजार
- वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला - 1 लाख 10 हजार
- कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला - 1 लाख 60 हजार
- एकूण अपात्र महिला - 5 लाख
"सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे," असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
या पाच निकषांनुसार झाल्या महिला अपात्र
निवडणुकीआधी ज्या ज्या महिलांनी अर्ज केला त्यापैकी बहुतांश महिलांना पैसे मिळाले. मात्र, महायुतीचं सरकार सत्तेत पुन्हा आल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी होणार असल्याची चर्चा सुरू झाली.
योजनेच्या या छाननीत कोणते निकष लावण्यात येतील? महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यावर काय म्हणाल्या होत्या? योजनेचे किती लाभार्थी होते? जाणून घेऊयात.

याआधीही अडीच वर्ष सत्तेत असलेल्या महायुतीनं थेट आर्थिक लाभ देणारी लाडकी बहीण योजना सुरू केली. तसेच आमचं सरकार आलं, तर ही योजना पुढेही अशीच सुरू राहील आणि महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ, असं आश्वासन महायुतीनं दिलं होतं.
आता सरकार आल्यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपयेच जमा होत आहेत. वाढीव 2100 रुपयांबद्दल अर्थसंकल्पीय अधिवेशनात विचार करू, असं अदिती तटकरे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.


किती महिलांना मिळाला आहे लाभ?
महिलांना सुरुवातीला तीन महिन्यांचे पैसे मिळाले. त्यानंतर आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांचे पैसे एकाचवेळी देण्यात आले.
आता पुन्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली असून महिलांना पैसे मिळायला सुरुवात झाली. मात्र, काही पुरुषांनी महिलांच्या नावावर बोगस अर्ज भरल्याचं समोर आलं. त्यानंतर हे अर्ज फक्त बाद झाले.
योजनेसाठी एकूण 2 कोटी 63 लाख अर्ज आले होते. त्यापैकी 2 कोटी 34 लाख महिलांना लाभ मिळाला होता. तसेच त्यावेळी आधार सिडींग झालेलं नसल्यानं काही महिला या लाभापासून वंचित राहिल्या होत्या.
ज्या महिलांचं आता आधार सिडिंग झालंय अशा 12 लाख 67 हजार महिलांना पहिल्या महिन्यापासूनचे पैसे एकाचवेळी देण्यात आले. तसेच 5 महिन्यांचा लाभ घेतलेल्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हफ्ता देण्यात आला.

फोटो स्रोत, @mieknathshinde/x
महायुतीला निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा लाभ झाल्याचंही बोललं गेलं. विशेष म्हणजे निवडणूक झाल्यानंतर ही योजना बंद होईल अशाही चर्चा झाल्या. निवडणूक झाल्यानंतर या योजनेचे निकष बदलले जातील, अर्जांची छाननी होईल, अशाही बातम्या आल्या होत्या.
मात्र, त्यावेळी अदिती तटकरे यांनी हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असून आम्ही कुठलेही निकष लावणार नाहीत, एखाद्या जिल्ह्यातील ठराविक तक्रार आली, तर फक्त त्याबद्दलच विचार केला जाईल, असं म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
यावेळी ही योजना पुढेही सुरू राहणार आहे, असंही सांगण्यात आलं. त्यानंतर डिसेंबरचा हफ्ताही महिलांना वितरित करण्यात आला. मात्र, आता या योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी होणार असून सरकारनं काही निकष निश्चित केले आहेत.
फडणवीस सरकारची 2 जानेवारीला मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी अर्जांची छाननी कशी केली जाणार आहे याबद्दल माहिती दिली होती.
कोणते निकष लावून अर्जांची छाननी होणार?
पालघर, वर्धा, यवतमाळ, धुळे अशा जिल्ह्यातून लाडकी बहीण योजनेबद्दल काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींच्या आधारे 5 निकष लावून संपूर्ण महाराष्ट्रातील अर्जांची छाननी होणार आहे, असं महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं. ते निकष कोणते खालीलप्रमाणे:
1) अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी सरकारनं आयकर विभागाकडून माहिती मागवली आहे. त्यानुसार अर्जांची छाननी होईल. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला असतील, तर लाभ मिळणार नाही.
2) एखादी लाभार्थी दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल, तर त्यांच्या अर्जांबद्दलही पुनर्विचार केला जाणार आहे. एखादा लाभार्थी 'नमो शेतकरी' योजनेचा फायदा घेत असेल, तर त्याला या योजनेतून 1000 रुपये आधीच मिळतात. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना फक्त वरचे 500 रुपये देऊन 1500 रुपयांपर्यंतचा फरक भरून काढला जाईल.

फोटो स्रोत, Facebook/Aditi Tatkare
3) चारचाकी वाहनं असणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार आहे. त्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती मागवली जाणार आहे. अशा महिला लाभ घेत असतील, तर त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही.
4) आधार कार्डवर नाव वेगळं आणि बँकेत नाव वेगळं अशा अर्जांची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे. तसेच केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर आधारची ई केवायसी सुद्धा केली जाणार आहे.
5) विवाहानंतर परराज्यात गेलेल्या महिला आणि शासकीय नोकरीत असताना कोणी लाभ घेतला असेल तर अशा अर्जांची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे.
हे 5 निकष का ठरवले?
याआधी अडीच कोटी महिलांना लाभ देणाऱ्या सरकारनं आता अर्जांची पडताळणी करायला सुरुवात का केली? याबद्दलही अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं.
अदिती तटकरे म्हणाल्या होत्या की, "गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेबद्दल काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दीड दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्हास्तरीय कार्यालय, आयुक्त कार्यालयात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत."
"नाव आणि आधार नंबर वेगवेगळा असणं, काहींनी दोनवेळा अर्ज केलेला आढळून आलं, काही महिला लग्नापूर्वी महाराष्ट्रात वास्तव्यास होत्या, त्या आता दुसऱ्या राज्याच्या रहिवासी आहेत अशा महिलांचे अर्ज, काहींनी चुकीचं हमीपत्र जोडलेलं आहे अशा तक्रारी स्थानिक प्रशासनाकडून आल्या आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
काही महिला सरकारी नोकरीत लागल्यामुळे आमचा लाभ कमी करावा, अशी मागणी संबंधित महिलांनी स्वतःहून केली आहे. काही महिलांचं नोकरीत प्रमोशन झालंय, तर काहींना सरकारी नोकरी लागल्यामुळं लाभ नको असे आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं.
प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार शासन निर्णयातीलच 5 निकषांच्या आधारे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी करायचं ठरवलं आहे. शासन निर्णयात कुठलाही बदल केलेला नाही, असं आदिती तटकरे यांनी अधोरेखित केलं होतं.
तसेच पुढच्या 10-15 दिवसात किती महिलांचे अर्ज बाद होतील याचा अंदाज येईल, असंही त्यांनी नमूद केलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











