महायुतीच्या आश्वासनानंतरही 'लाडक्या बहिणीं'ना 2100 ऐवजी 1500 रुपयेच का मिळतायेत?

महायुती

फोटो स्रोत, ANI

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"1500 रुपयांचा एसएमएस पाहिल्याबरोबर वाटलं सरकार आपल्याशी खोटं बोललं. सरकारनं 2100 रुपये देतो म्हणलं होतं तर द्यायला पाहिजे ना? 2100 कबूल करतात आणि 1500 रुपये देतात. असं खोटारडं सरकार पुढं आम्हाला 2100 रुपये देणार, याची काय गॅरंटी आहे?"

ही प्रतिक्रिया आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी प्रज्ञा झोडापे यांची. प्रज्ञा नागपूर जिल्ह्यातील चनोडा गावात राहतात. त्यांना याआधी 1500 रुपये प्रमाणे 7500 रुपयांचा लाभ मिळाला होता.

आता महायुतीचं सरकार आल्यानंतर योजनेच्या पुढील महिन्यांचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यानुसार प्रज्ञा यांच्या खात्यात पैसे आले. पण, सरकारनं 2100 रुपयांचं आश्वासन दिलं होतं तर मग 1500 रुपये का जमा झाले? असा सवाल त्यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना उपस्थित केलाय.

फक्त प्रज्ञाच नाही तर लाडकी बहीण योजनेच्या अनेक लाभार्थी महिलांना हा प्रश्न पडलाय की 2100 रुपये आमच्या खात्यात जमा होणार होते, तर मग फक्त 1500 रुपये कसे काय आले?

अशा काही लाभार्थी महिलांसोबत बीबीसी मराठीनं संवाद साधला. 1500 रुपये जमा झाल्यानंतर त्यांच्या मनात नेमके कोणते प्रश्न उपस्थित झाले? लाभार्थी महिलांना पडलेल्या या प्रश्नांवर महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांचं म्हणणं काय आहे? महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळणार आहेत? या प्रश्नांची उत्तरं घेण्याचा प्रयत्न करुयात.

महायुतीनं काय दिलं होतं आश्वासन?

महायुतीनं निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांच्या खात्यात प्रत्यक्ष 1500 रुपये द्यायला सुरुवात केली होती. सुरुवातीला दोन महिन्यांचे पैसे महिलांना देण्यात आले. त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी एकावेळी तीन महिन्यांचे म्हणजेच 4500 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले होते.

एकूण नोव्हेंबरपर्यंतचा हफ्ता लाभार्थी महिलांना मिळाला होता. या लाडकी बहीण योजनेच्या जवळपास अडीच कोटी महिला लाभार्थी आहेत, असं सरकारचं म्हणणं आहे.

निवडणुकीच्या काळात महायुतीनं जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये लाडक्या बहीणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देणार असल्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं. आमचं सरकार आलं तर ही योजना सुरू ठेवू आणि महिलांना पैसे वाढवून देऊ, असं महायुतीचा प्रत्येक नेता त्यांच्या प्रचारसभेत सांगत होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार

फोटो स्रोत, ANI

निवडणुकीचा निकाल आला तेव्हा महायुतीला बहुमत मिळालं. लाडकी बहीण योजनेमुळे इतकं मोठं यश मिळालं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सांगितलं. या यशाचं श्रेय लाडकी बहीण योजनेला देण्यात आलं.

आचारसंहितेच्या काळात बंद झालेली ही योजना आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ज्या सरकारनं 1500 रुपये आम्हाला दिले तेच पुन्हा सत्तेत आल्यानं आम्हाला आता 2100 रुपये मिळतील अशी अपेक्षा महिलांना होती. पण, योजना पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यांना 1500 रुपये खात्यात जमा झाल्याचे एसएमएस आले.

लाल रेष
लाल रेष

1500 रुपये जमा झाल्याचा एसएमएस वाचताच महिला काय म्हणाल्या?

महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाल्यानंतर त्यांच्यासोबत आम्ही संवाद साधला.

नागपूर जिल्ह्यातील उमरेड इथं राहणाऱ्या मनिषा शाहाणे म्हणतात, "सरकारनं 2100 रुपये सांगितले होते आणि आता 1500 रुपयांचा मेसेज दिसला तर नाराजी वाटली. 2100 ठरवले तर तेवढे पैसे द्यायला पाहिजे होते ना. आता महिला 1500 रुपयांवर कशा समाधानी होतील? सरकारनं सांगावं की 2100 रुपये का दिले नाही? त्याचं काय झालं?"

तर उमरेडमधील श्वेता मेश्राम या महागाईवर बोट ठेवत 1500 आले किंवा 2100 रुपये आले तरी आमच्या कुठल्याच कामाचे नाहीत, महागाई वाढत चालली आहे, असं सांगतात.

"सुरुवातीला 2100 रुपये मिळणार असल्यानं आम्ही खुश होतो. पण, 1500 रुपयांचा मेसेज दिसला तेव्हा धक्काच बसला. सरकार आम्हाला 2100 रुपये देऊ, असं खोटं तर बोलत नाहीये?" असा सवाल नागपुरातल्या रामेश्वरी भागात राहणाऱ्या पूजा ठाकूर उपस्थित करतात.

लाडकी बहीण योजना: महिलांना निवडणुकीनंतर 2100 रुपयांऐवजी 1500 रुपयेच का मिळत आहेत?

फोटो स्रोत, Getty Images

तर सरकार आपल्या आश्वासनावर आताच खरे उतरले नाहीतर पुढे 2100 रुपये देणार की नाही याची काही गॅरंटी वाटत नसल्याचं हितेश्वरी चाकुरे म्हणाली.

हितेश्वरी भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असून ती नागपुरात डायलिसिस टेकनिशियन कोर्सची विद्यार्थिनी आहे. तिला याआधी 5 महिन्यांचे पैसे जमा झाले होते. आता तिला डिसेंबरचा 1500 रुपयांचा हफ्ता मिळाला आहे.

आपल्याला 2100 रुपये मिळणार की नाही याबद्दल लाभार्थी महिलांच्या मनात अनेक शंका आहेत. पण, काही महिला 1500 रुपये मिळाले त्यावर समाधानी देखील वाटल्या.

नागपुरातील हर्षदा कावळे म्हणतात, "मला डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये आल्याचा मेसेज आला. 2100 रुपये नाही मिळाले. पण, 1500 रुपये खात्यात आले ते पण ठीकच आहे ना. काही न मिळण्यापेक्षा जे मिळाले ते ठीक आहे."

महिलांना 2100 रुपयांऐवजी 1500 रुपये का मिळाले?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सरकार आल्यानंतर 2100 रुपये देऊ असं म्हणणाऱ्या सरकारनं 1500 रुपये महिलांना का दिले? या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तरं जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासोबत संपर्क साधला.

त्या बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाल्या, "आम्ही 2100 रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं. पण, ते डिसेंबर महिन्यापासूनच देऊ असं आमच्या जाहीरनाम्यात कुठेही लिहिलेलं नव्हतं. योजना ज्यावेळी सुरू झाली तेव्हा 1500 रुपये देण्याची आर्थिक तरतूद मार्च महिन्यांपर्यंत करून ठेवली आहे. त्यानुसार महिलांना आम्ही 1500 रुपये द्यायला सुरुवात केली आहे. आधी जितक्या लाभार्थी महिलांना हे पैसे मिळाले त्या सगळ्या महिलांना हे पैसे देणं सुरू आहे."

पण, मग सरकारनं आश्वासन दिल्यानुसार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत की नाही? सरकार आपलं आश्वासन पूर्ण करणार आहे की नाही?

याबद्दल अदिती तटकरे म्हणतात, "महिलांना 2100 रुपये देणार नाही असं आम्ही कुठंही म्हणालो नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही विचार करू. तसेच ही योजना राबवायची असेल तर त्यासाठी आर्थिक तरतूद करावी लागते. अशी मध्येच आर्थिक तरतूद कशी करता येईल? मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक तरतूद तयार होईल तेव्हा महिलांना 2100 रुपये देण्याचा विचार केला जाईल."

किती महिलांना मिळणार लाभ?

24 डिसेंबरपासून महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. टप्प्याटप्प्यानं हे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. तसेच याआधी ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता त्या 2 कोटी 34 लाख महिलांना हे पैसे दिले जात आहेत.

पहिल्या दिवशी म्हणजे 24 डिसेंबरला 67 लाख महिलांना लाभ मिळाला आहे. पण, काही महिला आधार सीडींगमुळे या लाभापासून वंचित होत्या.

आता ज्या महिलांचं आधार सीडिंग पूर्ण झालंय अशा महिलांनाही या योजनेचा लाभ दिला जात आहे, असं महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून सांगितलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)