आठवीपर्यंत सरसकट पास करण्याचा आदेश मागे, 'हे' आहेत नियम

पाचवी-आठवी

फोटो स्रोत, Getty Images

आठवीपर्यंत सरककट पास करण्याचा राज्य शासनाचा आदेश आता मागे घेण्यात आला आहे. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी वार्षिक परीक्षेत पास होणं बंधनकारक असेल.

शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या नव्या परीपत्रकानुसार आता शाळेतील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना पास करण्याचा नियम होता. परंतु राज्य सरकारच्या नवीन परिपत्रकानुसार पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार असून नापास झाल्यानंतर पुढच्या वर्गात जाता येणार नाहीय. पहिल्या प्रयत्नात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी दिली जाणार आहे. परंतु दुसऱ्या संधीनंतर नापास झाल्यास पुढच्या वर्गात जाता येणार नाही.

राज्य सरकारने शिक्षण हक्क कायदा 2011 मध्ये सुधारणा केली आहे. या निर्णयानुसार पाचवी आणि आठवीच्या परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल.

मात्र, त्या परीक्षेतही नापास झाल्यास विद्यार्थ्यांना त्याच वर्गात बसावे लागणार आहे. याआधी सर्व विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत सरसकट पास केलं जात होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचं गांभीर्य राहीलेलं नाही असं काहींचं म्हणणं होतं.

पण आठवीपर्यंत नापास न करण्याच्या निर्णयामागे एक मोठी विचार प्रकीया होती. आता घेतलेला सरकारचा हा निर्णय योग्य नसल्याचं सांगत काही संघटना या निर्णयाला विरोध करत आहेत.

काय आहे नवी अधिसूचना ?

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

  • इयत्ता पाचवीच्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप प्रवेश देण्यात येईल. पण पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा असेल.
  • महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा, पुर्नपरीक्षा, मूल्यमापन याची कार्यपध्दती निश्चित करेल.
  • जर विद्यार्थी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण करू शकला नाही तर अश्या विद्यार्थ्याला संबंधित विषयासाठी शिक्षकांकडून अधिकचे मार्गदर्शन करण्यात येईल. वार्षिक परीक्षेच्या निकालानंतर दोन महिन्यांच्या आता पुर्नपरीक्षा घेतली जाईल.
  • जर विद्यार्थी पुर्नपरीक्षेतही नापास झाले तर पाचवी किंवा आठवीच्या वर्गात अश्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात ठेवले जाईल.
  • प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकाला शाळेतून काढून टाकले जाणार नाही.

शिक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया?

जिल्हा परिषद शिक्षक भाऊ चासकर यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

ते म्हणाले. "ना-नापास धोरणामागे मोठी विचारप्रक्रिया होती. सध्या अनेक शिक्षक नापास करायच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे याचे नवल वाटते. . मात्र याचा नीट विचार करायला हवा. नापास केल्यामुळे विद्यार्थी चांगले शिकतात, अशाप्रकारचे एखादे संशोधन असल्यास कृपया मला सांगा."

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"मी स्वतः वारंवार नापास झालेले एक मूल आहे आणि नापास केल्यानंतर तो नापाशीचा शिक्का कपाळी बसतो, तेव्हा आतल्या आत काय पडझड होते? केवढी निराशा येते, हे कधीही नापास न झालेल्यांना कधीच कळणार नाही.... मुलांना शिकवणे महत्त्वाचे की नापास करून खच्चीकरण करायचे, याचा साकल्याने विचार करायला हवा."

"परीक्षा म्हणजे व्यवस्थेने आमच्या विरुद्ध पुकारलेले युद्ध आहे, असे मुलांना वाटता कामा नये. खरं म्हणजे मुलं नापास होतात ना तेव्हा सरकार म्हणजे अख्खी शिक्षण व्यवस्था नापास झालेली असते. तेव्हा नापासीचे खापर केवळ मुलांच्या माथ्यावर का फोडले जाते आहे? आपली धोरणं नापास झाली आहेत, असं सरकार मान्य करणार आहे का? या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे," असं चासकर यांनी म्हटलं.

मात्र, इतर काही शिक्षकांनी या निर्णयाचं स्वागत केल्याचं दिसून येतं.

शिक्षक जितेंद्र महाजन म्हणतात, "मूल्यमापनाची ही नवी पध्दत विद्यार्थ्यांना अधिक सक्षम व प्रगत बनवेल."

तर, शिक्षक अभय ठाकरे यांनी म्हटलं, "विद्यार्थ्यांचे खऱ्या अर्थाने मुल्यमापन झाल्याने अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना हुरुप येऊन शाळेतील शिक्षकांनाही स्पर्धात्मक युगात आपला विद्यार्थी कुठपर्यंत पोहचेल याचा अंदाज येईल

पालकांचं म्हणणं काय?

ऑल इंडिया पॅरेंट असोसिएशनचे प्रमुख अनुभा सहाय म्हणाले, "वार्षिक परीक्षा घेण्याचं धोरण योग्य आहे. पण नापास करण्याचं धोरण चुकीचं आहे. सातत्याने प्रगतीचं मूल्यांकन करत राहणं, हाच विद्यार्थ्याची कामगिरी ठरवण्याचा योग्य मार्ग आहे. यामध्ये केवळ शैक्षणिक नव्हे तर शिक्षणेतर कलागुणदर्शनाचाही समावेश करण्यात यावा.

विद्यार्थ्यांचं मूल्यांकन केवळ पेन आणि पेपरवरील कामगिरीने न करता एकत्रित कामगिरीच्या आधारावर केला पाहिजे, असं सहाय यांनी म्हटलं.

"सरकारने सर्वप्रथम शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी त्यांनी शिक्षकांना योग्य प्रशिक्षण दिलं पाहिजे. योग्य शिक्षक असतील, तरच विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली होईल," असं मत पालकांनी नोंदवलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)