You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतात उच्चशिक्षित लोक हुंडा का घेतात?
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारतात शिक्षण आणि नोकरीच्या संधी वाढल्यामुळे हुंड्याचं प्रमाण वाढलं आहे असं एका अभ्यासाअंती लक्षात आलं आहे.
हुंडा घेणं ही भारतातली जुनी प्रथा आहे. 1961 पासून ती बेकायदा ठरवली असली तरी अजूनही अनेक भागात ती सुरू आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठाचे जेफ्री वेवर आणि व्हर्जिनिया विद्यापीठाचे गौरव चिपळूणकर यांनी 1930 ते 1999 या काळात झालेल्या 74000 लग्नांचा अभ्यास केला.
मुलाकडच्यांनी मुलीकडच्यांना दिलेली रक्कम आणि मुलीकडच्यांनी मुलाला दिलेली रक्कम यांच्यातला फरक म्हणजे त्यांनी हुंडा आहे असं धरलं. भारतात झालेल्या Rural Economic and Demographic Survey चा आधार त्यांनी घेतला. देशातल्या जास्त लोकसंख्येच्या 17 राज्यांमध्ये हे सर्वेक्षण केलं.
भारतातले बहुतांश लग्न हे अरेंज्ड म्हणजे ठरवून केलेले असतात. स्त्रिया विशीच्या शेवटी लग्न करतात. 1999 मध्ये झालेल्या 90 टक्के लग्नांमध्ये हुंड्याचा समावेश होता असं सर्वेक्षणात आढळलं आहे. 1950 ते 1999 या काळात एकूण 65 लाख कोटी रुपये इतका हुंडा दिला गेला होता.
अर्थव्यवस्थेत झालेल्या विकासामुळे हुंड्याच्या रकमेत वाढ झाली आहे. विशेषत: 1940 ते 1980 च्या दशकात. वेवर म्हणतात, “या काळात अनेक पुरुष उत्तम शिक्षण घेत होते, त्यांना चांगल्या नोकऱ्या लागत होत्या. त्यामुळे त्यांनी हुंडा घेण्यास सुरुवात केली असं ते सांगतात.
भारतातील लग्नं
- भारतातली बहुतांश लग्न एक पत्त्नीत्व असणारी असतात.
- घटस्फोटाचा दर एक टक्क्यापेक्षा कमी आहे.
- 1960 ते 2005 या काळात नवरा- नवरी शोधण्याचं काम 90 टक्के वेळा पालकांनीच केलं.
- 90 टक्के जोडपे लग्नानंतर नवऱ्याच्या आई वडिलांबरोबर राहतात.
- 85 टक्क्यांपेक्षा बायका त्यांच्या गावाबाहेरच्या मुलांशी लग्न करतात.
- 78.3% लग्न एकाच जिल्ह्यात होतात.
स्रोत- India Human Development Survey, 2005; National Family Health Survey 2006; REDS, 1999
या अभ्यासात नवऱ्या मुलाच्या बदलत्या दर्जाचाही अभ्यास करण्यात आला. शिक्षण आणि कमाई यांच्यात बराच फरक पडल्याचं या सर्वेक्षणात लक्षात आलं. नोकरी करण्यात स्त्रियांचा सहभाग कमी असल्यामुळे आपोआपच पुरुषांना जास्त नोकऱ्या मिळतात.
वेगळ्या शब्दात सांगायचं झाल्यास चांगल्या दर्जाचा मुलगा, चांगल्या नोकरीसाठी उच्च दर्जाची नोकरी असली की जास्त हुंड्याची मागणी होते. लग्नाच्या बाजारात मुलांची संख्या वाढली की त्यांना मिळणाऱ्या हुंड्याच्या रकमेत घट होते असंही या अभ्यासात समोर आलं आहे.
“आर्थिक स्थिती चांगली असली की हुंडा वाढीस लागतो. मुलींच्या बाजूने विचार केला तर असं लक्षात येतं की जर हुंडा देण्यास नकार दिला तर मुलीला चांगला नवरा मिळत नाही. मुलाची परिस्थिती चांगली असल्यामुळे तो हुंडा घेतो. त्यातही जर त्यांच्याच घरच्या मुलीला हुंडा द्यायचा असेल किंवा मुलाच्या शिक्षणाच्या गुंतवणुकीचा परतावा हवा असेल तर हुंड्याची रक्कम वाढते.”असं विवर आणि चिपळूणकर लिहितात.
हे फक्त भारतातच होतं का? ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या सिवान अँडरसन यांनी एक पेपर लिहिला. त्यात ते म्हणतात की इतर समाजात हुंडा घेण्याची प्रथा बऱ्यापैकी कमी झाली आहे. अगदी युरोपातही. भारतीय समाजात जातीचं वर्चस्व जास्त असल्यामुळे हुंड्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
विवर आणि चिपळूणकर म्हणात की हुंडा का घेतात याची जी पारंपरिक उत्तरं दिली जातात त्याबद्दल त्यांना अधिक माहिती मिळालेली नाही.
एका थिअरीनुसार हुंडा उच्च जातीत घेतला जातो, आणि त्याचं लोण कनिष्ठ जातीवर्गात पसरतं. समाजात चांगलं स्थान मिळावं, आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी सुद्धा तो आटापिटा असतो. मात्र नवीन अभ्यासानुसार या दाव्यात फारसं तथ्य आढळत नाही कारण उच्च आणि कनिष्ठ जातीत हुंडा घेण्याची प्रथा एकाच वेळेला सुरू करण्यात आली होती.
काही तज्ज्ञांच्या मते कनिष्ठ जातीच्या मुलींना उच्च जातीच्या लोकांशी लग्न करण्याच्या इच्छेमुळे सुद्धा हुंड्याच्या प्रथेत फरक पडला. विवर म्हणतात की हा दृष्टिकोन चुकीचा आहे. कारण भारतात आंतरजातीय विवाह फार कमी प्रमाणात होतात. हिंदू समाजाती 94 टक्के लोकांनी त्यांच्याच जातीत लग्न केल्याचं समोर आलं आहे.
मग स्त्रिया शिकल्यानंतर हुंड्याच्या रकमेत किती फरक पडतो?
गेल्या दोन तीन शतकात स्त्री शिक्षणाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुरुषांपेक्षा हा वेग खचितच जास्त आहे. त्यामुळे आता हुंड्याच्या प्रमाणात वाढ कमी व्हावी अशी अपेक्षा आहे. मात्र अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही असं विवर म्हणतात.
मात्र एका संशोधनात असं सिद्ध झालं आहे की स्त्री शिक्षणानंतर हुंड्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.
विवर यांनी केलेल्या संशोधनानुसार स्त्रिया एक वर्षं जास्त शिकल्यानंतर जो प्रभाव पडतो तो पुरुष एक वर्षं जास्त शिकल्यानंतर होणाऱ्या प्रभावापेक्षा जास्त नसतो. कारण त्यांची नोकरी करण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे त्यांच्या शिक्षणामुळे परतावा जास्त मिळण्याची शक्यता जास्त असते.
त्यामुळे नोकरीच्या बाजारात जास्तीत जास्त स्त्रियांचा समावेश आणि शिक्षणाला प्रोत्साहन यामुळे हुंड्याचा त्रास कमी करता येतो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)