उष्णतेच्या लाटेमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर परिणाम होणार?

    • Author, ऋषी बॅनर्जी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

देशात 18 व्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकांसाठी देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे भारतात वर्षातील सर्वात उष्ण दिवसांमध्ये हे मतदान होणार आहे.

एप्रिलमध्ये म्हणजे 19 एप्रिलला मतदानाच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात होण्याआधी देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटांचा तडाखा बसतो आहे.

अनेक भागात उष्णतेची लाट वाढते आहे. काही भागांमध्ये तर एप्रिल महिन्यातच तापमान 42 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.

एप्रिल, मे आणि जून महिन्यात देशभरात उष्णतेची लाट असते. विशेषत: उत्तर, पश्चिम आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये दरवर्षी उष्णतेची लाट दिसून येते.

उन्हाळ्याच्या मध्यावर म्हणजे एप्रिलच्या शेवटी आणि मे महिन्यात देशातील अनेक भागात तापमान 47 अंश सेल्सिअसवर पोहोचतं.

यावर्षीचा उन्हाळा आतापर्यतचा जगभरातील सर्वाधिक उष्ण उन्हाळा असेल असा इशारा तज्ज्ञांनी या आधीच दिला आहे.

अशा परिस्थितीत याच कालावधीत देशात लोकसभा निवडणुका होणार असून त्याचा निकालदेखील जूनच्या पहिल्या आठवड्यात असणार आहे.

या परिस्थितीत देशातील लोकसभा निवडणुकांसमोर उष्णतेची लाट आणि हवामान बदलाचं आव्हान निर्माण होण्याच्या शक्यता आहेत.

भारतीय हवामान विभागानं देखील या कालावधीत सरासरी तापमान अधिक राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागानं निवडणूक काळात उष्णतेच्या लाटेबद्दल धोक्याचा इशारा का दिला आहे?

भारतीय हवामान विभागानं 2024 मध्येदेखील एप्रिल ते जून या कालावधीत खूप जास्त उष्णता असेल, असा धोक्याचा इशारा दिला आहे.

हवामान विभागानुसार भारतात एप्रिल ते जून या कालावधीत असणाऱ्या सरासरी तापमानापेक्षा यंदा अधिक तापमान असणार आहे. त्याचबरोबर देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट असणार आहे. दक्षिण, मध्य आणि पूर्व भागात आणि वायव्य भारताच्या मैदानी भागात याचा फटका विशेषकरून बसणार आहे.

यावेळी हवामानाचा अंदाज काय आहे?

भारतीय हवामान विभागाच्या महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या उन्हाळ्यात गुजरातमधील सौराष्ट्र-कच्छ, महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये दिवसा प्रचंड तापमान असणार आहे. त्याचबरोबर काही भागाला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसणार आहे.

सर्वसाधारणपणे उन्हाळ्याच्या तीन महिन्यांमध्ये सरासरी 4 ते 5 दिवस उष्णतेची लाट दिसून येते. मात्र यावर्षी देशाच्या विविध भागात 10 ते 20 दिवस उष्णतेची लाट असणार आहे.

जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये देखील तापमानात वाढ झालेली दिसून येणार आहे.

2023 प्रमाणेच 2024 च्या उन्हाळ्यातदेखील पॅसिफिक महासागरात अल निनोचा प्रभाव असणार आहे. सर्वसाधारणपणे पॅसिफिक महासागरात जेव्हा अल निनोची स्थिती असते तेव्हा जगभरातील तापमान वाढलेलं असतं. मात्र असं पहिल्यांदाच झालं आहे की 2023 मध्ये प्रत्येक महिन्यातील तापमान सरासरी तापमानापेक्षा अधिक होतं.

मोहापात्रा सांगतात, ''अल् निनोची सुरूवात जून 2023 मध्ये झाली होती आणि त्याचा प्रभाव डिसेंबर महिन्यात कमी झाला होता.

मात्र यामुळे जागतिक तापमानात वाढ झाली. फक्त अल् निनोमुळंच तापमानात वाढ झाली असं खात्रीनं म्हणता येणार नाही. मात्र अल् निनोच्या वर्षांमध्ये उष्णतेच्या लाटांच्या संख्येत आणि तीव्रतेत वाढ झालेली दिसून आली आहे.''

अल् निनो हा हवामान बदलाचा भाग आहे आणि भारतापासून हजारो किलोमीटर दूर पॅसिफिक महासागरात ही बाब घडत असते.

अल् निनोचा ऋतूंवर लक्षणीय परिणाम होतो. सर्वसाधारपणं त्यामुळे भारतात मानसूनमध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी होतं.

बीबीसीशी बोलताना भारतीय हवामान विभागातील वैज्ञानिक, डॉ. सोम सेन रॉय म्हणाले, सरासरीपेक्षा अधिक तापमान असं ही आता नवी गोष्ट राहिलेली नाही. किमान आणि कमाल तापमानात सातत्यानं वाढ होते आहे आणि ती चिंतेची बाब आहे.

यावर्षी उष्णतेच्या लाटांमध्ये वाढ होईल आणि उष्णतेच्या लाटांचा कालावधीदेखील अधिक असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, दिवसाबरोबरच रात्रीदेखील तापमानात वाढ होते आहे.

दिवसा तापमानात वाढ झाल्यामुळं आणि रात्रीदेखील तापमान वाढ झाल्यामुळं सरासरी तापमान वाढतं आहे.

उन्हामुळे मतदारांच्या अडचणी वाढणार

लोकसभा निवडणुकांचे पहिले दोन टप्पे एप्रिल महिन्यात असणार आहेत. त्यात 191 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे.

निवडणुकीच्या सात टप्प्यांपैकी चार टप्प्यांसाठीचं मतदान 7,13,20 आणि 25 मे ला असणार आहे. सातव्या टप्प्यासाठीचं मतदान 1 जूनला होणार आहे. मतदारसंघांचा विचार करता 296 लोकसभा मतदारसंघांसाठी मे महिन्यात मतदान होणार आहे.

57 लोकसभा जागांसाठी 1 जूनला मतदान होणार आहे. मतदान जरी 1 तारखेला होणार असलं तरी प्रचारसभा, कार्यक्रम आणि निवडणूक प्रचाराशी निगडीत विविध गोष्टी मे महिन्यातच होणार आहेत. अशा रितीनं जेव्हा देशातील अनेक भाग सर्वाधिक तापमानाला तोंड देत असतील त्याचवेळेस 353 लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे.

महत्त्वाचं म्हणजे, मे महिन्यात ज्या राज्यांमध्ये मतदान होणार आहे ती राज्ये राजकीयदृष्ट्या आणि लोकसभा जागांच्या दृष्टीकोनातून महत्वाची आहेत.

उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर या राज्यांमधी बहुतांश जागांसाठी मे महिन्यातच मतदान होणार आहे. गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, गोवा, दिल्ली आणि हरियाणा या राज्यांमध्ये मे महिन्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

या राज्यांमध्ये मे आणि जून महिन्यात खूपच जास्त उष्णता असते. मे महिन्यात काही भागातील सरासरी तापमान 41 ते 42 अंश सेल्सिअसदरम्यान असतं. तर काहीवेळा तापमान 45 ते 47 अंश सेल्सिअसवरदेखील जातं.

गुजरातमधील गांधीनगर येथील इंडियन इन्स्टिस्ट्यूट ऑफ पब्लिक हेल्थचे माजी संचालक दिलीप मावलणकर सांगतात, ''मे महिन्यात तापमान सर्वात जास्त असतं आणि निवडणूक प्रक्रियेवरदेखील त्याचा परिणाम होईल ही बाब अत्यंत स्वाभाविक आहे.

त्यामुळं प्रचारसभा, कार्यक्रमांमध्ये आधीप्रमाणे जास्त लोक येणार नाहीत. अशा परिस्थितीत हजर राहणं सर्वांसाठीच सोयीचं ठरावं यासाठी बहुतांश प्रचारसभा, रोड शो आणि सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन संध्याकाळच्या वेळेस होण्याची शक्यता आहे.''

ही बाब लक्षात घेतली पाहिजे की यावर्षी एप्रिल महिन्यापासूनच गुजरातसह देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा तडाखा बसतो आहे. बंगळूरू शहरात 37.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मागील तीन वर्षातील हे सर्वाधिक तापमान आहे. हैदराबादमध्ये देखील मार्च महिन्यात 41 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण भारतात एप्रिल ते जून महिन्यांदरम्यान उष्णतेच्या तीव्र लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

2023 मध्ये लोकसभेत एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात केंद्र सरकारनं सांगितलं होतं की जूनपर्यंत 14 राज्यांमध्ये मिळून 264 लोकांचा उष्णतेच्या लाटेमुळं मृत्यू झाला आहे.

2023 मध्ये मार्च महिन्यातच उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेची सुरूवात झाली होती. उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्लीत विक्रमी तापमानाची नोंद झाली होती. या राज्यांमध्ये संपूर्ण वर्षभरात 49 असे उच्च तापमानाचे दिवस होते. या कालावधीत लोकांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा तडाखा बसला होता.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2003 ते 2022 या कालावधीत प्रचंड उष्णता आणि उष्णतेच्या लाटेमुळे देशात 9675 लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षाच्या आकेडवारीतून दिसून येतं की दरवर्षी तापमानात वाढ होते आहे. अगदी 2024 मध्ये देखील उष्णतेचा तडाखा अधिक तीव्र आणि दृश्य स्वरुपात दिसून येणार आहे.

एप्रिल 2023 मध्ये नवी मुंबईतील खारघर इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क मैदानावर झालेल्या एका पुरस्कार समारंभात उष्णतेचा फटका बसून 12 जणांचा मृत्यू झाला होता. तर असंख्य जणांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं. हा एक सरकारी कार्यक्रम होता. यात लोकांना जबरदस्तीनं अशी वेळ आणण्यात आली होती.

तापमानवाढीचा निवडणुकांवर याचा परिणाम होईल का?

अलीकडंच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या निवडणूक प्रचाररथाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. प्रचार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या रथावर स्प्रिंकलर बसवण्यात आले होते आणि त्या स्प्रिंकलरमधून पाणी फवारण्यात येत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत होतं.

असह्य उष्णता आणि तीव्र उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये राजकीय पक्ष, राजकीय नेते, प्रशासन आणि निवडणूक आयोगाचीदेखील परीक्षा असणार आहे.

लोकांना प्रचारसभा, सार्वजनिक कार्यक्रम आणि मतदान केंद्रांपर्यत आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.

दिलिप मावलणकर म्हणतात,''स्वाभाविकपणं, या परिस्थितीत अशा कार्यक्रमांकडे लोक फिरकण्याची शक्यता कमी आहे. त्याचा फक्त राजकीय कार्यक्रमांवरच नाही तर मतदानावरदेखील नकारात्मक परिणाम होणार आहे. निवडणूक प्रक्रियेत अपेक्षेपेक्षा कमी लोकांचा सहभाग असण्याचा अंदाज आहे.

सकाळी आणि संध्याकाळी लोकांचा सर्वाधिक सहभाग असेल. मात्र एकंदरित सरासरी सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोग आणि राजकीय पक्षांना खूपच अधिक मेहनत करावी लागणार आहे.''

ते पुढं म्हणतात की एरवी मतदान केंद्रांबाहेर दिसणाऱ्या रांगा दिवसाच्या वेळी दिसणार नाहीत. त्याचबरोबर मतदान केंद्रांच्या आत मोठी गर्दी दिसून येईल. दुपारच्या वेळेत मतदान धीम्या गतीनं होईल. त्यामुळं निवडणूक आयोगालादेखीलयासाठी तयारी करावी लागणार आहे.

सेंटर फॉर स्टडीज ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस)चे संचालक, प्रोफेसर संजय कुमार यांच्या मते,

सकाळी आणि संध्याकाळी मतदानाची टक्केवारी सर्वाधिक असणार आहे. तर दिवसभरात हे प्रमाण सर्वात कमी असणार आहे.

प्रोफेसर कुमार म्हणतात, ''2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकादेखील उन्हाळ्यातच झाल्या होत्या. त्यावेळेस मतदानाची टक्केवारी चांगली होती.

लोकसभा निवडणुकीसारखी महत्त्वाची निवडणूक असल्यामुळं उष्णता आणि आर्द्रता असूनदेखील राजकीय पक्ष, पोलिंग एजंट आणि मतदार देखील उत्साहाने भाग घेतील. राजकीय पक्षांनी प्रचारसभा, प्रचार फेऱ्यांसाठी शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि इतर व्यवस्था केली पाहिजे. लोकांना प्रचारसभा, कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था केली पाहिजे.

सर्वसाधारणपणे या प्रकारची व्यवस्था राजकीय पक्षांकडून केली जाते. सकाळी 11 पासून ते संध्याकाळी 4 वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया धीम्या गतीनं होईल मात्र त्यानंतर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.''

तज्ज्ञांच्या मते, उष्णतेच्या लाटेदरम्यान राजकीय कार्यक्रम, प्रचारसभा आणि प्रचार फेऱ्या मधील सहभागाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

यासाठी निवडणूक आयोगाची काय तयारी आहे?

लोकसभा निवडणुकीच्या काळात उष्णता आणि उष्णतेच्या लाटेमुळं निर्माण होणाऱ्या समस्यांचा विचार निवडणूक आयोगानंदेखील केला आहे.

त्यामुळंच भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यांच्याबरोबर ताळमेळ साधत निवडणूक आयोग काम करतं आहे.

निवडणूक आयोगानं सात टप्प्यात मतदान घेण्याच्या नियोजनासह एक मार्गदर्शिका देखील लागू केली आहे.

यानुसार प्रत्येक राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्याला उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर योग्य कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मतदान केंद्रांमध्ये किमान सुविधांबद्दलची खातरजमा करण्यास सांगण्यात आले आहे.

डॉ. सोम सेन रॉय म्हणतात, "लोकसभा निवडणुकीसाठी मे महिन्यात होणाऱ्या मतदानाचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे हे लक्षात घेऊन भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसोबत ताळमेळ साधत निवडणूक आयोग काम करतं आहे.

अधिकाधिक नागरिकांनी मतदानात भाग घ्यावा यासाठी निवडणूक आयोगाकडून पावलं उचलण्यात येत आहेत. निवडणूक प्रक्रियेचा लोकांना कमीतकमी त्रास व्हावा यासाठी विविध स्तरावर काम करण्यात येत आहे."

कोणत्याही भागातील स्थानिक हवामान विभागानं निश्चित केलेल्या तापमानाच्या विशिष्ट बिंदूंच्या वर जेव्हा तापमान पोचतं आणि ते ठराविक दिवसांसाठी तसंच राहतं, त्याला उष्णतेची लाट म्हणतात.

भारतीय हवामान विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उष्णतेच्या लाटेसाठी सरासरी तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असलं पाहिजे. तर शीत लाटेसाठी सरासरी तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असले पाहिजे. सर्वसाधारणपणं हे तापमान पाच दिवस राहतं.

मानवासहित असंख्य सजीवांवर उष्णतेच्या लाटेचा परिणाम होतो. उष्णतेच्या लाटेमुळं शरीरात पाण्याची पातळी खालावणं, थकवा येणं, अशक्तपणा येणं, चक्कर येणं, डोकेदुखी, उलट्या होणं, पोटात दुखणं, खूप घाम येणं, उष्माघात होणं यासारख्या तक्रारी उद्भवतात.

ज्या लोकांना ह्रदयाशी संबंधित आजार असतात त्यांनादेखील अती उष्णतेमुळं ह्रदयविकाराचा झटका येणं किंवा उष्माघाताचा त्रास होऊ शकतो.

दिलिप मावलणकर सांगतात, जर लोकांना सार्वजनिक कार्यक्रम किंवा प्रचारसभांना हजर राहायचं असेल तर त्यांनी योग्य काळजी घेतली पाहिजे.

जर तुम्ही उन्हात घराबाहेर पडत असाल तर जवळ पाणी आणि छत्री बाळगली पाहिजे. जर उन्हात उभं राहायची आवश्यकता असेल तर डोकं व्यवस्थित झाकलेलं असलं पाहिजे.

दीर्घकाळ उष्णतेला तोंड दिल्यास किंवा उन्हात राहिल्यास शरीरातील पाण्याची पातळी खालावणं आणि इतर गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते.

ज्येष्ठ नागरिक आणि ज्या लोकांना दोन किंवा त्यापेक्षा अधिक आजार आहेत अशा लोकांसाठी अती उष्णता धोकादायक असते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)

हेही नक्की वाचा