You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरेंचा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाला बिनशर्त पाठिंबा
मंगळवारी (9 एप्रिल) गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे भाषण केलं. या भाषणावेळी राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे सांगितले आहे.
नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून आपण या लोकसभा निवडणुकीवेळी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे राज यांनी सांगितले.
याआधी, राज ठाकरे यांनी अमित शाह यांच्या भेटीवेळी माध्यमांनी ज्या प्रकारे बातम्या दिल्या त्यावर सडकून टीका केली.
दिल्लीत पोहोचल्यानंतर अमित शाह यांची भेट दुसऱ्या दिवशी ठरली होती. तरीही राज ठाकरेंनी अमित शाह यांच्या भेटीसाठी अनेक तास वाट पाहावी लागली, अशा बातम्या चालवल्या, यावर राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली.
मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. तर केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करेन, असं राज यांनी म्हटलं.
काही दिवसांपूर्वी 'एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रमुख होऊ शकतात',अशा बातम्या आल्या होत्या. त्यावर राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं.
राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
- मला जर शिंदेंच्या शिवसेनेचा प्रमुख व्हायचं असतं तर आधीच झालो असतो. मी केवळ बाळासाहेब ठाकरेंशिवाय कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. मी मनसेचाच प्रमुख राहणार.
- मुख्यमंत्री गेले वर्ष दीड वर्ष म्हणत होते, आपण एकत्र आलं पाहिजे. एकत्र म्हणजे काय? मला कळत नव्हतं म्हणून मी अमित शाह यांना फोन केला मग त्यांना भेटलो. मग आम्ही तिघंही (अमित शाह, राज ठाकरे, एकनाथ शिंदे) एकत्र भेटलो.
- कॉंग्रेस नेत्यांसोबत भेटी होत्या पण गाठी पडल्या त्या भाजपबरोबर.
- या देशातला मी पहिला व्यक्ती होतो, ज्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहीजेत, असं म्हटलं होतं. तेव्हा त्यांच्या पक्षामध्येही याविषयी कुणी बोलत नव्हतं.
- मला मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी विरोध केला नाही, तर मला काही गोष्टी पटल्या नाहीत म्हणून मी विरोध केला होता.
गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर मनसे आणि भाजप यांच्या युती होणार का, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.
राज ठाकरे यांनी आज मांडलेल्या भूमिकेचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे.
"सस्नेह स्वागत !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत,
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी,
भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी,
भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख श्री राज ठाकरे जी यांचा अत्यंत आभारी आहे.
आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशाआकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या!"
असं ट्वीट फडणवीस यांनी केलं आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी "विकसित भारताच्या संकल्पासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे यांनी देशाचे खंबीर नेतृत्व पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांच्या या पाठिंब्यामुळे महाराष्ट्रातील भाजपा- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षांची महायुती अधिक मजबूत झाली आहे. त्यांच्या या निर्णयाचे मनापासून स्वागत."
"पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश विकास आणि समृद्धीच्या वाटेवर निघाला आहे. यात राज ठाकरे यांच्यासारख्या दुरदृष्टी लाभलेल्या नेतृत्त्वाची साथ मिळत आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महायुतीची गुढी अधिक मजबूत झाली आहे."
अशी प्रतिक्रिया दिली आहे.