You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मिरवणुकीत लेझरकडे पाहताना अंधारी आली, दुसऱ्या दिवशीही दिसत नव्हतं आणि आता...'
- Author, प्राची कुलकर्णी
- Role, पुण्याहून, बीबीसी मराठीसाठी
दरवर्षीप्रमाणे अनिकेत शिगवण (23 वर्षं ) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी बाहेर पडला.
आपल्या मंडळाच्या मिरवणूकीत नाचून झाले की इतर मंडळे आणि तसेच मित्रांसोबत लक्ष्मी रस्त्यावरच्या मिरवणूकांमध्ये नाचायला जायचे त्याचे नियोजन होते.
मंडळाची मिरवणूक झाली आणि पुढच्या मिरवणूकीत नाचता नाचता अनिकेत लेझरकडे पहात असताना त्याच्या डोळ्यासमोर अचानक अंधारी आली.
“मला वाटलं घेरी आली आहे म्हणून मी मित्रासोबत जात शेजारच्या मेडिकल स्टोअर मधून औषधं घेतली. पण त्यानंतरही दिसेना. मग घरी जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरही नीट दिसत नसल्याने मात्र मग मी डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला,” अनिकेत सांगत होता.
"तपासण्या झाल्या आणि मग त्यांनी जे सांगितलं ते ऐकून एकदम भीती वाटली.”
लेझरची किरणे डोळ्यात गेल्याने अनिकेतच्या डोळ्यांमध्ये रक्तस्त्राव झाला होता आणि त्यामुळे त्याची 70 टक्के दृष्टी गेली होती.
आई,वडील, आजी आणि बहिणीसोबत पुण्यातल्या पर्वती परिसरात राहणाऱ्या कुटुंबात अनिकेत कमावत्या सदस्यांपैकी एक.
त्यामुळे हा प्रकार झाल्याचे ऐकल्यावर साहजिकच त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
असा प्रकार झालेला अनिकेत एकटा नाही.
लेझरमुळे दृष्टी जाऊ शकते?
डॉ अनिल दुधभाते बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, “ अनिकेतसह आणखी एक केस माझ्याकडे आली होती. दोघांच्याही डोळ्यांना लेझरमुळेच दुखापत झाली होती. लेझरच्या किरणांची आणि डोळ्याची फोकल लेंथ मंच होते तेव्हा तो भाग जळतो.
कारण जे लेझर वापरले गेले आहेत ते मुळात आम्ही शस्त्रक्रियांना वापरतो तशा प्रकारचे आहेत. शस्त्रक्रियांना वापरल्या जाणाऱ्या लेझर वापरताना परवानगी तरी घ्यावी लागते. पण इथे असा फिल्टर वगैरे वापरायचा संबंधच नाही. त्यामुळे त्याच्याकडे पाहताना ही दुखापत होते.”
सध्या रक्तस्त्राव झालेला असल्याने अनिकेतला एका डोळ्याच्या मध्यभागातून काहीही दिसत नाही आणि बाकी धूसर दिसते. डॉक्टरांच्या मते हे पूर्णपणे बरे होण्यासाठी अनिकेतला सात दिवसांची ट्रिटमेंट घ्यावी लागणार आहे आणि ते कमी न झाल्यास शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.
त्यानंतर देखील त्याच्या दृष्टीवर 20 ते 30 टक्के परिणाम झालेला असेलच. एकीकडे शस्त्रक्रियेचा खर्च, दुसरीकडे नोकरीची चिंता आणि त्यातच भवितव्याची काळजी अशा तिहेरी संकटात अनिकेत अडकला आहे.
ऑपरेशनसाठी वापरले जाणारे लेझर लाइट मिरणुकीसाठी कसे मिळाले?
पण मुळात जे लेझरचे लाईट शस्त्रक्रियेसाठी वापरले जातात ते इतक्या सहजासहजी उपलब्ध झाले तरी कसे?
साऊंड आणि इलेक्ट्किक जनरेटर्स असोसिेशन चे बबलू रमजानी सांगतात, “ मार्केटमध्ये सध्या हे लाईट अगदी सहज मिळत आहेत. नवे काही आले की ते घेण्याकडे व्यावसायिकांचा कल असतो. यापूर्वी असा दुखापत होण्याचा काही प्रकार समोर आला नव्हता. अर्थात हे लाईट वापरले जाऊ नयेत, त्याच्या वापरावर निर्बंध आणले जावे अशी मागणी आम्ही पोलिसांकडे मिरवणूकीपुर्वीच केली होती.”
पण गंभीर बाब म्हणजे आवाजाची मर्यादा ओलांडल्यावर जशी कारवाई केली जाऊ शकते तशी काहीही कारवाई करण्यासाठी या लाईटच्या बाबत कायद्यात तरतूदच नाही.
बीबीसी मराठीशी बोलताना पुणे पोलिसांच्या विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त आर. राजा म्हणाले , “लेझरच्या वापरावर फक्त विमानतळाच्या परिसरात निर्बंध आहेत. इतर कुठेही काही निर्बंध नाहीत. तसेच कायद्यामध्ये तशी काही तरतूद देखील नाही.
जर कोणाला काही दुखापत झाली तर त्या अनुषंगाने त्याला जबाबदार असणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. या प्रकरणात देखील तशीच कारवाई होईल. आवाजाबाबत कायदा आणि निर्बंध आहेत.”
हा सगळा प्रकार लक्षात घेता आता मिरवणूकीत लेझरच्या वापरावरच निर्बंध घालावेत अशी मागणी केली जात आहे. अनेक संघटनांसह राजकीय पक्ष ही मागणी करत आहेत. सरकार आता याबाबत काही अधिकृत पावले उचलते का हे पाहणे महत्वाचे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)