You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विनायक की विनायकी? हत्तीचं मस्तक-स्त्रीचं शरीर असलेल्या 'या' मूर्ती कोणाच्या?
राज्यभरात सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. घराघरांमध्ये बाप्पा विराजमान होतातच. पण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळंही गणपती बाप्पांच्या आकर्षक, भव्य आणि वेगवेगळ्या स्वरूपातल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करतात. अगदी ट्रेंडमध्ये असलेल्या चित्रपटांपासून राजकीय, सामाजिक विषयांचं प्रतिबिंबही या गणेश मूर्तींमध्ये पाहायला मिळतं.
अष्टविनायक, नवसाचे गणपती, मानाचे गणपती अशा वेगवेगळ्या गणेशरुपांशिवायही काही विशेष मूर्तीही देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आढळतात.
त्यांपैकी काही तर चक्क स्त्री रुपातील आहेत...
विनायकी, गणेशिनी, पिलियारिनी अशा वेगवेगळ्या नावांनी या मूर्ती ओळखल्या.
त्याशिवाय त्यांच्या हातात बांगड्याही दिसतात. तामिळनाडूच्या वेगवेगळ्या भागातही 'विनायकी'च्या मूर्ती आढळल्या आहेत.
पण या खरंच गणपतीच्या मूर्ती आहेत का? त्यांचा इतिहास काय आहे?
विनायकी हे नाव कुठून आलं?
या मूर्ती वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जात असलं तरी विनायकी हे त्यांच्यासाठी वापरलं जाणारं सर्वसाधारण नाव आहे.
त्यांचं मस्तक हे हत्तीचं आणि शरीर हे स्त्रीचं आहे. या मूर्तींची गावागावांमध्ये वेगळी आहेत. 'गॉडेस विनायकी- फिमेल गणेशा' या पुस्तकात पी. के. अग्रवाल यांनी म्हटलं आहे की, विनायकी या नावाचा उल्लेख हिंदू धर्मातील 64 योगिनींमध्येही आढळतो.
याच नावाच्या देवतेचा उल्लेख बौद्ध वाङ्मयातही आढळतो, असं संशोधक म्हणतात.
तामिळनाडूमध्ये या मूर्ती कुठे आहेत?
कन्याकुमारी जिल्ह्यातील अलगाम्मा मंदिरामध्ये वीणा वादन करणारी विनायकीची एक मूर्ती आहे. याच जिल्ह्यातील सुचिंद्रा इथल्या एका मंदिरातही विनायकीचं कोरलेलं शिल्प आढळतं.
या मूर्ती विजयनगर साम्राज्याच्या काळातील असाव्यात, असं पी. के. अग्रवाल यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.
मदुराईमधील मीनाक्षी अम्मन मंदिरातही स्त्री रुपातील गणेश मूर्ती पाहायला मिळतात. पण, या विनायकाच्या मूर्तीचे पाय हे वाघाप्रमाणे आहेत. त्यामुळेच त्यांना 'व्याघ्रपद विनायकी' असंही म्हणतात.
याशिवाय तामिळनाडूच्या चिदंबरम नटराज मंदिर, इरोडे भवानी मंदिर, तिरुनेलवेली, विरुधुनगर जिल्ह्यामध्येही विनायकीच्या मूर्ती सापडल्या आहेत.
तामिळनाडूव्यतिरिक्त महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि ओडिशामध्येही अशा गणेश मूर्ती आढळल्या आहेत.
1. मध्य प्रदेशाच्या जबलपूरमध्ये विनायकीची मूर्ती आढळली आहे. ती दहाव्या शतकातील असावी असा अंदाज आहे.
2. ओडिशामधील भुवनेश्वरमध्ये आढळलेली विनायकीची मूर्तीही दहाव्या शतकातलीच आहे.
3. मध्य प्रदेशातील मंदसौरमधील विनायकीची मूर्ती. या मूर्तीची सोंड आणि हात भंगलेले असल्याचं फोटोत दिसत आहेत.
यासंबंधी काही कथा आहेत का?
विनायकीसंबंधीच्या काही कथा किंवा त्याच्या व्युत्पत्तीसंबंधी कोणतंही स्पष्टीकरण मिळत नाही, असं तामिळनाडू आर्किऑलॉजी डिपार्टमेंटचे माजी सहायक संचालक संतालिंगम यांनी सांगितलं.
तामिळनाडूमध्ये प्रत्येक जण त्याला हव्या त्या स्वरूपात देवतेची उपासना करू शकतो...यालाही सहाव्या शतकापासूनच सुरूवात झाली होती. त्या व्यतिरिक्त विनायकीचं मूळ काय आहे, याबद्दल फारशा काही परंपरागत कथा आढळत नाहीत, असं संतालिंगम यांनी म्हटलं.
त्याशिवाय पुरूष देवतांना समांतर अशा स्त्री देवता तयार करण्यात आल्या होत्या. 'सप्त कन्यां'मध्ये त्यांची अत्यंत काळजीपूर्वक वर्गवारी करण्यात आली होती. वैष्णवी, महेश्वरी, इंद्राणी अशी ही नावं आहेत. भाषा-प्रांतानुसार ही नावं बदलतात. या स्त्री देवतांकडे स्वतंत्र देवता म्हणूनच पाहिलं जात. गणेशाच्या स्त्री रुपातील मूर्तींबद्दलही असंच काहीसं झालेलं असू शकतं.
'गॉडेस विनायकी- फिमेल गणेशा' या पुस्तकात पी. के. अग्रवाल यांनीही असाच काहीसा निष्कर्ष मांडला आहे.
"विनायकी किंवा वाराखी ही गणेशची पत्नी नाहीये. पुरूष देवतांच्या प्रतिमांप्रमाणे या स्त्री देवतांच्या प्रतिमा तयार करण्यात आल्या असाव्यात. हेच विनायकीचं नेमकं मूळ असावं, असं मात्र निश्चितपणे सांगता येणार नाही," असंही ते म्हणतात.
संशोधक बालाजी मुंडकर यांनी त्यांच्या शोधनिबंधात म्हटलं आहे, की जैन आणि बौद्ध धर्मामध्ये विनायकीचा उल्लेख स्वतंत्र देवता म्हणून आहे. बौद्ध वाड्मयात या देवतेचा उल्लेख 'गणपती हृदया' म्हणूनही केला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotifyआणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)