You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पॅलेस्टाईनचा हल्ला हे मोसादचं अपयश? इस्रायलच्या गुप्तचर संस्थेचं कुठे चुकलं?
- Author, फ्रँक गार्डनर
- Role, बीबीसी संरक्षण प्रतिनिधी
“आम्हाला कळलं नाही हे सगळं कसं झालं.”
इस्रायलच्या इतक्या सुसज्ज यंत्रणेला या हल्ल्याचा अंदाज कसा आला नाही असा प्रश्न मी इस्रायलच्या अधिकाऱ्यांना विचारला तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
शनिवारी (7 ऑक्टोबर) पहाटे जेव्हा गाझा पट्टीतून इस्रायलवर हजारो रॉकेट डागले गेले त्याच वेळी अनेक सशस्त्र पॅलेस्टिनी सैनिक इस्रायलमध्ये प्रचंड सुरक्षा असलेली सीमा ओलांडण्यात यशस्वी झाले.
इस्रायलची गुप्तचर संस्था शिन बेत, विदेशात हेरगिरी करणारी संस्था मोसाद आणि शक्तिशाली लष्कर असताना कोणालाही या हल्ल्याची कुणकुण लागली नाही का? किंवा त्यांना कळलं असेल आणि हा हल्ला थोपवण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही याची जाणीव त्यांना झाली असेल? असे प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
या हल्ल्यात 100 नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि 985 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात 198 पॅलेस्टिनी नागरिक मारले गेलेत तर 1000 हून अधिक जखमी झाले आहेत.
पश्चिम आशियात इस्रायलकडे सर्वाधिक सुसज्ज गुप्तहेर संस्था आहे.
इस्रायलची गुप्तचर संस्थेचे हेर आणि खबरी पॅलेस्टिनी कट्टरपंथीय गटांशिवाय लेबनन, सीरिया, आणि प्रत्येक ठिकाणी आहेत.
गेल्या काही वर्षांत या संस्थेने कट्टरपंथीय नेत्यांची अत्यंत चलाखीने हत्या केली आहे आणि त्यांना प्रत्येक हालचालीची इत्यंभूत माहिती असते.
जेव्हा एखादा एजंट टार्गेट कारवर जीपीएस ट्रॅकर लावतो तेव्हा त्या कारवर ड्रोनने हल्ला केला जातो. अनेकदा तर स्फोट करणाऱ्या मोबाईलचा वापरही केला गेला आहे.
मूलभूत सुरक्षाव्यवस्थाही चोख आहे. गाझा आणि इस्रायलच्या सीमेवर मजबूत तटबंदी आहे. तिथे कॅमेरे आहेत, ग्राऊंड मोशन सेंसर आहेत. लष्कराची तिथे कायम गस्त असते.
भिंतींवर टोकदार तारांचं कुंपण आहे, त्यामुळे घुसखोरीची शक्यता अतिशय कमी होते. यावेळीही ती तशीच होती.
मात्र, हमासच्या कट्टरपंथीयांनी या भिंती बुलडोझरने पाडल्या, तारा कापल्या आणि समुद्रमार्गे तसंच पॅराग्लायडरच्या सहाय्याने इस्रायलमध्ये घुसलं.
इस्रायलच्या नाकाखाली इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि इतका ताळमेळ साधत हा हल्ला झाला. त्यात हजारो रॉकेट डागले गेले. यावरून हमासने हा हल्ला अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचं दिसून येतं.
इस्रायलच्या गुप्तहेर संस्थेचे कुठे चुकलं?
ऑक्टोबर 1973 मध्ये झालेल्या योम किपूर युद्धात सुद्धा असाच अचानक हल्ला झाला होता. त्या युद्धाला 50 वर्षं होत असताना हा हल्ला कसा झाला असा प्रश्न इस्रायलची प्रसारमाध्यमं विचारत आहेत.
इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की, एक मोठी चौकशी सुरू झली आहे आणि हा प्रश्न पुढचा अनेक काळ विचारला जाईल.
मात्र इस्रायलसमोर सध्या आणखी एक महत्त्वाचं काम आहे. त्यांना सध्या त्यांच्या दक्षिण सीमेवर असलेल्या घुसखोरांना हुसकवून लावायचं आहे आणि सीमेवर हमासच्या कट्टरवाद्यांच्या ताब्यातून लोकांना सोडवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे.
ज्या नागरिकांना ओलीस ठेवलंय, त्यांना सोडवण्यासाठी इस्रायलला उपाय शोधावे लागतील. मग ते चर्चेने असो किंवा एखादं मिशन आखून.
तसंच ज्या जागेवरून रॉकेटचा हल्ला केला त्या जागा नेस्तानाबूत करण्याचा ते प्रयत्न करतील. पण हे अतिशय कठीण काम आहे कारण हे काम अतिशय कमी वेळात करता येण्यासारखं आहे.
हमासच्या आवाहनावर संघर्षात सामील होणाऱ्यांना कसं थोपवायचं आणि या हा लढा पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरण्यापासून कसं रोखायचं ही इस्रायलची सगळ्यात मोठी चिंता आहे.
कारण लेबनॉनला लागून असलेल्या उत्तर सीमेवरील अत्याधुनिक हत्यारांनी सुसज्ज हिजबुल्लाह चे सैनिक या युद्धात सामील होऊ शकतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)