पॅलेस्टाईन आणि गाझा पट्टीचा इतिहास आणि सध्याची स्थिती कशी आहे?

भूमध्य समुद्र, इस्रायल आणि इजिप्तने वेढलेल्या गाझापट्टीचा प्रदेश 41 किलोमीटर लांब आणि 10 किलोमीटर रुंद असून 20 लाख लोकांसाठी हक्काचे आश्रयस्थान आहे.

गेल्या काही वर्षातील गाझा आणि इस्रायलमधील वाढलेल्या तणावाचे रूपांतर अलिकडच्या काळात सर्वात भीषण हिंसाचारात झाले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाला "एका मोठ्या युद्धाचा" इशारा द्यावा लागला होता.

मूलतः इजिप्तच्या ताब्यात असलेला गाझा, 1967 च्या मध्यपूर्व युद्धात इस्रायलने ताब्यात घेतला होता. इस्रायलने 2005 मध्ये आपले सैन्य आणि सुमारे 7,000 स्थायिक माघारी घेतले.

हा प्रदेश अतिरेकी इस्लामी गट हमासच्या नियंत्रणाखाली आहे, या गटानं 2007 मधील हिंसक फुटीनंतर तत्कालीन शासक पॅलेस्टिनी प्राधिकरण (पीए) सोबत निष्ठावान असलेल्या शक्तींना हाकलून दिले होते.

तेव्हापासून, इस्रायल आणि इजिप्तने अतिरेक्यांच्या विरूद्ध सुरक्षा उपाय म्हणून वस्तू आणि लोकांच्या आत आणि बाहेर जाण्यावर निर्बंध घातले आहेत.

हमास आणि इस्रायलमध्ये 2014 साली एक छोटा संघर्ष झाला आणि मे 2021 मध्ये दोन्ही बाजूंनी पुन्हा शत्रुत्वाला तोंड फुटले.

ताजा हिंसाचार कशामुळे भडकला?

इस्त्रायली-पॅलेस्टिनी यांच्यामधील अनेक आठवड्यांच्या तणावानंतर पूर्व जेरूसलेमधील ताबा घेतलेल्या पवित्र धार्मिक स्थळी मुस्लीम आणि यहूदी लोकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर गाझा हिंसाचाराला सुरूवात झाली.

10 मे रोजी इस्रायलला माघार घेण्याचा इशारा दिल्यानंतर हमासने रॉकेट सोडण्यास सुरुवात केली आणि प्रत्युत्तरादाखल हवाई हल्ले सुरू केले. दोन्ही बाजूंनी तीव्र संघर्ष झाला आणि 2014 पासून इस्रायल आणि गाझा यांच्यातील शत्रुत्वाची जागा त्वरित सर्वात वाईट हिंसाचाराने घेतली.

पॅलेस्टिनी लोकसंख्या ही प्रामुख्याने शेजारच्या अरब देशांमध्ये ऐतिहासिक पॅलेस्टाईन आणि स्थलांतरीत अशा पद्धतीने विभागली गेली आहे,

जॉर्डन नदीच्या पश्चिम किनार्‍यावर पॅलेस्टिनी राज्य निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नामुळे आणि भूमध्य सागरी किनार्‍यावरील गाझा इस्रायलशी सुरू असलेल्या संघर्षामुळे हैराण झाला आहे.

पश्चिम किनारा आणि पूर्व जेरुसलेममधील पॅलेस्टिनी लोक 1967 पासून इस्रायलच्या अधिपत्याखाली राहिले आहेत, दरम्यान इस्रायलने पश्चिम किना-यावर बांधलेल्या वसाहतींमध्ये 500,000 लोक राहतात आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार ते बेकायदेशीर असल्याचे मानले जात असले तरी इस्त्रायल याबाबत वाद घालत आहे.

स्थलांतरील पॅलेस्टिनी लोकांच्या स्थितीबद्दलही आणि आत्ताच्या इस्त्रायमधून विस्थापित झालेल्या पॅलेस्टिनी निर्वासितांना त्यांच्या मूळ जागी परत जाण्याची परवानगी द्यायची की नाही या प्रश्नावर देखील विवाद सुरू आहेत.

पॅलेस्टिनी स्वयंनिर्णयासाठी प्रयत्नशील आहेत परंतु त्यांनी त्यांच्या कारभारावर मर्यादित नियंत्रण मिळवले आहे. इस्रायली अधिकाऱ्यांशी त्यांचा संघर्ष कायम हिंसक राहिला आहे.

अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे आणि त्यावर इस्रायली निर्बंध आहेत. बहुतांश लोकसंख्या अन्नाच्या मदतीवर अवलंबून आहे.

पश्चिम किना-यावरील महमूद अब्बास यांचा फताह पक्ष आणि गाझा पट्टीवर नियंत्रण ठेवणारे इस्लामी अतिरेकी हमास विरोधक यांच्यात पॅलेस्टिनी राजकीय नेतृत्व मोठ्या प्रमाणावर विभागलेले आहे.

बहुसंख्य आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्यता दिलेली नसली तरी इस्रायलने 1967 मधील सहा दिवसांच्या युद्धापासून पूर्व जेरुसलेमवर ताबा मिळवला आहे आणि संपूर्ण शहराला त्याची राजधानी मानतो. पॅलेस्टिनी आपल्या राज्याची भविष्यातील राजधानी म्हणून त्यावर दावा करतात.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांचा असा युक्तिवाद आहे की इस्रायली आणि पॅलेस्टिनी यांच्यातील शांतता "द्वि-राज्य तोडग्या"वर अवलंबून आहे, स्वतंत्र पॅलेस्टाईनची स्थापना करण्यात आल्यास इस्रायलच्या बरोबरीने दोन्ही बाजूंना शांततेत सह-अस्तित्वाचा मार्ग निर्माण होईल. तथापि, अलिकडे थोडी प्रगती झाली आहे.

पॅलेस्टिनी प्रदेश:

राजधानी: जेरुसलेम (घोषित, मर्यादित आंतरराष्ट्रीय मान्यता)

प्रशासकीय केंद्र: रामल्ला

क्षेत्रफळ: 6,020 चौरस किलोमीटर

लोकसंख्या: 5.3 दशलक्ष (पश्चिम किनारपट्टी: 3.19 दशलक्ष; गाझा पट्टी: 2.17 दशलक्ष) 5.9 दशलक्ष निर्वासित (आजूबाजूच्या देशांमध्ये आणि इतरत्र: UNRWRA)

भाषा: अरबी

आयुर्मान: 72 वर्षे (पुरुष) 77 वर्षे (महिला)

गाझा पट्टीतील जीवन

गाझामध्ये वीज पुरवठा खंडित होणे ही रोजची घटना आहे. ताज्या हिंसाचारापूर्वी गाझामधील घरांना आळीपाळीने आठ तास वीज मिळत होती.

ताज्या हिंसाचारामुळे वीजेच्या तारांचे नुकसान झाले आणि वीज पुरवठा विस्कळीत झाल्याचे म्हटले जाते. संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवतावादी व्यवहार समन्वयासाठीच्या कार्यालय (Ocha - ओचा) नुसार, बहुतेक घरांमध्ये आता फक्त तीन-चार तास वीज मिळत आहे.

गाझापट्टीला बहुतांश वीज इस्रायलमार्फत गाझाच्या एकमेव पॉवर प्लांट (वीज प्रकल्प) मधून आणि काही प्रमाणात इजिप्तकडून मिळते.

गाझा पॉवर प्लांट (GPP) आणि अनेक लोकांचे खासगी जनरेटर हे दोन्ही डिझेल इंधनावर अवलंबून आहेत, परंतु इस्रायल मार्गे येणारा पुरवठा वारंवार रोखला जातो, ज्यामुळे वीज पुरवठ्यात अधिक व्यत्यय येतो.

सीमारेषा ओलांडण्यावर बंधनं

2007 मध्ये गाझामध्ये हमासची सत्ता आल्यापासून, इजिप्तने गाझालगतची सीमा बंद ठेवली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीही अतिरिक्त निर्बंध लादण्यात आले होते. ताज्या हिंसाचारापर्यंत वाहतूक पूर्ववत झाली होती. त्यानंतर काही मदत ताफ्यांना परवानगी देण्यात आली आहे, अन्यथा याव्यतिरिक्त क्रॉसिंग बंद आहेत.

संयुक्त राष्ट्र संघाच्या म्हणण्यानुसार गाझाची सुमारे 80% लोकसंख्या आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून आहे आणि सुमारे दहा लाख लोक दैनंदिन अन्न मदतीवर अवलंबून आहेत. इस्रायलने लादलेल्या नाकाबंदीमुळे पट्टीमध्ये आणि बाहेरील हालचालींवर आणि व्यापार करण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम झाला आहे.

नाकेबंदीवर पर्याय म्हणून हमासने बोगद्यांचे जाळे तयार केले आहे ज्याचा वापर ते पट्टीमध्ये माल आणण्यासाठी आणि भूमिगत कमांड सेंटर म्हणून करतात. इस्रायलचे म्हणणे आहे की अतिरेकी स्वसंरक्षणासाठी बोगद्यांचा वापर करतात आणि हवाई हल्ले करून त्यांना लक्ष्य केलं जातं.

वाढती लोकसंख्या आणि रॉकेट हल्ल्यांमध्ये होणारे घरांचे नुकसान

जगातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता गाझापट्टीत आहे. संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्यानुसार, गाझामधील जवळपास 600,000 निर्वासित आठ छावण्यांमध्ये दाटीवादीने राहत आहेत.

प्रति चौरस किलोमीटरमध्ये सरासरी 5,700 पेक्षा जास्त लोक राहतात - लंडनमधील लोकसंख्येची घनता एवढीच आहे - परंतु गाझा शहरात ही संख्या आता 9,000 पेक्षा जास्त झाली आहे.

2014 च्या हिंसाचारात सुमारे 140,000 घरे उद्ध्वस्त किंवा नष्ट झाल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्र संघाने व्यक्त केला आहे आणि त्यानंतर जवळपास 90,000 कुटुंबांना त्यांची घरे पुन्हा बांधण्यासाठी मदत करण्यात आली आहे.

कोलमडलेली आरोग्य सेवा

गाझाची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था विविध कारणांमुळे कोलमडलेली आहे. 'ओचा' नुसार इस्त्राईल आणि इजिप्तची नाकेबंदी, पश्चिम किनारपट्टी - आधारित 'पीए'कडून आरोग्यावरील किरकोळ खर्च आणि पीएमधील अंतर्गत राजकीय संघर्ष - ज्यांच्यावर पॅलेस्टिनी प्रदेशातील लोकांच्या आरोग्यसेवेची जबाबदारी आहे - आणि हमास हे सर्व यासाठी दोषी आहेत.

संयुक्त राष्ट्र संघातर्फे चालवल्या जाणा-या 22 आरोग्य सुविधा केंद्रांद्वारे मदत केली जाते. परंतु इस्रायलसोबतच्या मागील संघर्षात अनेक रुग्णालये आणि दवाखान्यांचे नुकसान झाले किंवा ती नष्ट झाली.

विस्कळीत झालेली खाद्यपदार्थांची वाहतूक

संयुक्त राष्ट्र संघाच्या म्हणण्यानुसार, गाझामधील दहा लाखांहून अधिक लोकांना "मध्यम ते गंभीर अन्न असुरक्षित" म्हणून वर्गीकृत केले गेले आहे, असं असूनही अनेकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे अन्न मदत मिळत आहे.

मदत ताफ्यांना परवानगी देण्यासाठी सीमा क्रॉसिंग उघडण्यात आल्या आहेत, परंतु गोळीबारामुळे वितरणात अडचणी येतात.

पाणीटंचाई

गाझामधील बहुतेक ठिकाणी पाण्याची टंचाई आहे. नळाचे पाणी खारट आणि प्रदूषित असून ते पिण्यास योग्य नाही.

गाझामधील बहुतांश घरे पाण्याच्या पाईपद्वारे जोडली गेली असतानाही अपुऱ्या वीजेमुळे 2017 मध्ये प्रत्येक कुटुंबाला दर चार दिवसांनी फक्त सहा-आठ तास पाणी मिळाले. ताज्या हल्ल्यांमुळे हे प्रमाण आणखी कमी झाले आहे.

शाळांचा निवारा म्हणून वापर

अनेक मुले संयुक्त राष्ट्र संघाद्वारे चालवल्या जाणार्‍या शाळांमध्ये शिकतात आणि त्यापैकी अनेक शाळा गोळीबारापासून स्वत:ला वाचवण्यासाठी पळून आलेल्या लोकांसाठी आश्रयस्थान म्हणून काम करत आहेत.

पॅलेस्टिनी निर्वासित एजन्सी UNRWA च्या मते, त्यांच्या 275 शाळांपैकी 64% शाळा "डबल शिफ्ट" प्रणालीप्रमाणे चालवल्या जातात, ज्यामध्ये विद्यार्थ्यांची एक शाळा सकाळी आणि दुसरी दुपारी असते.

तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक

सीआयए फॅक्टबुकनुसार, गाझामध्ये जगातील सर्वात तरुण लोकसंख्या आहे, ज्यात जवळपास 65% लोकसंख्या 25 वर्षांपेक्षा कमी आहे. मात्र अनेक तरुण बेरोजगार आहेत.

2020 च्या 'ओचा'च्या अहवालात म्हटले आहे की तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण जवळपास 70% आहे, कोरोना साथीचाही यावर अंशतः परिणाम झालेला पाहायला मिळतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)