महिलांना पाहून सार्वजनिक ठिकाणी हस्तमैथुन करणाऱ्यांवर ‘हे’ आहेत कायदेशीर कारवाईचे पर्याय

    • Author, सुशीला सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तो दिवस होता 21 जुलैचा, संध्याकाळचे सात वाजले असतील.

त्या दिवशी बंगळुरूच्या टाऊन हॉल परिसरात मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी होऊन घरी परतत असताना अथिरा पुरुषोत्तम कॅब बुक करत होत्या.

पण त्यांना टॅक्सी मिळाली नाही आणि त्यामुळे रॅपीडोचा वापर करून त्यांनी बाईक बुक केली.

केरळच्या अथिरा पुरुषोत्तम तिथे एका स्वयंसेवी संस्थेसोबत काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्या तरुणांना लैंगिक विषय, प्रजननाचे हक्क आणि अधिकार इत्यादींबाबत जागरूक करण्याचे काम करतात.

अथिरा म्हणतात की, "रॅपीडोची बाईक चालवणाऱ्याने त्यांना दुसरा नंबर दिला आणि सांगितले की तो ट्राफिकमध्ये अडकला असल्यामुळे त्याला यायला उशीर होईल."

बीबीसीसोबत बोलताना अथिरा पुरुषोत्तम यांनी सांगितले की, "त्यांनी बुक केलेली बाईक आणि प्रत्यक्षात त्यांना नेण्यासाठी आलेली बाईक या दोन्ही दुचाकींचा नंबर वेगवेगळा होता."

जेंव्हा अथिराने त्या दुचाकी ड्रायव्हरला गाडीच्या नंबर प्लेटबद्दल विचारले तेंव्हा तो म्हणाला की रॅपीडोकडे नोंदणी केलेली गाडी सर्व्हिसिंगसाठी दिलेली आहे त्यामुळे तो ही दुसरी बाईक घेऊन आलाय.

मग अथिरा पुरुषोत्तम यांनी त्यांनी केलेल्या बुकिंगच्या संदर्भातले सगळे तपशील पुन्हा एकदा तपासले आणि घरी जाण्यासाठी त्या आलेल्या बाईकवर बसल्या.

त्या दिवशी नेमकं काय घडलं

त्यांनी सांगितलं की त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक अतिशय निर्जन जागा आहे तिथे बांधकाम सुरु आहे.

अथिरा म्हणतात की, "बाईक त्या ठिकाणी आल्यावर तो माणूस केवळ त्याच्या उजव्या हाताने बाईक चालवत होता आणि डावा हात हलवत होता, त्याची उंची कमी होती म्हणून मी लक्ष देऊन पहिले तर मला दिसलं की तो हस्तमैथुन करत होता."

अथिरा पुरुषोत्तम सांगतात, “ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथं कोणतंही घर नव्हतं, मी घाबरले. मला स्वतःला धोक्यात घालायचं नव्हतं म्हणून गप्प राहणंच बरं असं मला वाटलं. तो माणूस माझ्यावर बलात्कार करेल की काय अशी मला भीती होती."

त्या सांगतात की, "या व्यक्तीला माझ्या घराचा पत्ता माहित असावा असं मला वाटत नव्हतं, म्हणून मी त्याला 200 मीटर दूरच सोडण्यास सांगितलं आणि तो गेल्यानंतर मी घराकडे निघाले."

अथिरा म्हणतात की त्यानंतर त्या माणसाने त्यांना व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवायला सुरुवात केली आणि त्यांनी त्याला ब्लॉक केलं.

या घटनेनंतर अथिरा पुरषोत्तम यांनी याबाबत रॅपिडोकडे तक्रार केली आणि मग रॅपीडोने त्या माणसाला कामावरून काढून टाकलं आणि त्याचं नाव काळ्या यादीत टाकलं.

या प्रकरणाची त्यांनी अधिकृत पोलीस तक्रारही दाखल केली आणि त्या एफआयआरमध्ये आरोपीच्या विरोधात आयपीसीच्या कलम 354(A), 354(D) आणि 294 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

हे एकमेव प्रकरण नाहीये

बंगळुरूमध्ये अथिरा पुरुषोत्तम यांच्यासोबत जे घडले ती अशाप्रकारची पहिलीच घटना नव्हती.

नुकताच दिल्ली मेट्रोमध्ये एका व्यक्तीने सार्वजनिकरित्या हस्तमैथुन केल्याचा व्हीडिओही व्हायरल झाला होता.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ही घटना अतिशय लाजिरवाणी असल्याचं सांगत तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली.

पोलिसांनी याप्रकरणी एफआयआरही नोंदवला आहे.

दुसरीकडे, अलीकडेच कर्नाटकात एका महिला प्रवाशाने ड्रायव्हरने तिला पॉर्न व्हीडिओ दाखवून हस्तमैथुन केल्याची तक्रार केली होती.

विकृत मानसिकतेची लक्षणं

मानसोपचार तज्ज्ञांच्या मते हे आजारी मानसिकतेचे लक्षण आहे आणि याला मानसिक आरोग्याशी संबंधित आजार मानता येणार नाही.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पूजाशिवम जेटली यांनी बीबीसीशी केलेल्या संभाषणात सांगितले की, "सार्वजनिक ठिकाणी किंवा महिलांच्या समोर केलेलं हे कृत्य हेच दाखवतं की अशा व्यक्तींसाठी लैंगिक सुख मिळवणे सगळ्यांत जास्त महत्वाचं असतं मात्र त्यांना हे कळत नाही सार्वजनिक ठिकाणी तसं करणं हे स्वीकारार्ह नाही."

त्यांच्या मते, "ही विचारधारा पूर्वापार चालत आलेली आहे जिथे पुरुषांच्या गुप्तांगांना शक्तीचं प्रतीक समजलं जातं. तर दुसरीकडे, महिला किंवा मुलांसमोर तुमचे प्रायव्हेट पार्ट दाखवणं किंवा सार्वजनिक ठिकाणी पॉर्न पाहणं अशा कृतींमुळे हेच दिसतं की समाजात महिला आणि लहान मुलांची परिस्थिती कमकुवत आहे आणि अशी कामं करणाऱ्यांना ते रोखू शकत नाहीत."

ही तर निव्वळ गुंडगिरी

याच चर्चेला पुढे नेत लैंगिक विषयांचं वार्तांकन करणारे पत्रकार नसीरुद्दीन म्हणतात की, "सार्वजनिक ठिकाणी केलेलं अशा प्रकारचं कृत्य पुरुषांची गुंडगिरी, पितृसत्ता आणि विकृत लैंगिक मानसिकतेचं लक्षण आहे."

ते म्हणतात की, "पुरुषाच्या गुप्तांगाला त्यांच्या पुरुषत्वाशी जोडून पाहण्यात येतं. पुरुषही त्याच अवयवाचा वापर करून त्यांचं पुरुषत्व सिद्ध करू पाहतात. एवढंच नाही तर याबाबत पुरुष नेहमी चिंताग्रस्त असतात."

नसीरुद्दीन म्हणतात की, "समाजात तुम्ही अनेकदा फक्त चड्डी-बनियान घातलेले पुरुष अगदी मोकळेपणाने फिरताना, कुठेही उभं राहून लघवी करताना पहिले असतील आणि कोणालाही त्यात वावगं वाटत नाही. पुरुष त्यांच्या या अवयवामध्ये महिलांना पाहतात आणि त्यांच्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्याचं महिला हे निव्वळ एक साधन आहेत असं त्यांना वाटतं."

डॉ. पूजाशिवम जेटली म्हणतात की असे लोक वास्तवापासून दूर राहतात आणि अशा कृत्याने इतरांना किती त्रास होऊ शकतो हे त्यांना समजत नाही.

"अशा प्रकारच्या इतरही काही बातम्या आल्या होत्या, याचा अर्थ असा होत नाही की अशी प्रकरणं वाढली आहेत पण हो अशा प्रकरणांची नोंदणी मात्र नक्कीच वाढली आहे."

कायद्याचा आधार

प्रत्येक बाईला तिच्या घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी कधी ना कधी अशा वाईट अनुभवाला सामोरं जावं लागतं. तरीही यातील अनेक महिला लाजेपोटी गप्प राहतात तर काही मात्र त्या विरोधात आवाज उठवतात.

एका क्षणासाठी अथिरा पुरुषोत्तम देखील थबकल्या असतील मात्र नंतर त्यांनी रॅपिडो, पोलीस आणि सोशल मीडियावर या प्रकरणाच्या विरोधात आवाज उठवला आणि तक्रारही दाखल केली.

भारतीय कायद्यानुसार, जर एखाद्या महिलेसोबत अशी घटना घडली तर ती शून्य एफआयआर दाखल करू शकते, याचा अर्थ ती घटना कुठेही घडली असेल तर ती कोणत्याही पोलीस ठाण्यात जाऊन तिची तक्रार नोंदवू शकते.

यासोबतच महिलांना ऑनलाईन तक्रार दाखल करण्याचीदेखील सुविधा आहे.

महिलांच्या प्रश्नांवर मोकळेपणाने बोलणाऱ्या आणि उच्च न्यायालयात वकील म्हणून काम करणाऱ्या सोनाली कडवसरा म्हणाल्या की, "सोशल मीडियावर तुमचं म्हणणं मांडणं ठीक आहे पण तो अगदीच अनौपचारिक मार्ग आहे त्यामुळे अशा घटनांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणंच योग्य ठरेल."

त्यांच्या म्हणण्यानुसार, "जर एखाद्या महिलेला या प्रकरणी खरोखरच कारवाई करायची असेल, तर तिने लवकरात लवकर एफआयआर नोंदवला पाहिजे आणि शांतपणे तिच्यासोबत घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती दिली पाहिजे."

यासोबतच अशा प्रकारणांबाबत बोलताना त्यांनी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की "जर एखाद्या महिलेने टॅक्सी बुक करण्यासाठी एखाद्या कंपनीची मदत घेतली किंवा तिच्या घराची साफसफाई करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी एखाद्या ॲपची मदत घेतली असेल आणि ती सेवा देण्यासाठी आलेल्या व्यक्तीने काही अनुचित प्रकार केला तर त्या कंपनीकडे देखील तशी तक्रार महिलांनी दाखल केली पाहिजे."

या कंपन्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाबाबत पॉश कायदा 2013 अंतर्गत कारवाई करण्यास बांधील आहेत.

सोनाली कडवसरा म्हणतात की, "तक्रार करणारी महिला त्यांच्या कंपनीत काम करत नसली तरी, तिला त्रास देणारी व्यक्ती कंपनीची कर्मचारी आहे आणि कंपनी तिच्याविरुद्ध अंतर्गत तक्रार समिती (ICC) अंतर्गत कारवाई करते."

अथिरा प्रकरणातही रॅपिडोने आरोपीवर कारवाई केली.

बंगळुरूमध्ये याप्रकरणी आयपीसीच्या कलम 354 (ए), 354 (डी) आणि 294 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनाली कडवसरा यांनी हे निदर्शनास आणून दिले की या दोन्ही कलमांतर्गत लैंगिक छळाच्या प्रकरणात तक्रार दाखल केली जाऊ शकते. एकीकडे कलम 354 मध्ये महिलेवर केलेल्या बळजबरी किंवा आयोग्य वर्तनाचा समावेश होतो तर दुसरीकडे कलम 354-अ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊन शिक्षा झाल्यास 3 वर्षांची शिक्षा होते.

दुसरीकडे, कलम 294 हे कलम सार्वजनिक ठिकाणी केलेल्या अश्लील कृत्याशी संबंधित आहे, ज्यामध्ये तीन महिन्यांच्या शिक्षेची आणि दंडाची तरतूद आहे.

दिल्लीतल्या 'परी' नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक योगिता भयना यांनी त्यांचा वैयक्तिक अनुभव सांगितला आणि म्हणाल्या की "अशा घटना त्यांच्यासोबतही घडल्या आहेत आणि त्यादेखील घाबरल्या होत्या."

परंतु अशा परिस्थितीत घाबरून न जाता मदत घ्यावी असे त्या म्हणतात.

"तसंच अशा प्रकरणांच्या विरोधात नक्कीच तक्रार दाखल केली पाहिजे. कदाचित अशा घटनांकडे दुर्लक्ष करून पुढे जाता येणे तुमच्यासाठी शक्य असेल पण एखादी दुसरी मुलगी अशा व्यक्तीची शिकार ठरू शकते आणि तो व्यक्ती पुन्हा पुन्हा असे गुन्हे करत राहील."

यासोबतच एखादी टॅक्सी किंवा बाईक बुक केली तर त्यासंदर्भातले सगळे तपशील तपासून पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)