'माझी आई एक तवायफ होती - आणि हे सांगताना मला लाज वाटत नाही'

    • Author, शर्लिन मोलान
    • Role, बीबीसी न्यूज, मुंबई

"मी अंधारात नृत्य केलंय. खोलीत मेणबत्त्या लावून त्या उजेडात मी नाचायचे. त्या ब्लॅकआउटच्या अंधःकारातूनच माझ्या नशिबात प्रकाशवाट येणार होती."

1962 चं ते वर्ष होतं. भारत आणि चीनमध्ये सीमेवरून वाद सुरू होता आणि त्याची परिणती युद्धात झाली. भारत सरकारने आणीबाणी जाहीर केली.

ते दिवस असे होती की, सायरनच्या आवाजाने लोकांमध्ये घबराट व्हायची. दिवस दिवस ब्लॅकआउट असे. कधी काय होईल सांगता येत नव्हतं.

पण रेखाबाईला हे मरणाचं भय आपल्या नशिबावर राज्य करणं मान्य नव्हतं. ती नटून-नजून चांगली साडी नेसून तयार होई आणि रात्र रात्र आपल्या दारी येणाऱ्या पुरुषांचं गाऊन आणि नाचून मनोरंजन करीत राहिली.

तिच्या कोठ्यावर पुरुषांची गर्दी होत असे. नृत्य आणि गायन करून रिझवणारी तवायफ किंवा मराठीत नायकीण म्हणतात तशा नायकिणीची ही कोठी होती.

रेखाबाईला तिच्या आयुष्यात धडा मिळाला होता की, कष्टातूनच संधी मिळते. किमान जगण्याची संधी तर नक्कीच मिळते, हे ती शिकली होती.

रेखाबाईच्या उलथापालथीच्या आयुष्यावर आता एक पुस्तक आलं आहे. The Last Courtesan (अखेरची नायकीण/तवायफ)हे त्याचं नाव आणि ते लिहिलं आहे तिच्या मुलाने - मनीष गायकवाडने.

"माझ्या आईला कायमच तिची कथा सगळ्यांना सांगायची होती," गायकवाड सांगतात. आणि तिची कथा सांगताना कुठलीही लाज किंवा वैषम्य वाटत नाही, असंही ते नमूद करतात.

लेखक मनीष यांचं बालपण आईबरोबर कोठ्यावरच गेलं त्यामुळे तिचं आयुष्य मुलासाठी काही गुपीत नव्हतं.

कसं असायचं नायकिणींचं आयुष्य?

"एखाद्या कोठ्यावर लहानाचा मोठा होताना लहान मुलाला जे दिसायला नको तेही दिसत असतं. माझ्या आईला याची कल्पना होती आणि म्हणूनच तिला काही लपवून ठेवावंस वाटलं नाही," गायकवाड सांगतात.

आईने सांगितलेल्या आठवणींच्या आधारे त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक 20व्या शतकाच्या मध्यात भारतीय नायकिणींचं किंवा तवायफ म्हणून जगणाऱ्या स्त्रियांचं आयुष्य कसं होतं याची धक्कादायक जाणीव करून देतं.

Courteasans म्हणजे भारतीय संदर्भात तवायफ किंवा नायकीण. इसवीसनापूर्वी दुसऱ्या वर्षापासून भारतीय उपखंडात नायकिणी होत्या आणि त्याचे संदर्भ उपलब्ध आहेत, असं मधुर गुप्ता सांगतात.

'Courting Hindustan: The Consuming Passions of Iconic Women Performers of India' या पुस्तकाच्या गुप्ता लेखक आहेत. त्या स्वतः ओडिसी नृत्यकलाकारही आहेत.

"बड्या लोकांचं, राजा-महाराजांचं आणि साक्षात देवांचं मनोरंजन करायचं. त्यांना रिझवायचं हे काम करणाऱ्या या स्त्रिया होत्या", गुप्ता सांगतात.

भारतावर इंग्रजांचं राज्य येण्यापूर्वीच्या काळात त्या दरबारी नृत्यांगना होत्या. त्यांना समाजात मान होता. कलेचं व्यवस्थित शिक्षण घेतलेल्या, श्रीमंत नृत्य-गायन कलाकार म्हणून त्यांना ओळखलं जाई. राजे-महाराजे आणि त्या काळातले लब्धप्रतिष्ठित सत्ताधारी त्यांना आश्रय देत.

"पण त्या काळात त्यांचंही समाजाने आणि पुरुषांनी शोषण केलं," गुप्ता सांगतात.

कथाकादंबऱ्यांमधून समोर आलेल्या नायकिणींच्या कहाण्या

ब्रिटीशांचं राज्य आल्यानंतर भारतातली तवायफ संस्कृती लयाला जाऊ लागली.

ब्रिटीश त्यांना nautch girls म्हणजे निव्वळ नाच-गाणी करणाऱ्या मुली म्हणायचे आणि त्यांच्याकडे वेश्या म्हणूनच पाहू लागलं जाऊ लागलं. त्यामुळे त्यांचा व्यवसाय बंद करण्यासाठी ब्रिटिशांनी कायदे कानून केले.

त्यांचा मान-मरातब, पैसा सगळं गेलं. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर तर अनेक नायकिणींना उदरनिर्वाहासाठी निव्वळ शरीरविक्रय किंवा वेश्या व्यवसायच करावा लागला.

आता तवायफ किंवा नायकिणी भारतातून पार हद्दपार झाल्या आहेत. तरीही प्रसिद्ध नायकिणींच्या रंजक कहाण्या आणि बेधडक आयुष्य यांच्या कथा मात्र पुस्तकरूपाने किंवा चित्रपटांमधून अजूनही सांगितल्या जातात.

त्यातलीच एक कथा आहे रेखाबाईची.

मेणबत्तीच्या प्रकाशात केलेल्या नृत्यांतून स्वतंत्र होण्याचा मार्ग

रेखाबाईचा जन्म पुण्याचा. 10 भावडांमध्ये ती सहावी. रेखाबाईला तिच्या जन्माची नेमकी तारीख किंवा सालसुद्धा लक्षात नाही.

पहिल्या पाच मुलीच असल्याने बाप चिंतेने व्यथित असताना सहावी मुलगीच झाली. तिच्या गरीब बापाने म्हणे तिच्या जन्मानंतर विहिरीत फेकून देण्याचा प्रयत्न केला होता.

कुटुंबावरच्या कर्जाचं ओझं थोडं कमी व्हावं या हेतून तिचं वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षीच लग्न लावून देण्यात आलं. नंतर तिच्या सासरच्यांनी तिला कोलकात्याच्या बावबाझार भागात एका कोठ्यावर चक्क विकून टाकली.

कोठ्यावर राहून तवायफ म्हणून नाच-गाणं शिकायला सुरुवात केली त्या वेळी रेखा बारा वर्षांचीही नव्हती. तिचं आयुष्य आणि कमाई हेही तिचं नव्हतं. तिचीच एक दूरची नातेवाईक आणि तिथेच तवायफ म्हणून काम करणाऱ्या एका बाईकडे तिला सोपवलं गेलं.

भारत-चीन युद्ध सुरू झालं आणि त्या अशांत भयग्रस्त वातावरणात तिची ती नातेवाईक बाई कोठी सोडून गेली.

रेखाबाईला तिचं स्वतःचं आयुष्य पुन्हा स्वतःच्या हाती घ्यायची संधी मिळाली. मेणबत्तीच्या प्रकाशात तिने केलेली नृत्य तिला कमाई देऊ लागली आणि ती स्वतंत्र व्हायचा मार्ग मोकळा झाला. आपण थोडं धाडस दाखवलं तर स्वतःच्या जिवावर जगू शकतो, स्वतःचं संरक्षण करू शकतो याची जाणीवही तिला याच काळात झाली.

कोठीच बनली त्यांची ताकद

तिच्या उर्वरित आयुष्यात हीच जाणीव तिला आधार देत राहिली. तवायफची गोष्ट सांगणारे प्रसिद्ध हिंदी चित्रपट 'उमराव जान' किंवा 'पाकीजा'मध्ये दाखवलेल्या नायिकांसारखी ती कुठल्याही एका माणसासाठी झुरली नाही.

तिच्याकडे येणाऱ्यांमध्ये अनेक श्रीमंत शेख, प्रसिद्ध संगीत कलाकार होते तसंच काही कुख्यात गुंडही. पण रेखाबाईने पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्न केलं असतं तर कोठा सोडून ती राहू शकली असती. तिचं तवायफ म्हणून आयुष्य कदाचित संपलं असतं. पण तरीही तिने पुन्हा लग्न केलं नाही.

तिचा कोठा हा तिच्यासाठी एका अर्थाने स्वातंत्र्याचं प्रतीक ठरला. तो कोठा तिचा होता. तिची स्वतःसाठीची जागा होती. ती तिथे परफॉर्म करायची. तिच्या मुलाला तिने तिथेच वाढवलं आणि तिच्या कुटुंबातल्या अनेकांना त्यांच्या वाईट काळात तिने तिथेच आसरा दिला. ती छोटी कोठी तिची ताकद ठरली.

असं असलं तरी ती जागा अपार कष्ट, मेहनत आणि संघर्षाने मिळाली होती. या सगळ्यात निष्पाप मन कधीच मेलं होतं. परिस्थितीने माणुसकीही संपवली आणि राग, भीती, निराशा अशा वाईट भावनांनी तिची जागा बळकावली.

‘कोठ्याची एक भाषा असते. ती मला चांगलीच अवगत झाली’

या पुस्तकात गायकवाड यांनी आपल्या आईने सांगितलेल्या अनेक थरारक आठवणी नोंदवल्या आहेत - उदाहरणार्थ तिने लग्नाला नकार दिला म्हणून एका गुंडाने तिच्यावर गोळी झाडण्यासाठी बंदूक रोखली होती.

रेखाबाईच्या कोठ्यावरच्या संघर्षाच्याही आठवणीही पुस्तकात आल्या आहेत. तिच्या यशाचा आणि प्रसिद्धीचा इतर नायकिणींना हेवा वाटायचा. त्या रेखाबाईचा छळ करायचा. तिला शिव्या-शाप द्यायच्या.

काही जणींनी तर तिला धमकावण्यासाठी भाडोत्री गुंड आणून तिच्या खोलीबाहेर उभे केले होते. रेखाबाई देहविक्रय करणारी स्त्री नव्हती, तरी तिची वेश्या म्हणून अवहेलना केली जायची.

पण या सगळ्या संघर्षातूनच वर येत ती कणखर बनली. टक्के-टोणपे खात यशस्वी झाली. तिथेच तिला हळूहळू आपल्यातील नृत्यकौशल्याची आणि त्यातल्या जादूची जाणीव झाली. अनेक पुरुष नेहमीच्या निरस जीवनात विरंगुळा शोधायला यायचे, काही जण स्वतःच्या असुरक्षितपणाच्या भयाने यायचे तर काही उदासीनतेच्या गर्तेत असायचे. ती तिच्या नृत्यकौशल्याने त्यांचं मन रिझवायची.

इथेच ती पुरुष वाचायला शिकली. आपल्याला कोण कसं वागवतो यावरून तिला पुरुषाचा बरोबर अंदाज यायचा. कुठे पुरुषी अहंकार गोंजारायचा आणि कुठे आपल्या आत्मसन्मानावर आच यायला लागली तर तोच पुरुषी अहंकार कसा जागीच ठेचायचा हे तिला बरोबर कळलं.

"कोठ्याची एक भाषा असते. ती मला चांगलीच अवगत झाली होती. जिथे गरज असेल तिथे मी त्याच भाषेत बोलायचे", रेखाबाई सांगतात.

मुलाबद्दलचा अभिमान

पण या कोठ्यातच या सुंदर, बेधडक, मनमोहक अदाकाराचं एका अत्यंत प्रेमळ, कर्तव्यकठोर आणि सुजाण आईमध्ये रुपांतर झालं. आपल्या मुलाच्या भल्यासाठी, त्याला चांगलं आयुष्य मिळावं यासाठी तिला शक्य असेल ते सगळं तिने केलं.

मुलगा लहान असताना तिने त्याला कायम आपल्याबरोबर कोठ्यातच ठेवला. नृत्याची मैफल सुरू असताना रडण्याचा आवाज आला तर कशी ती मध्येच नाचता नाचता त्याला बघायला जायची हे रेखाबाई आठवून सांगतात.

नंतर रेखाबाईने मुलाला बोर्डिंग स्कूलला घातलं. आणि आपल्या मित्रांना त्याला घरी बोलावता यावं म्हणून एक वेगळं घरदेखील घेतलं.

मोठा माणूस होत असलेल्या आपल्या मुलाबद्दल तिला अभिमान होता. त्याचं इंग्रजी माध्यमातलं शिक्षण सुरू झालं आणि बोर्डिंग स्कूलमधल्या शिस्तीने आणि राहणीमानामुळे त्या दोघांच्या आचार-विचारांमधलं अंतर वाढत गेलं. तरी तिचं मुलाबद्दलचं प्रेम आणि अभिमान कायम राहिले.

रेखाबाई त्या दिवसांची एक हृद्य आठवण पुस्तकातून सांगतात. एकदा मुलगा सुट्टीसाठी घरी आला तेव्हा त्याने जेवताना 'फोर्क अँड स्पून' मागितला.

"मला काटा-चमचा माहिती होता. पण त्याला इंग्रजीत काय म्हणतात हे कुठे माहीत होतं. मला मग त्या फोर्कसाठी थेट बाजार गाठावा लागला. आणि तिथे जाऊन कळलं तुला काय हवं होतं ते", पुस्तकात रेखाबाईंची ही आठवण आहे.

2000 च्या दशकात भारतातून कोठी आणि तवायफ संस्कृती पूर्णपणे लोप पावली होती. त्या वेळी रेखाबाई कोलकात्यामधला आपला कोठा सोडून त्याच शहरातल्या अपार्टमेंटमध्ये राहू लागल्या. गेल्या फेब्रुवारीत त्यांचं मुंबईत निधन झालं.

गायकवाड म्हणतात की, आईची प्रतिभा, तिचा आवेश, जगण्याची जिद्द कायम मला प्रभावित करत राहतील.

ते म्हणतात, "हे पुस्तक पुरुष वाचतील, अशी मला आशा आहे. भारतीय पुरुषांच्या मनात आईविषयी एक आदर्शवादी प्रतिमा ठाम असते. आई म्हणजे सात्विकतेचा पुतळा असते."

"पण मला आशा आहे की, हे पुस्तक वाचल्यानंतर ते आपल्या आईचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून विचार करतील. आपल्या तिच्याशी असलेल्या नात्यापलीकडे एक व्यक्ती म्हणून तिला आहे तशी स्वीकारतील."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)