रिव्हेंज पॉर्न : ‘आरोपीला माफ करावं म्हणून माझ्या बहिणीवर न्यायालयातही दबाव टाकण्यात आला’

इंडोनेशियातील एका रिव्हेंज पॉर्न प्रकरणात आरोपीला सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

यावर पीडितेच्या कुटुंबीयांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, ही शिक्षा पुरेशी नाहीये.

या प्रकरणात आरोपी असलेल्या अल्वी हुसेन मुल्ला याला न्यायालयाने दोषी ठरवून सहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय आरोपीच्या इंटरनेट वापरावरही बंदी घातली आहे.

यावर पीडितेच्या भावाने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "पीडितेला या घटनेचा जितका त्रास झालाय तितकी आरोपीला शिक्षा देखील झालेली नाही. या घटनेचा तिच्यावर कायम प्रभाव राहील."

हे प्रकरण इंडोनेशियातील बॅंटन प्रांतातील असून मुलीच्या संमतीशिवाय तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते.

पीडितेच्या भावाने बीबीसीला सांगितलं की, "तो आता पोलिसांकडे नवी तक्रार दाखल करणार असून लैंगिक हिंसाचार कायद्यांतर्गत आरोपींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करणार आहे.

दुसरीकडे न्यायालयाने दिलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचं सांगत पोलिस आयुक्त अमिना टार्डी यांनी म्हटलंय की, हा निकाल खूप महत्वपूर्ण आहे. यापूर्वी अशा प्रकरणात क्वचितच एखाद्या आरोपीचे इंटरनेट अधिकार रद्द करण्यात आले असतील. त्यामुळे हे न्याययंत्रणेचं यश आहे.

या प्रकरणात आरोपीला जी शिक्षा झालीय ती सोशल मीडियावर सुरू असलेल्या मोहिमेमुळे झाल्याचं पीडितेच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

पीडितेच्या कुटुंबीयांचा आरोप

पीडितेच्या कुटुंबीयांचा असा आरोप आहे की, फिर्यादी कार्यालयाने पीडितेचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, तिच्याकडे दुर्लक्ष केलं.

यावर पीडित कुटुंबाने ट्विटरवर एक थ्रेड चालवला. त्यानंतर इंटरनेटवर लोकांनी याविषयी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आणि इंडोनेशियामध्ये या प्रकरणावर चर्चा सुरू झाली.

न्यायालयाने गुरुवारी या प्रकरणातील आरोपीला शिक्षा सुनावली आहे.

26 जून 2023 रोजी पीडितेच्या भावाने ट्विटरवर या प्रकरणाबाबत एकामागून एक अनेक ट्वीट केले होते.

या प्रकरणानंतर पीडितेच्या भावाने ट्वीट करून आपली ओळख सार्वजनिक केली आहे.

त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "माझ्या बहिणीसोबत जे घडलं ते सार्वजनिकरित्या बोलणं माझ्यासाठी सुखद अनुभव नव्हता. या सगळ्यामुळे माझी बहिण मानसिक तणावात आहे."

पीडितेचा भाऊ इमान जनातुल हॅरीचं म्हणणं आहे की, माझ्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी माझ्याकडे सोशल मीडिया व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता.

त्याने सांगितलं, "हे प्रकरण जर व्हायरल नसतं झालं तर सामान्य कायदेशीर प्रक्रियेचं पालन केलं गेलं असतं. आणि त्याचा म्हणावा तसा परिणाम झाला नसता. त्यामुळे आमच्या कुटुंबाने हे प्रकरण व्हायरल करण्याचा निर्णय घेतला."

नेमकं काय झालं होतं?

इमानने ट्वीटच्या थ्रेडमध्ये सांगितलं होतं की, "ज्या व्यक्तीने माझ्या बहिणीवर बलात्कार केला त्या व्यक्तीने तिचा व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. ही धमकी तो सलग तीन वर्ष देत होता."

त्याने सांगितलं की, या काळात माझ्या लहान बहिणीला खूप मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं.

4 डिसेंबर 2022 रोजी पीडितेला एका अज्ञात इंस्टाग्राम अकाउंटवरून मेसेज आला. यात तिचा बेशुद्धावस्थेचा व्हीडिओ रेकॉर्ड करून पाठवण्यात आला होता.

इमानच्या म्हणण्यानुसार, त्याच्या बहिणीने रडत रडत त्याला सर्व काही सांगितलं. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.

प्रदीर्घ तपास प्रक्रियेनंतर अखेर 21 फेब्रुवारी 2023 रोजी आरोपीला अटक करण्यात आली.

इमानच्या म्हणण्यानुसार, या काळात त्याचं कुटुंब खूप दबावात होतं.

तो म्हणतो, "माझ्या बहिणीला बळजबरीने ओढत नेलं, तिला मारहाण केली, पायऱ्यांवर मारहाण करण्यात आली. आरोपीने माझ्या बहिणीच्या गळ्यावर सुरा ठेऊन तिला जीवे मारण्याची धमकी दिली."

इमानच्या म्हणण्यानुसार, "आरोपी माझ्या बहिणीचा व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन बॉयफ्रेंड बनण्यासाठी दबाव आणत होता."

इमानने त्याच्या बहिणीसोबत जे घडलं त्याचे तीन भागात ट्वीट केलं. त्याचं ट्वीट लाखो लोकांनी पाहिलं.

या प्रकरणी आरोपी अल्वी हुसेन मुल्ला याच्यावर आरोप निश्चिती करून सहा वर्षांची शिक्षा करण्यात आली.

इमान दावा करतो की, खटल्याच्या पहिल्या सुनावणीबाबत त्यांना किंवा त्याच्या वकिलांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.

दुसऱ्या सुनावणीला बहिणीची साक्ष नोंदवण्यासाठी बोलावलं तेव्हा त्यांना याविषयी माहिती मिळाली.

इमान सांगतो की, आरोपीला माफ करावं म्हणून माझ्या बहिणीवर न्यायालयातही दबाव टाकण्यात आला.

शिवाय न्यायालयात त्यांना इतरही अनेक आव्हानांना सामोर जावं लागलं. फिर्यादीने आपल्या लॅपटॉपमधील घटनेचा व्हीडिओ दाखवण्यासही नकार दिला होता.

न्यायालयात पीडितेची बाजू घेणारा वकील त्याच्या बहिणीलाच धमकावत होता आणि तिची बाजू योग्य प्रकारे मांडत नव्हता असा दावाही इमानने केला आहे.

न्यायालयाने अश्लील व्हीडिओ प्रकरणात आरोपीला शिक्षा सुनावली पण त्याच्यावर बलात्काराचा आरोपच ठेवला नाही.

इमान सांगतो की, माझ्या बहिणीने वारंवार सांगितलंय की, तिच्यावर बलात्कार झालाय. त्यामुळेच आम्ही या प्रकरणात नवीन तक्रार दाखल करणार आहोत.

पांडेलांग जिल्हा न्यायालयात सुनावणीवेळी न्यायाधीश म्हणाले की, आरोपीने जाणीवपूर्वक आक्षेपार्ह व्हीडिओ इंटरनेटवर शेअर केला आहे.

या प्रकरणात आरोपीला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली असून पुढील आठ वर्षं इंटरनेट वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.

असं म्हटलं जातंय की, हा निकाल इंडोनेशियामध्ये मैलाचा दगड ठरेल. एखाद्या आरोपीचे इंटरनेट अधिकार रद्द करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हे ही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)