सख्ख्या भावानं ठेवलेल्या शरीरसंबंधांतून बहीण गर्भवती, DNA चाचणीतून आलं समोर

सख्ख्या भावानं ठेवलेल्या शरीरसंबंधांतून अल्पवयीन बहीण गर्भवती राहिल्याचं डीएनए चाचणीतून समोर आलं आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आलं आहे.

त्यानुसार, पीडितेचा सख्खा भाऊ आणि मावस भावजी यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (2) (एन), (एफ), (जे) 506, 34 आणि पॉक्सो कलम 4, 5 (जे) (2) (एल) (एन) 6,8,12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणातील आरोपी क्रमांक 1 असलेल्या पीडितेच्या मावस भावजीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं जामीन मंजूर केला आहे.

संशयित मावस भावजीवर आरोप सिद्ध होत नसल्यामुळे त्याला न्यायालयानं जामीन मंजूर केल्याचं न्यायालयानं म्हटलंय.

तर आरोपी क्रमांक दोन म्हणजेच पीडितेचा भाऊ सध्या तुरुंगात आहे.

प्रकरण काय?

औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका गावातील अल्पवयीन मुलीनं मावस भावजीनं आपला बलात्कार केल्याचा FIR स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये दाखल केला होता.

यात तिनं म्हटलं होतं की, “माझ्या मावस बहिणीचा पती घरी कोणी नसताना आमच्या घरी आला होता. त्यावेळी तो मला म्हणाला की, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू जर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाही तर तुझ्या पोटात चाकू भोकसून तुला जिवंत मारून टाकील. असं म्हणत त्यानं बळजबरीनं माझ्या इच्छेविरुद्ध शारीरिक संभोग केला.

“त्यानंतर मामाच्या घरी असतानाही मावस बहिणीचा पती तिथं आला आणि बळजबरीनं माझ्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. मी भीतीपोटी ही घटना घरात कुणालाही सांगितली नाही.

“त्यानंतर मला मासिक पाळी येत नसल्यानं मी माझी आई आणि आजी यांना सांगितलं. पुढे आम्ही तीन महिने मासिक पाळी येण्याची वाट पाहिली. त्यानंतर मी माझ्या आईला मावस बहिणीच्या पतीनं माझ्यासोबत दोनदा बळजबरीनं शारीरिक संबंध ठेवल्याचं सांगितलं. आईच्या सांगण्यावरुन प्रेगन्सी कीट घरी आणून तपासणी केली असता मी गरोदर असल्याचं आम्हाला समजलं. त्यानंतर पोलिस स्टेशनला येऊन तक्रार दिली.”

पीडितेनं पुरवणी जबाबात काय म्हटलं?

त्यानंतर या पीडितेचा गर्भपात करण्यात आला. तिच्या डीएनएचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.

काही दिवसांनी पीडितेनं 18 मार्च 2023 रोजी पुरवणी जबाब दिला. त्यामध्ये तिनं सख्ख्या भावानेच आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचं नमूद केलं.

या जबाबात तिनं म्हटलं, “नाताळच्या सुट्ट्या लागल्यानं मी भावासोबत घरी आले होते. त्यादिवशी भावानं माझी इच्छा नसताना बळजबरीनं शारीरिक संबंध ठेवले. मी 10 दिवस घरी असताना भावानं माझ्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.

“त्यानंतर माझा भाऊ मला एका दवाखान्यात घेऊन गेला. तिथं माझी सोनोग्राफी केली आणि मी 4 महिन्यांची गरोदर असल्याचं त्यानं मला सांगितलं.

“मी घरी येऊन हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे, असं भावाला म्हटलं. तेव्हा तो म्हणाला की, तू दुसरे कुणाचीही नाव सांग. पण माझे नाव जर कोणाला सांगितले तर मी माझा जीव देईन, अशी धमकी त्यानं मला दिली होती. म्हणून मी आजपावेतो त्याचं नाव कुणालाही सांगितलं नाही.”

दरम्यान, पीडितेच्या पोटातील गर्भ हा तिच्या सख्ख्या भावाचा होता, हे या प्रकरणातील डीएनए चाचणीतून समोर आलं आहे.

आरोपीची उच्च न्यायालयात धाव

या प्रकरणात पीडितेचा मावस भावजी आणि भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मावस भावजीनं स्थानिक न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला, पण तो फेटाळण्यात आला.

त्यानंतर त्याने अॅड. रवींद्र गोरे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला.

5 जुलै 2023 रोजी या प्रकरणाची न्यायमूर्ती एस.जी.मेहरे यांच्या एकल पीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी न्यायालयानं निष्कर्ष दिला की, “या प्रकरणात पीडितेचा मावस भावजी यांच्याविरोधात कोणताही आरोप सिद्ध होत नाही. त्यांच्यावर केलेले आरोप हे संशयास्पद आहे. त्यामुळे पीडितेचा मावस भावजी यांना जामीन देण्यात येत आहे.”

अॅड. रवींद्र गोरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, “पीडितेच्या मावस भावजीवर केलेले आरोप संशयास्पद असल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलं आहे. म्हणून कोर्टानं त्यांना जामीन दिला आहे. आता इथून पुढे ही केस सत्र न्यायालयात चालेल.”

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)