हिजबुल्लाह बरोबरच्या शस्त्रसंधीनंतर इस्रायलचे काही नागरिक का करत आहेत युद्ध सुरू ठेवण्याची विनंती?

उत्तर इस्रायलमधल्या आपल्या घरांमध्ये परतण्याची लोकांना भीती वाटतेय.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, उत्तर इस्रायलमधल्या आपल्या घरांमध्ये परतण्याची लोकांना भीती वाटतेय.
    • Author, लुसी विल्यमसन
    • Role, बीबीसी न्यूज
    • Reporting from, जेरुसलेम

इस्रायल आणि लेबनॉन देशातल्या हिजबुल्लाह या अतिरेकी संघटनेत सुरू असलेल्या युद्धाला अखेर विराम मिळालाय. गेले वर्षभर इस्रायल सात आघाड्यांवर युद्ध लढत आहे. त्यामुळं हिजबुल्लाहसोबत झालेला शस्त्रसंधी हे महत्त्वाचं यश असल्याचं इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेन्जामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे.

इस्रायलने हिजबुल्लाहला इतकं कमकुवत करून सोडलं आहे की, संघटना काही दशकं मागं ढकलली गेली. या संघटनेत आता आधीसारखी धमक राहिली नाही, असंही नेतन्याहू पुढे म्हणाले.

गाझा, लेबनॉन आणि इतर सगळ्याच ठिकाणी इस्रायल काय कारवाई करत आहे याकडं सगळ्यांचंच लक्ष होतं. अनेक देशांना अमान्य असतानाही स्वतःला महत्त्वाची वाटते वाटते तीच भूमिका इस्रायलने नेहमी घेतली आहे, असं नेतन्याहू म्हणाले.

शस्त्रसंधीचं समर्थन करताना इस्रायलला इराणच्या धोक्यावर लक्ष केंद्रीत करता येईल असं नेतन्याहू म्हणाले. पण हिजबुल्लाहकडून पुन्हा धमकी देण्यात आली तर इस्रायल त्यांच्यावर कारवाई करताना मागेपुढे पाहणार नाही, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

गेल्या 24 तासात लेबनॉनमधल्या 180 भागांवर हल्ले केले असल्याचं इस्रायलच्या लष्करानं मंगळवारी म्हटलं होतं. दुसरीकडं इस्रायलमध्येही लेबनॉनकडून होऊ शकणाऱ्या रॉकेट आणि ड्रोन हल्ल्यांची सूचना सीमेवरच्या लोकांना सतत दिली जात होती.

ही शस्ंत्रसंधी म्हणजे आपण शरण आलो असा अर्थ कोणी घेऊ नये, असं दोन्हीही पक्षांचं मत आहे.

पण, नेतन्याहू यांचे राजकीय शत्रू आणि काही मित्रही नेमका 'शरणागती' हाच शब्द वापरत आहेत.

मंगळवारी घेण्यात आलेल्या एका जनमत चाचणीत नेतन्याहू यांचं समर्थन करणाऱ्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचा या शस्त्रसंधीला विरोध होता, हे समोर आलं. शिवाय, उत्तर इस्रायलमधल्या मोठ्या संख्येनं विस्थापित झालेल्या लोकांनीही संताप व्यक्त केला.

देशभरात लोकं दोन विचारात विभागले गेलेत. दुसऱ्या एका जनमत चाचणीत 37 टक्के लोकांनी शस्त्रसंधीच्या बाजूनं आणि 32 टक्के लोकांनी विरोधात मत दिलं. तर 31 टक्के लोकांनी याबद्दल काहीही माहिती नसल्याचं म्हटलं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

युद्धविराम हा एक बेजबाबदारपणे आणि घाईत घेतलेला राजकीय निर्णय असल्याचं शेली यांचं म्हणणं आहे. त्या श्लोमी शहरात इंग्रजीच्या शिक्षिका आहेत.

रोना वॅलेन्सी या किबुत्झमधील केफर गिलाडी भागातून गेल्या वर्षी 8 ऑक्टोबरला विस्थापित झाल्या होत्या. त्यांच्या मते, शस्त्रसंधी गरजेची होती. कारण त्यातूनच घरी परतण्याचा त्यांचा मार्ग मोकळा होणार होता. पण त्यांच्या आणि आसपासच्या गावांमध्ये लेबनिज रहिवासीही परतणार असल्याचं कळल्यावर त्यांचा हिरमोड झाला.

केफर गिलाडीपासून ओडाइसेह हे लेबनॉनमधलं गाव अगदी स्पष्ट दिसतं.

“हिजबुल्लाह या गावांमध्ये घुसखोरी करून काही नवं कारस्थान करणार नाही एवढीच आशा मी ठेवू शकते,” असं रोना बीबीसीशी बोलताना म्हणाल्या. “ही गावं आणि त्यात माणसं (लेबनिज) नसतील तरच मला सुरक्षित वाटू शकतं,” त्या पुढे म्हणाल्या.

लेबनॉन इस्रायलच्या सीमेवरच्या गावातून हिजबुल्लाह पुन्हा संघटनेची उभारणी करेल याची काळजी रोना वॅलेन्सी यांना वाटते.
फोटो कॅप्शन, लेबनॉन इस्रायलच्या सीमेवरच्या गावातून हिजबुल्लाह पुन्हा संघटनेची उभारणी करेल याची काळजी रोना वॅलेन्सी यांना वाटते.

सुरक्षित वाटण्यासाठी शस्त्रसंधीची नाही तर लोकांनी आपण कोण आहोत, कुठे आहोत या विसरलेल्या गोष्टी पुन्हा समजून घ्यायची गरज आहे, असं रोना यांचे पती, ओन यांना वाटतं.

सीमा भागातल्या लोकांना सुरक्षित वाटावं यासाठी लेबनॉन किंवा अमेरिकेचं लष्कर काही करेल यावर त्यांचा विश्वास उरलेला नाही.

“माझा फक्त माझ्या देशाच्या सैन्यावर विश्वास आहे. ते सैन्य तिथे नसेल तर नागरिकांना पुन्हा तिथे आणणं फार अवघड होईल,” असं ते म्हणाले.

केफर गिलाडीपासून ओडाइसेह हे लेबनॉनमधलं गाव अगदी स्पष्ट दिसतं.
फोटो कॅप्शन, केफर गिलाडीपासून ओडाइसेह हे लेबनॉनमधलं गाव अगदी स्पष्ट दिसतं.

या युद्धानं इस्रायलला भरपूर लष्करी यश मिळालं आहे - हिजाबुल्लाह कमकुवत झाली आहे, त्यातली शस्त्रास्त्र संपली आहेत, इमारती मोडल्या आहेत आणि हमासमागचा त्यांचा पाठिंबाही कमी झाला आहे.

पण त्याचसोबत इस्रायलचं सैन्यही थकलं आहे, अर्थव्यवस्थेवर ताण आला आहे आणि हजारो नागरिक विस्थापित झालेत.

तरीही लेबनॉनमधलं युद्ध सुरू ठेवण्यासाठी अनेकजण बेंजामिन नेतन्याहू यांना विनंती करत आहेत. संपूर्ण विजय मिळत नाही तोपर्यंत गाझामधला संघर्ष चालू ठेवण्याचं वचन देणारा राष्ट्राध्यक्ष उत्तरेकडे सुरू असलेल्या युद्धविरामावर सही कशी करतो असा त्यांचा सवाल आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.