बांगलादेशातील हिंदू का आंदोलन करत आहेत, चिन्मय कृष्ण दास कोण आहेत?

बांगलादेशच्या कोर्टाने बांगलादेश संमिलित सनातनी जागरण जोतचे प्रवक्ते आणि चितगाव येथील पुंडरिक धामचे माजी प्रमुख चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी (38) यांना जामीन नाकारला आहे.
बांगलादेशातल्या स्वातंत्र्य स्तंभावरील राष्ट्रध्वजाची विटंबना केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांगलादेश दंड संहितेच्या कलम 120(ब), 124(अ), 153(अ), 109 and 34 अन्वये चिन्मय कृष्ण दास यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता.
चिन्मय दास यांना जाणारी तुरुंग प्रशासनाची गाडी अजूनही न्यायालयाच्या आवारातच आहे. न्यायालयाच्या आवारात निदर्शने सुरू आहेत. या जामीन अर्जावर पुन्हा एकदा सुनावणी होऊ शकते.
आज (26 नोव्हेंबर) त्यांना चितगावच्या कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या देशद्रोहाच्या खटल्यात चितगावच्या सहाव्या महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. याच न्यायालयातील सुनावणीनंतर न्यायाधीश काझी शरीफुल इस्लाम यांनी हा आदेश दिला.


जामीन नाकारूनही, न्यायालयाने धार्मिक आधारावर कैद्यांचं तुरुंगातलं विभाजन आणि धार्मिक प्रथा पाळण्याची परवानगी मागणाऱ्या दोन याचिकांना परवानगी दिली.
चिन्मय कृष्ण दास यांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांमध्ये दावा केला आहे की, त्यांच्यावर लावलेले आरोप निराधार आहेत.
चिन्मय दास यांच्या सुटकेसाठी भारताने प्रयत्न करावेत - इस्कॉनची विनंती
चिन्मय कृष्ण दास यांच्या अटक प्रकरणात इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा कॉन्शअसनेस म्हणजेच इस्कॉनने भारताच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. इस्कॉनतर्फे एक निवेदन जारी करून ही विनंती करण्यात आली आहे.
इस्कॉनच्या एक्स हॅन्डलवर हे निवेदन जारी करण्यात आलं आहे. या निवेदनात इस्कॉनचा दहशतवादाशी संबंध असल्याचे आरोप फेटाळण्यात आले आहेत. या ट्विटमध्ये इस्कॉनने म्हटलं आहे की, "भारत सरकारने बांगलादेश सरकारसोबत तात्काळ चर्चा करण्याची विनंती आम्ही करत आहोत. इस्कॉन हे एक शांततापूर्ण भक्ती चळवळ असल्याचं भारत सरकारने बांगलादेशला सांगावं."
इस्कॉनचे नेते चिन्मय कृष्ण दास यांच्या सुटकेची मागणी देखील इस्कॉनतर्फे करण्यात आली आहे. चिन्मय कृष्ण दास यांना बांगलादेशची राजधानी ढाका येथून सोमवारी (25 नोव्हेंबर) अटक करण्यात आली होती.

फोटो स्रोत, @ISKCONINC
ढाका महानगर पोलिसांचे मोहम्मद तालेबर रहमान यांनी बीबीसी बांगलाला सांगितलं की, त्यांना "त्यांना काही ठराविक आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेची माहिती देण्यात येईल."
बांगलादेशातील संमिलित सनातनी जागरण जोत ही संघटना मागच्या काही महिन्यांपासून देशभर वेगवेगळी आंदोलनं आणि कार्यक्रम आयोजित करत असतं. 5 ऑगस्ट रोजी बांगलादेशातील आवामी लीगचं सरकार कोसळल्यानंतर ही आंदोलनं केली गेली. बांगलादेशातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्यांक समुदायावर होणाऱ्या अत्याचाऱ्यांविरोधात ही आंदोलनं केली गेली.
देशद्रोहाच्या खटल्यातील सहभागाला सूट दिली जाणार नाही
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे स्थानिक सरकार, युवा आणि क्रीडा सल्लागार आसिफ महमूद साजिब भुईया म्हणाले की, "देशद्रोहाच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग असल्यास कोणतीही सूट दिली जाणार नाही."
मंगळवारी रंगपूर येथे एका कार्यक्रमात आसिफ महमूद बोलत होते.

फोटो स्रोत, SHARIER MIM
या भाषणात बोलताना ते म्हणाले की, "बांगलादेशच्या सार्वभौमत्वाला धोका असेल किंवा स्वातंत्र्यामध्ये कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ होत असेल, आणि देशाचा अपमान होत असेल तर सरकार निश्चितपणे कठोर कारवाई करेल."
त्यानंतर ते म्हणाले की, "अटक झाल्याच्या घटनेभोवती देशातील परिस्थिती अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की देशद्रोहासारख्या घटनेत कोणीही सहभागी असेल, मग तो कोणीही असो, कितीही मोठा नेता असो, त्याला कोणतीही सूट दिली जाणार नाही."
आसिफ महमूद साजिब भुईया म्हणाले की, "या प्रकरणात देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याला प्राधान्य दिलं जाईल. एखाद्या ठराविक धर्माचा विचार करून निर्णय घेतले जाणार नाहीत."
या घटनेच्या पार्श्वभूमीवर काल देशभरात अनेक हिंदूंनी निदर्शने केली. आजही चिन्मय दास यांच्या अनुयायांनी न्यायालयाच्या आवारात निदर्शने केली.
दरम्यान, जामीन नाकारण्याच्या आदेशानंतर तुरुंग प्रशासनाच्या गाडीतून बोलताना चिन्मय दास यांनी त्यांच्या अनुयायांना शांततेने आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.
एका व्हिडिओमध्ये दास असे म्हणताना दिसत आहेत, “राज्य अस्थिर झाले आहे आणि शांततापूर्ण सहजीवन नष्ट झाले होईल असं आम्ही काहीही करणार नाही. भावनांवर नियंत्रण ठेवून, भावनांचे बळात रूपांतर करून शांततापूर्ण आंदोलन करा."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











