'शेवटच्या चेंडूपर्यंत खेळा', इम्रान खान यांचा समर्थकांना तुरुंगातून आदेश; पाकिस्तानात नेमकं काय घडतंय?

पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेची आणि नुकत्याच झालेल्या निवडणुका रद्द करण्याची मागणी करत, पाकिस्तानमधील तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी मंगळवारी (26 नोव्हेंबर) इस्लामाबादमध्ये आंदोलन केलं.

या आंदोलनामध्ये इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांनी देखील सहभाग घेतला आहे. किंबहुना, त्यांनीच आंदोलनाचं नेतृत्व केलं.

मात्र, पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमध्ये पीटीआय पक्षाच्या समर्थकांना पोलीस आणि रेंजर्सनी ब्लू एरियामधून हटवण्यात आता यश मिळवलं आहे.

पाकिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांना हटवण्याच्या मोहिमेमध्ये संरक्षण दलांनी शेकडो लोकांना अटक केली आहे.

बुशरा बीबी करत होत्या नेतृत्व

इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी या गेल्या महिन्यातच तुरुंगातून जामीनावर बाहेर आल्या आहेत. बुशरा बीबींनी पहिल्यांदाच याप्रकारे एखाद्या राजकीय आंदोलनामध्ये सहभाग घेतल्याचं दिसून आलं.

या दरम्यानच माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी असा इशारा दिला होता की, जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत ते मागे हटणार नाहीत.

इम्रान खान यांच्या 'एक्स' अकाऊंटवरुन प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये त्यांनी आपल्या पक्षाला 'शेवटच्या चेंडूपर्यंत खेळण्याचा' संदेश दिला होता.

मंगळवारी इस्लामाबादमध्ये संरक्षण दल आणि पीटीआयच्या समर्थकांमध्ये हिंसक धुमश्चक्री पहायला मिळाली. इम्रान खान या त्यांच्या नेत्यांची सुटका करण्यात यावी, अशी त्यांची मागणी होती.

एकेकाळी क्रिकेटपटू असणारे इम्रान खान पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले होते. 72 वर्षीय इम्रान खान यांना 2022 साली सत्तेतून पायउतार व्हावं लागलं.

त्यानंतर त्यांच्यावर अनेक खटले दाखल करण्यात आले. इम्रान खान यांना मे 2023 मध्ये पहिल्यांदा अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी इस्लामाबादच्या ब्लू एरियामध्ये पीटीआय आंदोलकांच्या विरोधात रेंजर्स आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईला दुजोरा दिला आहे.

पाकिस्तानच्या जिओ न्यूजशी बोलताना पंतप्रधानांचे सल्लागार म्हणाले की, आंदोलकांमध्ये गंभीर गुन्हेगार सामील असल्याची माहिती आमच्याकडे होती, त्यामुळे रेंजर्स आणि पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई केली.

पुढे, राणा सनाउल्ला यांनी म्हटलं आहे की बुशरा बीबी आणि अली अमीन हे रेंजर्स आणि पोलिसांच्या कारवाईदरम्यान गंडापूर आंदोलनाच्या ठिकाणाहून 'पळाले' आहेत.

सुमारे 500 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याचं ते सांगतात

इम्रान खान काय म्हणाले होते?

इम्रान खान यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलं होतं की, "लष्करी न्यायालयामध्ये खटल्याची धमकी देणाऱ्यांना माझा संदेश आहे की, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, मी मागे हटणार नाही."

जे लोक अद्यापही आंदोलनामध्ये सहभागी झालेले नाहीत, त्यांनाही डी-चौकामध्ये पोहोचण्याचं आवाहन इम्रान खान यांनी केलं होतं.

इम्रान खान यांनी असा आरोप केला होता की, गृहमंत्री मोहसीन नक्वी यांच्या आदेशानंतरच, रेंजर्स आणि पोलिसांनी पीटीआय पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार केला. हे कार्यकर्ते शांततेमध्ये आंदोलन करत होते. मात्र, या गोळीबारात अनेक लोक मारले गेले तसेच जखमीही झाले.

मोहसीन नक्वी यांना या कृत्याचा हिशेब द्यावा लागेल, असंही इम्रान खान यांनी म्हटलं होतं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

आंदोलकांना शांतता बाळगण्याचं आवाहन करत पीटीआय पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांनी म्हटलं होतं की, या आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी एकजुटीने दृढनिश्चय केला पाहिजे.

इस्लामाबादमधील या आंदोलनादरम्यान पोलीस आणि पीटीआय कार्यकर्त्यांच्या दरम्यान झालेल्या धुमश्चक्रीमध्ये अनेक पत्रकारांना आंदोलकांकडून लक्ष्य करण्यात आल्याचंही वृत्त आहे.

पीटीआय कार्यकर्त्यांचं आंदोलन

फोटो स्रोत, Getty Images

स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या पत्रकारांचं असं म्हणणं आहे की, आंदोलकांनी या पत्रकारांसोबत फक्त धक्काबुक्की केली नाही तर त्यांच्या साहित्याचंही नुकसान केलं.

'इन्डीपेंडेंट उर्दू' या माध्यमाच्या पत्रकार ऐनी शिराजी यांनी बीबीसी प्रतिनिधी फरहत जावेद यांच्याशी बोलताना म्हटलं होतं की, त्यांना डी-चौकामध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या कार्यकर्त्यांनी धमकी देऊन घाबरवलं.

लाल रेष

या बातम्याही वाचा:

लाल रेष

डी-चौकात गोळीबार

इस्लामाबाद पोलिसांचं असं म्हणणं आहे की, तहरीक-ए-इन्साफचे कार्यकर्ते रेड झोनमधील डी-चौकात आल्यानंतर अज्ञात लोकांकडून गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये कमीतकमी सहा लोक जखमी झाले आहेत.

पोलिसांचं असं म्हणणं आहे की, यातील सर्व जखमी हे पीटीआय पक्षाचे आंदोलक आहेत. मात्र, हा गोळीबार कुणी केला, याबाबत अद्याप काहीही माहिती उपलब्ध नाही.

सध्या डी-चौकामध्ये पोलिस आणि रेंजर्सचे सैनिक तैनात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. इथे पोहोचण्यासाठी बुशरा बीबी ज्या कंटेनरमधून आल्या, तो कंटेनर सुरक्षा रक्षकांनी दुसऱ्या बाजूला नेला.

डी-चौक मंगळवारी सायंकाळपर्यंत पूर्णपणे रिकामा झाला होता तसेच पीटीआयचे कार्यकर्ते आसपासच्या परिसरामध्ये पोलिसांपासूनच स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसून आले, अशी माहिती बीबीसी प्रतिनिधी फाखिर मुनीर यांनी दिली.

पीटीआय कार्यकर्त्यांचं आंदोलन

फोटो स्रोत, Getty Images

तहरीक-ए-इन्साफचे कार्यकर्ते इस्लामाबादच्या डी-चौकामध्ये जाऊन इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आंदोलन करण्याच्या मागणीवर अडून होते.

सरतेशेवटी मंगळवारी दुपारनंतर तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या या आंदोलकांना इस्लामाबादमधील रेड झोनमध्ये असलेल्या डी-चौकापर्यंत पोहोचण्यात यश आलं होतं.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हीडिओमध्ये काही आंदोलक डी-चौकात ठेवलेल्या कंटेनर्सवर उभे राहून जल्लोष करताना दिसून आले होते.

पोलीस आणि अर्धसैनिक दलांनी आंदोलकांना रोखलं नाही, असं इस्लामाबादचे डेप्यूटी कमिशनर इरफान नवाज मेमन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं.

मंगळवारी काय काय घडलं?

याआधी खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर आणि बुशरा बीबी या देखील एका कंटेनरमधधून डी-चौकात पोहोचण्यासाठी निघाले होते. मात्र, पीटीआयचे कार्यकर्ते कंटेनर आणि बॅरिकेड्स पार करुन त्यांच्या आधीच डी-चौकात पोहोचले होते.

आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत डी-चौकामध्ये धरणे आंदोलन करण्याची घोषणा बुशरा बीबी आणि अली अमीन गंडापूर यांनी केली आहे, अशी माहिती खैबर पख्तुनख्वाच्या मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित असलेले पीटीआय पेशावरचे प्रदेश अध्यक्ष अरबाब नसीम यांनी बीबीसीला दिली होती.

पीटीआय कार्यकर्त्यांचं आंदोलन

फोटो स्रोत, Getty Images

डी-चौक हा इस्लामाबाद शहरातील एक मोठा चौक आहे. या चौकाच्या परिसरातच अनेक महत्त्वाच्या सरकारी इमारती आहेत. यामध्ये पंतप्रधान कार्यालय, संसद तसेच सुप्रीम कोर्टाचाही समावेश आहे.

पाकिस्तानमध्ये या चौकाला 'डेमोक्रसी चौक' असंही म्हटलं जातं. सामान्यत: या चौकाचा वापर राजकीय सभांसाठी केला जातो. अनेकवेळा मोठमोठ्या सभांमुळे इस्लामाबादमध्ये ट्राफीक जॅम होताना दिसून येतो.

आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत

सध्या या चौकामधील हवेमध्ये अश्रूधूर आहे. त्यामुळे डोळ्यांमध्ये चुरचुरणे तसेच घशात खवखव होण्याची समस्या जाणवत आहे.

रस्त्यावर मोठमोठी दगडं आहेत. बॅरिकेड्स तुटले असून अश्रूधुराच्या रिकाम्या नळकांड्या रस्त्यावर पडल्याचं दिसून आलं.

आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी प्रशासनाने लावलेले कंटेनर हटवण्यात पीटीआयच्या कार्यकर्त्यांना यश आलं होतं.

बीबीसी उर्दूने काही स्थानिक लोकांशी चर्चा केली. या सगळ्या आंदोलनामुळे त्यांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे.

पीटीआय कार्यकर्त्यांचं आंदोलन

फोटो स्रोत, Getty Images

मंगळवारी रात्री झालेल्या या धुमश्चक्रीमुळे आपल्या मुलांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जावं लागलं, असं एका व्यक्तीने सांगितलं.

गोळीबार आणि धुरामुळे आपल्या मुलीला रात्रभर श्वास घेण्यामध्ये अडचण निर्माण झाल्याचं दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितलं.

बीबीसीने आंदोलकांशीही चर्चा केली. खैबर पख्तुनख्वामधील एका व्यक्तीने हसत हसत म्हटलं की, "मी रात्री फूटपाथवर झोपलो. मला आता या अश्रूधुराची सवय झाली आहे, त्यामुळे मला कशाचीही काळजी वाटत नाही."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)